सैनिकहो, तुमच्यासाठी!

विवेक मराठी    24-May-2018
Total Views |

 


 

भारतीय जवानांसाठी काम करणा-या संस्था व व्यक्ती फारच थोडया आहेत. योगेश आणि सुमेधा चिथडे हे त्यांपैकीच. या दांपत्याने सुरू केलेल्या 'सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन' अर्थात 'सिर्फ' या संस्थेने जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच सियाचीनमध्ये जवानांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा ध्यास घेतला आहे.


समाज आदर्श कोणाला मानतो, आयडॉल कोणाला मानतो ह्यावरून समाज आणि त्याची दिशा ओळखता येऊ शकते. कुठेतरी फिल्म जगतातल्या हिरोला न्यायालयीन शिक्षा होते, माध्यमे पूर्णवेळ त्या घटनेला वाहून घेतात, त्याच दरम्यान अवघा 20 वर्षांचा शुभम मातृभूच्या सेवेसाठी शत्रूच्या गोळया झेलत हुतात्मा होतो आणि त्याची बातमी कोणाच्या लक्षातही राहत नाही. त्याने नक्की काय काम केलं, कुठे मृत्यू आला, त्याच्या कुटुंबीयांनी हा धक्का कसा सहन केला, त्यांना काही मदत मिळाली का, अशा कोणत्याही नोंदी मेंदू मागत नाही, ठेवत नाही, कधी आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. मात्र ह्याच समाजात जिथे आवश्यक आहे तिथे ही पोकळी भरून काढायचं काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्यामुळेच हे जग चालू आहे. अशी आस्था बाळगणाऱ्या निवडक लोकांपैकी योगेश चिथडे आणि सुमेधा चिथडे हे दांपत्य.


देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी अनेक कामं ह्या दांपत्याने सुरू केली, त्याला आता २० वर्षं होतील. योगेश चिथडे यांनी वायुदलामध्ये काही वर्षं नोकरी केल्यानंतर सध्या ते स्टेट बँकेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर सुमेधा चिथडे ह्या गेली २६ वर्षं माध्यमिक शाळेत अध्यापनाचं काम करत आहेत. ''आपल्या सगळयांच्याच मनात सैनिकांविषयी आत्मीयता असते. मात्र समाजकार्य म्हणून आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो, असं तुम्हाला कसं वाटलं?'' या प्रश्नाने मी केवळ सुरुवात केली. त्यानंतर दोघेही - विशेषतः सुमेधाताई भरभरून बोलत होत्या. ''आपण सगळयांनी कोणता ना कोणता झेंडा हातात घेतला आहे. मात्र जात, धर्म, प्रांत असे सगळे भेदभाव विसरून खऱ्या अर्थाने देशाची सेवा जर आज कोणी करत असेल, तर तो देशाचा सैनिक आहे. 'वर्दीशी इमान' आणि 'प्राणांचं सर्वोच्च बलिदान' देणारे सैनिक हे नेहमीच माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बरोबरीने प्रेरणास्थान राहिले आहेत. १९९९ साली मी माझ्या शाळेतील मुलींना क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिटयूटमध्ये राखीबंधनासाठी घेऊन गेले होते. तेव्हा काहींना लढताना आलेलं अपंगत्व, त्यांची निष्ठा, शिस्त हे सगळं बघून खूप भारावून गेले होते. त्यानंतर आम्ही सैनिकांबरोबर किंवा त्यांच्या परिवारांबरोबर खूप सणवार साजरे केले आणि त्याचं अमूल्य समाधान आम्हाला मिळतं.'

'
१९९९ नंतर सुमेधाताई दर वर्षी नियमितपणे पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवर रुजू असणाऱ्या सैनिकांसाठी संक्रांतीला तिळगूळ, राखीपौर्णिमेला राख्या, तर दिवाळीला फराळ, भेटकार्डं पाठवतात. पण अशा प्रासंगिक देशप्रेम व्यक्त करून त्या थांबत नाहीत. बहुतेक वेळा उपचार म्हणून किंवा प्रातिनिधिक म्हणून आजकाल खूप जणी सैनिकांना राख्या बांधतात. मात्र एकूणच सैन्याविषयी आदराची आणि कृतज्ञतेची भावना मनात जोपासणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. सुमेधाताई म्हणतात, ''आपल्या सैनिक बांधवांचं स्मरण आपल्याला रोज व्हायला पाहिजे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून येऊन ते वाळवंट, जंगल, बर्फ अशा कोणत्याही दुर्गम भागात आपल्या रक्षणार्थ दक्ष असतात. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून, सर्व सुखांचा त्याग करून ते आपलं कर्तव्य बजावत असतात. तेव्हा आपण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी एक दिवाही लावू शकत नाही का?''

सुमेधाताई आणि योगेशदा हे वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष जाऊन भेटतात. त्यासाठी भारतभरात कुठेही ते स्वखर्चाने प्रवास करतात. आणि केवळ एकदा औपचारिक भेटच घेऊन थांबत नाहीत, तर कुटुंबाला आवश्यक ती सगळी मदत करतात. हुतात्मा सैनिकाची नुकतीच लग्न झालेली पत्नी असू शकते. तिला मानसिक आधार देऊन उभं करावं लागतं. तिने शिक्षण अर्धवट सोडलं असेल, तर शिक्षणासाठी वा नोकरी-व्यवसायासाठी प्रवृत्त करणं, पुनर्विवाहाविषयक तिचा कल जाणून घेणं, शासनाची मदत मिळाली आहे की नाही, त्यासाठी प्रयत्न करणं, मुलांच्या शिक्षणासाठी आणि पायावर उभं राहण्यासाठी सहकार्य करणं, अशा अनेक बाबींवर कुटुंबाला आधार लागत असतो. कुटुंबाची गरज ओळखून शक्य त्या त्या सर्व गोष्टी चिथडे पतिपत्नी करतात. फोनवर संपर्कात राहतात, पुन्हा पुन्हा भेटत राहतात.

चिथडे दांपत्याला केवळ स्वत:च्या समाधानापुरतं लाक्षणिक काम करण्याची इच्छा नाही. कृतज्ञतेची ही भावना समाजात सर्वदूर पोहोचली पाहिजे, खासकरून मुलांपर्यंत आणि युवकांपर्यंत ही पोहोचली की पूर्ण पिढी प्रेरित होईल, असं त्यांना वाटतं. ''आम्ही त्यासाठी सैनिक बांधवांच्या शौर्य, पराक्रम, त्याग अशा गुणांचा गौरव करणं, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा, त्यागाचं मोल जनमानसात पोहोचवणं यासाठी अनेक शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, विद्यार्थी मेळावे, समारंभ इथे जाऊन 'सर्व्हिस बिफोर सेल्फ' ह्या एक तासाच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सादरीकरण करतो. त्यानिमित्ताने लोकांमध्ये त्या भावना निर्माण होऊन आमच्या कार्यात अनेक जण जोडले जातात. ह्या कार्यक्रमात जाणीवजागृती हा विचार आहेच, तसंच अधिकाधिक तरुण तरुणींनी 'सैन्यदल' हे आपलं कार्यक्षेत्र निवडावं ह्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती ह्या सादरीकरणामध्ये आहे. सैनिकांच्या प्रेरणादायी कहाण्या आणि सैन्यदल कार्यक्षेत्राविषयी माहितीमुळे अनेक तरुण-तरुणींनी ह्यामधून प्रेरणा घेतली आहे.''

आपल्या नोकरी-व्यवसायानंतर केलेलं 'पार्ट टाइम' काम म्हणून सुमेधाताई आणि योगेशदा ह्याकडे बघत नाहीत, तर दिवसरात्र त्यांच्या मनात हा ध्यास असतो. सुमेधाताई ओम पैठणेबद्दल खूप अभिमानाने सांगतात. ''ओम बी.एससी.नंतर ओला कॅब चालवू लागला. एकदा एक कर्नल त्याच्या कॅबमध्ये बसले. त्यांच्याशी बोलता बोलता कर्नलनी त्याला आर्मीबद्दल थोडी माहिती दिली. त्यामधून प्रेरणा घेऊन त्याने सी.डी.एस.ची परीक्षा दिली, ऑॅफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नईचं खाजगी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज तो सैन्यदलात अधिकारी आहे. आम्ही त्याला घरी बोलावून त्याचा गौरव केला. तो आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. त्याच्या तीन आई आहेत असं तो आज अभिमानाने सांगतो. एक जन्मदात्री, दुसरी मातृभूमी आणि तिसऱ्या सुमेधाताई. पहिल्या पगारातील मोठा भाग त्याने आमच्या कार्यासाठी दिला. असेच दहशतवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेले हुतात्मा सातप्पा पाटील यांच्या पत्नीशी आम्ही सातत्याने संपर्कात होतो. पतीचा अल्प सहवास लाभलेली अश्विनी मानसिकरित्या खचून गेली होती. आम्ही निपाणीला तिला भेटायचो, फोनवर बोलायचो. ती, तिचे आई-वडील घरी यायचे जायचे. ह्या बोलण्यातून तिला बळ मिळालं आणि त्यामुळे पतिनिधनानंतर शासनाकडून मिळालेली 20 लाख रुपयांची मदत तिने पतिइच्छेचा मान राखून मुलींची शाळा उभारण्यासाठी निधी म्हणून दिला. एवढं करून ती थांबली नाही, तर आपल्या छोटया नोकरीतून साठवलेले 3 लाख रुपयेही तिने पुन्हा शाळेला दिले. स्वत: आधी सेवेचा हा मंत्र ती पतीप्रमाणेच खरोखर जगली.''
'शिवाजी जन्माला यावा तो शेजाऱ्याच्या घरी' असं प्रत्येक जणच म्हणत असतो. पण चिथडेंच्या घरी मात्र 'आधी केले मग सांगितले' हेच खरं आहे. त्यांच्या एकुलत्या एका मुलाने सैन्यदल करिअर निवडावं यासाठी त्यांनी कोणतीही सक्ती न करता सर्व संधी उपलब्ध करून दिल्या. ''आम्ही त्याला एनडीए, सीएमई अशा वेगवेगळया संस्था बघायला घेऊन जायचो. मात्र करिअरसाठी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सीडीएस आणि यूपीएससी ही परीक्षा देऊन तो भारतात 21वा आला. आज भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये तो अधिकारी म्हणून सेवेत रुजू आहे.'' योगेश चिथडे सांगतात.

चिथडे दांपत्य लोकांना एकत्र जमवून एनडीए, सीएमई, वॉर मेमोरिअल अशा संस्थांना भेटी घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतं. ''त्यामुळे ह्या क्षेत्राविषयी असलेला सामन्यांच्या मनातला दुरावा संपतो. प्रशिक्षणं, क्षेत्रं, त्यामधल्या उपशाखा अशा सगळयाची लोकांना माहिती होते. सैनिकांप्रती आदराची भावना तर दुणावतेच, तसंच स्वत: किंवा मुलांनी सामील होण्यासाठीही ओढ वाढते.'' दोघांना अगदी मनापासून हे वाटतं.

चिथडे दांपत्य आपले सर्व उपक्रम स्वखर्चाने करतात.

'आमच्या कमाईतला काही भाग आम्ही सुरुवातीपासूनच ह्या कामासाठी उपयोगात आणतो. आजकाल मात्र समाजातील अनेकांचे हातभार ह्या कामाला लागत आहेत. कोणी सणांसाठी पाठवायच्या वस्तुरूपाने, कोणी वेळ देऊन आणि आर्थिक मदत करूनही ह्या कामात सहभागी होत आहेत.'' योगेश चिथडे सांगतात.  त्यांनी सैनिकांचा प्रत्यक्ष गौरवही केला आहे. भारतात १९५० नंतर एकूण २१ जणांना शौर्याबद्दल असणारा सर्वोच्च पुरस्कार 'परमवीरचक्र' दिला गेला आहे. त्यापैकी हयात तीन परमवीरचक्र विजेते ग्रेनेडिअर योगिंदरसिंग यादव (परमवीरचक्र) कारगिल युध्द, रायफलमन संजयकुमार (परमवीरचक्र) कारगिल युध्द, ऑॅनररी कॅप्टन बाना सिंग (परमवीरचक्र) सियाचीन युध्द, या तिघांना त्यांनी २०१५ साली पुण्यात आमंत्रित केले. त्यांचा यथायोग्य गौरव केला. शाळा, कॉलेज, एनसीसीचे विद्यार्थी यांना यानिमित्ताने त्यांची शौर्यगाथा ऐकण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रमही चिथडे दांपत्याने स्वखर्चाने केला. अशा खऱ्या हिरोंना समाजापुढे आणणे हे ते स्वत:चे कर्तव्य मानतात. योगेश चिथडे यथार्थ अभिमानाने सांगतात, ''मुंबईमध्ये एल्फिन्स्टन ब्रिज बांधायला कोणीही बिल्डर पुढे आला नाही, मात्र आमच्या सैन्यदलाने पुढे येऊन योग्य वेळेत, योग्य खर्चात हा पूल बांधून दिला. ते ही 'सेल्फलेस सर्व्हिस' करतात, तर आपण त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव ठेवण्यासाठी निदान इतके तरी करू शकतो.''

लोकांची आर्थिक मदत मिळायला लागल्यावर चिथडे पती पत्नींनी 'SIRF' म्हणजे 'Soldiers Independent Rehabilitation Foundation' या नावाने धर्मादाय संस्था स्थापन केली आहे. कारण त्यांच्या पुढच्या एका प्रकल्पात अधिकाधिक मदतीची आवश्यकता आहे. सुमेधाताईंनी हाती घेतलेला प्रकल्प लक्षात येण्यासाठी आपल्याला सियाचीनबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल.

सियाचीन - भारताच्या उत्तरेकडची हिमालयीन काराकोरम पर्वतरांगांमधील सीमारेखा. पश्चिमेला पाकिस्तान तर पूर्वेला चीन. जगातली सगळयात उंच युध्दभूमी. तापमान उणे ५३ अंश सेल्सिअस. उंची २१,१४७ फूट. खराब वातावरणात २०० कि.मी.पर्यंत वेगाने वाहणारे वारे, पाऊस, बर्फवृष्टी. १९४७ साली झालेल्या फाळणीपासूनच ह्या सीमेबाबत विवाद चालू आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे हे पाकिस्तानने कधीच मान्य केले नाही. ऑॅक्टोबर १९४७ मध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये काश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानने बळकावला. १९७२ मध्ये सिमला कराराने लाइन ऑॅफ कंट्रोल (LOC) ठरवली गेली. LOC किंचित पश्चिमेकडून उत्तरेला जाऊन मग ती पूर्वेला काराकोरम खिंडीलगत चीनच्या सीमेला येऊन मिळते. मात्र पाकिस्तानने पश्चिम-उत्तर आणि मग पूर्व अशी दिशा टाळून तिला तिरक्या रेषेत सरळ चीन सीमेला मिळवून टाकलं आहे. आणि ह्या त्रिकोणामध्ये सियाचीन हा भाग आहे. तिथल्या पर्वतरांगांमुळे एक नैसर्गिक सीमा तयार झाली आहे आणि भारताचे सैनिक पाकिस्तानी शत्रूबरोबरच हवामानाच्या ह्या अस्मानी संकटांना तोंड देत अहोरात्र जागे आहेत. सीमेचं रक्षण करीत आहेत. ह्या भागाच्या उंचीमुळे आणि विरळ हवेमुळे ऑॅक्सिजनची कमतरता हे खूप मोठं संकट आहे. अत्यंत कमी प्राणवायू असूनही सियाचीन सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना कर्तव्यदक्षतेत यत्किंचितही कसूर करून चालत नाही, इतका हा भाग संवेदनशील आहे.

ह्या सैनिकांना प्राणवायू त्वरित उपलब्ध व्हावा, ह्यासाठी चिथडे पतिपत्नींनी सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑॅक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. साधारण नऊ हजार सैनिकांना ह्या प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो. ऑॅक्सिजनअभावी सैनिकांच्या आरोग्याच्या उद्भवणाऱ्या गंभीर समस्या ते प्राणहानी ह्यावर हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ह्या कामासाठी सुमेधाताईंनी स्वत:चे दागिने मोडले आहेत. मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत, मात्र आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. ''इतक्या मोठया लोकसंख्येच्या देशामध्ये प्रत्येकाने एक रुपया दिला तरी हे काम त्वरित सुरू होईल. आम्ही स्वत:पासून सुरुवात केली आहे. दागिने मोडणं ही खूप काही विशेष गोष्ट आम्हाला वाटत नाही. संपत्ती ही खूप क्षुल्लक गोष्ट झाली. अन्न, हवा, पाणी ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं आपण म्हणतो. पण आपल्या रक्षणासाठी आपल्या सैनिक बांधवांची जर प्राणवायूसारखी मूलभूत गरज भागली जात नसेल, तर दागिन्यांना काही अर्थ नाही!'' सुमेधाताई अत्यंत कळवळयाने बोलतात आणि यात समाजाची साथ नक्की लाभेल, अशी आशा व्यक्त करतात.

आपण सगळेच आयुष्याचं प्रयोजन शोधत असतो. चिथडे पतिपत्नींनी आपलं आयुष्य सैनिकांप्रती वाहून घेतलं आहे. त्यांच्या ध्यानीमनी आता ऑॅक्सिजन जनरेशन प्लान्ट आहे. त्यासाठी निरनिराळया परवानग्या घेणं, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं ह्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्या घरात शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यांच्या मनात शौर्य, साहस, कर्तव्य, देशप्रेम असे गुण असलेले सैनिक आहेत. पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? ह्या प्रश्नावर 'चिथडे पतिपत्नींनी केलेल्या कामासारखे प्राण फुंकावे लागतात आणि समाजात त्या पध्दतीने प्रतिमा उभ्या कराव्या लागतात' असं वाटून गेलं. 'आपले आयडॉल्स कोण?' हा प्रश्न आपण स्वत:लाच ह्या निमित्ताने विचारून घ्यायला हवा. अशा आदर्शांच्या प्रतिमानिर्मितीचं काम हे कोणत्याही पुतळे उभारण्याच्या कामापेक्षा मोठं आहे. ह्या प्रतिमानिर्मितीनंतरच आपल्या आदर्शांप्रती आदराची भावना आणि नंतर त्यांच्याप्रमाणे जीवन जगण्याची स्फूर्ती घेता येऊ शकते.

 

विभावरी बिडवे:  vvibhabidve@gmail.com

सुमेधा चिथडे - 9764294292
योगेश चिथडे - 9764294291 (cyogeshg@rediffmail.com )