'मोदी हटाव'ची डरांव डरांव

विवेक मराठी    25-May-2018
Total Views |

नुकतीच कर्नाटकची विधानसभा निवडणूक पार पडली आणि संख्याबळाने मोठा असणारा पक्ष विरोधी बाकावर बसला. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाने पाठिंबा दिला, त्यामुळे हा चमत्कार झाला आणि गेले काही महिने देशभर दौडत असणारा भाजपाचा विजयरथ कर्नाटकातील मतदारांनी नाही, तर निवडणुकीनंतरच्या अभद्र आघाडीने रोखला. सत्तेवर येण्याची क्षमता असणारा पक्ष विरोधी बाकावर बसल्यावर अनेकांनी आपल्या बाह्या मागे सारत दंडावरच्या बेडक्या फुगवून दाखवायला सुरुवात केली आणि या सर्व फुगलेल्या बेडक्या कर्नाटकात शपथविधी समारंभास हजर राहिल्या. आपण एकत्र आलो, तर भाजपाला रोखू शकतो. ज्यांना ज्यांना देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळया पडत असतात, अशांच्या स्वप्नांना तर अधिकच धुमारे फुटले आणि परस्परांचे हाडवैरीही या निमित्ताने एकमेकांच्या गळयात गळे घालून 'मोदी हटाव'ची डरांव डरांव करू लागले. यात स्वतःचे अस्तित्व संपलेले, अडगळीत गेलेलेही व्यंगचित्र काढून आपला आवाज मिसळू लागले आणि जणू काही या विळयाभोपळयाच्या मोटेमुळे मोदींचा आणि भाजपाचा दणदणीत पराभव होणार आहे आणि ही बेडूकरावांची आघाडी सत्तेवर येणार आहे. एका जागी जमा झालेल्या बेडकांचे एकत्रित वजन करता येत नाही, त्याचप्रमाणे मोदीविरोधात 2019ची लोकसभा निवडणूक लढवू म्हणणाऱ्या या मंडळींचेही प्रत्येकाचे स्वतंत्र लक्ष्य आहे - बहुतेक प्रत्येकाला देशाचे पंतप्रधानपद भूषवायचे आहे. पण मोदीविरोधात एकत्र येताना केवळ मोदी हटाव या समान मुद्दयावर ते एकत्र आले आहेत. प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंत यातील किती एकत्र राहतील हे आता सांगणे अवघड आहे. कारण स्थिर न राहणे हा बेडकाचा स्वभावधर्म आहे. ते सतत उडया मारत राहणार आणि आपापल्या बिळातून मोदी हटावच्या घोषणा देत राहणार. कर्नाटकच्या निवडणुकीने या सर्वांना आपापली बिळे सोडून एकत्र येण्यास भाग पाडले. या मंडळींकडे देशाच्या विकासाचे कोणतेही धोरण नाही. केवळ मोदीविरोध आणि हिंदुत्वद्वेष या दोनच गोष्टींसाठी ही मंडळी एकत्र आली. त्यांच्या एकत्र येण्यामुळे देशात राजकीय परिवर्तन होणार अशी आवई काही माध्यमांतून उठवली गेली. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षांचा अवधी आहे. तोपर्यंत ज्या कर्नाटकाच्या आदर्शावर ही मंडळी मैदानात उतरत आहेत, ते सरकार टिकेल का? निवडणूक प्रचारात एकमेकांवर हीन पातळीवर उतरून आरोप करणारे सत्तेच्या लोण्यासाठी एकत्र आले आणि तोच आदर्श डोळयासमोर ठेवून प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय नेते एकमेकांच्या हातात हात गुंफू लागले. ज्यांना मोदी आणि भाजपा नको अशा गटांवर या साऱ्याच्या परिणाम झाला नाही, तर आश्चर्यच म्हणावे लागेल. विळयाभोपळयाच्या मोटेला पूरक होण्याचे पवित्र काम या मंडळींनीही सुरू केले. अशी मंडळी आधी उघडपणे आपल्या कारवाया करत नसत. पण आपल्या सोईचे सरकार यावे यासाठी आकाशातील बापाला प्रार्थना करण्याचे फतवे जारी केले जात आहेत आणि ज्यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत, अशांच्या पक्षांचे प्रवक्ते या फतव्याचे समर्थन करत आहेत, यावरून या मंडळींची मिलीभगत आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.  

देशात लोकशाही धोक्यात आली आहे, लोकसभेची निवडणूक आता जवळ आली आहे, पुढील वर्षी देशात नवीन सरकार स्थापन होईल, यासाठी प्रार्थना करा असा वादग्रस्त फतवा दिल्लीतील आर्चबिशप अनिल काऊटो यांनी देशातील सर्व चर्चच्या धर्मगुरूंना जारी केला आहे. याचाच अर्थ असा की विद्यमान सरकारला सत्ताच्युत करून पुढील निवडणुकीत आपल्या सोईचे सरकार आणण्यास मदत करा. देशभर विविध राजकीय पक्षांनी मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, या पार्श्वभूमीवर एका धर्माच्या धर्मगुरूंनी जारी केलेला हा फतवा खूपच बोलका आहे. त्यात विद्यमान सरकार सत्तेवरून जाऊन नवीन सरकार सत्तेवर यावे यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पण विद्यमान सरकार सत्तेवरून का गेले पाहिजे? विद्यमान सरकारने या आणि अशा तथाकथित धर्मगुरूंचे आणि धर्माचे काय घोडे मारले आहे की ज्यामुळे त्यांना मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे हे सरकार नकोसे वाटत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधताना लक्षात येते की विद्यमान सरकारने असे धर्म, धर्मगुरू आणि सत्ता यांची अभद्र युती मोडीत काढली आहे. धर्माच्या आधाराने धर्माचे राजकारण करणाऱ्यांना गेल्या चार वर्षांत आपल्या पदरात काहीच पाडून घेता आले नाही आणि हीच खरी दुखरी नस आहे. चार वर्षांआधी असे धर्म आणि त्यांचे धर्मगुरू हे सरकारवर आपला दबाब टाकू शकत होते आणि आपल्याला हवे ते पदरात पाडून घेऊ शकत होते. धर्म आणि सत्ता या दोन स्वतंत्र गोष्टी असल्या, तरी त्यातील भेदरेषा पुसून टाकण्याचे काम चार वर्षांपूर्वी होत होते. मोदी सत्तेवर आले. त्यांनी सत्ता आणि धर्म यांचे साटेलोटे मोडले. परदेशातून विविध मार्गांनी होणारा अर्थपुरवठा नियंत्रित केला. या साऱ्याची खदखद अनेक फादर आणि बिशप मंडळींच्या मनात होती. आता ती कर्नाटकातील प्रयोगानंतर बाहेर पडली आणि आर्चबिशपच्या फतव्याच्या रूपाने प्रकाशित झाली. हिंदूंच्या चार शंकराचार्यांपैकी एका शंकराचार्यांनीही मोदींवर टीका करून अपण काँग्रेसच्या जवळ असल्याचे सिध्द केले आहे. त्याचबरोबर मुसलमान समाज आणि त्यांचे नेते, धर्मगुरू यांनी मोदींच्या आणि हिंदुत्वाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली होती. शक्तिपात झालेल्या, प्रदेशापुरते मर्यादित झालेल्या अनेक पक्षांच्या नेत्यांनीही मोदीविरोधात शंख फुंकला आहे. एका महाभागाने तर मोदींना निवडणुकीत हरवण्यासाठी पाकिस्तानची मदत घेण्याची घोषणा केली आहे. इतकी सर्वांना मोदीविरोधाची आणि द्वेषाची उबळ आली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर 2019च्या निवडणुका या सर्वांसाठी लक्षणीय असणार आहेत. गेल्या चार वर्षांत मोदी आणि त्याचे सहकारी देशाला विकासाच्या मार्गाने घेऊन चालले आहेत आणि त्याची पदचिन्हे उमटू लागली आहेत. याउलट सत्तेपासून दूर गेलेले आणि आपली दुकानदारी बंद झालेले मोदीद्वेषाने ग्रासले असून ते 'मोदी हटाव'ची डरांव डरांव करत आहेत.