पैशाचे महत्त्व संकटात उमगते

विवेक मराठी    28-May-2018
Total Views |

आपला बहुसंख्य समाज गरीब राहण्याचे एक कारण असेही आहे, की त्याला योग्य प्रकारे पैसे मिळवण्याचे मार्गदर्शन मिळालेले नाही. पैसा हा मुळात वाईट नसतो. तो मिळवण्यासाठी तुम्ही पापाचा मार्ग अवलंबलात किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी त्याचा विनियोग केलात तरच तो वाईट ठरतो. 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' म्हणणारे संत तुकाराम किंवा 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' असे बजावणारे संत रामदास असे अपवाद सोडले, तर बहुतेक संतांनी 'पैसा हे अनर्थाचे मूळ' असाच उपदेश केल्याचे दिसते. पण वास्तव हे आहे की पैशाचे महत्त्व तेव्हाच उमगते, जेव्हा संकटकाळात आपल्यापाशी पैसा नसतो.

 आयुष्यात पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या हावरट लोकांइतकाच पैशाची अकारण निंदा करणाऱ्या विरक्त लोकांचाही मला तिटकारा आहे. एका कीर्तनकाराची गंमतीशीर गोष्ट मी वाचली होती. या कीर्तनकार बुवांनी एकदा आदिशंकराचार्यांचे 'अर्थमनर्थ भावयनित्यम्। नास्तिस्तेष: सुखलेश सत्यं' (पैसा हे अनर्थाचे मूळ) हे वचन उद्धृत करून असे काही जोशपूर्ण निरुपण केले, की त्यातील विरक्तीच्या तत्त्वज्ञानाने श्रोते खूपच प्रभावित झाले. प्रवचन संपल्यावर बुवांनी श्रोत्यांपुढे दक्षिणेसाठी ताट फिरवायला सुरुवात केली. त्यावर एका चतुर श्रोत्याने खटयाळपणे विचारले, ''बुवा! आताच तर तुम्ही सांगितलेत ना की पैसा हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. पण तुम्ही तर तोच पैसा लोकांकडून मागत आहात?'' त्यावर बुवा वैतागून म्हणाले, ''अरे बाबा! ते सगळे कीर्तनात सांगण्यापुरते ठीक असते. आपल्याकडे 'पुराणातील वानगी पुराणात' अशी म्हण आहे. पैसे मिळाले नाहीत तर माझ्यापुढे संध्याकाळच्या भाकरीचा प्रश्न उभा राहील.'' वरकरणी आपल्याला हा विनोदी किस्सा वाटला तरी त्यात जीवनातील एक जळजळीत सत्य लपले आहे, ते म्हणजे शब्दांच्या पोकळ बुडबुडयांपेक्षा पोटाची भूक अधिक महत्त्वाची असते.

मी दुबईला सर्वप्रथम गेलो, तेव्हा माझ्या खिशात दहा दिऱ्हॅमच्या तीन नोटा होत्या - म्हणजे त्या वेळचे साधारणपणे साडेतीनशे रुपये. मी दुबईत उतरल्यावर सुरुवातीला आवडेल ते खाण्या-पिण्यासाठी किंवा चंगळ करण्यासाठी बाबांनी मला ते पैसे दिले होते. मी फारसा खर्च न करता ते पैसे शिलकीत साठवून ठेवले. माझा विचार होता, की त्यात आणखी भर घालून दुबई आणि आसपासची सहलीची ठिकाणे मनसोक्त बघून घ्यायची. पण नंतर माझ्या नशिबात जे खडतर जगणे आले, त्यामुळे शहाणा होऊन मी ते पैसे कधीच उडवले नाहीत. त्या तीन नोटांनी मला पैशाची खरी किंमत समजावून दिली. दुकानाला पहिल्या वर्षी प्रचंड नुकसान झाल्यानंतर माझी जीवनशैलीच बदलली. मी सलग चार वर्षे भात, पातळ भाजी आणि बेकरीत मिळणाऱ्या ब्रेडसारख्या तयार रोटया (त्यांना अरबी भाषेत खुबूस म्हणतात) एवढे तीन पदार्थ खाऊन दिवस काढले. मी दुकानात सोळा तास कष्ट करायचो. माझ्याकडे सायकलही घ्यायची ऐपत नसल्याने वसुलीला बाहेर जायची वेळ आली तर पायी जायचो. अगदी लांबवर जायचे असेल आणि टॅक्सी करणे क्रमप्राप्त असेल, तर त्यातही मी शेअर-ए-कॅब करून तीन चतुर्थांश भाडे वाचवायचो. दुबईत खाडी ओलांडण्यासाठीचे स्वस्त साधन म्हणजे अब्रा या लाकडी होडया. त्यांचे भाडे सर्वांत स्वस्त असायचे. मी अनेकदा या अब्रातून प्रवास करून खाडीपलीकडच्या देरा दुबई या भागात खरेदीसाठी जायचो. घाऊक दराने स्वस्तात मसाले गोणीत भरून ते पोते पाठीवर घेऊन चालत यायचो. पैसे वाचवण्यासाठी मी अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करायचो. मात्र या सगळया प्रवासात कधीही कुणापुढे उसनवारीसाठी हात पसरला नाही. लहानपणी गरिबीने मला काटकसर शिकवली होती. मोठेपणी भरपूर पैसे मिळू लागल्यावरही माझी ती सवय गेली नाही.

संकटकाळी पैसा किती महत्त्वाचा असतो, हे मनावर ठसवणारे दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आले. त्यातील पहिला प्रसंग मी याआधीच्या एका लेखात वर्णन केला आहे. मी कॉलेजला असताना माझ्या वडिलांना सहा महिने बेरोजगार म्हणून मुंबईत बसून राहावे लागले होते. त्यांनी शिलकीत साठवलेला पैसा घरखर्चात झरझर संपून गेला. एक वेळ अशी आली की घरात खायला धान्य नाही आणि खिशात पैसा नाही. पाणी पिऊन दिवस ढकलण्याची वेळ आली, पण आईच्या समयसूचकतेमुळे आम्ही उपाशी राहण्यापासून वाचलो. ओटीत मिळालेल्या तांदळांपासून आईने साधीशी खिचडी रांधली. ती खात असताना मला 'रोटी की किमत भूखा ही जाने' ही म्हण वारंवार आठवत राहिली. माझ्या बाबांना पुन्हा नोकरी मिळताच त्यांनी प्रथम आईचे दागिने गहाण ठेवले व त्या पैशातून आधी घरात किराणामाल भरला. विमानाचे तिकीट काढल्यानंतर उरलेले पैसे दोन-तीन महिन्यांच्या खर्चासाठी आईकडे देऊन ते दुबईला रवाना झाले आणि सहा महिन्यांत त्यांनी पगारातून बचत करुन आईचे दागिनेही सोडवले. घरात धान्याचा कण नाही किंवा हातात पैसा नाही, ही वेळ त्यांनी आमच्यावर कधीही येऊ दिली नाही.

दुसरी घटना साधारणपणे पंधरा-वीस वर्षांपूर्वी घडली. त्या खेपेस मी एक सुस्थापित उद्योजक होतो. मी एकदा एकटाच व्यावसायिक कारणासाठी हाँगकाँग, थायलंड व इंडोनेशिया या देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. दुबईहून मी हाँगकाँग विमानतळावर पोहोचलो. तेथून मला दुसरे विमान पकडून थायलंडला जायचे होते. मी सरकत्या पट्टयांजवळ उभा राहून माझ्या सामानाची वाट बघत होतो, पण माझी बॅग काही आलीच नाही. माझ्या काळजात धस्स झाले, कारण मी एक मोठी चूक करुन बसलो होतो. माझी औषधे, उबदार कपडे, कागदपत्रे याबरोबर पैशांचे पाकिटही मी त्या बॅगेत ठेवले होते. माझ्या खिशात पासपोर्टखेरीज काहीही नव्हते. खिशातल्या पाकिटात अगदीच किरकोळ रक्कम होती. त्या काळात मोबाइलचा, क्रेडिट कार्डचा आजच्याइतका प्रसार झालेला नसल्याने मी खर्चासाठी रोख रक्कमच घेऊन गेलो होतो. बॅग गहाळ झाल्यामुळे पुढे काय करावे, या काळजीत मी हाँगकाँग विमानतळावर उभा होतो.

विमानतळाच्या नियमानुसार सामान गहाळ झालेल्या प्रवाशाला तात्पुरता दिलासा म्हणून काही आर्थिक मदत केली जाते. त्यानुसार माझ्या हातात काही डॉलर्स पडले, पण लवकरच माझा भ्रमनिरास झाला. ते अमेरिकी डॉलर्स नसून हाँगकाँग डॉलर्स होते. तेवढया रकमेत केवळ काही खाद्यपदार्थ विकत घेता आले असते. विमानतळावरील खाद्यपदार्थ महाग वाटले, म्हणून मी बाहेर आलो आणि रस्त्यावरचे स्वस्तातील पदार्थ खाल्ले. अंगावरचे कपडे घामट झाल्याने बदलण्याची गरज होती, पण सर्व कपडे बॅगेतच राहिले होते. मग मी रस्त्यावरील फेरीवाल्याकडून एक स्वस्तातील शर्ट-पँट विकत घेतली. या दोन खरेदींतच माझ्याकडचे बहुतेक सर्व पैसे संपले. एरवी माझ्या व्यापारी जगात मी अल अदील कंपनीचा अध्यक्ष होतो, पण त्या दिवशी विमानतळावर मी एक निर्धन, असाहाय्य माणूस म्हणून उभा होतो.

माझी अवस्था फार कुचंबणेची झाली होती. मला खूप भूक लागली होती आणि हातात पैसे तर नव्हते. हाँगकाँगमध्ये माझ्या कुणी ओळखीचे नव्हते. अखेर मी सर्व लाज-संकोच बाजूला ठेवला आणि खिशातील शिल्लक राहिलेले सर्व पैसे वापरून हाँगकाँग विमानतळावरून थायलंडमधील यजमानांना इंटरनॅशनल कॉल करून माझी अडचण कळवली. त्या भल्या गृहस्थांनी तत्परतेने हालचाल करून माझा थायलंडपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुखकर केला. विमानात बसल्यावर खाणे पुढयात आले, तेव्हा मी खरोखर हात जोडून त्या अन्नाला नमस्कार केला. त्या दिवसापासून प्रवासात सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवण्याची चूक मी कधीही केली नाही. मी माझे पैसे खिशात, बॅगेत, हातातील ब्रीफकेसमध्ये विखरून ठेवू लागलो. प्रवासाचे नियोजन करताना अडचणीचे प्रसंग गृहीत धरून मदतीला कोण येईल, यांची यादी करून ठेवू लागलो. अर्थात तशी वेळ पुन्हा आली नाही, कारण डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या प्रसारामुळे मला आजवर कधीही जास्त रोख रक्कम जवळ बाळगावी लागली नाही. आजही तशी गरज पडत नाही. ट्रॅव्हलर्स चेक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील एटीएम, एक्स्चेंज काउंटर्समुळे अडचण येत नाही. मात्र पैशाचे महत्त्व जाणवून देणाऱ्या या घटना मी कधीही विसरलो नाही.

मित्रांनो! 'पैशाने सर्व सुखे खरेदी करता येत नाहीत' वगैरे तत्त्वज्ञान ज्यांना ऐकायचे, त्यांना ऐकू द्यात. ते विरक्त व्यक्तींना किंवा साधू-संतांना आवडत असेल, पण सर्वसामान्यांना व विशेषत: कुटुंबाच्या पालन-पोषणाची जबाबदारी असलेल्यांना मी इतकेच सांगेन की संकटाच्या काळात आपली भूक भागवेल किंवा लाज वाचवेल इतका पैसा नेहमी शिलकीत असू दे.

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)