बदलणारे पर्यावरण आणि आरोग्य

विवेक मराठी    11-Jun-2018
Total Views |

पर्यावरणात आरोग्य, भौतिक, जैविक, सामाजिक आणि मानसिक घटक निर्धारित असतात. मानवी आरोग्य नीट ठेवण्यासाठी पर्यावरण व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. बदलत्या पर्यावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे नवनवीन आजारांची भर पडत आहे. आरोग्य नीट राहण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे नव्हे, कर्तव्य समजले पाहिजे.

 आरोग्याचा आणि आसपासच्या वातावरणात होत असलेल्या बदलांचा घनिष्ठ संबंध आहे हे उघड आहे. आपल्याला जगायला पोषण लागणार ते उत्तम अन्नातून येणार. आपण श्वास घेणार ती हवा दूषित असून भागणार नाही. पाणी म्हणजे तर जीवन. एकवेळ दोनचार दिवस आपल्याला फाके पडले तरी बिघडणार नाही पण पाण्यावाचून आपण जिवंत राहूच शकणार नाही. सध्या जगात या तिन्ही बाबींमध्ये होत असलेल्या पर्यावरणाच्या नाशाबद्दल मोठी आणि अत्यंत रास्त चर्चा चालू आहे. त्या चर्चेत मनुष्यप्राण्याच्या भविष्यासोबत एकंदरच जीवसृष्टीच्या भवितव्याची चिंता होणं साहजिक आहे.

निव्वळ माणसाबद्दल बोलायचं झालं तरी स्वच्छ आणि पिण्यालायक पाणी, शरीर निरोगी राहील असं पोटभर अन्न व फुफ्फुसांना इजा न करता शरीराला योग्य प्रमाणात प्राणवायू पुरवू शकेल अशी शुध्द हवा या किमान गरजा पूर्ण व्हायलाच हव्यात याबद्दल कोणाचंही दुमत होणार नाही. दुर्दैवानं या मूलभूत गरजादेखील भागताना दिसत नाहीत. एकीकडे अन्न वाया जात असताना, पाण्याचा अपव्यय होत असताना दुसरीकडे दोन वेळेच्या खाण्यासाठी आणि घोटभर पाण्यासाठी तडफडणारे काही कमी नाहीत. कमी अन्न कुपोषणाला कारणीभूत ठरणार, तर पाण्याची कमतरता स्वच्छतेच्या आड येणार. स्वच्छता नसेल तिथं रोगराई पसरणार, अनेकांचे जीव घेणार हेही तितकंच उघड. निदान पिण्याच्या पाण्याचे स्रोत तरी दूषित होऊ  नयेत याची नक्कीच काळजी घेतली जायला हवी.

सुदैवानं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रश्नांची जाण आहे. देशाचं भवितव्य उज्ज्वल करत असताना देश स्वच्छ असेल तरच जगाची आपल्याकडे पाहायची नजर बदलेल हे त्यांना ठाऊक आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी भक्कम पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या पावलाचे पडसाद आज जाणवणार नाहीत, परंतु उद्या त्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल, हे नक्की.

अन्न, पाणी, स्वच्छता, शुध्द हवा या गोष्टी सगळयांना व्यवस्थित माहित आहेत. त्यांच्यावर चर्चा करणं म्हणजे माहित असलेली गोष्ट पुन्हा पुन्हा उगाळून सांगण्यासारखं होईल. त्यापेक्षा तितक्याच महत्त्वाच्या पण लोकांना नीटशी कल्पना नसलेल्या गोष्टींचा उहापोह अधिक उपयुक्त होईल.

हल्ली नव्याने नजरेस पडत असलेल्या आजारांकडे लक्ष दिलं तर काही महत्त्वाच्या नोंदी दिसतात. नवनवी इन्फेक्शन्स आपली नजर वेधून घेतात. त्यातही हे जाणवतं की यातले बरेचसे आजार इतर प्राण्यांपासून आलेले आहेत. माकडांकडून मिळालेला एड्स, गाईकडून पसरलेला मॅड काऊ डिसीज, डुकरांकडून आपल्यापर्यंत पोचलेला स्वाईन फ्लू, पक्ष्यांची देण असलेला बर्ड फ्लू किंवा सार्स, गेल्या कित्येक वर्षांमध्ये अशा प्राणिजगताकडून माणसापर्यंत पोचलेल्या आजारांची लांबलचक यादी देता येते. अगदी गेल्या आठवडयापासून चर्चेत आलेला आणि केरळमध्ये दहाएक जणांचे जीव घेणारा वटवाघळांपासून आलेला निपाह व्हायरस याचे ताजे उदाहरण आहे.

असं का घडतंय याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. हे प्राणी काही नव्याने आपल्या संपर्कात आलेले नाहीत. ज्या विषाणूंमुळे हे आजार पसरतात तेही नवीन नाहीत. मग आताच असं का होतंय, आताच ही मंडळी माणसाला का उपद्रव देऊ लागलीत हे लक्षात घ्यायला हवं आहे.

कारण अगदी स्पष्ट आहे. आपल्या आसपास एक सूक्ष्म जीवांचं जग आहे. सूक्ष्मदर्शीनं बारीकपणे पाहिल्याशिवाय ते आपल्या नजरेला पडत नाही, पडणार नाही. आपलं लक्ष पर्यावरणात झालेल्या ढोबळ बदलांवर केंद्रित आहे. सूक्ष्मजगतात चाललेल्या घडामोडींचा आपण तितकासा विचार करत नाही. पण त्या जगातही मोठी उलथापालथ होते आहे. आपण प्रतिजैविकांचा म्हणजे ऍंटिबायोटिक्सचा शोध लावला आणि बॅक्टेरिया मारीत सुटलो. आवश्यकता असो नसो, आपल्या आसपास असणारे सूक्ष्म जीव नुकसान करणारे असोत की निरुपद्रवी, आपण त्यांचा खात्मा करायचा धोषा लावला. त्यामुळे दोन घटना घडल्या. अनेक सूक्ष्म जीव मोठया प्रमाणात मारले गेले. ते जीव पर्यावरणाच्या ज्या साखळीत बसले होते ती जागा रिकामी झाली. रिकाम्या जागी घर बनवायला मिळाल्यावर ती संधी कोण सोडेल? इतर प्राण्यात वास्तव्याला असलेल्या ज्या ज्या सूक्ष्म जीवांना नवं घर पकडणं शक्य होतं त्यांनी त्यांनी इथं उडी मारली. बॅक्टेरियांना ऍंटिबायोटिक्सचा धाक होता. परंतु व्हायरस किंवा विषाणूंना ती भीती नव्हती. त्यांचं फावलं. त्यांना ताज्या दमाचं नवं घर मिळालं. आपली रोगप्रतिकार शक्ती या नव्या विषाणूंना सरावलेली नव्हती. इतकंच कशाला त्या दुसऱ्या प्राण्यातल्या विषाणूंची आणि आपल्या रोगप्रतिकार शक्तीची साधी तोंडओळख देखील नव्हती. मग आपलं शरीर त्यांचा मुकाबला करायला तयार कुठून असणार! त्यामुळं आपल्या शरीरावर घाला घालणं आणि स्वत:चं बस्तान बसवणं या विषाणूंना सहज जमून गेलं. गेल्या काही वर्षांमध्ये उदयाला आलेल्या आजारांकडे आपण नजर टाकली तर जवळपास सर्वच आजार विषाणूंमुळे पसरलेले दिसतील.

दुसरा याहून घातक प्रकार होता. ऍंटिबायोटिक्स आपला घात करताहेत हे बॅक्टेरियांना समजल्यावर त्यांनी आपल्याच शरीरात बदल करून घेतले. 'सर्व्हायव्हल ऑॅफ द फिटेस्ट' हा सिध्दांत ते कोळून प्यायले होते. त्यांनी स्वत:ला असं काही बदललं की ऍंटिबायोटिक्स त्यांचं काही वाकडं करू शकणार नाहीत. कुठल्याही ऍंटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या नव्या दमाच्या बॅक्टेरियांचा जन्म झाला. आता हे किटाणू सहजपणे माणसांच्या शरीरात वावरू लागले, आजार पसरवू लागले. ऍंटिबायोटिक्स आता प्रभावहीन ठरू लागली. डॉक्टरांसाठी 'ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया' हे नवं ताजं आणि तितकंच धोकादायक आव्हान उभं राहिलं. काही कालबाह्य झाल्यासारखे वाटणारे आजार एका नव्या उमेदीनं माणसांचा बळी घ्यायला सज्ज झाले. मल्टीड्रग रेझिस्टंट टीबीने केवळ पेशंटच नाही तर त्या पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर देखील मृत्युघंटा वाजवली. मलेरियाने लोकांना त्रस्त करायला सुरुवात केली. सूक्ष्म जगतात झालेल्या पर्यावरण बदलाचा हा महत्त्वाचा भाग होता.  

होऊ  घातलेल्या पर्यावरणाचा दुसरा बळी आहे रासायनिक द्रव्यांमुळं होणाऱ्या तब्येतीच्या प्रश्नांचा. गेल्या वर्षी दिल्लीत धुक्यानं थैमान घातलं होतं ही आठवण अजून ताजीच आहे. त्यावेळी कित्येक लहान मुलांना श्वसनाचे विकार जाणवले. बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढते आहे. हळूहळू चालणारी वाहनं जो धूर ओकतात तो पर्यावरणाला घातक असतोच. दमेकऱ्यांची वाढती संख्या याचं उत्तम उदाहरण आहे.

 आपल्या लक्षात यायच्या आत अनेक ठिकाणाची गिधाडं नाहीशी झाली. पारशी लोक आपले मृत आप्तजन त्यांच्या पवित्र विहिरीत टाकतात. गिधाडं त्या देहांवर आपली उपजीविका करत. झालं असं की जर त्या मयत व्यक्तीनं थोडया प्रमाणात जरी डायक्लोफेनॅक नावाचं वेदनाशामक औषध घेतलेलं असलं तर ते प्रेत खाणाऱ्या गिधाडांच्या जीवावर उठे. गिधाडांना ते डायक्लोफेनॅक औषध विषासारखं बाधे, त्यांचा जीव जाई. होता होता गिधाडं जवळपास नष्ट झालेली आहेत.

माणसांचं पर्यावरण आणखी एका बाबतीत बिघडलं आहे. तसे आपण कळपप्रिय. परंतु आताशा एकटे पडू लागलो आहोत. ढासळणारी कुटुंबव्यवस्था उग्र स्वरूप केव्हा धारण करेल याचा नेम नाही. उत्तम कौटुंबिक वातावरण हा आपल्या मानसिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग होता. मोठया कुटुंबात साधारण समवयस्क असं कोणी ना कोणी तरी असायचं. त्यांच्यात चांगला संवाद असायचा. त्यामुळं मानसिक ताणतणावांचा निचरा व्हायचा. आजच्या मितीला लहानलहान होत चाललेल्या कुटुंबात समवयस्क मिळणं दुरापास्त आहे. संवाद कठीण होत चाललाय. अशा परिस्थितीत मानसिक आजार बळावणार नाहीत तर काय? ताणतणाव, डिप्रेशन आताशा पावलोपावली दिसू लागले आहेत. त्यामुळं आत्महत्या आणि व्यसनाधीनता वाढू लागली आहे. लहान मुलं मोठया प्रमाणात हिंसक होण्यामागे हे बदललेलं कौटुंबिक वातावरण आहे. एक प्रकारे हा मानसिक पर्यावरणाचा ऱ्हासच म्हणायला हवा.

 आता टॉमने जेरीला का छळावं आणि जेरीनं टॉमला का जेरीस आणावं असले प्रश्न लहान मुलांना पडत नाहीत. मी, माझा म्हणताना दुसऱ्यासोबत आपण काही गोष्टी शेअर करायच्या असतात, वाटून खायचं असतं, एकत्र येऊन एकाच खेळण्यानं अनेकांनी खेळायचं असतं हे त्यांच्या गावी नाही. आपण नेहेमीच जिंकू शकत नाही, कधीतरी हरणंही आपल्या वाटयाला येऊ शकतं. त्यात वावगं काहीच नाही. आयुष्याचा तोही एक भाग आहे हे त्यांना आपण शिकवायचं विसरून गेलो आहोत. मुलांना हिंसा पटू लागली आहे, आवडू लागली आहे. तिच्या परिणामांची त्यांना जाणीव नाही, पर्वाही नाही. सामाजिक आरोग्याचा आणि मनाचा खूप मोठा संबंध असल्यानं वाढत चाललेल्या हिंसक वृत्तीनं समाजाचं खूप बिघडू लागलं आहे. यावर त्वरित उपाय योजण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वी कुपोषणाचा अर्थ वेगळा होता. ज्याला खायला पुरेसं अन्न नाही तो कुपोषित असं म्हटलं जायचं. किंबहुना ते तसंच होतं. पुरेशी प्रथिने किंवा जीवनसत्त्वे आहारातून न मिळालेली बालकं आणि त्यांची चित्रं पाहत डॉक्टरांच्या पिढयांच्या पिढया मोठया झाल्या. आज ती व्याख्या बदलावी लागेल. अयोग्य खाणारी ती कुपोषित असं म्हणायची पाळी आलेली आहे. खायला भरपूर अन्न आहे, परंतु त्यात योग्य ते पोषक घटक नाहीत अशी माणसं आसपास सर्रास दिसायला लागली आहेत. लहान मुलांमध्ये हे प्रमाण विलक्षण वाढत आहे. अन्नातलं पर्यावरण बिघडल्याचे हे संकेत आहेत.

आणखी एका ज्वलंत प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. पैसे कमावण्याच्या नादात स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणारी तरुण पिढी हा म्हटलं तर वेगळा विषय होऊ  शकतो. पण तरुण मंडळींमध्ये वाढत चाललेला हृदयरोग संपूर्ण कुटुंब हादरवून सोडत असल्यानं किमान त्या गोष्टीचा विचार नक्कीच व्हायला हवा. व्यायामाला, नीट खायला इतकंच कशाला व्यवस्थित झोपायला देखील वेळ नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे. नवरा बायकोचा संवाद इतका कमी झालाय की नवा कोरा 'सॉफ्टवेअर विडो' शब्द रूढ होऊ  लागलाय. म्हणजे नवरा, असून नसल्यासारखा, शनिवारी-रविवारी भेटणारा एक माणूस असं स्वरूप यायला लागलं आहे. डिंक (D.I.N.K.) म्हणजे 'डबल इन्कम नो किड'सारखे विचार फोफावू लागले आहेत. शारीरिक आणि मानसिक संबंधांची जागा पैसे घ्यायला लागले तर किती भयानक चित्र उभं राहील हे सांगणं कठीण आहे. किमान कुटुंब या संस्थेच्या पर्यावरणाला धोका आहे हे निश्चित.

अन्नातलं आणि एकंदर आपल्या आसपासचं प्रदूषण एका समस्येला खत पाणी घालतंय का याचा शोध घ्यायला हवा. कॅन्सर मोठया प्रमाणात वाढण्यामागची कारणं तपासायलाच हवीत. आपल्या आसपासचे कॅन्सरला निमंत्रण देणारे 'कार्सिनोजेनिक' पदार्थ शोधून काढून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायलाच हवा. खाण्याच्या, पिण्याच्या, अंगाला लावण्याच्या कुठल्याच वस्तूंपासून कॅन्सर होणार नाही, आपल्याच शरीराच्या पेशी आपल्याच विरूध्द बंड करून उठण्यास प्रवृत्त होणार नाहीत याची खातरजमा करायलाच हवी.

म्हणजे पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा प्रश्न फक्त आपण काय खातो, काय पितो, कुठल्या वातावरणात श्वास घेतो इथपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. कारण मुळात आरोग्य म्हणजे देखील केवळ आजार नसलेलं शरीर इतकाच छोटा अर्थ लावता येत नाही. त्यात मानसिक, सामाजिक आणि आत्मिक आरोग्यसुध्दा मिसळलं पाहिजे. त्यामुळंच रोज ऐकू येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करतात. कोवळया मुलींवर होणारे बलात्कार, शाळेतच शाळकरी मुलांकडून केले जाणारे खून सामाजिक आरोग्य किती ढासळलं आहे याची ग्वाही देतात. आपल्या आजूबाजूची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा व्यापक अर्थ लावला तर आताची परिस्थिती आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुरक्षेत कमी पडतेय हे नक्की.

हे बदललं पाहिजे.

नाहीतर भविष्यात काही खरं नाही.