गिरे तो भी...

विवेक मराठी    16-Jun-2018
Total Views |

भिवंडी येथे 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधीहत्येचा आरोप केला. परिणामी भिवंडी जिल्हा कार्यवाह राजेश कुंठे यांनी तक्रार नोंदवली होती. आता 12 तारखेला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. तर हे आरोप आपल्याला मान्य नसून आपण निर्दोष असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. मुळात राहुल गांधी यांनी संघावर गांधीहत्येचा आरोप करताना न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान केला होता आणि आता निश्चित झालेले आरोप मान्य न करता ते स्वतःला निर्दोष जाहीर करत आहेत. ते 12 तारखेला भिवंडी येथील न्यायालयात हजर राहण्यासाठी आले होते. पण काही प्रसारमाध्यमांनी 'राहुल गांधींचा महाराष्ट्रात दौरा' अशा शब्दात या न्यायालयीन हजेरीचे वर्णन केले आहे. मुंबई काँग्रेसने तर राहुल गांधींच्या स्वागताच्या कमानी लावल्या. जी व्यक्ती न्यायालयात संभाव्य आरोपी म्हणून हजर राहणार आहे, त्याच्या स्वागताचा असा सोहळा करणे पक्ष म्हणून कदाचित स्थानिक कार्यकर्त्यांची गरज असेलही, पण भारताचे भावी पंतप्रधान अशा आशयाचे फलक लावणे कितपत योग्य आहे? असे प्रकार पहिल्यांदाच घडत आहेत असे नाही, तर भिवंडीत तक्रार दाखल झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यासाठी येणार होते, तेव्हा विमानतळापासून भिवंडीपर्यंत महात्मा गांधींच्या दांडी यात्रेतील फोटोसोबत राहुल गांधींचा फोटो असणारे अनेक फलक लावून स्वागत केले होते आणि राहुल गांधी म्हणजे महान योध्दा आहेत असा संदेश या निमित्ताने देण्याचा प्रयत्न झाला होता. भिवंडी न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 10 ऑगस्ट निश्चित केली असून तेव्हा पुन्हा राहुल गांधींना भिवंडीत यावे लागणार आहे. संघावर बिनबुडाचे आरोप केले की मतदार आपल्यावर खूश होतील आणि आपला उमेदवार निवडून येईल असा जर राहुल गांधींचा समज असेल, तर त्यांनी तो लवकर दूर करायला हवा. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या एक-दोन दशकांत संघावर गांधीहत्येचा आरोप करून दिशाभूल केली जात असे. आज मात्र ती स्थिती नाही, हे राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष जितके लवकर समजून घेईल, तितके त्यांच्या दृष्टीने चांगले आहे. भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींवरचे आरोप निश्चित केले आहेत आणि या आरोपांबाबत न्यायालय लवकरच आपला निकालही जाहीर करेल. राहुल गांधी यांनी भिवंडीतील न्यायालयातील हजेरीनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेतली, पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता मोदी सरकार कशा प्रकारे संविधान विरोधी, समाजविरोधी आहे यावर तीन मिनिटे भाषण केले आणि पत्रकार परिषद संपवली. कदाचित पत्रकार भिवंडीतील आरोपाबाबत प्रश्न विचारतील अशी त्यांना भीती वाटली असावी. राहुल गांधी यांनी मोठया आवेशात संघावर आरोप केला होता. आता त्याचे उत्तर कसे द्यायचे आणि न्यायालयाने निश्चित केलेल्या आरोपातून स्वत:ला मोकळे कसे करायचे, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गांधीहत्या आणि संघ या विषयावर गेली सत्तर वर्षे सातत्याने चर्चा चालू आहे. याबाबत विविध भाषांमध्ये विपुल लेखनही प्रकाशित झाले असून न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून संघाला निर्दोष मुक्त केले आहे. गांधीहत्येत संघाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. मात्र आजही जर कोणी संघावर गांधीहत्येचा आरोप करून मतांचा जोगवा मागत असेल, तर तो न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान होत नाही का?

भिवंडी येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी संघावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप जाणीवपूर्वक केला होता आणि हा आरोप मुळातच चुकीचा आणि संघाविषयी गैरसमज पसरवणारा असल्यामुळे एका स्वयंसेवकाने त्याच्याविरुध्द तक्रार दाखल करून वास्तवाची आणि न्यायालयाच्या निकालाची जाणीव करून दिली आहे. 2014 साली झालेली तक्रार लक्षात घेऊन राहुल गांधींनी, काँग्रेसने आपल्या विचारसरणीत काहीही बदल केलेला नाही याची नुकतीच प्रचिती आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरला संघस्थानावर आले, तेव्हा काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आले की 'संघाने नथूरामच्या हाती बंदूक दिली'. म्हणजेच वेगळया शब्दात आजही काँग्रेस आणि तिचे नेतृत्व संघाला महात्मा गांधींच्या हत्येतील आरोपी मानत आहे आणि ही बाब गंभीर आहे. राहुल गांधींनी भिवंडीत संघावर आरोप केल्यानंतर ज्याप्रमाणे तेथील स्वयंसेवकाने न्यायालयात दाद मागितली, तशीच अन्य ठिकाणीही मागितली जाऊ शकते आणि न्यायालयीन लढाई लढली जाऊ शकते, यांची चुणूक भिवंडीत राहुल गांधी यांनी अनुभवली आहेच.

मुळात राहुल गांधींनी भिवंडीत भाषण करताना संघाची बदनामी करणारी, विपर्यास करणारी विधाने केली. न्यायालयाने त्याबाबत त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. पण ते राहुल गांधी यांना मान्य नाहीत. आपण केलेल्या विधानाचा बहुधा त्यांना विसर पडला असावा. त्यामुळे न्यायालयाने निश्चित केलेले आरोप त्यांना मान्य नसावेत. एकूणच राहुल गांधी यांचा हा व्यवहार म्हणजे 'गिरे तो भी टांग उपर' अशा स्वरूपाचा आहे. मताची बेगमी मिळवण्यासाठी राहुल गांधी यांनी भिवंडीत संघावर आरोप केले. त्यांचा उमेदवार तर निवडून आला नाहीच, पण ही न्यायालयाची वारी मागे लागली. या वारीतील पुढचा टप्पा 10 ऑगस्ट रोजी आहे. एवढे होऊनही अजून राहुल गांधी मी निर्दोष आहे
असे म्हणत आहेत. यालाच म्हणतात, गिरे तो भी....