किबुत्सिम

विवेक मराठी    19-Jun-2018
Total Views |

इस्रायलमध्ये स्थलांतरित ज्यू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिकदृष्टया स्थैर्य मिळवून देण्याचे, त्याचप्रमाणे त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य किबुत्स पध्दतीमधून झाले. सध्याच्या काळात किबुत्सिम जरी अस्तित्वात असले, तरी त्यांचे स्वरूप पारंपरिक राहिलेले नाही. आता आधुनिक मानसिकतेनुसार आणि जीवनशैलीनुसार व्यक्तिवाद वाढलेला आहे. स्वार्थीपणा वाढल्यामुळे अनेकांना किबुत्सिममध्ये सगळयांमध्ये एकत्र राहणे पटत नाही.

इस्रायलच्या उभारणीमध्ये किबुत्स या साम्यवादी विचारांवर आधारित एकत्र राहण्याच्या पध्दतीने फार मोठा हातभार लावला. हिब्रू भाषेत पुल्लिंगी अनेकवचनी शब्दांचा अंत्योच्चार 'इम'ने करतात आणि म्हणून किबुत्सिम हे किबुत्सचे अनेकवचन आहे. पूर्वी अमेरिकेतील, युरोपातील धनाढय ज्यू लोकांनी किबुत्ससाठी जागा विकत घेऊन त्या ज्यू समाजाच्या, इस्रायलच्या उभारणीसाठी वापरण्यास दान दिल्या. त्यामुळे त्या जमिनीवर फक्त किबुत्सचा हक्क असे. जे किबुत्सचे सदस्य असत, ते ज्या घरामध्ये राहत, ती घरे त्या त्या सदस्यांची असत. कोणालाही वेतन किंवा पैसे दिले जात नसत, तर जगण्यास आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जात असत. किबुत्समध्ये अनेक कुटुंबे एका मोठया एकत्र कुटुंबासारखी एकत्र राहत आणि सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असत. कोणी गोठयात दूध काढण्याचे काम करी, तर कोणी स्वयंपाकघरात स्वयंपाक, तर कोणी फक्त सगळयांचे कपडेच धुणार, तर कोणी सगळयांच्या लहान मुलांना एकत्र सांभाळणार. त्यामुळे यांच्या गरजादेखील कमी असत.

किबुत्समध्येच मुलांची शिकण्याची सोय, म्हणजेच शाळा असत. किबुत्समध्येच राहणारे लोक शिक्षक, डॉक्टर इत्यादी कामे करत असत. किबुत्समधील सदस्यांची मुले आई-वडिलांबरोबर न राहता एकत्र राहत असत. हेच नियम टीन-एजमधील आणि तरुण मुलांसाठी, तसेच वयोवृध्दांसाठी असत. लहान मुलांची तसेच वयोवृध्दांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र परिचारिका उपलब्ध असत. सगळे एकत्रच एका भोजनगृहात भोजन करत असत. एकाच किंवा बाहेरच्या किबुत्समधील मुला-मुलींची लग्नं होत असत. किबुत्सचा सर्व कारभार सांभाळण्यासाठी एक कमिटी असे. ती कमिटी कायम लोकशाही पध्दतीने निवडलेली असते. किबुत्सिमची गंमत अशी की त्याची रचना जरी कम्युनिस्ट विचारसरणीवर आधारित असली, तरी किबुत्सिममध्ये असलेले सगळेच काही पूर्ण डाव्या विचारसरणीचे नसत. त्यामुळे किबुत्सिममध्येच सिनेगॉगदेखील असे. ज्यूंचे सर्व सण एकत्रितपणे अगदी पारंपरिक पध्दतीने यात साजरे होत.

किबुत्समधील सदस्यांसाठी किबुत्सिममध्येच पोहण्याचा तलाव, क्रीडासाधने, त्याचबरोबर दफनभूमीही असते. किबुत्समधील जे सदस्य लष्करात काम करत असताना युध्दात मृत्यू पावले, त्यांच्यासाठी या दफनभूमीत वेगळी जागा असते. त्यांचे दफनही पूर्ण लष्करी पध्दतीने होत असते. किबुत्समध्येच ज्या सदस्यांचे कुटुंबीय युरोपात हॉलोकास्टमध्ये मारले गेले, त्यांच्या स्मरणार्थदेखील या दफनभूमीत विशेष जागा तयार करून त्यांना तिथे स्थान दिलेले आहे. एकूणच इस्रायलमध्ये स्थलांतरित ज्यू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिकदृष्टया स्थैर्य मिळवून देण्याचे, त्याचप्रमाणे त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य या किबुत्स पध्दतीमधून झाले. सध्याच्या काळात किबुत्सिम जरी अस्तित्वात असले, तरी त्यांचे स्वरूप पारंपरिक राहिलेले नाही. आता आधुनिक मानसिकतेनुसार आणि जीवनशैलीनुसार व्यक्तिवाद वाढलेला आहे. स्वार्थीपणा वाढल्यामुळे अनेकांना किबुत्सिममध्ये सगळयांमध्ये एकत्र राहणे पटत नाही. अनेकांना शेती करणे आवडत नाही. त्यामुळे पूर्वीची किबुत्सिमची पध्दत बंद पडत चालली आहे. बरीच किबुत्सिम आता खाजगी कारखान्यांमध्ये रूपांतरित झालेली आहेत. पूर्वी किबुत्समधील सदस्यांना पैसे दिले जात नसत. पण आता किबुत्समध्ये राहून काम करणाऱ्यांना कामाच्या मोबदल्यात योग्य ते वेतन दिले जाते. एकत्र भोजनालय आहेत, पण सदस्य घरीदेखील जेवण बनवू शकतात. सणाच्या दिवशी वगैरे सगळे एकत्र जेवतात.

हैफापासून उत्तरेकडे गिल्बोआ पर्वताच्या कुशीत वसलेल्या 'इन-हारोद' या इस्रायलमधील सर्वात जुन्या किबुत्सला (स्थापना 1925) भेट देण्याचा योग माझी सहकारी 'येल लुझ' हिच्यामुळे आला. या किबुत्सच्या संस्थापक सदस्यांमध्ये तिच्या आजी-आजोबांचा समावेश होता. हिब्रू बायबलमध्ये इन-हारोदचा संदर्भ आहे, ज्यावरून या किबुत्सचे नाव ठेवले गेले. हिब्रू भाषेत 'एन' म्हणजे झरा किंवा विहीर. जवळच असलेल्या 'एन हारोद' या विहिरीवरून या किबुत्सचे नाव एन हारोद असे ठेवले. बायबलमधील गोष्टीनुसार गिल्डिऑॅन हा जज जॉर्डन नदी पार करून त्याच्याकडे उपलब्ध सैन्यबळ घेऊन शत्रूंशी लढायला जाणार, तितक्यात त्याला परमेश्वराची आज्ञा मिळाली. परमेश्वराने त्याला विशिष्ट पध्दतीने निवडलेले लोकच लढण्यास घेऊन जाण्यास सांगितले, जेणेकरून संख्याबळ कमी असले तरी विजय त्याचाच होईल. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याने आपल्या सैन्यातील लोकांना जेझ्राएल व्हॅलीमध्ये असलेल्या इन-हारोद या विहिरीपाशी जाऊन पाणी पिण्यास सांगितले. जे लोक कुत्र्यांसारखे विहिरीच्या पाण्याला तोंड लावून पाणी पितात, त्यांची निवड न करता जे लोक हातात ओंजळीने पाणी घेऊन पितात, त्यांची निवड करण्यास परमेश्वराने सांगितलेले होते. कारण कुत्र्यासारखे पाणी पिणारे सावध नाहीत, तसेच शूरही नाहीत, पण हातात ओंजळीने पाणी घेऊन पिणारे सावध आणि शूर असतात. गिल्डिऑॅन त्या 300 शूर सैनिकांसह लाखोंच्या संख्येने असलेल्या शत्रूशी लढला आणि विजयी झाला.

इन-हारोद हे किबुत्स ज्या दरीत आहे, ती जेझ्राएल व्हॅली आहे आणि त्या दरीसमोर जो डोंगर उभा आहे, तो गिल्बोआ. बायबलमधल्या कथेनुसार गिल्बोआ डोंगराला शाप मिळाल्यामुळे त्या डोंगरावर आणि जेझ्राएल दरीत पाऊस अत्यंत कमी पडतो - जवळजवळ नाहीच. खरेच, अजूनही त्या भागात पाऊस खूपच कमी पडतो. गिल्बोआ डोंगर अतिशय रूक्ष आहे. आता शासनाने तिथे काही प्रमाणात वृक्षारोपण केल्याने त्याचा काही भाग हिरवा दिसतो, तर उरलेला भाग उजाड.

गिल्बोआ डोंगराची बायबलमधील कहाणी अशी आहे - इस्रायलच्या पहिल्या राजाने, म्हणजे राजा साउलने फिलिस्तीन लोकांच्या विरोधात गिल्बोआच्या डोंगरात लढाई केली आणि त्यात त्याची हार झाली. युध्दात हार झाल्याने राजा साउलने गिल्बोआच्या डोंगरात स्वत:च्याच तलवारीने आत्महत्या केली. हे ऐकून राजा डेव्हिड याने गिल्बोआ डोंगराला 'तुझ्यावर कधीच पाऊस पडणार नाही' असा शाप दिला. असे म्हणतात की त्यामुळेच गिल्बोआ डोंगरात पाऊस फारच कमी पडतो. या तिन्ही गोष्टींचा संदर्भ बायबलमध्येसुध्दा आला आहे आणि इन-हारोद या किबुत्सचा परिसर जेझ्राएल दरीत आणि गिल्बोआ डोंगराच्या समोरच आहे.

येलचे आजोबा जेव्हा या किबुत्सच्या ठिकाणी आले, तेव्हा त्यांनी तंबूत राहण्यास सुरुवात केली. तो सगळा प्रदेश अत्यंत दलदलीचा होता. निलगिरीची झाडे पाणी खूप शोषून घेतात, त्यामुळेच त्यांनी दलदल जाण्यासाठी म्हणून सगळीकडे निलगिरीच्या झाडांची लागवड केली. येल आणि तिचे वडील दोघेही तिथेच जन्मलेले आणि वाढलेले. फरक फक्त इतकाच की येल आता किबुत्समध्ये राहत नाही आणि तिचे वडील अजूनही किबुत्समध्ये राहतात. 1948च्या युध्दात तिचे वडील इस्रायली लष्करामध्ये लढलेले होते. किबुत्समध्ये असताना जेव्हा येल गायींच्या गोठयात काम करत असे, तेव्हा तिला गायींचा त्रास काय असतो याची कल्पना आली आणि वयाच्या 16-17व्या वर्षीच ती शाकाहारी झाली. त्यानंतर तिने मधुमक्षिका पालन विभागात काम केले. तिच्या मते किबुत्सने तिला आयुष्यात जमिनीशी जोडलेले ठेवले. तिचे वडील किबुत्समधल्याच मोठया शाळेत भौतिकशास्त्र शिकवत. लहानपणी किबुत्समधल्या शाळेत असतानाची आठवण सांगताना येल म्हणाली की किबुत्समधल्या लोकांना शेतीचे काही काम तातडीने करून घ्यायचे असेल, तर आम्हाला शाळेतून सुट्टी देऊन शेतात काम करण्यासाठी नेत. शाळेत फार काही चांगले शिकवत नसत, पण वडील सुट्टीत फिरायला गेल्यावर शास्त्रातील ज्या गमतीजमती सांगायचे, त्यामुळे तिला आणि तिच्या बहिणीला गणिताची आणि भौतिकशास्त्राची आवड निर्माण झाली. संपूर्ण किबुत्स फिरून दाखवताना 88 वर्षांचे तिचे तरुण वडीलदेखील आमच्याबरोबर फिरत होते. पाऊस कमी होत असूनही किबुत्सचा सर्व परिसर एकदम हिरवागार होता. किबुत्समध्ये फुललेल्या वसंताने तर मला वेडच लावले. जाईचे आणि सायलीचे वेलही तिथे दिसले. आंब्याची झाडे पानोपान मोहराने फुललेली होती, तर किबुत्समधील मोठमोठाले वृक्ष तिथल्या लोकांच्या शतकांच्या मेहनतीची साक्षच देत होते.

किबुत्सिम पध्दत बंद पडत चालल्याने आता तिथे राहणाऱ्या लोकांची मालमत्ता, घर, जमीन इ. कायदेशीरपणे त्या त्या सदस्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया चालू आहे. जे किबुत्सिममध्येच आयुष्यभर राहिलेत, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेदनादायक आहे. आता जी किबुत्सिम अस्तित्वात आहेत, त्याचे स्वरूप एका मोठया कॉलनीसारखे आहे. जे किबुत्समध्ये वाढले पण आता किबुत्सच्या बाहेर राहत आहेत, त्यांना किबुत्सने जी मूल्ये दिली, जमिनीशी जोडून ठेवतील असे आयुष्यातले जे अनुभव दिले, तसे अनुभव ते आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत याची त्यांना खंत वाटते. पण त्याचबरोबर आपल्या मुलांना आपल्यासारखे इतर मुलांबरोबर हॉस्टेलमध्ये राहिल्यासारखे राहावे लागलेले नाही, याचे त्यांना समाधान आहे. किबुत्सिम पध्दत खरेच चांगली की वाईट हे ठरवणे तितके सोपे नाही. पण एक मात्र नक्की की एखादे राष्ट्र, एखादा समाज उभा करायचा असेल तर ही पध्दत खूपच उपयोगी पडेल, असे माझे वैयक्तिक मत आहे.

aparnalalingkar@gmail.com