नागाभूमीतील शैक्षणिक प्रयोग

विवेक मराठी    23-Jun-2018
Total Views |

 

एक वर्षातील नागालँड वास्तव्याचे, कामाचे ते अनुभव रोज मला पुन्हा त्या भूमीत काम करण्यास खुणावत होते आणि ईश्वरी कृपेने एप्रिल 2018मध्ये हा योग आला. नागालँडमध्ये पूर्णवेळ कार्यकत्यर्ांची खूप आवश्यकता आहे. पण वैयक्तिक मला दीर्घकाळ जाणं शक्य नाही हे लक्षात आलं आणि मग दुसरी कल्पना डोळयासमोर फेर धरू लागली. 8 दिवसांचे, 15 दिवसांचे कार्यक्रम घेऊन आपण गटागटाने निश्चितच काम करू शकतो. 21 एप्रिल ते 05 मे इतका काळ आम्ही नागालँडमध्ये त्या प्रयोगासाठी दिले. याबाबतचं हे मनोगत...

 नमस्कार वाचकहो... पुन्हा एकदा एक जिव्हाळयाचा विषय घेऊन आपणासमोर येतेय. खरं तर हे माझं मनोगत आहे. माझे व्यक्तिगत अनुभव, व्यक्तिगत चिंतन आहे. पण ईशान्य भारतावर माझ्यासारखीच आस्था असणाऱ्यांना हे सांगावं असं वाटलं अन् कागदावर उतरत गेलं. तीन वर्षांपूर्वी याच विषयावर मी माझे अनुभव विवेकच्या माध्यमातून लिहिले होते. एक वर्षातील नागालँड वास्तव्याचे, कामाचे ते अनुभव रोज मला पुन्हा त्या भूमीत काम करण्यास खुणावत होते आणि ईश्वरी कृपेने एप्रिल 2018मध्ये हा योग आला.

ईशान्य भारताची सामाजिक स्थिती, तिथला निसर्ग, रस्ते, चर्चच्या माध्यमातून घडवून आणलेलं धर्मांतरण या साऱ्या गोष्टी खरं तर आपल्याला ढोबळमानाने माहीत असतात. तिथल्या लोकांना अन्य भारताशी, भारतीयांशी भावनिकदृष्टया जोडणं आणि देशाचं अस्तित्व सर्वतोपरी सुरक्षित करणं हा स्पष्ट आणि शुध्द हेतू घेऊन आपलं काम तिथे सुरू आहे याबद्दलही आपण अवगत आहोत. अनेकांना काही करण्याची इच्छादेखील असते, पण नेमकं काय करावं याबाबत ते साशंक असतात. तीन वर्षांनंतर तिथे जाताना मी या साऱ्या गोष्टी अनुभवत होते.

एक गोष्ट तीन वर्ष सतत जाणवत होती की, तिथे (नागालँडमध्ये) पूर्णवेळ कार्यकर्त्याची खूप आवश्यकता आहे. सातत्याने काम करत राहिलं तरचं तो समाज आपल्याला स्वीकारेल आणि स्वत:चं मूळ शोधण्याचा प्रयत्न करेल. पण वैयक्तिक मला दीर्घकाळ जाणं शक्य नाही हे लक्षात आलं आणि मग दुसरी कल्पना डोळयासमोर फेर धरू लागली. 8 दिवसांचे, 15 दिवसांचे कार्यक्रम घेऊन आपण गटागटाने निश्चितच काम करू शकतो. 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिंनीपासून ते सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सारे यात सहभागी होऊ शकतील आणि मग हा प्रयोग केला. आमची तीन जणींची टीम ठरली. 21 एप्रिल ते 05 मे इतका काळ आम्ही नागालँडमध्ये या प्रयोगासाठी दिले. त्याबाबतचं हे मनोगत...

जायचं ठरलं, तेव्हा अनेक प्रश्न मनात होते... काय प्रतिसाद मिळेल? मनातल्या, कागदावरच्या नियोजनाला वास्तवात उतरवण्यात कितपत यशस्वी होऊ? पण शेवटी हा प्रयोग आहे. यातून जे समोर येईल ते स्वीकारायचं आणि एखादी छान कल्पना घेऊन कामाला लागायचं असं ठरवून मी, सई साने (रत्नागिरी) आणि स्वाती केतकर (ठाणे) कामाला लागलो.

मी माझं क्राफ्ट ऍक्टिव्हिटीचं नियोजन सुरू केलं. सईताईने 2 महिने परिश्रम करून शिक्षकांसाठी सेशन तयार केलं. विविध टीचिंग एड्स तयार केली. 100 मुलांपर्यंत पोहोचायचं - तेही कमी वेळात, तर मग 5 शिक्षकांसह काम करणं सुलभ म्हणून ही 'टीचर्स ट्रेनिंग'ची कल्पना पुढे आली. युवा वर्गासाठी करियर टॉक आणि गृहिणींसाठी कुकिंग क्लास अशा Short but sweet activitiesचा समावेश आमच्या कार्यक्रमात केला होता.

वसतिगृहात (तुएन्सांग) वॉर्डन म्हणून काम करणारा माजी विद्यार्थी चाँगसा यांच्या मी दोन महिने सतत संपर्कात होते. त्याला काही नवीन गोष्ट, योजना सांगितली की तो हसत म्हणायचा, ''हो जाएगा।'' त्याच्या शब्दाने मनाला एक वेगळीच शक्ती यायची. कारण तुएन्सांगसारख्या ठिकाणी आपल्याकडील एकही कार्यकर्ता नाही. समाजाशी संपर्क नाही, तरीही 7 दिवसांचा कार्यक्रम घेण्याचं धाडस मी करत होते. सारं काही अनिश्चिततेच्या धुक्यातून जात होतं आणि यात 12वीत शिकणारा चाँगसा 'हो जाएगा' म्हणत आशेचा किरण दाखवायचा.

शिक्षक, लहान मुलं, तरुण-तरुणी अन् महिला यांना डोळयासमोर ठेवून आमचा कार्यक्रम निश्चित झाला. आम्ही 19 एप्रिलला निघून 21ला रात्री दिमापूर कार्यालयात पोहोचलो.

गोपालजींनी आमच्या 'इनर लाइन परमिट'चं काम दोन दिवस आधीच केल्याने आमचा कार्यक्रम सुरळीत सुरू झाला. वास्तविक आमची 9ला पोहोचणारी कामरूप रात्री 12.30नंतर दिमापूरला पोहोचली. तीन दिवसांच्या प्रवासानंतर केवळ 4 तास विश्रांती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी 6.30ची नागा स्टेट ट्रान्स्पोर्टची बस पकडून तेनिंगच्या दिशेने प्रवास सुरू केला. रिपरिप पाऊस सुरू होता. पण नागभूमीत पाय ठेवला अन् प्रवासाचा शीण कुठल्या कुठे निघून गेला.

पेरेन जिल्ह्यातील तेनिंग या गावी जनजाती विकास समितीच्या झेलियांगराँग हराक्का स्कूलमध्ये आमचा कार्यक्रम ठरवला होता.

माजी मुख्यमंत्री टी.आर. झेलियांग यांच्या गावावरून ही बस जाणार होती. 15-20 कि.मी.चा पक्का रस्ता संपला आणि कच्चा रस्ता सुरू झाला. हिरव्यागार वनराईशी गप्पागोष्टी करत, हलत-डुलत माणसं, किराणा सामान, भाजीपाला, कोंबडी आणि डुकराची एखाद-दोन पिल्लं यांना मिरवत आमची बस चालली होती.

नागमोडी वळणं, उंच उंच आकाशाला स्पर्शणारे डोंगर, स्वच्छ निळंभोर आकाश, हवेचा आल्हाददायक स्पर्श आणि सहप्रवाशांच्या अगम्य गप्पागोष्टी याचा आनंद घेता घेता 10 तास केव्हा उलटून गेले कळलंच नाही. सूर्य मावळतीला झुकत चालला होता आणि आमची बस तेनिंगच्या शेवटच्या थांब्याला जाऊन पोहोचली. केवळ 145 कि.मी. रस्ता कापायला तिने 10 तास घेतले होते.

हराक्का शाळेतील दोन शिक्षिका आम्हाला आणायला हसतमुखाने हजर होत्या. त्यांनी आमच्या सामानाचा ताबा घेतला आणि आम्ही हराक्का स्कूलच्या गेस्टरूममध्ये येऊन पोहोचलो.

गरमगरम वाफाळत्या चहासह सर्वांशी परिचय झाला. सहज खोलीबाहेरच्या अंगणात उभी राहिले. सूर्यबिंब डोंगराआड वेगाने जात होतं. त्या मावळतीच्या प्रकाशात माझी नजर एका विशिष्ट इमारतीवर गेली. ते होतं 'तिंगवांग भगवान'चं मंदिर. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहिलेलं. स्वधर्म मानणाऱ्या बांधवांची, हाताच्या बोटावर मोजावी इतकीच मंदिरं आज पेरेनमध्ये उरली आहेत. याच तिंगवांगला स्मरून वीर जादोनांग यांनी इंग्रजांविरुध्द लढण्याचं धाडस केलं. याच तिंगवांगच्या आशीर्वादाने गाइदिन्ल्यू यांनी समाजाला काळानुसार बदलण्याचं महत्त्व सांगत समाजाची पुनर्बांधणी केली आणि याच तिंगवांगने राणी गायदिन्ल्यूला भारताच्या स्वातंत्र्यलढयात संपूर्ण 14 वर्षं तुरुंगवासात इंग्रजांचा जुलूम सहन करतही अभिमानाने जगण्याचं बळ दिलं. विचारांची तंद्री भंग पावली अन् जाणवलं.. सूर्य अस्ताला गेला होता. आकाश काळोखाची चादर पांघरून विसावलं होतं. मनात एक अनामिक कालवाकालव झाली. कसं लयाला गेलं हे वैभव...? पण पुन्हा वाटलं - आजचा सूर्यास्त निराशेची नाही, उद्या येणाऱ्या सूर्योदयाची नांदी असते....

रोटी आणि आलू सब्जी, राजा मिरच्यांची चटणी अशी मेजवानी घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशीच्या कामाचं नियोजन केलं.

12वी परीक्षा दिलेल्या 2 मुली आणि हराक्का शाळेतील 2 मुलींना आम्ही मदतनीस म्हणून आमच्याबरोबर बोलावलं होतं.

दुसऱ्या दिवशी शाळेच्या परिपाठावेळी सर्व 320 विद्यार्थ्यांशी आमचा परिचय करून दिला गेला आणि आमच्या नियोजित कामाला सुरुवात झाली. इयत्ता 9वीच्या आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांशी करियरविषयक गप्पा मारण्याचं काम स्वातीताईने सुरू केलं. ही गोष्ट मुलांना अगदी नवीन होती.

मी माझ्या टीमसह एकेका वर्गात क्राफ्ट पेपर, रंग, आइसक्रीम स्टिक यांपासूनचे क्राफ्ट शिकवत होते. कागदी टोप्या घालून मुलांना खूप मजा वाटत होती. तयार केलेली फुलं, माळा यांनी वर्गाच्या मोकळया भिंती सजू लागल्या. मुलांना नागामिझ, इंग्लिश कळत नव्हतं. त्यांच्यासाठी माझ्या साहाय्यक छान समजावून सांगायच्या. सुमारे 200 मुलांना त्या दिवशी स्टॉकिंग फुलांपासून क्राफ्ट पेपरच्या विविध वस्तू शिकवल्या गेल्या. वेळ अगदी भुर्रकन उडून गेला.

सईताई 12 शिक्षक-शिक्षिकांसह तिच्या Moduleनुसार चर्चा करत होती. छोटे खेळ, गणितासाठीचे टीचिंग एड्स हे शिक्षक पहिल्यांदाच अनुभवत होते. सुरुवातीला शांतपणे केवळ ऐकणारे सारे जण हळूहळू मोकळेपणाने बोलू लागले. विचारू लागले. नव्या कल्पना, नवा दृष्टीकोन यामुळे स्वत:कडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन त्यांना मिळाल्याचं त्यांनी शेवटच्या सत्रात सांगितलं.

एक दिवसाचा भरगच्च कार्यक्रम पाहता पाहता पार पडला. आणखी एक दिवस असा कार्यक्रम हवा होता, असं साऱ्यांनाच वाटत होतं. पण आमच्याकडे वेळ थोडा होता. आज मिळालेल्या
Contentचा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित उपयोग करू असा विश्वास आम्हाला साऱ्या शिक्षकांनी दिला आणि आम्ही सारे आपापल्या निवासी परतलो.

आम्ही तिघी पुन्हा एकदा एकत्र बसलो आणि एकमेकींचे अनुभव समजून घेतले. कारण हा ट्रेनिंगचा कार्यक्रम जरी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी असला, तरी त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळणारं होतं.

या गावात मोबाइल रेंज शून्य होती. त्यामुळे अनेक शिक्षकांना सईताईने अनौपचारिक भेटीमध्ये अनेक शैक्षणिक व्हिडिओ शेअर केले. अनेक नव्या कल्पना सुचवल्या.

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही दिमापूरला निघणार होतो. कार्यक्रम यशस्वी झाला होता आणि आम्हाला खूप अनुभवही देऊन गेला होता. काही तथ्यं समोर आली, ती पुढील काळात जाणाऱ्यांना नक्की उपयुक्त ठरतील.

  1.  अंतर अन् वेळ यांचं गणित नागालँडमध्ये प्रवासात फोल ठरलं. पण निसर्गाचं वैभव पाहता पाहता आपला वेळ निश्चितच सत्कारणी लागतो.

  2. या लोकांमध्ये कमालीची सहनशीलता असते. ती समजून घेत तर कधी सहन करत काम करावं लागतं.

  3.  पाहुणचाराबाबत नागा लोक खूप उदार आहेत. हातचं न राखता भरभरून देण्याचा त्यांना सहज स्वभाव असतो.

  4. v या ठिकाणी महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, पण गायनॅक तर दूरच, साधा फिजिशियनही त्यांच्या पंचक्रोशीत नसतो.

  5. v बहुतांश महिलांचं बाळंतपण घरीच होतं. काही सधन लोक 3-4 महिने आधी दिमापूरला जाऊन राहतात.

  6. आता आमच्या कार्यक्रमातून जाणवलेल्या काही गोष्टी -

  7. u मुलांना रंजक वाटतील अशा Short term activities घेऊन आपण तिथे गेल्यास चांगला प्रतिसाद मिळतो.

  8. u प्रयोगशाळा, प्रयोगसाहित्य, पृथ्वीचा गोल या गोष्टी मी पाहिलेल्या शाळांमध्ये आढळल्या नाहीत. कालचा पेपर आज किंवा उद्या वाचायला मिळतो, असं दळणवळण असणाऱ्या भागातील मुलांना बाहेरच्या विज्ञानाची, घडामोडींची काहीच माहिती नसते.

  9. u लहान मुलांसह काम करताना त्यांची भाषेची अडचण लक्षात घेऊन आपण स्थानिक इंग्लिश, हिंदी जाणणाऱ्या मुलामुलींची मदत घेणं इष्ट...

  10. u तिकडे जाण्यापूर्वी तिथे चालणारी नागामिझ ही भाषा, जुजबी स्वरूपात शिकून घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.
  11. u नागा लोकांची मुळातच कमी बोलण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे सुरुवातीला त्यांचा संकोच काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. संवादात सहजपणा आणावा लागतो. 'अरे बापरे, हे असं असतं इथे' असे शब्दच नव्हे, तर भावही चेहऱ्यावर आणणं टाळावं.

  12. u Participatory Learning, Peer Learning या शिक्षणाच्या पध्दती इथे नाहीत. केवळ शब्दांचे ढीगच्या ढीग स्मृतीच्या भिंतींनी बंदिस्त करणं हाच अभ्यास. संकल्पना समजावून देणाऱ्या शिक्षणाची इथे गरज आहे. Class control, class visibality अशा सेशन्सची तिथे अधिक आवश्यकता आहे.

  13. u शारीरिक खेळ इथे फारसे खेळले जात नाहीत. त्यामुळे अशा मैदानी खेळांचे, Physical Educationचे, लेझिम, रिबन कवायत, कराटे, इ.चे प्रशिक्षण कार्यक्रमदेखील इथे आवश्यक आणि उपयुक्त ठरतील.

  14. u सायन्स फॅक्ट्स, प्रयोग, ई-लर्निंग, इतिहास व आरोग्याबाबतच्या गोष्टी, गाणी, पुस्तकं, शॉर्ट फिल्म्स, लेक्चर्स या माध्यमातूनदेखील तिथे काम करणं शक्य आहे.

खरंच, किती शिकवलं या एका दिवसाने....

खूप प्रसन्न मनाने भगवान तिंगवागच्या मंदिरासमोर नतमस्तक होऊन आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपलेपणा, शिक्षक बंधुभगिनींच्या हृदयातील जागलेली उत्सुकता हे सारं मनात साठवून आम्ही दिमापूरचा रस्ता धरला.

(पूर्वार्ध)

suchitarb82@gmail.com