जेरुसलेम

विवेक मराठी    25-Jun-2018
Total Views |

जेरुसलेम हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असून ज्यूंइतकेच अरब मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठीदेखील ते धार्मिकदृष्टया महत्त्वाचे आहे. तीन एकेश्वरवादी धर्मांमुळे येथे धार्मिक आणि सांस्कृतिक गुंतागुंत पहायला मिळते. या शहराची विविध अंगांनी ओळख करून देणारा लेख.

इस्रायलमधील जेरुसलेम या शहराला 4000 वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन असा इतिहास आहे. विविध कथा, त्याचप्रमाणे पुरातत्त्व विभागाच्या उत्खननातून मिळालेले पुरावे यांची जोड देऊन हा इतिहास जेरुसलेममध्ये जिवंत ठेवलेला दिसतो. पुरातत्त्व विभागाच्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार जेरुसलेमच्या आजूबाजूला उत्खननात 7000 वर्षांपूर्वीची तांब्याच्या युगातील सिरॅमिकची भांडी सापडलेली आहेत. हिब्रू भाषेत जेरुसलेमला 'येरुशलाईम' किंवा 'येरुशलेम' असे म्हणतात. येरुशलेम हा शब्द 'येर' आणि 'शलेम' या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून आला आहे. 'येर' याचा अर्थ एखाद्याच्या स्मृतीसाठी असलेले किंवा कायम असलेले ठिकाण, तर 'शलेम' याचा अर्थ शांतता असा आहे. त्यामुळे 'येरुशलेम' या शब्दाचा अर्थ शांततेची स्मृती असलेले ठिकाण. हे नाव हिब्रू बायबलमधील 'येशुहाच्या पुस्तकात' सर्वप्रथम आलेले आढळते. हिब्रू भाषेत 'ज' असा उच्चारच नाहीये. जिथे जिथे इंग्लिशमध्ये 'ज'चा उच्चार येतो, तिथे तिथे हिब्रूचा 'य' हा उच्चार आहे. म्हणून जेजुहाचा येशुहा, जेरुसलेमचा येरुशलेम असे उच्चार करतात. सध्याच्या जेरुसलेमचे दोन भाग आहेत. एक इस्रायलमध्ये आहे आणि दुसरा पॅलेस्टाइनमध्ये.

इस्रायलमधील नवीन जेरुसलेममध्ये ज्यू लोकांचीच वस्ती आहे. हे नवीन जेरुसलेम इतर कोणत्याही आधुनिक शहरासारखेच आहे. ज्युईश संस्कृती दाखविणारे मोठे म्युझियम नवीन जेरुसलेममध्ये आहे. त्याचप्रमाणे हॉलोकॉस्टमधील बळींच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'याद वाशेम' हे स्मृती मंदिर आहे. जुन्या जेरुसलेममधील 'वेस्टर्न वॉल' किंवा 'अश्रूंची भिंत' या खालोखाल भेट दिले जाणारे 'याद वाशेम' हे दुसरे पर्यटन स्थळ आहे. जेरुसलेममध्ये शब्बातचा काळ हा काटेकोरपणे पाळला जातो. त्या दिवशी जर तुम्ही जेरुसलेममध्ये असाल, तर याचा अनुभव घेतल्याशिवाय तुमची जेरुसलेम भेट पूर्ण होऊच शकत नाही. शब्बातच्या काळात शब्बात काटेकोरपणे पाळणारे लोक इलेक्ट्रिक स्विचेससुध्दा बंद करत नाहीत, लिफ्टची बटन्स दाबत नाहीत, फोन उचलत नाहीत, कार चालवत नाहीत. जेरुसलेम हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असूनही अरब मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठीदेखील धार्मिकदृष्टया महत्त्वाचे असल्याने पॅलेस्टाइननेदेखील त्यावर दावा सांगितलेला आहे. म्हणूनच जवळजवळ सर्व देशांच्या वकिलातींची कार्यालये तेल अविवमध्येच आहेत. हल्लीच ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  झाल्यानंतर त्यांनीच अमेरिकन वकिलात जेरुसलेमला हलवली आहे. याची परिणती जेरुसलेममधील पॅलेस्टाइन लोकांचे इस्रायली लोकांवरील आत्मघातकी हल्ले वाढण्यात, तसेच इराणने हमास आणि हिज्बोला या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊन इस्रायलवरील हल्ल्यांच्या वाढीत झाली आहे.

जुने जेरुसलेम हे इस्रायलव्याप्त पॅलेस्टाइनमध्ये येते, जिथे प्रामुख्याने तीन एकेश्वरवादी धर्मांची प्रार्थनास्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. जुन्या जेरुसलेममध्ये सर्वत्र इस्रायली सैनिक मोठमोठया मशीनगन्स घेऊन उभे असलेले दिसतात. त्यामुळे त्याला एका छावणीचे स्वरूपच आलेले आहे. जुन्या जेरुसलेमच्या सभोवती मोठी तटबंदी असलेली भिंत आहे. जुन्या जेरुसलेममध्ये प्रवेश करण्यासाठी दमास्कस गेट, जाफा गेट, झिऑॅन गेट, लायन्स गेट व न्यू गेट अशी एकूण पाच भव्य प्रवेशद्वारे आहेत. या भिंतीच्या आत असलेल्या जुन्या जेरुसलेमचे प्रामुख्याने चार भागात विभाजन होते. जुन्या जेरुसलेमच्या उत्तर-पूर्व भागात मुस्लीम क्वार्टर आहे. लायन्स गेटपासून चालू होत दमास्कस गेट ते टेंपल माउंटच्या उत्तरेकडचा सर्व भाग या क्वार्टरने व्यापलेला आहे. ख्रिस्ती धर्मीयांचे 'व्हिया डलोरोसा' येथूनच लायन्स गेटपासून चालू होते. व्हिया डलोरोसा म्हणजे दु:खाचा मार्ग. यात येशू ख्रिस्ताला रोमन राजांनी अटक करण्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची 9 स्थानके येतात. ख्रिस्ती भाविक या मार्गावरून अगदी क्रॉस ओढत जाताना पाहावयास मिळाले. व्हिया डलोरोसाचा सुरुवातीचा भाग मुस्लीम क्वार्टरमध्ये येतो. मुस्लीम क्वार्टरमध्ये आधी मिश्र वस्ती होती. आता ख्रिस्तींची आणि ज्यूंची संख्या कमी आहे. या क्वार्टरमध्ये सगळा टर्किश बाजार समाविष्ट आहे. बाजाराचा भाग सोडला, तर मुस्लीम क्वार्टरमध्ये गरिबी आणि बकालपणा अधिक दिसून येतो.

जुन्या जेरुसलेमच्या उत्तर-पश्चिम भागात ख्रिश्चन क्वार्टर आहे. यात साधारणपणे ख्रिस्ती धर्माची 40 धार्मिक ठिकाणे येतात. यात विविध देशांतील (ग्रीक, इटालियन, फें्रेच, इंग्लिश इ.) चर्चेस, त्याचप्रमाणे कॅथलिक, बाप्टिस्ट असे भिन्न प्रकार आहेत. गंमत म्हणजे फक्त व्हिया डलोरोसावरील नऊ स्थानकांवर आणि शेवटी जिथे येशू ख्रिस्ताचा मृतदेह जिथे ठेवलेला होता, ती गुहा ज्या चर्चमध्ये आहे ते चर्च ऑॅफ सेपेल्कर या ठिकाणीच भाविकांची गर्दी दिसली. बाकीची ठिकाणे अक्षरश: ओस पडलेली दिसली. आम्ही नाझरेथला गेलो, त्या वेळी आम्हाला हेच दृश्य दिसले. या चर्च ऑॅफ सेपेल्करच्या भोवतालीच ख्रिश्चन क्वार्टर पसरलेले आहे. अरब ख्रिश्चन लोकांची वस्ती तिथे अधिक आहे. जुन्या जेरुसलेमच्या दक्षिण-पश्चिम भागात अर्मेनियम क्वार्टर आहे. तिथे मुख्यत: अर्मेनियम ख्रिश्चन लोकांचे वास्तव्य आहे. असे म्हणतात की चौथ्या शतकात अर्मेनिया हा देश सर्वप्रथम संपूर्ण ख्रिस्ती झाला. त्यानंतर अर्मेनियातून येऊन अनेक ख्रिस्ती धर्मगुरू जेरुसलेमच्या या भागात स्थायिक झाले. जुन्या जेरुसलेमच्या दक्षिण-पूर्व भागात ज्युईश क्वार्टर आहे. इथे अधिकाधिक ज्यू वस्ती आहे. ज्युईश क्वार्टर खूपच सधन आणि रात्रीच्या वेळी अधिक गजबजलेली वाटली. अरब क्वार्टर्स (मुस्लीम आणि ख्रिश्चन)मधील टर्किश बाजारातील दुकानांमधील मालाच्या किमती आणि ज्युईश क्वार्टरमधील दुकानांमधील मालाच्या किमती यांमध्येदेखील खूप फरक जाणवला. ज्युईश व अर्मेनियम क्वार्टरमध्ये स्त्रियादेखील मोकळेपणाने रात्री फिरताना दिसल्या, पण अरब भागात - म्हणजेच मुस्लीम आणि ख्रिश्चन क्वार्टर्समध्ये एकदम सामसूम होती. तो सर्व भाग इस्रायली सैनिकांनी भरलेला आढळला. या प्रत्येक भागास एकमेकांपासून विलग करण्यास भली मोठी प्रवेशद्वारे आहेत. रात्री ही सगळी प्रवेशद्वारे बंद केली जातात.

या चारही क्वार्टर्समधून जुन्या जेरुसलेममधील 'टेंपल माउंट' या अतिसंवेदनशील भागात जाता येते. टेंपल माउंटवरच ज्यू लोकांचे पहिले आणि दुसरे मंदिर बांधलेले होते. पहिले मंदिर बॅबेलिऑॅन लोकांनी पाडले, तर दुसरे मंदिर राजा हेरॉदने बांधले, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचे बांधकाम अर्धवटच राहिले. त्यानंतर आलेल्या रोमन राजांनी ते अर्धवट बांधकाम असलेले दुसरे मंदिरही पाडून टाकले. ज्यू धर्मीयांनी इतर देशांत स्थलांतर केल्यानंतर या ठिकाणी अरब, टर्किश राजांनी राज्य केले. त्याच सुमारास येथे अरब मुसलमान आले. महंमद स्वत: कधीच जेरुसलेममध्ये आलेले नाहीत, पण त्यांनी स्थानिक धर्मगुरुंना सांगितले की त्यांच्या स्वप्नात पांढऱ्या उडत्या घोडयावरून ते टेंपल माउंटवर आलेले होते. त्यामुळे स्थानिक अरब मुसलमानांनी तिथे ज्यू लोकांच्या दुसऱ्या टेंपलचे अवशेष नष्ट करून तिथे मोठी मशीद बांधली. पाच वेळा नमाजासाठी जाण्यास सोपे पडावे म्हणून त्यांनी टेंपल माउंटच्या पायथ्याशीच बोगदे करून आपली वस्ती वाढवली. आजही अरब मुसलमानांची वस्ती जुन्या जेरुसलेममध्ये जास्त आहे. कमानीसारखे छप्पर असलेल्या इमारत अशी त्यांच्या घरांची रचना आहे.

खरे तर टेंपल माउंट हे ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्टया अतिशय महत्त्वाचे आहे. पण तिथे मुसलमान लोकांनी भव्य मशीद बांधल्याने त्यांना टेंपल माउंटच्या त्या भागात प्रवेश नाही. ज्यू लोकांना फक्त टेंपल माउंटच्या पश्चिमेकडील भिंतीचा भाग दिलेला आहे. त्यालाच ते 'वेस्टर्न वॉल' असे म्हणतात. तिथे जाऊन ज्यू धार्मिक लोक प्रार्थना करतात. आपल्या पूर्वजांच्या आठवणीने रडतात. म्हणून त्याला 'वेलिंग वॉल' म्हणजेच अश्रूंची भिंत असेही नाव आहे. टेंपल माउंटच्या आजूबाजूला इस्रायली सैनिकांचा कायम वेढा असतो. सकाळी फक्त तीन तास टेंपल माउंट पर्यटकांसाठी खुले असते. टेंपल माउंटवरील त्या भव्य मशिदीत फक्त मुसलमान पुरुष-स्त्रियांनाच परवानगी आहे. पर्यटक फक्त बाहेरून फिरून तो भाग पाहू शकतात. ज्यू लोकांची अशी धारणा आहे की त्या मशिदीच्या मुख्य डोमाखाली त्यांचा पारंपरिक धार्मिक दगड अजूनही आहे. मुसलमान लोक त्या मशिदीच्या डोमला 'डोम ऑॅफ रॉक' असेच म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या आदल्या रात्री कर्मठ ज्यू लोक, शालेय विद्यार्थी, स्थानिक ज्यू लोक असे टेंपल माउंटच्या बाजूने वाजत गाजत 'टेंपल माउंटचा ताबा ज्यू लोकांना मिळून तिथे ज्यू लोकांचे मंदिर बांधणे' यासाठी मिरवणूक काढतात. ही प्रथा इस्रायलच्या स्थापनेच्याही खूप आधीपासून - त्या भागात टर्किश राज्यकर्ते होते, तेव्हापासून चालू आहे. टेंपल माउंटच्या परिसरातील ते सर्व वातावरण पाहिले आणि मला अयोध्येत पाहिलेला बाबरी मशिदीचा ढांचा आणि त्या वेळी तिथे असलेला कडक पोलीस बंदोबस्त आठवला. ज्यू लोकांना जरी टेंपल माउंटवर जायची परवानगी नसली, तरी टेंपल माउंटच्या भिंतीच्या खालून इस्रायली पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून भुयारे खणलेली आहेत. या भुयारांत त्यांना दुसऱ्या टेंपलचे अवशेषही मिळालेले आहेत. ज्यू लोकांचा टेंपल माउंटशी संबंध कसा आहे आणि ज्यू लोकांनाच त्याचा ताबा मिळाला पाहिजे, हे भविष्यात सगळया जगाला पटवून देण्यासाठी ही सगळी धडपड आहे. इतके सगळे होऊनही त्यांनी हार मानलेली नाही. एकूणच जुने जेरुसलेम पाहिल्यावर, उत्तरेकडील हैफामधील 'बहाई टेरेस गार्डन्स' पाहिल्यावर, वेस्ट बँकमधील इस्रायल-जॉर्डन सीमेवरील 'कसेर अल येहुदा' तसेच गॅलेलीमधील 'यार्देनीत' ही बाप्तिस्मा साईट पाहिल्यावर इतक्या छोटया इस्रायलमधील एकेश्वरवादींचा धार्मिक गुंता लक्षात येतो.

 aparnalalingkar@gmail.com