आस्थेचे पंचप्राण - 5

विवेक मराठी    28-Jun-2018
Total Views |

हा आहे तुंगनाथ, ज्या ठिकाणी महिषरूपी महादेवांचे बाहू पूजले जातात, तो तुंगनाथ. तुंगनाथ पंचकेदारांमधला तिसरा केदार व जगात सर्वात जास्त उंचीवर असणारं एकमेव शिवमंदिर. समुद्रसपाटीपासून याची उंची 3,680 मी.

 तुंगेश्वर महाक्षेत्रं कथ्यमानं मया श्रुणु।

यच्छुत्वा सर्वपापेभ्यों मुच्यते नात्र संशय:।

मान्धातृक्षेत्रतो याम्ये योजनद्वयविस्तृतम्।

द्वियोजनसमायातं सर्वकामफलप्रदम्।

तुंगनाथं शुभक्षेत्रं पापघ्नं सर्व कामदाम्।

यदृष्ट्वा सर्वपापेभ्यो विमुक्तो लभते शिवम्।

(स्कंद पुराण 50, केदार खंड अध्याय 49/1, 3-4)

 तुंगनाथ हा तिसरा केदार. महिषरूपी महादेवांच्या नाभीच्या वरचा व शिरप्रदेशाखालचा भाग या ठिकाणी पूजला जातो. म्हणजेच महादेवांचे बाहू व वक्षस्थळ इथे पूजनीय आहेत. स्कंद पुराणातल्या केदार खंडात या क्षेत्राचं महत्त्व वर्णन करताना त्याला 'महाक्षेत्र' म्हटलं गेलंय. या क्षेत्राचं माहात्म्य ऐकल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. हे तीर्थ शिवभक्ती प्रदान करणारं, याच्या केवळ दर्शनामुळे मनुष्यप्राणी पापांपासून मुक्त होतो व शिवसायुज्य - म्हणजेच शिवाशी एकरूप होतो. तुंगेश्वर क्षेत्राच्या अंतर्गत दोन योजनांचं मांधाता क्षेत्र आहे, जिथे राजा मांधाताने पूर्वकाली घोर तपश्चर्या केली होती. मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण करणारं असं तुंगनाथ.

तर आपण आता जाणार आहोत तुंगनाथला. रुद्रनाथहून आपण सागर या ठिकाणी पोहोचलो आहोत. सागरहून आपल्याला जायचंय चोपता या गावापर्यंत. सागर ते चोपता हे अंतर आहे 31 कि.मी. मंडल ते चोपता हा रस्ता केदारनाथ वाइल्ड लाइफ सँक्च्युअरीमधून जाणारा निसर्गरम्य असा रस्ता. घनदाट जंगल अन यामध्ये आढळणारे अनेक पक्षी, वन्यजीव. केदारनाथ वाइल्ड लाइफ सँक्च्युअरी ही प्रसिध्द आहे कस्तुरी मृगांच्या संरक्षण व संवर्धनासाठी.

अतिउंचीवर सापडणारा कस्तुरी मृग हा या राज्याचा राज्य पशू आहे. कस्तुरीसाठी हत्या करण्यात येत असल्यामुळे हळूहळू endangered होत चाललेला. केदारनाथ वाइल्ड लाइफ सँक्च्युअरीमध्ये यांच्या संरक्षणासाठी व्यवस्था. तर क्वचितच दिसणारा कस्तुरी मृग, तसंच या राज्याचा राज्यपक्षी हिमालयन मोनाल, जो चोपता-मंडल या भागात प्रामुख्याने आढळून येणारा. केदारनाथ वाइल्ड लाइफ सँक्च्युअरीमध्ये कस्तुरी मृग व हिमालयन मोनाल दिसण्याची जास्त शक्यता असते अन कस्तुरी मृगांचे आवाजही ऐकू येण्याची शक्यता जास्त आहे.

बरेच जण मंडल ते चोपता किंवा उलट चालत जातात, कारण हा रस्ता अतिशय निसर्गरम्य असा आहे.

मंडलपासून आपण चोपता या ठिकाणी येऊन पोहोचतो. चोपता हे भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाहून त्रिशूल, नंदादेवी व चौखंबा यासारख्या हिमालयीन शिखरांचा सुंदर नजारा दिसतो. 2,700 मी. इतक्या उंचीवर वसलेलं चोपता हे देवदार, ऱ्होडेडेंड्रॉन्स (लाल बुऱ्हांस) यासारख्या वृक्षराजीने वेढलेलं आहे. हिवाळयात खूप प्रमाणात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे अतिशय प्रसिध्द असं. डिसेंबर ते मार्च या काळात तुंगनाथ, चोपता व चंद्रशीला हे सर्व जाड बर्फाच्या चादरीखाली झाकली जातात. मार्चनंतर अतिशय सुखद असं वातावरण असतं.

चोपताजवळच दुगलबिट्टा हे गाव आहे अन या दोन्हीही ठिकाणी बुग्याल आहेत. या ठिकाणी कॅम्पिंग करायची सोय आहे. चोपताजवळचा रोहिणी बुग्याल हा चोपता व सरी या गावांना जोडणारा, ज्या ठिकाणी सुंदरसं देवरिया सरोवर आहे. सरीहून चोपतापर्यंत हे देवरिया सरोवर/सरी या मार्गानेही जाता येतं.

चोपता येथे आपण मुक्काम करायचाय. चार धामांप्रमाणेच तुंगनाथलाही कपाट व्यवस्था - म्हणजेच ठरावीक दिवशी मंदिर उघडणं व बंद होणं. तुंगनाथची पालखी ही मक्कूमठ या गावाच्या मंदिरात ठेवली जाते. उखीमठ ते चोपता या मार्गावर एक तिठा दिसतो, यातला तिसरा रस्ता मक्कूमठला जातो.

ज्यांना इथली जीवविविधता बघायची असेल, त्यांच्यासाठी मेअखेर ते जूनअखेर हा सीझन सर्वात चांगला. अनेक फुलं, वृक्ष, पक्षी, तसंच हिरव्यागार रंगाने उठून दिसणारे बुग्याल, कुरणं, त्यावर चरणारे मेंढयांचे कळप हे अगदी नयनरम्य दृश्य. ऱ्होडेडेंड्रॉन्स तर अगदी बघत राहावेत असे.

चोपता ते तुंगनाथ हे अंतर साधारण 3 ते 3.5 कि.मी. अन हे पार करायला आपल्याला 3-4 तासांचा वेळ लागतो. या मार्गातला निसर्ग हा अखंड वाटचाल करू देत नाही. जागोजागी थांबून हे नेत्रसुख घेणं अपरिहार्य.

चालायला सुरुवात केल्यावर पहिला अर्धा तास ऱ्होडेडेंड्रॉन्स, नेचे, कोनिफर, शेवाळी यांनी समृध्द अशा जंगलातून जातो. बंदरपूंछ, केदारनाथ यासह अनेक हिमशिखरांचं दर्शन होतं. काही कालावधीनंतर जंगलाची व्याप्ती कमी होत जाताना दिसते अन दोन्ही बाजूंना हिरवीगार कुरणं व त्यात विविधरंगी नाजूक फुलांची उधळण दिसते. पक्ष्यांचे आवाज, औषधी वनस्पती अत्यंत अद्वितीय असं दृश्य.. अपूर्व आनंद देणारं..

वाटेत एक पाटी दिसते - वनस्पती अध्ययनासाठी गढवाल विश्वविद्यालयाची एक उच्चशिखरीय वनस्पती अध्ययन प्रयोगशाळा या ठिकाणी आहे, त्याची-अल्पाईन रिसर्च सेंटर, जे अतिउंचीवरील व दुर्मीळ वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी उभं केलंय.

इथे मध्ये काही छोटी हॉटेल्स आहेत अन इथल्या एका ठिकाणाहून यमुनोत्री, गंगोत्रीपासून बद्रिनाथपर्यंतची शिखरं दिसतात, त्रियुगी नारायणचंही दर्शन होतं. यानंतरचा रस्ता मात्र चढत जाणारा. तुंगनाथच्या आधी अर्धा कि.मी.वर दिसतं ते गणेश मंदिर. नंतर पुढे रस्ता रुंद होतो. डाव्या बाजूला काही पायऱ्या दिसतात. तुंगनाथ मंदिर इथून अर्धा कि.मी.वर. डाव्या बाजूला भोजपत्र वृक्षांनी नटलेलं खोरं. मोनालसारख्या पक्ष्यांमुळे स्वर्गसमान भासणारी ही संपूर्ण जागा.

पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटंसं कुंड. पुढे गेल्यावर काही दुकानं दिसतात, ज्यांना ओलंडून आपण मंदिर प्रांगणात प्रवेश करतो. तुंगनाथ क्षेत्रात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम दर्शन घ्यायचं ते भैरवनाथाचं, जो रक्षक आहे. सर्व शिवमंदिरांच्या दर्शनाआधी आपल्याला भैरवनाथ मंदिरं दिसतात. भैरव हा त्या त्या प्रांतात रक्षक म्हणून काम करतो.

हे मंदिर ग्रॅनाइटच्या फरशांनी बांधलं गेलंय. जगेश्वर, बागेश्वर मंदिरांची आठवण करून देणारं.

मंदिरद्वारांचं रक्षण करणारा नंदी समोर व मंदिराच्या गर्भगृहात भगवान तुंगनाथजींच्या बाहू स्वरूपातलं स्वयंभू लिंग आहे. मंदिरात आदिशंकराचार्य व व्यास यांच्या मूर्तीही प्रतिष्ठापित आहेत. या मंदिर प्रांगणात काही छोटी मंदिरं, पार्वती, पांडव, कुंती, द्रौपदी, कुबेर, डुंगरी देवी व धरुडिया देवी यांची. जगद्गुरू व्यास यांची.

तुंगनाथमध्ये आकाशगंगा या नावाने वाहणारी जलधारा आहे. ही पितृतीर्थ मानली जाते अन याच ठिकाणी पितृशिला, जिथे पितृतर्पण केलं जातं.

य: कश्चिन्मानो देवि पितृन्संतर्पयेत्प्रिये।

तीरे अअकाशगंगाया: पितरस्तस्य सुंदरि...।

मंदिर उत्तराखंडी शैलीत बांधलंय. ग्रॅनाइटच्या फरशा तासून त्यापासून बांधलं गेलंय. इतर मंदिरांप्रमाणेच याही मंदिराचं बांधकाम पांडवांनी केलेलं आहे, असं मानलं जातं. तुंगनाथ पूजा ही मे ते ऑॅक्टोबर या कालावधीत या मंदिरात व शीतकालीन पूजा ही मक्कूमठ या गावी.

तुंगनाथ मंदिरापासून 1 ते 1.5 कि.मी. अंतरावर आहे चंद्रशिला हे एक खुलं पठार.

तुंगनाथ हे अतिउंचीवर असल्यामुळे राहाण्याची सोय कमी. तरीही चंद्रशिलेवरून दिसणाऱ्या सूर्योदयाचा नजारा बघण्यासाठी इथे मुक्काम करणारेही लोक आहेत. चंद्रशिलेकडे जाण्यासाठी मंदिराच्या मागून जाणारा रस्ता, चोपताहून येणारा पायऱ्यापायऱ्यांचा असा रस्ता मंदिराजवळच संपतो. अन आता आपल्याला जायचंय ते मंदिराच्या मागून जाणाऱ्या रस्त्याने.

हा रस्ता काहीसा अरुंद अन दगडांतून जाणारा. नंतर बाजूने काहीशी हिरवळ. चंद्रशिलेपर्यंत जाण्यासाठी साधारण दोन तास चालावं लागतं. रस्ता चढत जाणारा. अतिशय चढण असणारा. हवेतल्या ऑॅक्सिजनची मात्रा कमी होत जाते अन श्वास घ्यायला त्रास होऊ  लागतो. पण बाजूला खाली अलकनंदा व मंदाकिनी नद्यांच्या खोऱ्यांचं सुंदर दृश्य, चौखंबा, बंदरपूंछ, केदारनाथ, नंदादेवी, नीळकंठ, दूनागिरी अन आणखी बऱ्याच हिमालयीन शिखरांचा नजारा भुरळ पाडतो.

चंद्रशिलेपर्यंत पोहोचल्यावर आलेल्या थकव्याचा विसर पडावा असं हे दृश्य. संपूर्ण आकाशात गगनचुंबी हिमशिखरं. पर्वतांमधून बाहेर पडणाऱ्या असंख्य जलधारा, रंगीबेरंगी फुलं अन हिमालयन मोनालचं होणारं दुर्मीळ दर्शन. चंद्रशिलेच्या ठिकाणी महान शिवभक्त रावणाने महादेवांची उग्र तपश्चर्या केली होती, असं मानलं जातं. अन ज्या ठिकाणी बसून केली होती, ती रावणशिला, चंद्रशिलेजवळच आहे.

शिवलोके महीयन्ते यावदाभूत संप्लन्वम्।

पिंडदानं च यो मर्त्यातीर्थे आकाशगंगके।

इथे केलेल्या पितृतर्पणामुळे पूर्वजांना शिवलोक प्राप्त होतो, असा महान हा केदार.

अन खरंच, तुंगनाथ हे सौंदर्याचं आगर आहे. मनाची व डोळयांची तृप्ती करणारा, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, तृषित मनाला तोषवणारा असा हा केदार.

यानंतर आपण जाणार आहोत मध्यमाहेश्वरला.

pourohitamita62@gmail.com