अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला दिशा देणारे 'अनन्यशिल्प'

विवेक मराठी    04-Jun-2018
Total Views |

 पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्ांपैकी विजेचा वाढता वापर आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांची कमतरता हा प्रश्ही आज ऐरणीवर आहे. या प्रश्ावर काही मोजके लोक आणि संस्था गांभिर्याने काम करत आहेत, त्यांपैकी मुंबईचे कौस्तुभ गोंधळेकर हे एक. वीजबचतीबाबत केवळ व्याख्याने देऊन प्रश् सुटणार नाहीत, तर त्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. हे त्यांनी ओळखले. त्यासाठी स्वत: अभ्यास केला आणि आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. त्यांची 'अनन्यशिल्प' ही कंपनी आज सौर उर्जेसह वीजबचतीच्या अनेक पर्यायांबाबत मार्गदर्शन करते आणि सेवा देते.

पारंपरिक ऊर्जेचा वाढता वापर आपले भविष्य अंधकारमय करत आहे, ही गोष्ट आपल्या देशात अद्यापही म्हणावी तशी गांभीर्याने घेतली जात नाही. सुखकर वर्तमानासाठी आपण अधिकाधिक मेहनत करतो. दिवसाचे 17-18 तास काम करतो. पण ते काम करताना कितीतरी जास्त वीज वापरली जाते. मग वाढलेले वीज बील भरण्यासाठी अधिक मेहनत. एसी, फ्रिज, टीव्ही, इन्व्हर्टर यांसारखी मोठया प्रमाणात वीज लागणारी उपकरणे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली आहेत. या वाढत्या पारंपरिक वीज वापराला निर्बंध घालण्याच्या पलीकडे परिस्थिती गेली आहे. सौर उर्जेसारख्या अपारंपरिक किंवा पर्यायी उर्जास्रोताच्या वापराचा पर्याय आहे, मात्र अद्यापही तो सवयीचा झालेला नाही. ही परिस्थिती एका दिवसात पालटणार नाही, पण त्यासाठी प्रयत्नच न करणे मात्र चुकीचे ठरू शकेल. हाच विचार करून साडेचार वर्षांपूर्वी कौस्तुभ गोंधळेकर हा तरुण अपारंपरिक ऊर्जा आणि इलेक्टि्रक सोल्युशन क्षेत्रात उतरला. त्यासाठी चक्क आयटी क्षेत्रातील लठ्ठ पगाराच्या 14 वर्षांच्या नोकरीवर त्याने पाणी सोडले. कौस्तुभची शैक्षणिक पार्श्वभूमीदेखील त्यासाठी पूरक नव्हती. आयटी मध्येच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर इन्फर्मेशन सिक्युरिटी या विषयात पीएचडी केलेली. असे असताना ऊर्जा क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे असे त्यांना वाटले. त्यातून 'अनन्यशिल्प'चा जन्म झाला. अनन्य म्हणचे युनिक आणि शिल्प म्हणजे क्रिएटीव्हीटी...अर्थात् 'युनिक क्रिएटीव्हीटी'. आज भारतासह जगातील अन्य भागांतही अनन्यशिल्पची टीम आपली सेवा देते आणि कौस्तुभ या विषयात मार्गदर्शन करतात. नुकताच दुबईच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेचा 'इंटरनॅशनल अचिव्हर्स ऍवॉर्ड फॉर बिझनेस एक्सेलन्स' हा पुरस्कार कौस्तुभ गोंधळेकरांना मिळाला आणि ऊर्जा क्षेत्राविषयीच्या त्यांच्या सद्सद््विवेकबुध्दीची पोचपावतीच त्यांना मिळाली.

ही विवेकबुध्दी जागी होण्याचा प्रवास मांडताना कौस्तुभ सांगतात,''मी जिथे नोकरी होतो तिथले बहुतेक काम हे सरकारी किंवा खासगी डेटा सेंटरमध्ये असायचे. आयटी कंपनी असल्याने कायम एसीची सवय. चौदा वर्षाच्या आयटी क्षेत्रातील नोकरीत विजेचा अतिरिक्त वापर आणि त्यासाठीचा वाढता खर्च हे जवळून पाहत होतो. त्यावेळी कुठेतरी काहीतरी चुकतंय अशी जाणीव होत होती. ग्रामीण भागात आजही पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकत नाही आणि आपण शहरात इतकी विजेची उधळपट्टी करतो, हे विरोधाभासी चित्र दिसत होतं. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अजिबात वीज नाही किंवा गरजेच्या तुलनेत अत्यल्प उपलब्धी आणि शहरातील लोकांना ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याची किंमत नाही. तेव्हा ही दरी भरून काढण्यासाठी आपण काही तरी करायला पाहिजे असे वाटत होते. म्हणूनच कन्सल्टन्सीमध्ये काम करत असताना समांतरपणे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचाही अभ्यास करू लागलो. 7 वर्षात विजेशी संबंधित अनेक कोर्स केले. वाचन केले, कार्यशाळांना उपस्थित राहिलो. मग एक दिवस वाटलं की नोकरी सोडून या क्षेत्रात काम सुरू करावं. कुटुंबाची जबाबदारी होती. मुलगी लहान होती अशा परिस्थितीत हा निर्णय मोठेच धाडस होते.

पहिली दोन वर्ष मी एकटाच काम करत होतो. नोकरी सोडलेली असल्याने पैसा हातात नव्हता. मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्याने कर्ज घेण्याची मानसिकता नव्हती. स्वत:चं ऑफिसही नव्हतं. सीसीडीतून काम करायचो. कमीत कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ठेवली. बहुतेक काम साईटवर असायचं. हळूहळू क्लायंट मिळू लागले. मग एका क्लायंटनेच सुचवलं की तुमच्याकडे जागा नसेल तर आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसा. मग सहा महिने एका क्लायंटच्या ऑफिसमध्येच बसू लागलो.''

स्थिरस्थावर झाल्यावर कौस्तुभ यांच्या टीममध्ये एक व्यक्ती सहभागी झाली. अडीच-तीन वर्षांनंतर पार्ल्याला स्वत:चं ऑफिस सुरू झाल्यानंतर त्यांनी वळून मागे बघितलं नाही. कारण तोपर्यंत ग्राहकांनाही या विषयाचे महत्त्व लक्षात आले होते. सहकारीही वाढत गेले. सध्या त्यांची 7 जणांची टीम आहे आणि ती संपूर्ण देशभरात काम करते. सुरुवातीला त्यांनी 'मेक इन इंडिया' या सरकारी योजनेंतर्गत सौर ऊर्जा उपकरणांचे उत्पादनही केलं, पण नंतर असं लक्षात आलं की नुसतं उत्पादन करून उपयोग नाही. कारण अनेक उत्पादनं पडून राहतात आणि खराब होतात. सौर ऊर्जा उत्पादने करणाऱ्या अनेक कंपन्यांची ही स्थिती दिसत असल्याने त्यांनी 'ट्रेडिंग आणि सोल्युशनिंग' यावर भर दिला. म्हणजे सौर ऊर्जा उत्पादनाबाबत ग्राहकाच्या गरजेचा अभ्यास करून त्यांना सल्ला देणे, त्यानुसार डिझाईन करून देणे आणि सिस्टिम बसवून दिल्यानंतर त्याचा मेंटेनन्स पाहणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. त्याशिवाय वीज बचतीच्या व्यवस्थापनाचे अन्य अनेक पर्याय ते सुचवतात. सोलार उत्पादनाच्या डिझाईनमध्येही आवश्यकतेनुसार बदल करून घेतात. 

याचे उदाहरण देताना कौस्तुभ सांगतात, ''सर्वसाधारण पंख्याला तासाला 75 ते 80 वॅट वीज लागते. आम्ही जे पंखे वापरण्याचा सल्ला देतो त्यांना तासाला 28-35 वॅट वीज लागते. ते रिमोट पध्दतीने चालतात. त्यामुळे 60-70 टक्के विजेची बचत होते. बीएलडीसी तंत्रज्ञान वापरून हे पंखे तयार केले जातात. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये या पंख्यांचा वापर आता होऊ लागला आहे.

गुजरातमध्ये थानगड किंवा मोरबी या भागात सेरॅमिक पॉटस् बनविण्याचा उद्योग चालतो. भांडी सुकवायला तेथे मोठया प्रमाणात पंख्याचा वापर केला जातो. त्याच कामासाठी असे पंखे वापरले तर त्यांचे महिन्याला साधारण 10-12 लाख रुपये वाचतात. ''

वीज बचतीसाठी जी उपकरणे कौस्तुभ ग्राहकांना सुचवतात, ती ते स्वत:च्या घरी, कार्यालयांमध्येसुध्दा वापरतात. आपण अनेक उपकरणे आयुष्यभर किंवा ती बंद होईपर्यंत वापरत राहतो. कालांतराने त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्याचप्रमाणे विजेच्या वायरिंगची कार्यक्षमताही काही काळाने कमी होते. त्यासाठी काय केले पाहिजे याचाही अभ्यास 'अनन्यशिल्प'ची टीम करते. म्हणजे वीजबचतीबाबत मुळापासून अभ्यास करून उपाय शोधते.

एकूण कामापैकी विक्री, मार्केटिंग आणि तंत्रज्ञान या गोष्टी स्वत: कौस्तुभ पाहतात. नोए फिलिप हे अन्य एक संचालक काही महिन्यांपूर्वी अनन्यशिल्पमध्ये रूजू झाले आहेत. त्यांना या क्षेत्राचा 40 वर्षांचा अनुभव आहे. ते नवीन लोकांना प्रशिक्षणही देतात. या व्यतिरिक्त तीन जणांची ऑपरेशन टीम आहे. तसेच दोघेजण विक्रीचे काम बघतात. प्रत्येक साईटवर कौस्तुभ पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित असतात. जिथे प्रकल्प उभारले जातात तेथील काही लोकांना मेन्टेनन्सचे ट्रेनिंग दिले जाते. ज्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो.

सौर ऊर्जा उपकरणांचा वापर टाळताना, जास्त जागा लागते, तसेच खर्चही अधिक येतो अशी कारणे दिली जातात. सौर उर्जेच्या तंत्रज्ञानाला आपल्याकडे अद्याप स्वीकारार्हता नाही. आरामदायी जीवनशैलीसाठी आपण अनेक गोष्टींवर खर्च करतो, मात्र सौर ऊर्जा वापरासाठी येणारा खर्च आपल्याला जास्त वाटतो, अशी खंत कौस्तुभ व्यक्त करतात. त्याशिवाय सौर ऊर्जा उपकरणांना जागा बऱ्यापैकी जास्त लागते. आपल्याकडे इमारती बांधकामांचा जो ढाचा असतो तोही ही उपकरणे बसविण्यासाठी सोयीचा नसतो, असे त्यांचे मत आहे.

''आपल्याकडे जागेची वानवा आहे आणि जागेच्या किमतीही जास्त आहेत. त्याचबरोबर आपल्याकडील लोकांना सौर उर्जेच्या क्षमतेविषयीच शंका आहे. त्याबाबतच्या तांत्रिक बाबी सर्वसामान्यांना समजतीलच असे नाही. त्यामुळे लोकांमध्ये सौर ऊर्जा वापराबाबत जागरुकता वाढवावी लागेल. या विषयात जन प्रबोधनाची खूप आवश्यकता आहे.''

सौर ऊर्जा उपकरणे व्यापत असलेल्या जागेच्या प्रश्नावर तंत्रज्ञानाने अलीकडे काही पर्याय शोधून काढले आहेत. उदा. थीन फिल्म प्रकारची सोलार पॅनेल्स आता वापरता येतात. त्याचबरोबर बांधकामातील त्रुटींवर उपाय म्हणून एक नवीन तंत्रज्ञान येत आहे ते म्हणजे बिल्डींग इंटेग्रेटेड फोटो इफेक्टस्. म्हणजे इमारतीत बांधकामाच्या काही साहित्यांऐवजी सोलार पॅनेल्स वापरू शकतो. उदा. टेरेसच्या स्लॅबऐवजी किंवा टाईल्सऐवजी आपण सोलार पॅनेल वापरू शकतो. परदेशात हे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडे आता आता त्याची सुरुवात होत असल्याची माहिती गोंधळेकरांनी दिली. तसेच हे तंत्रज्ञान आपल्याकडे आणण्यासाठी 'अनन्यशिल्प' एका स्पॅनिश कंपनीशी व्यवहार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बांधकाम करताना सुरुवातीपासूनच सौर ऊर्जा उपकरणांचा, तसेच वीजबचतीसाठी करायच्या रचनेचा विचार झाला पाहिजे. कौस्तुभ याबाबत आपल्या माहितीतील बांधकाम व्यावसायिकांना गेली काही वर्षे समजावत आहेत. आता हा मुद्दा त्यांनाही पटू लागला आहे आणि ते त्यासाठी 'अनन्यशिल्प'चा सल्ला घेऊ लागले आहेत.

पोतदार कॉलेज, जयहिंद कॉलेज, साठे कॉलेज, एनआयटी कुरुक्षेत्र यांसारख्या शैक्षणिक संस्थांसाठी तसेच काही सरकारी आस्थापनांसाठीही 'अनन्यशिल्प'ने काम केले आहे. साठे महाविद्यालय हा कौस्तुभ गोंधळेकरांचा पहिला मोठा क्लायंट ठरला आणि तेथील यशानंतर कौस्तुभच्या व्यवसायाची गाडीही रुळावरून भरधाव जाऊ लागली. तसेच ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी येथील प्रकल्पासाठीही त्यांनी काम केले.

त्याशिवाय निवासी सोसायटया या कौस्तुभ यांच्या कामाच्या नेहमीच केंद्रस्थानी असतात. निवासी सोसायटयांमध्ये सामूहिकरित्या सौर ऊर्जा वापरण्यासाठी आणि वीजबचत करण्यासाठी चांगली संधी असते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते सोसायटयांमध्ये जाऊन मार्गदर्शन करतात.

ते सांगतात, ''जर सामाईक भागात म्हणजे पाण्याचा पंप, जिन्यातील दिवे, पॅसेजमधील दिवे यांसाठी सौर उर्जेचा वापर केला तरी सोसायटयांच्या वीज बिलात खूप फरक पडतो. विजेवर ज्या कोणत्याही गोष्टी चालू शकतात त्या सर्व सौर उर्जेवरही चालू शकतात. त्याशिवाय 2017 मध्ये नेट मीटरिंगचे धोरण तयार झाल्यानंतर आपण सौर उर्जेद्वारे मिळणारी वीज ग्रीडलाही कनेक्ट करू शकतो. समजा एखाद्या सोसायटीत सौर उर्जेद्वारे 50 युनिट वीजनिर्मिती होत असेल आणि त्यापैकी 40 युनिटचा वापर होत असेल तर उरलेली 10 युनिट वीज ग्रीडला देता येते. त्यातून सोसायटीलाही फायदा मिळतो. आमच्या अनेक प्रकल्पांमध्ये आम्ही या यंत्रणेचा वापर केला आहे.

त्याचबरोबर निवासी सोसायटयांच्या वीजबचतीसाठी अन्यही काही पर्याय आम्ही सुचवतो. उदा. ऑटोमेशन - स्वयंचलित यंत्रणा. म्हणजे एखाद्या भागात कोणीच नसेल तर तेथील दिवे बंद राहतील आणि जवळपास कोणी आल्यास ते आपोआप सुरू होतील. शक्य तिथे जास्तीत जास्त वीज वाचवण्याच्या दृष्टीने आम्ही रचना करतो. ज्या सोसायटयांमध्ये आम्ही अशा प्रकारची रचना केली, त्या सोसायटयांचे गेल्या 6 महिन्यांमध्ये विजेच्या बिलामध्ये 80-90 हजार रुपये वाचले. म्हणजे त्यांच्या प्रकल्पासाठी आलेला खर्च 5 वर्षांऐवजी 3 वर्षातच भरून निघतोय. तसेच सौर ऊर्जा पॅनेलची वॉरंटी 25 वर्षांची असते. त्यामुळे 25 वषर्े तरी सौर उजर्ेपासून त्यांना वीज मिळणार आहे.''

रोज नवीन लोक या क्षेत्रात येत आहेत. अजूनही या क्षेत्रात उत्तम तांत्रिक ज्ञान असलेल्या आणि अनुभवी लोकांची जास्त गरज असल्याचे ते सांगतात. ''आम्ही काम करताना जिकडे केवळ वायरिंग करायची असते तेथे आयटीआय प्रशिक्षण घेतलेला स्टाफ वापरतो. मात्र डिझाईनच्या कामासाठी इंजिनिअरिंग (इलेक्ट्रॉनिक) क्षेत्रातील तज्ज्ञच लागतात. हे काम करत असताना सुरक्षेचा विचारही प्रामुख्याने करावा लागतो. आम्ही पी.एस. सर्टिफाईड आहोत. सेफ्टी कॅप, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी उपकरणे अशी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते. प्रत्येक कंपनीने तशी काळजी घेतली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही.''

अपारंपरिक ऊर्जा वापराविषयीची आपल्या देशाची अन्य देशांशी तुलना करताना ते सांगतात, ''अमेरिका किंवा युरोपीय देश हे भविष्याकडे पाहणारे देश आहेत असे आपण म्हणतो. तेच चित्र ऊर्जावापराबाबतही दिसतं. पारंपरिक ऊर्जा स्रोत आपल्याला आयुष्यभर पुरणार नाहीत हे त्यांनी लक्षात घेतले आहे आणि त्यासाठीच्या पर्यायांचा वापर ते करत आहेत. 89 टक्के जर्मनी आज सौर उर्जेवर चालते. (जर्मनीमध्ये दिवसाचे 5 तास ऊन असते.) स्पेनमध्येही सौर ऊर्जा वापराबाबत ही स्थिती आहे. चीन सौर ऊर्जा वापराबाबत जगात पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

परदेशात तंत्रज्ञानाच्या वेगवेगळया पर्यायांचा शोध घेतला जातो. मध्य-पूर्वेकडील देशांचे उदाहरण लक्षात घेतले तरी ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. या देशांमध्ये तेलाचे उत्पादन खूप जास्त आहे. गेली 50 वर्षे ते तेल वापरत आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्थाही त्यावरच अवलंबून आहे. मात्र त्या देशांनाही कळून चुकलंय की आपल्याकडचे इंधन साठे कधी तरी संपणार आहेत. त्यासाठी पर्याय शोधायला हवेत. अबुधाबी, ओमान, दुबई या देशांनी आता सौर उर्जेचा पर्याय मनावर घेतला आहे. 'सोलार इम्पल्स' या सौर उर्जेवर चालणाऱ्या पॅसेंजर फ्लाइटची चाचणी सद्या सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठा गुंतवणूकदार अबुधाबी हा देश आहे. अबुधाबीमधील मसदार हे शहर संपूर्णपणे पर्यावरणशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात पारंपरिक ऊर्जा फार अभावाने वापरली जाते. सौर ऊर्जा आणि अन्य अक्षय्य ऊर्जा स्रोतांचा तिथे जास्तीत जास्त वापर केला आहे. लोकांनी पर्यटन म्हणून या शहराला भेट देऊन ही गोष्ट पाहिली पाहिजे. दुबईमध्येही आम्ही सध्या कन्सल्टिंगचे काम करतो. दुबईत जेव्हा आम्ही काम करण्यासाठी प्रस्ताव मांडला तेव्हा तिथल्या सरकारकडून आम्हाला हिरवा कंदील मिळाला. त्यांना याची गरज वाटायला लागली आहे हीच मोठी गोष्ट आहे. आपण त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे. अन्य देशांमध्ये आढळणारी ही दृष्टी आपल्या देशात अभावानेच आढळते. आपल्याकडच्या लोकांनाही पर्याय शोधण्याची सवय लागली पाहिजे.''

लोकांमध्ये सौर ऊर्जा वापराविषयी असलेल्या उदासीनतेला सौर ऊर्जा कंपन्याही तिक्याच जबाबदार असल्याचे मत कौस्तुभ व्यक्त करतात. ''आज देशात सौर ऊर्जानिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 80-90 हजार कंपन्या आहेत. अनेकदा या कंपन्या चुकीची आणि अवास्तव माहिती देतात. आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर लोकांचा विश्वास उडतो आणि ते त्या पर्यायाकडे परत येत नाहीत.''

2014 ला भारतात भाजपा सरकार आल्यानंतर अपारंपारिक ऊर्जा धोरणासंदर्भात अनेक चांगले बदल झाले आहेत. गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सौर ऊर्जा वापराबाबत प्रगती आहे. लोडशेडिंगचे प्रमाणही कमी झाले आहे, हे खूप मोठे यश आहे. त्यात सोलारचा मोठा वाटा आहे. काही ठिकाणी कॅनॉलवर सोलार पॅनेल लावून त्यातून वीजनिर्मितीचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत.

सौर ऊर्जा वापरणाऱ्या उद्योगांसाठीही सरकारने एक नवीन धोरण आणले आहे, त्याविषयी कौस्तुभ सांगतात, ''जर एखादा उद्योग सौरउर्जेचा वापर करत असेल तर त्याला प्राप्तीकरात ऍक्सिलरेटेड डेप्रिसिएशन म्हणजे घसाऱ्यात वाढीव वजावट मिळते. तरीही लोक त्याचा वापर करत नाहीत. अजूनही आपल्याकडे या उर्जेला रिन्युएबल एनर्जी-अक्षय्य ऊर्जा नाही तर,  अल्टरनेटीव्ह एनर्जी-पर्यायी ऊर्जा म्हटले जाते. त्यामुळे त्याचा वापर केलाकिंवा नाही केला तरी चालेल, असं लोकांना वाटतं.  तिचा वापर अनिवार्य करायला हवा. लोकांनाही कळतंय की आज ना उद्या हे करावं लागणार आहे. अपुऱ्या विजेमुळे आणि वाढत्या वीज बीलामुळे ते ही हैराण आहेत. नाही तर एलईडीच्या पर्यायाला लोकांनी प्रतिसाद दिला नसता. त्याच धर्तीवर सरकारने सौर उजर्ेचाही प्रसार केला पाहिजे.''

सरकारकडून अशी अपेक्षा व्यक्त करताना कौस्तुभ स्वत:देखील अपारंपरिक ऊर्जा वापराविषयीचा प्रसार करत आहेत. त्यांच्या व्यवसायातील पर्यावरणाविषयीच्या संवेदनशीलतेची दखल देशातच नव्हे, तर परदेशातही घेतली जात आहे. 'इंटरनॅशनल ऍचिव्हर्स ऍवॉर्ड फॉर बिझनेस एक्सेलन्स' पुरस्कार हे त्याचेच उदाहरण आहे.

''आतापर्यंतचा व्यवसाय आम्हाला माऊथ पब्लिसिटीवर किंवा ग्राहकांनी केलेल्या शिफारशीवरच मिळाला होता. या पुरस्कारासाठी आमचं नामांकन झाल्याची मेल मिळाली. त्यानंतर आमच्या कामाचं ऑडिट करण्यात आलं. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आम्हाला सुखद धक्काच बसला.'' यापूर्वीही काही पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. बेस्ट एमएसएमई इंडिया 5000, इंडिया ऍचिव्हर्स पुरस्कार, सामाजिक योगदानाबद्दल 'समाज दूत' या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.  4 वर्षांचा टप्पा हा एखाद्या उद्योगाच्या वाटचलीतला लहानसा टप्पाच आहे. पण इतक्या कमी कालावधीत पर्यावरण संवर्धनातील एक 'नोबेल' व्यवसाय म्हणून कौस्तुभ आणि 'अनन्यशिल्प'ला मिळत असलेले यश त्यांची दिशा बरोबर असल्याचे द्योतक आहे. हुरूप वाढवणारे आहे.

 कौस्तुभ गोंधळेकर

संस्थापक : अनन्यशिल्प कन्सल्टिंग सर्व्हिसेस

भ्रमणध्वनी : 9920468884

kg@ananyashilpaconsulting.com