उज्ज्वला गॅस योजनेचे फलित

विवेक मराठी    04-Jun-2018
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेची प्रशंसा जगभर होत आहे. विशेष अभिमानास्पद गोष्ट म्हणजे  जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषणाविषयी प्रसिध्द केलेल्या अहवालात  या योजनेची प्रशंसा केली आहे. भारतातील प्रदूषण कमी करण्यात योजनेचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यात म्हटले आहे.

आजही आपल्या देशात दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज. मग ती व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत. हे अन्न तयार करण्यासाठी गरीब घरातील महिलेला चूल पेटवावी लागते. त्यासाठी जंगलातील लाकडे, गोवऱ्या व अन्य जळाऊ साधनांचा उपयोग करून चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. अशा प्रकारे स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर स्वयंपाकघरात कोंडला जातो. त्यामुळे महिलांमध्ये श्वसनाचे व डोळयांचे विकार बळावतात आणि स्वयंपाकखोलीतील  हवाही मोठया प्रमाणावर प्रदूषित होत असते. या प्रदूषित हवेच्या असंख्य महिला आजवर बळी ठरल्या आहेत. यावर उपाय  म्हणजे केंद्र सरकारची 'उज्ज्वला योजना'.

1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' या महत्त्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्र सरकारने या योजनेकरिता एकूण 3 वर्षांसाठी 8000 कोटींची तरतूद केली आहे. ही गॅस जोडणी करून घेण्याकरिता प्रत्येक कुटुंबाला 1600 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तीन वर्षाच्या कालावधीत दारिद्रयरेषेखालील 5 कोटी महिलांना त्यांच्या नावावर एल.पी.जी. गॅसची जोडणी देण्यात येणार असून  आतापर्यंत सुमारे 3 कोटी 70 महिलांना याचा लाभ मिळाला आहे.

या योजनेमुळे देशातील दारिद्रयरेषेखालील महिलांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. चुलीच्या इंधनासाठी करावी लागणारी वणवण, त्यात खर्च होणारी शक्ती आणि आरोग्याच्या तक्रारी या सगळयावर या योजनेच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधला गेला आहे. या योजनेचा आणखी एक लाभ म्हणजे इंधन म्हणून होणाऱ्या लाकूडतोडीला मोठया प्रमाणावर आळा बसला आहे. देशातील 3 कोटी 70 लाख कुटुंबात स्वयंपाकासाठी वापरला जाणारा कोळसा, लाकूड व इतर कृषी कचरा इंधन हद्दपार झाला आहे. यामुळे उज्वला गॅस योजना पर्यावरणासाठीदेखील लाभदायी ठरली आहे. 

एल.पी.जी. गॅसवर कमी वेळात स्वयंपाक करून वाचलेल्या वेळेत या महिला इतरही काम करून अर्थार्जन करू शकतात, आपली एक ओळख निर्माण करू शकतात.

या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून घेता येतो. या फॉर्मसोबत आवश्यक त्या कागदपत्रांची जोडणी केली(जसे की आधार कार्ड, दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना मिळणारे रेशनकार्ड, बँकखात्याचा तपशील) की घरातील 18 वर्षावरील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन मिळवता येते. मात्र या कुटुंबाकडे त्याआधीची गॅस जोडणी अन्य कोणाच्याही नावे असता कामा नये, ही अट आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिध्द केलेल्या  प्रदूषणविषयक अहवालात भारतातील उज्ज्वला गॅस योजनेची प्रशंसा केली आहे. घरगुती वायू प्रदुषणामुळे जगात दरवर्षी 70 लाख लोक मरतात.  यावर उपाय म्हणून भारताने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे. उज्ज्वला गॅस सारख्या योजना कार्यान्वित करून देशातील वायू प्रदूषण कमी होत असल्याचे नमूद केले आहे.

उज्ज्वला गॅस योजनेला जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेली पावती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाला मिळालेली पावती आहे.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या चेहऱ्यावर
समाधानाचे चित्र दिसून येत आहे.

9970452767