व्यवसायात पत्नीची साथ अवश्य घ्या...

विवेक मराठी    06-Jun-2018
Total Views |

एखाद्याने स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय नावारूपाला आणून यश मिळवले तर जग त्याचे मोठे कौतुक करते, पण त्या कतर्ृत्वामागे ज्या गृहिणीची भक्कम साथ असते, तिच्या वाटयाला अभिनंदनाचे चार शब्दही येत नाहीत. खरे तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका सुप्त वसलेली असते. स्त्रियांना निसर्गत:च नेटके नियोजन, व्यवहारी वृत्ती, वास्तवाचे भान, व्यवस्थापकीय कौशल्य, दूरदृष्टी आणि संयम अशा गुणांची देणगी लाभलेली असते. व्यवसायाच्या प्रगतीसाठी हेच गुण गरजेचे असतात. म्हणूनच व्यवसायात प्रगती व यशासाठी पुरुषांनी पत्नीची साथ अवश्य घेतली पाहिजे.

'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा भक्कम हातभार असतो,' अशी इंग्रजी म्हण आहे. माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण माझ्या बाबांचा आणि माझा याबाबतचा अनुभव अगदी समान आहे. माझ्या बाबांनी नोकरीतून निवृत्तीच्या उंबरठयावर व्यवसायाच्या अनोळखी क्षेत्रात उतरण्याचे धाडस केले होते. अनेक अडचणींवर मात करून ते व्यवसायात यशस्वी झाले, पण त्या यशामागे माझ्या आईची भक्कम साथ कारणीभूत होती. धंद्यात पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाल्यामुळे बाबांचा धीर डगमगतोय हे लक्षात येताच आईने घरातील फर्निचर, किमती वस्तू, दागिने विकून ते पैसे बाबांना पाठवले आणि 'पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका,' या आश्वासक शब्दांनी त्यांचा आणि माझाही निर्धार जागवला. माझी आई तिच्या घरच्या गरीबीमुळे फारशी शिकू शकली नव्हती, पण तिचे व्यवहारज्ञान आणि व्यवस्थापन अफाट होते. मला पुढच्या आयुष्यात उपयोगी ठरलेली खरेदीची कला मी आईकडूनच शिकलो.

पत्नीची उत्कृष्ट साथ मिळण्याबाबत मीही बाबांइतकाच नशीबवान ठरलो. माझी पत्नी सौ. वंदना ही ग्रामीण भागात जन्मलेली आणि वाढलेली. सातारा व कराडच्या मध्ये असलेले खंडोबाची पाली हे तिचे गाव. तिचे शिक्षण गावातल्याच शाळेत झाले आणि गंमतीची गोष्ट म्हणजे लग्न होईपर्यंत तिने मुंबई महानगरी कधीच बघितलेली नव्हती. चहापोह्यांचा (मुलगी बघण्याचा) कार्यक्रम झाल्यावर प्राथमिक पसंती झाली तेव्हा दोन्ही घरांतील वडीलधाऱ्यांनी समंजसपणे आम्हाला परस्परांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी दिली. कराडच्या एका हॉटेलमध्ये चहा घेताना आम्ही मोजकेच बोललो. मी सांगितले की, 'आम्ही दातार कुटुंबीय मध्यमवर्गीय आहोत. दुबईत आमचे दुकान आहे आणि ते चांगले चालत आहे. आम्हाला घरातल्यांना सांभाळून घेणारी, मुख्यत: मिळेल त्या उत्पन्नात समाधान मानणारी मुलगी हवी आहे. व्यवसायात चढ-उतार असतात, हे समजून तुम्ही निर्णय घ्यावा.' त्यावर माझी पत्नी इतकेच म्हणाली, 'आमचे कुटुंब शेतकरी आहे. शेतीत तर कायमची अनिश्चितता असते. पण त्यामुळेच आम्हाला साध्या राहणीची सवय आहे' मला तिचे ते उत्तर आवडले. लग्नानंतर परत जाताना माझ्या पत्नीने माझी बॅग इतकी नीटनेटकी भरली होती, की पाहताच मला तिचा टापटिपीचा आणि शिस्तबध्द स्वभाव जाणवला आणि ते गुणवैशिष्टय मी लक्षात ठेवले.

पुढे वडिलांनी दुबईतील व्यवसायाची जबाबदारी माझ्याकडे सोपवून निवृत्ती पत्करून भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी पत्नीलाही व्यवसायात सहभागी होण्याची संधी दिली. माझ्या या कृतीला आमच्या घरातून विशेषत: वडिलांकडून विरोध झाला. अर्थात त्यामागे त्यांचा 'स्त्रियांनी व्यवसायात दखल देऊ  नये', असा सनातनी दृष्टिकोन नव्हता, तर त्यांचे म्हणणे इतकेच होते, की आम्ही पती-पत्नी दोघेही व्यवसाय आणि कार्यालयीन कामात गुरफटलेले राहिलो तर त्याचा परिणाम पुढे मुलांच्या संगोपनात उणीव राहण्यात होईल. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी पत्नीला कंपनीत मदतीसाठी घेतले आणि तिच्याकडे वित्त संचालकपदाची जबाबदारी सोपवली. तिने माझा विश्वास सार्थ ठरवला. तिने आमच्या कंपनीच्या हिशेबाला शिस्त लावली. अनावश्यक खर्च कमी केले आणि अर्थव्यवहाराची उत्तम घडी बसवली. तिच्या कौशल्यामुळे चमत्कार असा घडला, की जागतिक मंदीच्या काळात जेव्हा बहुतेक उद्योगांना मागणी आणि उत्पन्न कमी होण्याचा फटका बसला तेव्हा आमची कंपनी मात्र तब्बल 400 टक्के दराने प्रगती करत होती. दुसरीकडे तिने माझ्या बाबांची शंकाही अनाठायी असल्याचे दाखवून दिले. एकीकडे कंपनीचे व्यवहार लीलया सांभाळताना तिने गृहिणीची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे निभावली. मुलांच्या संगोपनात कुठलीच कमतरता राहू दिली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा समूह कोटयवधी रुपयांची उलाढाल करत असतानाही तिची जीवनशैली अगदी साधी आणि मध्यमवर्गीयच राहिली. मुलांनाही तिने शिस्तीने आणि संस्काराने मोठे केले. तिची समंजस साथ लाभल्यानेच मी यशस्वी होऊ  शकलो. मी आजारपणामुळे मृत्यूच्या उंबरठयावर पोचलो होतो तेव्हा माझ्या पाठीवर दिलासा देणारा हात तिचाच होता. मी पत्नीचा सहयोग आयुष्यभर विसरलो नाही. आजही मी कोणताही पुरस्कार स्वीकारायचा असो, प्रकट मुलाखत द्यायची असो किंवा नव्या दुकानाचे उद्धाटन करायचे असो, प्रत्येक प्रसंगी पत्नीला सोबत नेतोच.

खरे तर स्त्रियांमध्ये कोणतीही गोष्ट शांतपणे विचारपूर्वक आखून घेऊन तडीस नेण्याचा महत्त्वाचा गुण निसर्गत:च असतो. त्यांना संधी दिली गेली तर त्या स्वत:ला उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून सिध्द करतात. म्हणूनच व्यावसायिकाने व्यवस्थापनाचे धडे प्रथम आपल्या घरातील महिलांकडून घ्यावेत, या मताचा मी आहे. माझ्या आईकडून मी खरेदीची कला, काटकसर, स्वावलंबन, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची जिद्द, सोशिक वृत्ती असे गुण घेतले आहेत तर पत्नीकडून उत्तम व्यवस्थापन, शांतपणे विचार करण्याची कला आणि समाजाभिमुख मनोवृत्ती शिकलो आहे. कुटुंबावर संकट आले तर महिला किती जिद्दीने ते परतवून लावतात याचा प्रत्यय आणून देणारी घटना मी बघितली आहे. मुंबईत मी ज्या परिसरात राहात होतो तेथे एक बांधकाम व्यावसायिक होता. त्याची कोटयवधी रुपयांची येणे रक्कम थकली होती. ती वेळेवर हाती येत नसल्याने तो काळजीत पडला होता. पत्नी व मुलगी हेच त्याचे कुटुंब असल्याने त्याचे पुढे कसे होणार, या विचारानेच तो अगतिक झाला होता. त्याची हताश अवस्था बघून अखेर त्याची पत्नी व मुलगी पुढे सरसावल्या. पत्नीने घराचे व्यवहार उत्तम सांभाळले, तर मुलीने स्वत: बाजारपेठेत जाऊन चतुराई आणि कौशल्याने सगळीच्या सगळी थकबाकी वसूल करून दाखवली आणि वडिलांच्या कंपनीची गाडी पूर्ववत रुळावर आणली. यात उल्लेखनीय गोष्ट अशी, की हा व्यावसायिक अशा रुढीप्रिय समाजातील होता, जेथे स्त्रियांनी घरकामाखेरीज अन्य गोष्टींत दखल देणे नापसंत होते. पण वेळ येताच त्याचा व्यवसाय घरातील महिलांनीच वाचवला.

मित्रांनो! पुरुष व स्त्रिया अशा दोन्ही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात जोडीदाराची साथ अवश्य घेतली पाहिजे. ते शक्य होणार नसेल तर किमान आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती तरी विश्वासाने जोडीदाराला दिली पाहिजे. आमच्या व्यावसायिक वर्तुळातील एकजण जरा छुप्या वृत्तीचा होता. तो आपल्या उत्पन्नाबाबत किंवा आर्थिक व्यवहारांबाबत पत्नीला व मुलांना कोणतीही कल्पना द्यायचा नाही. 'त्यांना काय कळतंय धंद्यातलं', असा त्याचा आविर्भाव असायचा. दुर्दैवाने एक दिवस तो हृदयविकाराने अकस्मात गेला. त्यानंतर त्याच्या पत्नीला व मुलांना खूप कटकटींना तोंड द्यावे लागले. म्हणूनच एकमेकांवरील विश्वास फार महत्त्वाचा असतो.

माझे विशेषत: पुरुषांना सांगणे आहे, की तुमची पत्नी अल्पशिक्षित असो, की उच्चशिक्षित तिच्यातील व्यवस्थापकीय कौशल्याला जरूर संधी द्या. जी संसार उत्तम सांभाळू शकते ती व्यवसाय समर्थपणे का नाही सांभाळणार? खेडेगावातील आठवडी बाजारात भाजी विकायला येणाऱ्या स्त्रियांचेच उदाहरण घ्या. फार शिकलेल्या नसूनही त्या सर्व व्यवहार काळजीपूर्वक आणि नफ्यात करतात. स्वकमाईतून कुटुंबाची रोजी-रोटी चालवतात. दिवसभर राबल्या तरी स्वयंपाक, घरकाम, मुलांचे संगोपन यात चालढकल करत नाहीत. महिलांचे कर्तृत्व महान आहे आणि त्याला कृतज्ञतेने सलाम केलाच पाहिजे. पत्नी ही आपली सर्वात जवळची विश्वासू मित्र असते, हे एका सुभाषितात म्हटले आहे.

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।

व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

(प्रवासात तुम्ही शिकलेली विद्या मित्र असते. संसारात पत्नी तुमची मित्र असते. आजारात औषध मित्र असते आणि मृत्यूनंतर तुम्ही निभावलेला माणुसकी धर्मच मित्र उरतो.)

***

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिकि'या, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)