दोन भाषणे, आशय एक

विवेक मराठी    08-Jun-2018
Total Views |

 
seva_1  H x W:

भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात 7 जून हा दिवस आपला विशिष्ट ठसा उमटविणारा ठरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपासाठी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. दर वर्षी हा वर्ग असतो, दर वर्षी त्याचा समारोप होतो आणि दर वर्षी संघाबाहेरील एखादी महनीय व्यक्ती समारोपासाठी बोलाविली जाते, त्यात नवीन काही नाही. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी हाच मुद्दा आपल्या भाषणातही मांडला. परंतु 'तृतीय वर्ष समारोपासाठी प्रणव मुखर्जी जाणार आहेत' हा देशाच्या दृष्टीने सनसनाटी बातमीचा विषय झाला. काहींनी तो जाणीवपूर्वक केला आणि मीडियातील लोक लग्नाआधीच बारशाच्या तयारीला लागले.

या सर्व चर्चा ऐकताना महात्मा गांधीजींच्या तीन माकडांची आठवण मला येत राहिली. पहिले माकड डोळयावर हात ठेवून बसले आहे, ते म्हणते मी सत्य पाहणार नाही. दुसरे कानावर हात ठेवून बसलेले असते, ते म्हणते मी सत्य ऐकणार नाही आणि तिसरे तोंडावर हात ठेवून असते, ते म्हणते मी सत्य बोलणार नाही. संघाच्या विरोधकांनी या चर्चांत अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा केलेली दिसली. प्रणवदांनी काय बोलले पाहिजे, हे काही जणांनी सुचविले. त्यांनी जाता कामा नये, असे काही जणांचे मत झाले. ते जाण्याने संघाला प्रतिष्ठा प्राप्त होते, असा शोध एकाने लावला. प्रणवदा गेले आणि त्यांना जे बोलायचे होते, ते बोलले. मग त्यावर चर्चा सुरू झाली. यावर का बोलले नाहीत, त्यावर का बोलले नाहीत, हा विषय का टाळला, तो विषय का घेतला नाही, अशा चर्चा करणाऱ्यांचे गुरू सीताराम येचुरी यांनी गुरूला शोभेल या भाषेत भन्नाट विधान केले. ते म्हणाले, ''संघाला त्याच्या इतिहासाची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते. संघावर काँग्रेसने तीनदा बंदी घातली. पहिल्यांदा सरदार पटेलांनी...'' वगैरे वगैरे. माजी राष्ट्रपतींना सूचना देणाऱ्यांच्या बुध्दीचे कौतुक करावे तेवढे थोडे.

प्रणवदांच्या संघाच्या व्यासपीठावर जाण्याची जी चर्चा माध्यमांनी सुरू केली, काँग्रेसने आणि कम्युनिस्टांनी जे खतपाणी घातले, याबद्दल त्यांचे आभार. आपण स्वतःला आपल्या पायातील जोडे काढून मारून घेत आहोत, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठावर जाण्याची चर्चा वैचारिक सहिष्णुतेच्या मुद्दयावर गेली, आणि आम्ही किती भयानकरित्या असहिष्णू आहोत, हे त्यांनीच आपल्या बोलण्याने आणि लिखाणाने दाखवून दिले. प्रणवदा संघाच्या कार्यक्रमात काय बोलले हे जितके महत्त्वाचे, त्याहूनही सगळया तथाकथित सहिष्णुवाद्यांचा बुरखा टराटरा फाडला गेला आणि तो त्यांनीच आपल्या हाताने फाडला. म्हणून 7 जून इतिहासात अमर झाल्याशिवाय राहणार नाही.

सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण हिंदीत झाले. प्रणव मुखर्जी यांचे भाषण इंग्लिशमध्ये झाले. दोन्ही भाषणांचा विषय एकच, भाषणांचा आशयदेखील एकच. कुणाला असे वाटेल की दोघांनी ठरवून एकाच विषयावर भाषण केले. दोघांच्या भाषणात विलक्षण समानता. दोघांनाही माहीत आहे की, ते वेगळया संघटनेचे आहेत, संघटनेचा विचार आणि शिस्त दोन्हीकडे वेगवेगळी आहे. मोहनजी भागवत यांनी सुरुवातीलाच सांगून टाकले, ''संघ संघ आहे, प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी आहेत.''

मोहनजींनी आपला विषय संघाच्या शैलीत आणि संघाच्या परिभाषेत मांडला. तेथे उपस्थित संघस्वंयसेवक आणि त्यांचे भाषण दूरचित्रवाणीवर आपापल्या घरी ऐकणारे संघप्रेमी यांना ही भाषा चटकन समजते. मोहनजी म्हणाले, ''सर्व देशावर आपले प्रभुत्व गाजविण्यासाठी आपले काम नाही, समाजातील विशिष्ट वर्गाचे संघटन करणे हे आपले काम नाही. संघाचे काम संपूर्ण समाजाचे संघटन करणे हे आहे. आम्हाला कुणीही भारतवासी परका नाही, भारतभूमीत जन्मलेला प्रत्येक जण भारतपुत्र आहे. विविधतेत एकता ही आमच्या देशाची हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. भाषा, संप्रदाय यांची विविधता पूर्वीपासूनचीच आहे. वेगवेगळया राजकीय विचारसणीदेखील पूर्वीपासून आहेत. आपली विविधता जपत, दुसऱ्यांच्या विविधतेचे स्वागत करीत, त्यांचा सन्मान करीत मिळूनमिसळून राहणे आणि विविधतेतील एकतेचा साक्षात्कार करून घेणे ही आपली संस्कृती आहे.''

प्रणव मुखर्जी यांची भाषा संघाची नाही, परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांनी आपल्या भाषणात संघच मांडला. विपरीत अर्थ काढण्याची ज्यांना सवय आहे आणि ज्यांच्या पोटापाण्याचा तो धंदा आहे, त्यांना तो करू द्यावा. प्रणवदा यांनी राष्ट्र, राष्ट्रवाद, देशभक्ती या शब्दांच्या अर्थापासून आपल्या भाषणाची सुरुवात केली. ''एका भूप्रदेशात समान संस्कृती भाषा आणि इतिहास यांच्या साहाय्याने राहणाऱ्या समूहाला राष्ट्र म्हणतात.'' असे सांगून ''राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्राशी एकरूप होऊन त्यांच्या हितसंबंधाची जपणूक करून अन्य राष्ट्रांच्या हितसंबंधाना स्वतःपासून वेगळे करणे.'' तर देशभक्ती म्हणजे ''आपल्या देशाविषयीचा भक्तिभाव आणि देशाचे पूर्णपणे समर्थन होय.''


seva_1  H x W:

राष्ट्र, राष्ट्रीयता, देशभक्ती हे संघाचे गाभ्याचे विषय आहेत. प्रणवदांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या गाभ्याच्या विषयांनाच स्पर्श केला आणि मग त्यानंतर त्यांनी इ.स.पूर्व काळापासून ते इंग्रजांच्या राज्यांपर्यंत आपल्या देशाच्या इतिहासाचा अत्यंत संक्षिप्त आढावा घेतला. तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला, वल्लभी इत्यादी विद्यापीठांचा उल्लेख करून अठराशे वर्षे आपण शिक्षणाच्या क्षेत्रात किती आघाडीवर होतो हे सांगितले. चाणक्याचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रावरील उत्तम ग्रंथ असल्याचे त्यांनी नमूद केले. युरोपातील राज्य निर्माण होण्याअगोदरच भारतीय राज्य पूर्ण विकसित झालेले होते याचादेखील त्यांनी फार सुरेख आढावा घेतला आहे. हा सर्व विषय संघस्वंयसेवक संघात अनेक वेळा ऐकत असतो.

आपल्या राष्ट्रवादाचे वैशिष्टय काय? हे प्रणवदांनी अगदी संघाच्या भाषेत सांगितले. ते म्हणाले, ''आमचा राष्ट्रवाद 'वसुधैव कुटुंबकम्' यावर आधारित आहे. 'सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः' ही आमची इच्छा असते. सर्व विश्व एक कुटुंब आहे असे आम्ही मानतो आणि सर्वांच्या सुखासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. सर्वसमावेशकता आणि सहअस्तित्व याने आमची राष्ट्रीय ओळख होते. विविध प्रकारच्या संस्कृती, भाषा, श्रध्दा यामुळे भारताची वेगळी ओळख झालेली आहे. सहिष्णुतेतून आम्हाला शक्ती प्राप्त होते. बहुविधतेचा आम्ही स्वीकार आणि आदर करतो. आमच्या सामूहिक मानसिकतेचा हा अनेक शतकांपासूनचा भाग आहे. कोणत्याही प्रकारे आमचा राष्ट्रवाद, धार्मिक, प्रादेशिक अथवा बंदिस्त विचारधारांच्या आधारे त्याचप्रमाणे विद्वेष आणि असहिष्णुता याद्वारे जर मांडण्याचा प्रयत्न झालाल्ल तर आमची राष्ट्रीय आत्मीयता मलीन होईल. जे काही वेगळेपण दिसते ते वरवरचे आहे, आपण वेगळी ओळख असणारे सांस्कृतिक घटक आहोत, ज्यांचा इतिहास समान आहे. वाङ्मय समान आहे आणि सभ्यतादेखील समान आहे. थोर इतिहासतज्ज्ञ व्हिनसेंट म्हणतो, ''भारतात खोलवरची सांस्कृतिक एकता आहे.''

मोहनजी म्हणाले, विविधतेत एकता आहे... प्रणवदा म्हणतात देशात खोलवरची सांस्कृतिक एकता आहे. वेगळेपण हे वरवरचे आहे. अंतर्यामी आपण एक आहोत. आशय एक, सांगण्याची भाषा वेगळी.

भारतीय राज्याचे चढउतार मौर्य काळापासून ते इंग्रजाच्या काळापर्यंत कसे कसे होत गेले, हे सांगून प्रणवदा म्हणतात की, जरी आम्ही छोटया छोटया राज्यात विभागलो गेलो, तरी पाच हजार वर्षांची आमची संस्कृती अभिन्न राहिलेली आहे. या देशात आलेल्या विदेशी आम्ही आमच्यात सामावून घेतले. आजचा भारत विविध जनसमूहांचा कसा बनला आहे, हे रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील एक ओळीच्या माध्यमातून सांगितले. भारताचा राष्ट्रवाद महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभाई पटेल यांच्यामुळे कसा बळकट झालेला आहे, हे त्यांनी फार उत्तमरीत्या सांगितले. 1950 साली राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. ही आमची राज्यघटना 'केवळ कायद्याची कलमे नसून ती भारताच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची सनद (मॅग्ना कार्टा) आहे. आमच्या राज्यघटनेतून राष्ट्रवादाचा उदय होतो. भारतीय राष्ट्रवाद ही संवैधानिक देशभक्ती आहे. ज्यात आमच्या विविधतेची जपवणूक स्वतःला सुधारण्याची क्षमता आणि दुसऱ्यांपासून शिकण्याची तयारी असे विषय येतात.'


प्रणवदा यांनी वापरलेला शब्द आहे Constitutional Patriotism. मला वाटते संघाच्या व्यासपीठावर अन्य कोणत्याही वक्त्याने न उच्चारलेला हा शब्द आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा विविध अंगांनी येथून पुढे विचार करावा लागेल आणि त्या भाषेत राष्ट्रवादाची मांडणी करावी लागेल. कारण भारतीय राज्य हे संविधानाप्रमाणे चालते. त्यात संविधानाची कलमे समजून घेण्यापेक्षा संविधानाचा आत्मा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. प्रणवदांनी फार मोजक्या शब्दात संविधानाचे आत्मतत्व मांडण्याचे धाडस केलेले आहे. या विषयाचा विस्तार करताना ते पुढे म्हणतात, ''भारताचा आत्मा बहुविधतेत आणि सहिष्णुतेत आहे. ही बहुविधता शेकडो वर्षांच्या संमिश्रणाने निर्माण झालेली आहे. पंथ निरपेक्षता आणि सर्वसमावेशकता आमच्या दृष्टीने श्रध्देचा विषय आहे. संमिश्र संस्कृती एक राष्ट्र म्हणून आम्हाला उभे करते. 122 भाषा, 1600 बोलीभाषा, 60 प्रकारचे उपासनापंथ आणि तीन प्रकारचे वांशिक समूह यांनी 130 कोटी लोकांचा हा देश बनलेला आहे. हे सर्व एका व्यवस्थेत, एका ध्वजाखाली, आणि भारतीय ही ओळख ठेवून राहतात.''

अनेकता ही भारताची ओळख आहे आणि अनेकतेत एकता हा भारताचा जीव आहे. तिची जपणूक झाली पाहिजे. मोहनजी भागवतांनी आपल्या भाषणात या विषयावर सर्वाधिक भर दिलेला आहे. अशा विविधतापूर्ण भारतीय लोकांत समान आकांक्षा निर्माण करणे, राष्ट्रीय गुणांची निर्मिती करणे, संघटितपणा निर्माण करणे, देशाला परमवैभवसंपन्न करण्याची आकांक्षा निर्माण करणे हे संघाचे काम आहे. मोहनजींनी हे आपल्या भाषणातून संघशैलीत स्पष्ट केले.

प्रणव मुखर्जी याच आशयात आपल्या पध्दतीने भर घालताना पुढे म्हणतात, ''आज आपल्या आजूबाजूला हिंसा, अंधार, भय, अविश्वास आपल्याला जाणवतो. आम्हाला यातून मुक्त होता आले पाहिजे. केवळ अहिंसक समाजच समाजातील लोकशाही रचनेत सर्व घटकांचा सहभाग सुरक्षित करू शकतो. जे मागे राहिलेले आहेत किंवा दूर ठेवले गेलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने हे फार आवश्यक आहे. दीर्घकाळ आपण दुःख-कष्टामध्ये राहिलेलो आहोत. तुम्ही तरुण आहात, शिस्तबध्द आहात, उत्तम प्रकारे प्रशिक्षित आहात, आणि उच्चविद्याविभूषित आहात. शांतता, सहकार्य आणि सुखासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. आमच्या मातृभूमीची ही अपेक्षा आहे. आमच्या मातृभूमीला याची आवश्यकतादेखील आहे.''

प्रणव मुखर्जी यांनी स्वंयसेवकांना उद्देशून मातृभूमीचे आवाहन केले. सगळया वैचारिक भाषणाला त्यांनी हा एक भावनिक स्पर्श केलेला आहे. भारतमाता हा संघस्वंयसेवकांच्या परमश्रध्देचा विषय आहे. संघशाखेत रोज प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेत परमेश्वराकडे भारतमातेला परमवैभवाकडे नेण्यासाठी परमेश्वराकडे संघस्वंयसेवक 'शील, शक्ती, ज्ञान, वीरव्रत, ध्येयनिष्ठा' हे गुण मागतात. मोहनजींनी आपल्या भाषणात त्याचा विस्तार केलेला आहे. हे सर्व कशासाठी पाहिजे? तर आपल्याभोवती जो अंधकार आहे, तो मिटविण्यासाठी, देश समृध्द आणि बलवान करण्यासाठी.

प्रणवदा यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना मनुष्यजीवनात सुखाची आणि आनंदाची प्राप्ती हे सर्वात मोठे काम असते. आम्ही आर्थिक प्रगती चांगली केली असली तरी हॅपिनेस इंडेक्स (आनंदाचा निर्देशांक)च्या बाबतीत आम्ही जगाच्या क्रमवारीत 133व्या स्थानावर आहोत. राजाने प्रजेच्या सुखात आपेल सुख बघितले पाहिजे. स्वतःच्याच सुखाचा केवळ विचार करता कामा नये, हे सांगणारा कौटिल्याचा श्लोक संसदेच्या सभागृहात लावलेला आहे. प्रणवदांनी तो वाचून दाखविला आणि शासनाच्या सर्व कामाचा केंद्रबिंदू जनताच असली पाहिजे हे सांगितले. राज्यात शांतता, सौहार्द आणि सुख सर्व बाजूने निर्माण झाले पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संघ ही राष्ट्रवादी संघटना आहे. संघाची राष्ट्राची संकल्पना सर्वसमावेशक आणि विश्वमानवाच्या कल्याणाची आहे. ही संकल्पना संघाने शोधलेली संकल्पना नाही, भारतीय राष्ट्राची ती प्राचीन अवधारणा आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी संघाचे काम चालते. त्यासाठी सर्व समाजाचे सहकार्य आवश्यक आहे. हे एकटया संघाचे काम नाही, तर सर्व समाजाचे काम आहे. समाजातील सज्जन शक्तीने संघ समजून घेऊन या कामात सहभागी झाले पाहिजे, असे मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. प्रणवदांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सुखाच्या मापदंडाची सर्वांना आठवण करून दिली आणि त्यासाठी परस्परांना समजून घेत, संवाद करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारर्किद काँग्रेसध्ये सुरू झाली. देशाचे सर्वोच्च संवैधानिक पद - राष्ट्रपतिपद - त्यांनी भूषविले. राष्ट्रपती म्हणून त्यांची कारकिर्द कोणताही विवाद न करता संपली. राष्ट्रपती भवनात त्यांनी राजकारण नेले नाही. खऱ्या अर्थाने ते 130 कोटी जनतेचे राष्ट्रपती झाले. अशा माणसाने पक्षीय विचार करता कामा नये, राष्ट्रीय विचार केला पाहिजे. नागपूरच्या कार्यक्रमात तो त्यांनी व्यक्त केला. मोहनजी म्हणाले त्याप्रमाणे विचारधारा वेगळया असतात, मते वेगळी असतात, परंतु सगळयांच्या मनात देश मोठा करावा हा भाव असतो. म्हणून संवादाची आवश्यकता असते. प्रणवजींनी मोठी वाट तयार करून दिली आहे. या वाटेवरून दोन्ही बाजूने सतत चालणे होत राहिले पाहिजे. आशय एक, भाषा वेगळी असल्यामुळे संवादातून एकमेकांची भाषा एकमेकांना समजू शकते. प्रणवदांची भाषा संवैधानिक आहे, जी आधुनिक जीवनमूल्ये आपल्याकडे आली, त्याची एक भाषा आहे. उदा.,-प्लूरॅलिझम, डायव्हर्सिटी, सेक्युलॅरिझम, हॅपिनेस इंडेक्स इत्यादी शब्द प्रणवदाच्या भाषणात आहेत. संघाचे शब्द आहेत - विविधता, पंथ निरपेक्षता, सर्वांचे सुख, अनेकता, येणाऱ्या काळात परस्परांनी एकमेकांच्या भाषा समजून घेऊन समान आशयाचा संवाद करत राहणे देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे. संघाला काँग्रेस परकी नाही, शत्रू तर मुळीच नाही. काँग्रेसचे नेतेदेखील संघाला अस्पर्श नाहीत. प्रणवदांनी अत्यंत धाडसी निर्णय घेऊन एक पाऊल टाकले आहे. काँग्रेसची मंडळी हे पाऊल मोठे करणार की पाऊल पुसण्याच्या उचापती करणार?