कालच्या पोस्ट विषयी...

विवेक मराठी    10-Jul-2018
Total Views |


 

 

 

 

 

काल सा. विवेकच्या वेबसाइटवर व फेसबुक पेजवर मी आदरणीय भिडे गुरुजींना लिहिलेले पत्र प्रकाशित झाले. ही पोस्ट लिहीपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या. त्या वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधावासा वाटला, म्हणूनच हा लेखनप्रपंच.

अनेकांनी कालच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गुरुजींबद्दल माझ्या मनात गैरसमज आहे असं म्हंटल. माझ्या मनात भिडे गुरुजींबाबत आदर आहे, कारण ते हिंदू समाजाचे संघटन करत आहेत. युवा पिढीला शिव-शंभूंचा इतिहास सांगत देव, देश, धर्ममार्गाने नेत जातीपातीपलीकडचा समाज उभा करत आहेत. त्यांच्या या कामासाठी माझ्या मनात आदराचे स्थान आहे.

प्रश्न मनू आणि मनुस्मृतीचा आहे. मनुस्मृती मध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत सांगितल जात तश्याचं असंख्य वाईट गोष्टी हि आहेत. त्यामुळे मनूला नाकारणारे असंख्य लोक आहेत, ते माझ्यासारखे बहुजन, वंचित, दलित, उपेक्षित गटातील आहेत. ते मनूला का नाकारतात? हे कधीतरी समजून घ्यायला हवे की नको? काल मी लिहिले होते - मनूच्या कायद्याने ज्ञानेश्वरांना जातिबहिष्कृत केले, तुकोबाच्या गाथा बुडवल्या. आजही असे ज्ञानेश्वर, तुकाराम नाकारले जातात. आम्ही माणसे आहोत, आम्हाला माणसासारखे जगू द्या असे आमचे पूर्वज म्हणत होते. आजही आम्हाला पुन्हा तेच म्हणावे लागत असेल, आम्हाला व्यक्त होऊ द्या, माणसाच्या अंगभूत शक्तींना प्रकट करू द्या असे ओरडून सांगावे लागत आहे, समाजातील या संवेदना हिंदू समाजाचे संघटन करू पाहणारे लोक समजून घेणार आहेत का? भिडे गुरुजी हिंदू समाजासाठी काम करतात त्यांनी या संवेदना व तरुणांच्या भावना समजून घ्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. माझ्या सारखंचं अनेकांना वाटतं  तर आम्ही मनूचे आणि मनुस्मृतीचे समर्थन कशासाठी करायचे? असा असंख्य तरुणांच्या मनात प्रश्न आहे. मी फक्त खुलेपणाने बोललो एवढेच.

ज्यांना शतकानुशतके त्रास सहन करावा लागला आणि तरीही आज ते हिंदू समाजाचे घटक आहेत, त्यांची मानसिकता आणि वेदना कोण समजून घेणार? अशा समाजघटकांचे मनोगत मी मांडले, पुढेही मांडत राहीन. कारण मला संपूर्ण हिंदू समाज समरसतेच्या सूत्रात बांधायचा आहे. सशक्त आणि एकरस राष्ट्र उभे करायचे आहे. त्यासाठी मी माझ्या व्यवहारात आणि मानसिकतेत बदल करायला सदैव तयार आहे.

या प्रसंगी मला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा एक उतारा इथे सांगावासा वाटतो. ते लिहितात, "आम्ही भूतकाळातून प्रेरणा जरूर घेतो, परंतु त्या काळाशी जखडलेले नाही. वर्तमानाचे भान आम्ही ठेवतो, परंतु आम्ही स्थितीवादी नाही. आणि भविष्याची सुंदर स्वप्ने आम्ही पाहतो, परंतु आम्ही स्वप्नाळू नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य यांना व्यापून उरलेल्या भारतीय संस्कृतीचे आम्ही जागृत कर्मयोगी असे पूजक आहोत."

मनू आणि मनुस्मृती कधीकाळी चांगली असेल, पण तो भूतकाळ झाला. आपला वर्तमानकाळ संविधान आहे. घटनात्मक राष्ट्रवाद प्रबळ करत आपल्याला समग्र हिंदू समाजाला चिरविजयी करायचे आहे. असे जर असेल, तर आज आपण कसे वागायला हवे? कशाचा उच्चार आणि विचार करायला हवा? मनूचा की राज्यघटनेचा? घटनात्मक राष्ट्रवादातच हिंदूंचे उज्ज्वल भविष्य लपलेले आहे, हे लक्षात घेऊन आपणा सर्वांचा व्यवहार, उच्चार असायला हवा. त्यामुळे गुरुजींनी केलेला मनूचा उल्लेख कालसुसंगत नाही, हे माझे मत आहे आणि यापुढे ते कायम राहील.

-रवींद्र गोळे.