धगधगत्या मध्यपूर्वेचे वास्तव

विवेक मराठी    12-Jul-2018
Total Views |


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रक्तरंजित मध्यपूर्व : इतिहास आणि वर्तमान' या आपल्या ताज्या पुस्तकात लेखक रमेश पतंगे यांनी नव्या पिढीच्या मनातले हे सारे प्रश्न लक्षात घेऊनच विषयाची मांडणी केलेली आहे. मध्यपूर्वेच्या रक्तरंजित, युध्दमय, अग्निमय वास्तवाचा हा इतिहास आणि वर्तमान लेखकाने सोप्या, ओघवत्या आणि म्हणूनच आकर्षून घेणाऱ्या शैलीत आपल्यासमोर मांडले आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आणि संदर्भासाठी उपयुक्त असे झाले आहे.

11 सप्टेंबर 2001 या दिवशी इस्लामी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन मनोरे उद्ध्वस्त केले. किमान 3 हजार माणसे ठार झाली. आज या घटनेला सतरा वर्षे उलटून गेली आहेत. पाठोपाठ अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तानमध्ये आणि मग इराकमध्ये सैन्य घुसवले. आगींचा कल्लोळ उसळला नि रक्ताचे पाट वाहिले. सद्दाम हुसेन फासावर लटकला. यथावकाश ओसामा बिन लादेनलाही अमेरिकेने हुडकून हुडकून ठार केले. पण इस्लामी दहशतवादाचा त्रस्त समंध अजिबात शांत झालेला नाही. तालिबान आणि अल कायदा यांच्यानंतर आता इसिस उर्फ इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍंड सीरिया या नव्या रूपाने तो अधिकच बेफाम झाला आहे. तो बिगर मुसलमानांना तर मारतोच आहे, पण खुद्द इस्लामी अनुयायांनाच जास्त प्रमाणात मारतो आहे.

 सन 2001 ते आज सन 2018. म्हणजे इस्लामची ही भीषण कत्तलबाजी दूरदर्शनच्या पडद्यावर 'लाइव्ह' पाहत पाहत एक आख्खी नवी पिढी वर आली आहे. प्रसारमाध्यमे - म्हणजे वृत्तपत्रे, नियतकालिके आणि दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या या समाजाचे प्रबोधन करण्याऐवजी व एखाद्या समस्येची मूलग्राही मांडणी करण्याऐवजी सनसनाटी 'बे्रकिंग न्यूज'च्या मागे लागलेली आहेत. त्यामुळे नव्या पिढीला प्रश्न पडतात की, अरब आणि ज्यू यांचे एवढे हाडवैर का? जेरुसलेम या एका शहरासाठी जगभरचे मुसलमान, ज्यू आणि ख्रिश्चनदेखील एवढा जीव का टाकतात? शिया इराण आणि सुन्नी अरब यांच्यातूनदेखील विस्तव जात नाही, असे का? इराकमध्ये सुन्नी अरब शिया अरबांच्याच कत्तली करताहेत, तर सीरियात शिया राष्ट्राध्यक्ष बशर आसद याने सुन्नी अरब नागरिकांचा अक्षरश: खाटिकखानाच उघडलाय. असे का?

प्रस्तुत 'रक्तरंजित मध्यपूर्व : इतिहास आणि वर्तमान' या आपल्या ताज्या पुस्तकात लेखक रमेश पतंगे यांनी नव्या पिढीच्या मनातले हे सारे प्रश्न लक्षात घेऊनच विषयाची मांडणी केलेली आहे. मुळात आशिया खंडाच्या या अगदी पश्चिम टोकाला नि आफ्रिका खंडाच्या ईशान्य टोकाला, 'मध्यपूर्व' हा शब्द का नि केव्हापासून वापरला जाऊ लागला इथपासून - म्हणजे मध्यपूर्वेच्या भौगोलिक वर्णनापासूनच त्यांनी विषयाच्या मूलग्राही मांडणीला सुरुवात केली आहे.

कालानुक्रमे मध्यपूर्वेत प्रथम ज्यू, मग ख्रिश्चन आणि नंतर इस्लाम या संप्रदायांचा उदय होत गेला. पण इस्लामचा या अन्य दोन संप्रदायांबरोबरचा संघर्ष हा काही आजचा नव्हे. प्रारंभीपासूनच, म्हणजे इसवीसन 630पासूनच इस्लामने या दोन संप्रदायांबरोबर सशस्त्र संघर्ष पुकारलेला आहे. त्याची कल्पना यावी म्हणून लेखकाने थेट प्रेषित मुहंमदापासूनचा इस्लामचा इतिहास आवश्यक तितका विस्तृत पण जलदगतीने मांडला आहे. इस्लामचा स्वीकार केलेल्या अरबांनी पाहता पाहता पूर्वेकडे इराणपर्यंत धडक मारली. उत्तरेकडे अनातोलिया जिंकून रोमन बायझंटाईन साम्राज्याला जबर तडाखे हाणले. दक्षिणेला इजिप्तपासून सुरुवात करून भूमध्य समुद्राच्या काठाने ते सरळ अटलांटिक महासागरापर्यंत पोहोचले आणि जिब्राल्टर ओलांडून स्पेन जिंकून त्यांनी युरोपखंडाच्या आंतरभागात मुसंडी मारली.

पण अरबांनी बाटवून मुसलमान केलेल्या तुर्कवंशीय गुलामांनी पुढच्या काळात आपल्या मालकांचाच पराभव केला आणि अतिशय विस्तीर्ण अशा ऑटोमन साम्राज्याचा पाया घातला. हे साम्राज्य इसवी सन 1301 ते 1922 अशी जवळपास सव्वासहाशे वर्षे टिकले. आज आपण ज्याला मध्यपूर्व म्हणतो, तो सारा भूप्रदेश या ऑटोमन साम्राज्यात, म्हणजेच आधुनिक काळातल्या टर्की उर्फ तुर्कस्तान देशाच्या ताब्यात होता.

इथपासून लेखक आपल्याला ऐतिहासिक मध्ययुगातून आधुनिक युगात आणतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मोटार कारचा शोध लागला. ही फारच मोठी क्रांतिकारक घटना होती. या मोटारसाठी पेट्रोल हा पदार्थ विपुल प्रमाणात लागणार होता आणि या इंधन तेलाचे अमाप साठे मध्यपूर्वेच्या भूगर्भात आहेत, याचा वास पाश्चिमात्य राष्ट्रांना लागला. इथून मध्यपूर्वेतल्या मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या धार्मिक संघर्षाला, आर्थिक हितसंबंध हा एक नवा आयाम मिळाला. त्यातच ज्यू लोकांनी जोर केला. सगळया अरब मुसलमानांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या अगदी पोटातच त्यांनी आपला स्वतंत्र देश निर्माण केला.

हा सगळा वृत्तान्त सांगत असताना ऑटोमन साम्राज्यातून गेल्या सुमारे पाऊणशे-शंभर वर्षांत सौदी अरेबिया, इराक, सीरिया, लेबेनॉन, जॉर्डन, इजिप्त, इस्रायल इत्यादी देश कसे निर्माण होत गेले, हे लेखक आपल्यासमोर ओघवत्या शैलीत मांडत जातो.

 यानंतर भाग येतो तो 2011 सालपासून सुरू झालेल्या 'अरब स्प्रिंग'चा. म्हणजे एकापाठोपाठ एक अरब देशांमधल्या जनतेने केलेल्या हुकूमशाही विरोधी क्रांतीचा. या क्रांतीची सुरुवात टयुनिशिया या छोटया आफ्रिकी-अरब देशात झाली. क्रांतीच्या ज्वाळा भडकत लिबिया, इजिप्तमधल्या हुकूमशहांचा घास घेत सीरियात पोहोचल्या. तिथे आजही प्रचंड रणकंदन, कत्लेआम चालूच आहे. शिया सत्ताधारी बशर आसद हा सुन्नी बंडखोर जनतेला अक्षरश: चेचतो आहे.

या सगळया कत्तलखान्यात अरब नसलेला, सुन्नी नसलेला, पण कडवा इस्लामी शियापंथीय असलेला इराण नि तिथले कट्टरवादी अयातुल्ला हा आणखीनच एक पैलू आहे. इराणचा शहा मुहंमद रेझा पहलवी हा एक भंपक, खुशालचेंडू इसम होता. अमेरिकेने त्याला मोठा केला. 1979 साली अयातुल्ला खोमेनीने क्रांती घडवून शहाची हकालपट्टी केली. तिथपासून सगळी अयातुल्ला मंडळी अमेरिकेवर गरम झालेली आहेत.

अमेरिकेने आणि सगळयाच पाश्चात्त्य देशांनी दाणे टाकून कोंबडी झुंजवावीत तसे या अरबांना सतत आपसात झुंजवत ठेवले आहे. सगळयांनाच अरबांचे तेल हवे आहे. शक्य तितक्या कमी दरात हवे आहे आणि आपसात लढण्यासाठी अरबांनी आपल्याकडून नवनवीन शस्त्रे खरेदी करायलाही त्यांना हवे आहे.

मध्यपूर्वेच्या रक्तरंजित, युध्दमय, अग्निमय वास्तवाचा हा इतिहास आणि हे वर्तमान लेखकाने सोप्या, ओघवत्या आणि म्हणूनच आकर्षून घेणाऱ्या शैलीत आपल्यासमोर मांडले आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आणि संदर्भासाठी उपयुक्त असे उतरले आहे.

मात्र लेखकाने संदर्भसाधने म्हणून इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांचा विपुल वापर केला आहे, हे फारसे योग्य नाही. इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्युडाइझम यावर इंग्लिशमध्ये आणि मराठीतही भरपूर ग्रंथ उपलब्ध आहेत. इंग्लिशमधले लेखक-संशोधक स्वत: ख्रिश्चन असले, तरी बऱ्यापैकी निष्पक्ष असतात. त्यांच्या लेखनाचा आधार घेणे जास्त योग्य. इंटरनेटवरील संकेतस्थळांवर मजकूर 'अपलोड' करणारे लोक, दुसऱ्याच्या डोळयातले कुसळ दाखवताना स्वत:च्या डोळयातील मुसळ झाकून ठेवतात, असा साधारण अनुभव येतो.

त्याचप्रमाणे नकाशांच्या बाबतीत लेखक आणि प्रकाशक नकाशे देण्याच्या बाबतीत कंजूसपणा करतात. इथे लेखकाने जागोजागी उत्तम नकाशे देऊन विषयाची समजूत वाढवलेली आहे. पण मराठी पुस्तकात इंग्लिश नकाशे का आहेत? उत्तर स्पष्टच आहे की, ते इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहेत. म्हणून या ठिकाणी प्रकाशन विभागाने मुद्दाम मराठी नकाशे उपलब्ध करवून तेच घ्यायला हवेत.

तीच गोष्ट शब्दांच्या योग्य उच्चारांची. इंग्लिश भाषिक लेखक, पत्रकार अरबी, तुर्की, फार्सी शब्दांचे त्यांना वाटेल ते उच्चार करतात नि लिहितात. उदा., ओमर, मुआम्मर गडाफी, हफीज असाज, हज, रमादान इत्यादी. मूळ उच्चार उमर, मुहम्मद गद्दाफी, हाफीज आसद, हाज, रमझान असे आहेत. ते तसे लेखनात आले की, पुस्तकाला एक तालेवारपणा येतो. तसा तो यावा, ही अपेक्षा. मुखपृष्ठ, मुद्रण यासह हिंदुस्थान प्रकाशन संस्थेची एकंदर निर्मिती आकर्षक.

-7208555458

रक्तरंजित मध्यपूर्व ः इतिहास आणि वर्तमान

लेखक : रमेश पतंगे

प्रकाशक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था (साप्ताहिक विवेक)

पृष्ठे : 250. मूल्य : 324 रुपये