प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे बक्षीस

विवेक मराठी    13-Jul-2018
Total Views |

 

गरीब लाकूडतोडयाची लोखंडाची कुऱ्हाड विहिरीत पडली आणि देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर संतुष्ट होऊन बक्षीस म्हणून त्याला सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडी दिल्या, ही केवळ लहान मुलांना सांगण्याची गोष्ट नव्हे. त्यातील उपदेश आयुष्यभर अनुसरण्यासारखा आहे. माझाही प्रामाणिकपणा माझ्या बाबांनी कसोटीवर पारखला. सचोटी ही बावनकशी सोन्याप्रमाणे कुठल्याही काळात मौल्यवानच असते, हा मोलाचा धडा मला त्यातून शिकायला मिळाला.

मला दुकानाच्या सर्व व्यवहारांत तयार केल्यानंतर बाबांनी एकएक जबाबदारी माझ्याकडे सोपवत एके दिवशी व्यवसायातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. वर्ष 1996मध्ये दुबईतील दुकाने माझ्या ताब्यात देऊन ते भारतात निघून गेले. ते आईसोबत अकोला, लाड कारंजा व मुंबई येथे जाऊन-येऊन राहू लागले. इकडे मी, माझी पत्नी आणि तान्हा मुलगा दुबईत वास्तव्याला होतो.

येथे एक गोष्ट म्हटली तर विचित्र आणि म्हटली तर व्यवहाराला धरून होती. मी आमच्या दुकानांची संपूर्ण जबाबदारी सांभाळत असलो, तरी प्रत्यक्षात मी तेथे पगारी नोकर होतो. दुकानाचे मालक बाबाच होते. अर्थात ते स्वाभाविकच होते, कारण दुकाने त्यांच्याच कष्टाच्या पुंजीतून उभी राहिली होती. बाबा सर्व नफा स्वत:कडे ठेवत आणि मला महिन्याला ठरावीक पगार देत. मी एकटा होतो तोवर ठीक होते, पण लग्न आणि अपत्य झाल्यावर माझ्यापुढे अशी अडचण उभी राहिली, की संसाराची जबाबदारी व खर्च वाढल्याने मला पगार अपुरा पडू लागला.

एक दिवस मी धाडस करून बाबांना म्हणालो, ''बाबाऽ मी अत्यंत कष्ट करून दुकानांचा नफा दर वर्षी वाढवत आहे, पण हा पगार मला पुरत नाही. पत्नी व लहान मुलाचीही जबाबदारी माझ्यावर आहे हे लक्षात घेऊन मला जास्त उत्पन्न मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे.'' त्यावर बाबा त्यांच्या नेहमीच्या रागीट स्वभावानुसार माझ्यावर ओरडले, ''लग्न झाल्यावर फार धिटाईने बोलू लागलायस. ही अक्कल काय बायकोने शिकवली का रे तुला?'' मी त्यावर उत्तर न देता गप्प राहिलो.

बाबांना नंतर वस्तुस्थिती जाणवली म्हणा, किंवा आईने त्यांना पटवून दिले म्हणा, पण दुसऱ्या दिवशी बाबा अगदी शांतपणे मला म्हणाले, ''दादा! हे बघ तुझ्या बोलण्यावर मी विचार केला आणि मला एक पर्याय सुचला. दुकानाच्या नफ्याचा ठरावीक हिस्सा तू मला दर वर्षी द्यायचास. उरलेल्या हिश्श्यात दुकानाचा आणि तुझ्या संसाराचा खर्च चालवायचास. जितका नफा वाढवशील तितके तुला वाढीव उत्पन्न मिळेल.'' हा आकर्षक प्रस्ताव असल्याने मी त्याला संमती दिली आणि नफ्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम दोन हप्त्यांत विभागून दर सहा महिन्यांनी भारतात येऊन त्यांना देऊ  लागलो. हा क्रम बाबांच्या हयातीत अखंड सुरू राहिला. मी त्यांना प्रामाणिकपणे सर्व हिशेब देत गेलो. बाबांनीही कधी आपला मालकी हक्क सोडला नाही किंवा ''आता मला हा नफ्याचा हिस्सा देणे थांबव'' असे सांगितले नाही. ते सर्व हिशेब बारकाईने तपासून बघायचे. मला त्यांच्या कर्तव्यकठोरतेचे आश्चर्य वाटायचे, पण मीसुध्दा दिल्या शब्दाला पक्का होतो.

एका भेटीमध्ये मी गमतीनेच बाबांना म्हणालो, ''बाबा, धंद्यात आपण नेहमी प्रामाणिक राहावे, असा तुमचा व आईचा आग्रह असतो. पण प्रामाणिक माणसाच्या वाटयालाच जास्त मनस्ताप येतो. असे का?'' त्यावर बाबा शांतपणे म्हणाले, ''दादाऽ प्रामाणिकपणा माणसाचा कधीही घात करत नाही. उलट त्या गुणाचे बक्षीस फार मोठे असते. मी फार पूर्वी वाचलेली एक गोष्ट तुला सांगतो.

सुमारे दीड-दोनशे वर्षांपूर्वी भारतावर ब्रिटिश अमलाच्या काळात बंगालच्या ढाका जिल्ह्यातील तेवटा गावात पंचानन हा गरीब मुलगा राहत होता. आई-वडिलांविना पोरका असलेला हा मुलगा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत नातेवाइकांच्या कृपेवर उदरनिर्वाह करत होता. त्याला शिक्षण मिळाले नव्हते, पण तो प्रामाणिक व सज्जन होता. त्याने कष्ट करून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे गावातील पोक्त लोकांनी त्याला सुचवले. त्यानुसार हा मुलगा बाहेर पडला आणि उत्तर बंगालमधील तंबाखूच्या व्यापाऱ्यांसमवेत प्रवास करत अत्रेयी नदीकाठच्या खानसामा या गावी पोहोचला. लवकरच त्याला एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी हरकाम्या म्हणून नोकरी मिळाली. त्याने ते काम इतके प्रामाणिकपणाने केले, की कालांतराने मालक त्याच्यावर विश्वासाने मोठे व्यवहार सोपवू लागला.

एकदा अशी घटना घडली, की बाजारात तंबाखूचे भाव पडले असल्याने आणि गोदामातही तंबाखूचा मोठा साठा शिल्लक असल्याने पंचाननचा मालक काळजी करत होता. पंचाननला मात्र खात्री होती की मंदीपाठोपाठ तेजी येतेच. तो मालकाला धीर देत राहिला. एक दिवस तो बंदरावर हिंडत असताना त्याला तंबाखूच्या गठ्ठयांनी भरलेली जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाज मालकांनाही त्यांच्या मालाला ग्राहक हवा होता. पंचाननने आपल्या मालकाच्या नावाने धाडसाने त्यांच्याशी व्यवहार केला आणि विसार म्हणून हातातील सोन्याची अंगठी काढून दिली. तो घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या मालकाने उजळलेल्या चेहऱ्याने सांगितले की तंबाखूचे भाव पुन्हा वाढत असल्याचे पत्र कोलकात्यावरून आले आहे. हे ऐकताच दुसऱ्याच दिवशी पंचाननने खरेदी केलेला माल 50 टक्के नफा घेऊन विकला. या व्यवहारात त्याला तब्बल दहा हजार रुपये नफा झाला. पंचाननने ही रक्कम प्रामाणिकपणे मालकाकडे आणून दिली आणि मालकाच्या संमतीखेरीज व्यापार केल्याबद्दल माफीही मागितली. मालक त्याच्यावर इतका खूश झाला की त्याने तीच रक्कम पंचाननला बक्षीस म्हणून दिली आणि स्वतंत्रपणे व्यापार करायला सांगितले. पंचाननने पुढेही प्रामाणिकपणे व्यवसाय करून राजासारखे वैभव मिळवले. पंचाननच्या वारसांनीही हा प्रामाणिकपणा जपला. फलस्वरूप पंचाननच्या नातवालाही ब्रिटिशांनी एका जहागिरीचा राजा केले.''

गोष्ट संपवून बाबा म्हणाले, ''दादा लक्षात ठेव. ही कल्पित नसून घडलेली कथा आहे. आजूबाजूचे लोक लबाडी करून, खोटे बोलून पैसा मिळवत असले, तरी आपण त्या मार्गाला कधीच जाऊ नये. प्रामाणिकपणाच दीर्घकाळात आपल्याला चिरंतन वैभव मिळवून देतो आणि कष्ट व प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा मुलाबाळांचेही कल्याण करतो.'' बाबांचे हे शब्द मी कधीही विसरलो नाही. उलट त्याच्या सत्यतेचा प्रत्यय मला नेहमी येत गेला.

पुढे वयोमानानुसार बाबा थकले. त्यांची प्रकृतीही अस्थिर होऊ लागली. आईचे निधन झाल्यानंतरही मुंबईत स्वतंत्रपणे राहण्याचा निश्चय त्यांनी सोडला नाही. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, असा फोन आला त्याच्या एकच दिवस अगोदर मी महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी मुंबईतून दुबईला गेलो होतो. बाबांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच मी लगेच पुढचेच विमान पकडून मुंबईत दाखल झालो आणि थेट रुग्णालयात गेलो. दुर्दैवाने बाबांच्या आणि माझ्या अखेरच्या भेटीचा योग नव्हता. मी पोहोचेपर्यंत बाबांची प्राणज्योत मालवली होती. आम्ही सगळे शोकसागरात बुडून गेलो. पार्थिव घरी दर्शनासाठी आणले असताना बाबांच्या जेवणाची आणि औषधपाण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कामवाल्या मावशी मला काहीतरी सांगू लागल्या. जाण्यापूर्वी दोन दिवस आधीच बाबांनी एक डायरी त्या मावशींच्या हवाली केली होती आणि ''दादा आला की त्याच्याच हातात ही डायरी सोपवा'' असे बजावले होते. मी अंत्यसंस्कारांच्या गडबडीत असल्याने मावशींनी दिलेली डायरी न बघताच खिशात ठेवली. नंतर ते विसरून गेलो.

रात्री बाबांच्या सहवासाच्या बालपणापासूनच्या घटनांना उजाळा देताना मला एकदम त्या डायरीची आठवण झाली. मी डायरी उघडली, तर प्रत्येक पानावर हिशेबाची आकडेवारी, मालमत्तेचा तपशील अशी माहिती तारीखवार काटेकोर लिहून ठेवली होती. ते वाचताना मी आश्चर्याने थक्कच झालो. मी बाबांना वेळोवेळी देत असलेली नफ्याची रक्कम बाबांनी कधीच स्वत:साठी खर्च केली नव्हती. उलट त्याचा त्यांनी एक मोठा बचतनिधी बनवून ठेवला होता. शेवटच्या पानावर एकूण ठेवीची रक्कम आणि ती माझ्या नावाने ज्या बँकेत ठेवली, त्या खात्याचा तपशील नमूद केला होता. माझे डोळे भरून आले. बाबांनी माझ्याकडून वास्तविक कोणत्याही पैशाची अथवा आधाराची अपेक्षा केली नव्हती. उलट आयुष्यभर माझ्या पाठीवर राहिलेला त्यांचा हात जातानाही मला प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे बक्षीस देऊन गेला होता.

मित्रांनो! 'ऑॅनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी' (प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण) ही इंग्लिश भाषेतील म्हण मुळीच खोटी नाही.

 

(या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)