अनुभव नागाभूमीचा

विवेक मराठी    02-Jul-2018
Total Views |

नागालॅण्डमधील वास्तव्यात आम्ही तेथे केलेल्या शैक्षणिक प्रयोगांपैकी काहींविषयी आधीच्या भागात माहिती दिली आहे. या निसर्गसंपन्न राज्यातील संस्कृतींविषयीचे, येथील माणसांविषयीचे आणि आमच्या उपक्रमांचे आणखी काही अनुभव या भागात वाचा.

आताचा प्रवास तुलनेने सोपा होणार होता. कारण आज आम्ही बोलेरोमधून दिमापूरकडे जाणार होतो. आमच्या गाडीत आम्ही तिघी, सहा महिन्याच्या एका बाळासह त्याची आई आणि आमचा चालक बंधू असे सहा जणच होतो. नागालँडमध्ये आपल्याला खाजगी वाहतुकीवरच अवलंबून  राहावं लागतं. दोन जिल्ह्यांना किंवा त्यातील मोठया गावांना जोडणारी एकच एसटी सुटते आणि तीही एक दिवस आड.. त्यामुळे बहुतांश दळणवळण खाजगी वाहनातूनच चालतं म्हणा ना...

तर अशी ही स्पेशल बोलेरो घेऊन आम्ही निघालो. ड्रायव्हरशी ओळख झाली. आम्ही कोण, कुठे, कशासाठी आलो तेही सांगितलं. अचानक आठवलं म्हणून 'राजमिरच्यांचं बी' (जगातील सर्वात तिखट मिरची) कुठे मिळेल याची त्यांच्याकडे चौकशी केली. पण त्यालाही माहीत नव्हतं. आमचा नागामिझ संवाद ती महिला शांतपणे ऐकत होती. तासाभरानेच तिचं गाव आलं. ती ड्रायव्हरशी झेलियांग भाषेत काहीतरी बोलली अन मूळ रस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागली. मी ड्रायव्हरला विचारलं, तर तो म्हणाला, ''आपण हिच्या घरी जातोय. तिच्याकडे थोडं बिजन आहे राजमिरचीचं. ते द्यायचंय तिला तुम्हाला''... मी अवाक झाले. सईताईला आणि सानिकाताईला जेव्हा मी हे सांगितलं, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ही खऱ्या नागालँडची ओळख आहे. आपला कोणताही फायदा नसताना दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा सहज स्वभाव... आम्हाला प्रथमच पाहत असूनही, आम्हाला काय हवंय याचा विचार करणारी ती महिला आणि त्या महिलेच्या शब्दाला मानून बारा प्रवाशांच्या जागी केवळ तीनच प्रवासी असताना, डिझेलच्या दराचा विचार न करता सहा कि.मी. गाडी offtrack फिरवणारा तो चालक.. दोघेही मला खूप मोठे भासले आणि वाटलं - भले हे बिजन सर्वाधिक जहाल मिरचीचा असेल, तरी त्यातला आपुलकीचा भाव नक्कीच त्या झाडात उतरेल.

आता आम्ही चौघंच गाडीमध्ये होतो. ड्रायव्हर आम्हाला परिसराची माहिती देत होता. ज्या राज्य महामार्गावरून आम्ही जात होतो, त्यासाठी सरकारने कोटयवधी रुपये मंजूर केले, पण ते रस्त्यापर्यंतपोहोचलेच नाहीत, बारा वाटांनी वाहून गेले, याची कहाणीदेखील त्याने सांगितली. भ्रष्टाचाराला कंटाळलेले अनेक तरुण-तरुणी आज नागालँडमध्ये याबाबत उघडपणे बोलताना दिसतात, ही एक जमेची बाजू आहे.

आम्ही 8 तासांत दिमापूरला पोहोचलो. निसर्गाची हिरवाई पिऊन डोळे तृप्तावले. एक दिवस थांबून आम्ही नुएन्सांगकडे निघणार होतो. चाँगसाशी सतत संपर्क सुरू होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही भीमपत्नी हिडिंबा हिचा राजवाडा पाहायला गेलो. घटोत्कचाची आई हिडिंबा ही नागालँडची कन्या. राजबाडी म्हणून प्रसिध्द या जागी आता 10-12 फूट उंच दगडी बुध्दिबळाच्या सोंगटया अवशेषाने शिल्लक आहेत. नागा लोकांच्या बुध्दिमत्तेचं ते द्योतकच होतं. बुध्दिमत्ता, नवनिर्मितीची आस या लोकांकडे मुळातच आहे. त्याला जोड हवी ती विकासात्मक दृष्टीकोनाची, प्रामाणिक व्यवस्थेची.

या दरम्यान दिमापूर कार्यालयात प्रांतभर चालणाऱ्या संस्कार वर्ग-शिक्षकांचा अभ्यासवर्र्ग सुरू होता. सुमारे 30 ठिकाणी चालणारी ही  केंद्रं भविष्यातील प्रामाणिक व्यवस्थेची चाहूल देत आहेत असं वाटलं अन् मन सुखावलं.

पुढचा दिवस तुएन्सांगला जाण्याचा. 300 कि.मी. अंतरावर, ब्रह्मदेशाच्या सीमेलगत हिरव्यागार डोंगररागांत पहुडलेलं तुएन्सांग...

ढगांच्या थव्यांना आजूबाजूला वावरताना मी इथे पहिल्यांदा पाहिलं. लहानपणी पाहिलेल्या ढगांचं अस्तित्व गूढ स्पर्शाने अनुभवता आलं ते इथेच. कधी एकदा तिथे पोहोचेन असं होऊन मन गाडीच्या पुढे वेगाने धावत होतं. वळणावळणांचे नागमोडी रस्ते त्यांच्या तालावर आम्हाला डोलायला लावत होते. प्रवासात दोन व्यक्तींशी ओळख झाली. जनजाती विकासाचं आमचं काम त्यांना सांगताच ते खूश झाले. 18 तासांच्या प्रदीर्घ प्रवासाने आम्हाला तुएन्सांग गावामध्ये आणून सोडलं. चाँगसा टॅक्सी घेऊन आधीच थांबला होता.

चाँगसा तेथील आमच्या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी. अत्यंत सुस्वभावी, गुणी आणि मेहनती. गेल्या वर्षी वडील वारले आणि आईसह 6 भावंडांची जबाबदारी त्याच्यावर आली. आज 12 मुलांचं वसतिगृह सांभाळत त्याने बारावीची परीक्षा दिली आहे.

चाँगसासह आम्ही वसतिगृहापर्यंत पोहोचलो. ङाकुसुंग (kngakusung) या उंच पर्वताच्या नावाने चालणारं हे वसतिगृह. याच वास्तूने 2014 मध्ये मला कामाची दिशा दिली होती. मनोमन नमन करत मी आत शिरले. सामान आत ठेवतच होतो, तर चाँगसा हातात स्लीपर्सचे तीन कोरे जोड घेऊन उभा... तिथे थंडीमुळे घरातही चप्पल घालाव्या लागतात आणि आम्हाला मोकळया पायाने फिरावं लागू नये, म्हणून त्याने आल्या आल्या आम्हाला ते देऊ केले आणि वाटलं, पूर्वांचलात लहान प्रमाणात का असेना, पण संघटनेचं जे काम चाललं, त्याच हे फलित आहे. कार्यकर्ते घडताहेत. केवळ पाहुणचार नव्हे, तर नियोजन व्यवस्था यांची सांगड घालत किती कल्पकतेने त्याने आमची निवास व्यवस्था केली बरं... सई आणि सानिकाताई दोघींनाही त्याचं खूप कौतुक वाटलं.

आम्ही पोहोचलो त्या दिवशी कुकिंग क्लास सुरू करणार असं ठरवलं होतं. 8 महिलांनी नावंही नोंदवली. पण तुफान पावसाने तुएन्सांग जणू गारठून गेलं असावं अन् कुणीच आलं नाही. कुंद वातावरणात निराशेचे ढग मनाला वेढू लागले. सामान आणून तयार होतं, पण शिबिरार्थींचा पत्ता नव्हता. तशा पावसातच 3-4 घरांमध्ये गेले, त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली, पण व्हिलेज काउन्सिलची मोठी मीटिंग असल्याने महिला वर्ग जेवण करण्यात गुंतला होता. शांतपणे परत येणं हाच पर्याय. एक एक दिवस मोलाचा होता.

दुसऱ्या दिवशीच्या क्राफ्ट क्लासची आठवण करून द्यायला मुलांना फोन लावू लागले, तर नेटवर्क साथ देईना. अशा वेळी शांत बसणं अशक्य झालं. संध्याकाळी चार वाजता अंधाराने आकाश घेरलं. रिपरिप पावसात मी बाहेर पडले ते थेट हॉकिनच्या घरी गेले. सुदैवाने तो घरी होता.

2014मध्ये हॉकिन स्टुडंट युनियनचा अध्यक्ष होता. त्यांच्या एका कार्यक्रमासाठी मी त्यांना स्टॉकिंगची फुलं शिकवली, तेव्हाचा आमचा परिचय. त्याला भेटून आम्हा दोघांनाही आनंद झाला. क्राफ्ट क्लासचं सांगितलं, तसा खूश झाला आणि त्याच्या भावाच्या तीन मुलांना पाठवणार म्हणून शब्द दिला. थोडया गप्पागोष्टी करून घरी आले.

स्वयंपाकाची सारी धुरा सईताई, सानिकाताई आणि वसतिगृहात जेवण करणारी मॉशाय यांनीच पेलली. दोघींपेक्षा मी लहान असल्याने त्या मला प्रेमाने गरमा गरम करून वाढायच्या.

मॉशायही असेल 16-17 वर्षांची. घरची खूप गरिबी. वयाने लहान, नाजूकशी. हसऱ्या चेहऱ्याच्या  मॉशायवर अन्नपूर्णेचा जणू वरदहस्त होता. तिच्या साध्या वरणभातातही स्वाद होता. आमच्या 5 दिवसांच्या मुक्कामात तिने अनेक पदार्थ शिकून घेतले आणि आम्हालाही खाऊ घातले. कुल्हड (राजम्यासारखं नागा कडधान्य)ची भाजी, अखूनी, राजा मिर्चा, लायपताची चटणी, नागा दाल आणि लोकल तांदळाचा भात...आहाहा !! आजही चव तोंडावर रेंगाळते आहे. तीन वर्षांनी असं भरपेट जेवल्यासारखं वाटलं मला. तर कधी उपमा, पोहे, शिरा, शेवपुरी, पराठा, कुळथाचं पिठलं असा महाराष्ट्रीय बेतही झक्कास वाटायचा.

तुएन्सांगला पोहोचण्यापूर्वीपासूनच, आम्ही कोहिमाला कधी जातोय याकडे कुणीतरी डोळे लावून बसला होता, तो म्हणजे नायवांग कोनयाक. मॉन जिल्ह्यातला नायवाँग दहावीपर्यंत GGPS या रत्नागिरीच्या शाळेत शिकला. उत्तम मराठी, हिंदी आणि इंग्लिश बोलतो. माझ्या परिचयाचा तो होताच, तसाच आणखीही एक धागा होता - तो सईताईचा विद्यार्थी होता आणि आपल्या आवडत्या टीचर इकडे येताहेत याचा आनंद, उत्सुकता होती त्याला.

क्राफ्ट क्लासला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे 40 विद्यार्थी रोज 4 दिवस येऊन विविध वस्तू तयार करत आणि कौतुकाने पालकांना दाखवत. स्टॉकिंग फूल, आइसक्रीम स्टिक्स, वॉल हँगिंग, क्विलिंग ग्रीटिंग्ज, ओरिगामी. रोज अडीच तास सारं हॉस्टेल जणू गोकुळ होऊन जायचं. सारं सामान मी महाराष्ट्रातून घेऊन आले होते. इथे एका व्यक्तीचा मला उल्लेख करावासा वाटतो - माझा चुलत भाऊ रवींद्र भागवतचा. माझ्या कामाला सहकार्य म्हणून त्याने क्राफ्ट सामानाचे 5000 रुपये मला दिले होते. नवं शिकल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहिला आणि क्राफ्टचा आपला प्रयोग यशस्वी झाल्याची पावती मिळाली.

3500 कि.मी.वर त्या 40 मुलामुलींशी नातं जोडण्याचा, त्यांच्या घरांशी परिचय करण्याचा छोटा प्रयत्न होता. खरं तर तुएन्सांग एखाद्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची वाट पाहतंय, हे जाणवत होतं. खरंच, या समाजाचं आणि आपलं नातं बळकट करायचं, तर 4-8 दिवस देऊ शकणाऱ्या तरुण-तरुणींनी इथे यायलं हवं. आपलेपणाचं बीज पेरून सातत्याने त्याचं संवर्धन करायचं, तर एकत्र येऊन काहीतरी करावं लागेल.

पाऊस तर मी म्हणत होता. तापमान 120 से.पर्यंत खाली आलं होतं. मेच्या पहिल्या आठवडयात थंडी अनुभवतानाचं सुख काही वेगळं होतं.

एक दिवस अमितजी आम्हाला न्यायला आले. अमितजी दास - जनजाती विकास समितीचा कार्यकर्ता. फार लहानपणी ते तुएन्संागला आले. चांग जमातीचं नागरिकत्व (सिटिझनशिप) घेतलं. संगतम जमातीच्या मुलीशी लग् झालं. ते मूळचे बंगाली. आज अमितजी बंगाली, राजस्थानी आणि नागा या समाजांना जोडणारा दुवा बनले आहेत.

अमितजी आले ते विशेष कामासाठी. तुएन्सांगला येताना आसाम रायफल्सचा कॅम्प बघून सईताईला तिथे जाण्याची कल्पना सुचली. तिथल्या मराठी सैनिकांना भेटण्याची आमची इच्छा होती. अमितजी, त्यांची दोन मुलं, माजी विद्यार्थी लिरोसी आणि आम्ही तिघी गाडीतून आसाम रायफल्सच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. मोठया उंच कमानीवर लिहिलं होतं - 'आसाम रायफल्स - घातक 40.'

मी आणि अमितजी गेटवर गेलो. तिथल्या सिक्युरिटी पोस्टवर आम्ही महाराष्ट्रातून आलो आणि इथे कोणी मराठी असल्यास भेटायचं आहे असं सांगितलं. आधी त्यांनी उडवूनच लावलं. आम्हीही फार आग्रह धरणार नव्हतो, कारण ज्या भागात हा कॅम्प आहे, तिथे असा नकार येणं अपेक्षितच होतं.

सहज शक्य झाल्यास एखाद्या सैनिकाला तरी भेटवा, असं सांगून आम्ही वाट पाहत थांबलो. सिक्युरिटीवर असणाऱ्या त्या व्यक्तीने थोडी फोनाफोनी केली आणि 10 मिनिटांत त्यांचा फोन खणखणला. फोन उचलून काही बोलणं झालं आणि त्यांनी मला फोनवर बोलावलं. फोन कानाला लावला, तर समोरून आवाज आला, ''नमस्कार, मी अमोल पवार बोलतोय.''

क्रमश:    
suchitarb82@gmail.com