आजचे समाजवास्तव आणि सावरकर

विवेक मराठी    02-Jul-2018
Total Views |

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांत आज सावरकर कृतीतून साकार करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठीचे दिशादर्शन डॉ. अशोक मोडक यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर ः सध्याच्या संदर्भात' या पुस्तकाने केले आहे.

  महापुरुषाची दृष्टी आणि विचार हे काळाची पावले ओळखणारे आणि दिशादर्शन करणारे असतात. त्याच्या वक्तव्याला जसे तात्कालिक संदर्भ असतात, तसेच दूरगामी संदर्भही असतात. अशा महापुरुषांमध्ये स्वा. सावरकरांचा खूप वरचा क्रमांक लागतो. धगधगते जीवन, ओजस्वी विचार आणि जाज्वल्य देशभक्ती ही सावरकारांची रूपे आपल्याला चिरपरिचित आहेत. स्वा. सावरकरांचे विपुल लेखन आणि दूरदृष्टी या गोष्टीही आपल्याला परिचित आहेत. पण या साऱ्या गोष्टीचा आजच्या संदर्भात विचार केला, तर डॉ. अशोक मोडक यांनी हा प्रयोग केला असून त्यातून 'स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात' या पुस्तकाच्या रूपाने तो साकार झाला आहे.

या छोटेखानी पुस्तकात लेखकाने स्वातंत्र्यवीरांच्या विचारांची प्रासंगिकता, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांच्या कार्याचे आंतरराष्ट्रीय पैलू अशी तीन प्रकरणे लिहिली असून त्यातून सावरकर विचारांचे आजचे संदर्भ अधोरेखित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. समाज, राष्ट्र आणि विश्व या तिन्ही पातळयांवर सावरकरांचे विचार, त्यांचा प्रसार आणि त्यातून होणारी सामाजिक अभिव्यक्ती यावर लेखकांनी अचूकपणे बोट ठेवले आहे. हिंदू समाजाचे संघटन ही काळाची गरज आहे असे सावरकरांनी म्हटले होते. आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यावर हिंदू समाजाला ज्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे, ते पाहता सावरकर किती पुढचा विचार करत होते हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच वेळा सावरकरांचे विचार समजून न घेताच त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली जाते. किंवा सावरकारांना अपेक्षित नसणारा अर्थ लावून त्यांना बदनाम केले जाते. त्यामुळे सावरकरांच्या विचारापासून काही हिंदू स्वतःला चार हात दूर ठेवतात, किंवा काही हिंदू त्यांच्यापासून फारकत घेऊ इच्छितात, या पार्श्वभूमीवर आपण सावरकर आणि सावरकरांचे विचार यांचा आजच्या संदर्भत विचार कसा करावा? लेखक म्हणतात, 'सावरकरांच्या परखड व सुस्पष्ट विचारांबद्दल आपण अपराधित्व बाळगण्याचे काहीही कारण नाही. उलटपक्षी त्यांच्या जयिष्णू वृत्तीबद्दल आपण या महापुरुषाविषयी कृतज्ञच राहिले पाहिजे. आपण हिंदू आहोत व म्हणूनच आपण कुणाचाही त्यांच्या धर्ममतांबद्दल कधीही द्वेष करायचा नाही, कुणामध्येही भेदभाव करायचा नाही, मतभिन्नतेचे स्वागत करायचे; पण त्याचबरोबर आपले स्वत्व, आपली अस्मिता या मूल्यांशी तडजोड करायची नाही; प्रसंगी क्रोधशील व व्यावर्तक व्हायचे, पण मुदलात आपण क्षमाशील व सर्वसमावेशक आहोत याचे भान ठेवायचे. या भारतवर्षात राहणाऱ्या सर्वांना आपल्याबरोबर घेऊन मार्गक्रमणा करायची आहे व म्हणूनच आपण सर्व जण भारतीय आहोत हाच भाव सदैव जागवायचा. सहिष्णुता आणि जयिष्णुता यांचा समन्वय म्हणजे सावरकरवाद हे समीकरण महत्त्वाचे आहे.' याचाच अर्थ असा की सावरकरांचे कार्य आणि विचार यांचा अंगीकार करताना, कृतीतून साकार करताना त्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, तर आजच्या संदर्भातही सावरकरांचे विचार किती उपयुक्त होते, हे लक्षात येईलच.

हे दशक हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या दशकात देशात सत्तांतर झाले, त्याचबरोबर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या व्यक्तींचा आणि संघटनांचाही रेटा वाढला आहे. हिंदुत्वाचा समन्वयवादी विचार नाकारताना हा गट सत्ताधाऱ्यांना विरोध करताना बऱ्याच वेळा सावरकरांच्या विचारांचा, कृतीचा चुकीचा अर्थ काढत सावरकरांवर, हिंदुत्वावर चिखलफेक करताना दिसतो. अशा वेळी सावरकरांचे विचार आपण कशा प्रकारे प्रकट करणार? हा प्रश्न आहे. समाज सावरकरांचे विचार कृतीने साकार करतो, तेही आता दिसून येत आहे. 'तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधुबंधू' असे सावरकर दिशादर्शन करतात आणि नुकताच हैदराबाद येथील रंगनाथ मंदिरात एका दलित अर्चकांला सन्मानाने प्रवेश दिला जातो. अशा गोष्टीची वारंवारिता वाढणे, समाजाकडून केवळ स्वीकार न होता तो समाजाचा सहज स्वभाव होणे म्हणजेच सावरकर आजच्या संदर्भात जगणे होय.

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांत आज सावरकर कृतीतून साकार करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठीचे दिशादर्शन डॉ. अशोक मोडक यांच्या या पुस्तकाने केले आहे.

आज जागतिक पातळीवर झपाटयाने सर्वच संदर्भ बदलत आहेत. अनेक देश भारताचा मैत्रीचा हात घेऊन पुढे येत आहेत, तर भारताच्या शेजाऱ्याच्या वर्तनातही लक्षणीय बदल झालेला आहे. पाकिस्तान, चीन यांच्यातील समझोता आणि त्यातून भारतापुढे उभी राहणारी संकटे यांचा विचार करताना, जागतिक पातळीवर भारताला अग्रेसर मानून प्रतिष्ठा मिळवून पाहत असताना संभाव्य धोक्याचा सामना कसा करता येईल, याची उत्तरे या पुस्तकातून शोधण्याचा प्रयत्न केला असून 2014नंतरचे बदलते संदर्भ हे त्यांच्या केंद्रस्थानी आहे. या पुस्तकातून डॉ. अशोक मोडक यांनी जरी तीन विषय हाताळले असले, तरी त्यातून खूप मोठी उपयुक्त माहिती आणि महत्त्वपूर्ण संदर्भ वाचायला मिळतात. सध्याचे युग हे माध्यमांच्या लढाईचे आहे. प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे ही त्यांची रणभूमी आहे. या रणभूमीवरची लढाई लढताना विचाराचे अधिष्ठान अधिक घट्ट करत हल्ल्याला उत्तर द्यावे लागणार आहे. अशा वेळी आपले अधिष्ठान, तत्त्वज्ञान काय आहे आणि त्याचे आजचे संदर्भ काय आहेत हे नेमकेपणाने दाखवण्याचे काम डॉ. अशोक मोडक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. या पुस्तकात जरी तीनच प्रकरणे असली, तरी या उपयुक्त पुस्तकात सावरकरांनी वेळोवेळी मांडलेली भारताची राजनीती, परराष्ट्रनीती, रणनीती याबाबतचे विचार आज अगदी तशाच प्रकारचे चालू असलेला प्रत्यक्ष व्यवहार याचे विवेचन यातून लेखक आपल्याला सावरकर नावाच्या महापुरुषाचे अलौकिकत्व आणि द्रष्टेपणा संदर्भासह समजावून सांगतात. हे पुस्तक वाचत असताना सावरकरांचा सामाजिक कळवळा, त्यांची जातिनिर्मूलनाची चळवळ व त्यामागे उभे केलेले वैचारिक अधिष्ठान आपल्या लक्षात येते, त्याचप्रमाणे तथकथित पुरोगाम्यांचा ढोंगीपणा आणि जातिनिर्मूलनाच्या नावाखाली पोसला जाणारा जातवादही लक्षात आणून देण्याचे काम लेखकाने केले आहे. एकूणच काय, तर आजच्या काळातील वैचारिक लढाई आणि हिंदुत्वाबाबतचे गैरसमाज दूर करण्यासाठी डॉ. अशोक मोडक यांनी लिहिलेले 'स्वातंत्र्यवीर सावरकर ः सध्याच्या संदर्भात' हे पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल.

पुस्तकाचे नाव : स्वातंत्र्यवीर सावरकर ः सध्याच्या संदर्भात

लेखक : डॉ. अशोक मोडक

प्रकाशन : कॉन्टिनेन्टल प्रकाशन

मूल्य : 100 रुपये पृष्ठसंख्या : 116