कोट्टायमचा न्याय व्हावा

विवेक मराठी    02-Jul-2018
Total Views |

महिलांचे शोषण, अन्याय-अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा निषेध केलाच पाहिजे. पण हा निषेध करताना आपल्या देशात विविध रंगाचे चश्मे लावून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वी आपण त्याचा अनुभव घेतला आहे. काश्मीरमध्ये घडलेल्या अपहरण आणि लैंगिक शोषणाची बातमी प्रकाशित झाली, तेव्हा ती पीडित मुलगी, तिच्यावरचे अत्याचार या बाबी गौण ठरवत, मंदिरातील पुजाऱ्याने कसा क्रूर व्यवहार केला यावरच चर्चा होत राहिली होती. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मंदिरातील पुजाऱ्यावर, पर्यायाने हिंदू धर्मावर टीका करण्यात आली होती. कोणत्याही घटनेच्या आधाराने हिंदू धर्मावर टीका करून हिंदू समाजाला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचा घाऊक ठेका घेणाऱ्यांना महिला शोषणाच्या, अत्याचाराच्या घटना म्हणजे पर्वणी असतात हे वारंवार सिध्द झाले आहे. अशा प्रकारची टीका केली की पुरोगामी असल्याचे सिध्द करता येते असा या सर्वच माध्यमांचा आणि पुरोगामित्वाची झूल पांघरलेल्या मंडळींचा दावा असतो. मात्र त्यांचा पुरोगामित्वाचा परीघ हा केवळ हिंदू धर्मापुरता मर्यादित असतो. ख्रिश्चन आणि मुसलमान समाजांबाबत त्यांनी गप्पी मासे खाल्लेले असतात. या मंडळींच्या दृष्टीने सर्व वैगुण्ये दिसतात ती केवळ आणि केवळ हिंदू धर्मात, बाकीचे धर्म, संप्रदाय म्हणजे 'पाक'. त्यामुळे अगदी छोटया छोटया गोष्टीचा आधार घेऊन राईचा पर्वत करत केवळ हिंदू धर्माला झोडून काढण्याचे काम ही मंडळी करत असतात.

आम्ही प्रसारमाध्यमांवर आणि तथाकथित पुरोगामी मंडळींवर आरोप करत नाही, तर त्यांनीच त्यांच्या वर्तनातून ते सिध्द केले आहे. नुकतीच केरळमध्ये एक घटना घडली. कोट्टायम येथील चर्चमध्ये पाच पाद्रयांनी एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. पण त्यावर कोणताही बोलका पोपट किंवा चित्रवाहिन्यांचा प्रतिनिधी भाष्य करताना दिसला नाही. त्याचप्रमाणे या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा नव्हे, तर चर्च करणार आहे यावर कुणी आक्षेप घेतला नाही. त्या पाच पाद्रयांना सध्या सक्तीने सुट्टीवर पाठवले असून चर्च या घटनेचा तपास करणार आहे आणि पीडित महिलेला म्हणे न्याय देणार आहे. म्हणजेच एका अर्थाने चर्च समांतर तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा चालवणार आहे. हे संविधानाला धरून आहे का? काश्मीरच्या घटनेत देवालयात अत्याचार झाला असा आरोप होता, तो चुकीचा असल्याचे सिध्द झाले. पण त्या कालावधीत देवालयाचा पुजारी आणि हिंदू देवता यांच्याबाबत गरळ ओकणारे कोट्टायमचे चर्च आणि पाद्री यांच्याबाबत का मूग गिळून बसले आहेत? की आकाशातील बापाचा प्रेमळ हात त्यांच्याही डोक्यावरून फिरला आहे? चर्च म्हणजे आमच्यासाठी पवित्र धर्मस्थळ. त्यामुळे जो आदरभाव असायला हवा तो आमच्याही मनात आहे. पण काही लिंगपिसाट पाद्रयाचे बुरखे पांघरून जर चर्चमध्ये येणाऱ्या श्रध्दाळू महिलांचे शोषण करत असतील, तर त्या पवित्र प्रार्थनास्थळाबद्दल आम्ही आदरभाव का बाळगावा? चर्च व्यवस्थापन आता या घटनेचा तपास करून त्या पीडित महिलेला न्या देणार की, त्या पाच नराधमांना वाचवणार? एका चर्चमध्ये दीर्घकाळ महिलेचे शोषण होते. प्रभू येशूसमोर दिलेल्या पापक्षालन कबुलीचा उपयोग तिला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. या घटना पाहिल्या की पांढऱ्या झग्याखाली कशा प्रकारचे हैवान लपले आहेत, हे लक्षात येते. जे स्वतःला प्रभूचे दूत म्हणवतात आणि अशा प्रकारची कुकर्मे करतात, त्यांच्याविषयी पुरोगामी बिरादरी काहीच बोलत नाही आणि प्रसारमाध्यमांनाही या घटनेकडे पाहायला वेळ नसतो.

काही दिवसांपूर्वी एका मदरशातील अत्याचाराची घटना पुढे आली, पण त्यावरही कुणी भाष्य केले नाही. मात्र हिंदू धर्मातील व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून थोडी जरी अनुचित घटना घडली की मात्र सर्व जण बाह्या मागे सारत मैदानात उतरतात. याचा अर्थ असा नाही की हिंदू धर्मातील व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून होणाऱ्या महिलेवरील अत्याचारांचे आम्ही समर्थन करत आहोत. कोणत्याही प्रकारचा अत्याचार - मग तो कोणावरही होत असो, त्याचा निषेध करून संविधानाच्या तरतुदीप्रमाणे अत्याचार करणाऱ्यांना जबर शिक्षा झालीच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या, संप्रदायाच्या महिलेचे शोषण व अत्याचार यांचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण तमाम पुरोगामी विचारवंत, तथाकथित प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातील स्वयंघोषित बुध्दिवंत 'निवडक' घटनांवर भाष्य करतात आणि निवडक घटना या हिंदू समाजाबाबत असतात. सिलेक्टिव्ह भाष्य करायचे असल्यामुळे मूळ घटना बाजूला राहून हिंदू धर्म, हिंदुत्व आणि हिंदू संघटना यांना लक्ष्य केले जाते. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे वाकडी येथील मातंग समाजातील मुलावर अत्याचार झाल्यावर दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनी या घटनेत रा.स्व. संघाचा आणि भाजपाचा हात असल्याचे ट्वीट केले होते. काहीही करून संभ्रम निर्माण करायचा आणि त्यातून समाजाच्या मनात हिंदू धर्माविषयी गैरसमज निर्माण करायचे, अशी या मंडळींची रणनीती आहे. मात्र या रणनीतीतून ख्रिश्चन आणि मुसलमान यांना वगळण्यात आले आहे. केवळ आणि केवळ हिंदू धर्मच त्यांच्या माऱ्याचे लक्ष आहे. पुढील वर्षभरात हा मारा अधिक प्रखर केला जाईल. पुरोगामी मंडळी, पुरोगामित्वाची झूल पांघरलेले प्रसारमाध्यमातील हिंदुद्वेष्टे आणि समाजमाध्यमातील विद्वान त्यांच्या सवयीप्रमाणे अन्य धर्मांतील महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविषयी ब्रही उच्चारणार नाहीत किंवा त्यावर चर्चा घडवून आणणार नाहीत. म्हणूनच आपण पीडित महिला कोणत्या धर्माची आहे, शोषण कराणारे नराधम कोण आहेत, त्यांचा सामाजिक दर्जा काय आहे याचा विचार न करता पीडित महिलेला संविधानाने दिलेल्या कायद्याच्या आधाराने न्याय मिळायला हवा, यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि न्यायव्यवस्था, तपासयंत्रणा यांना समांतर व्यवस्था उभी करणाऱ्यांचा धिक्कार केला पाहिजे.