संस्थेशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व

विवेक मराठी    21-Jul-2018
Total Views |


 

शहाजी जाधव यांच्या आकस्मिक जाण्याने साप्ताहिक विवेकचा एक भक्कम खांब निखळला. जेव्हा शहाजी जाधव विवेकमध्ये दाखल झाले, तेव्हा विवेकची स्थिती रांगणाऱ्या मुलासारखी होती. विवेकचे संगोपन करणे आणि विवेकला चांगला खुराक देऊन त्याला बाळसे धरायला लावणे, हे एका अर्थाने अवघड काम होते. या कामात शहाजी जाधव यांनी न पुसता येणारे मौलिक योगदान दिले आहे.

विवेक हे संघविचारधारेचे साप्ताहिक आहे. विवेकमध्ये दाखल होताना शहाजी जाधव यांचा संघविचारधारेशी आणि संघ आचारसंहितेशी काही संबंध होता असे नाही. मी काय किंवा दिलीप करंबेळकर काय, आम्हा दोघांनाही संघकामाची दीर्घ पार्श्वभूमी होती. त्यामुळे  संघवर्तुळात आमच्या मान्यतेचा प्रश्न नव्हता. शहाजी जाधव यांचे तसे नव्हते. विवेक समजून घेत असतानाच त्यांनी संघ, संघाची आचारपध्दती, केव्हा आणि कशी समजून घेतली, ते कुणाच्याही लक्षात आले नाही. आपल्या निष्ठेने त्यांनी आपले स्थान संघ साप्ताहिक रचनेतील एक असे निर्माण केले.

ही फार अवघड प्रक्रिया असते. संस्थेत येताना माणसे स्वतःचे संस्कार, स्वतःचे विचार, स्वतःचे वेगळेपण, असं सगळं काही घेऊन येतात.  त्यांचे त्यांचे अहम् असतात. अनेकांना त्यातून बाहेर पडता येत नाही. कालांतराने अशी मंडळी संस्थेतूनच बाहेर पडतात. फार थोडे असे राहतात की जे संस्था समजून घेतात, संस्थेचा ध्येयवाद समजून घेतात, संस्थेची कार्यपध्दती समजून घेतात आणि हळूहळू ते संस्थेचा एक भाग बनून जातात. त्यांचे संस्थेशी एकरूप होणे इतके मोठे असते की, ते आणि संस्था यांना वेगळे करता येत नाही. शहाजी जाधव म्हणजे विवेक आणि विवेक म्हणजे शहाजी जाधव असे समीकरण कधी झाले, हे जाधवांनादेखील समजले नसेल आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनादेखील समजले नसेल.

साप्ताहिक विवेकची एक कार्यसंस्कृती आहे. ही कार्यसंस्कृती कोणत्याही मॅनेजमेंटच्या गुरूकडून आम्ही शिकलो नाही. व्यवस्थापनावरील पुस्तके वाचून त्याचे अनुसरण केलेले नाही. पंडीत दीनदयाळजी म्हणत असत की, आम्ही ज्या वाटेने जाऊ तोच आमचा मार्ग असेल. आमची वाट आम्ही विकसित केली. स्वभावाने प्रचंड भिन्न असलेली माणसे विवेकमध्ये असतानाही, सामंजस्याने आणि परस्पर सहकार्याने काम करण्याची कार्यसंस्कृती त्यांच्यात विकसित झाली. या कार्यसंस्कृती विकसनात शहाजी जाधव यांचा फार मोलाचा वाटा आहे.

प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे विकासाची पूर्ण संधी द्यायची, त्याच्या कामात त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे, अनावश्यक हस्तक्षेप करायचा नाही, परंतु त्याचवेळी त्याच्या कामावर बारकाईने नजरही ठेवायची, योग्य वेळी त्याला मार्गदर्शन करायचे, सावध करायचे आणि प्रसंगी कठोर होऊन काही ऐकवायचे ही कामे प्रामुख्याने व्यवस्थापकाला करावी लागतात. शहाजी जाधव यांनी यात फार मोठे कौशल्य-मास्टरी मिळविली, कोणत्याही प्रकारची व्यवस्थापनशास्त्रातील डिग्री न घेता आणखी एक वैशिष्टय.

आधुनिक भाषेत ज्याला प्रोफेशनॅलिझम म्हणतात, तो जाधवांनी संपादन केलाच, पण प्रोफेशनॅलिझम बरोबर येणारा करिअरवाद यापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. मला काय किंवा दिलीप करंबळेकरांना काय करिअरवादापासून दूर राहणे स्वाभविक होते. कारण विवेकचे काम हे आमच्या दृष्टीने संघकाम होते. ते आपली सर्व शक्ती लावून पूर्ण करायचे, हा संस्कार आमच्यावर फार खोलवरचा झालेला असल्यामुळे आम्ही व्यवसायवाद स्वीकारताना करिअरवादापासून दूर राहिलो. जाधवही सहजपणे या रांगेत येऊन बसले. हे त्यांचे फार मोठेपण आहे.

पदामुळे शक्ती (POWER)मिळते. पण अधिकार (AUTHORITY) मिळत नाही. अधिकार देता येत नाहीत, ते मिळवावे लागतात. ते मिळविण्यासाठी जे काम आपण हाती घेतले आहे, त्या कामाला पूर्ण निष्ठा वाहाव्या लागतात आणि संस्थेशी पूर्ण समर्पण करावे लागते. सहकारी हे सर्व मूकपणे पाहत असतात. मी काय म्हणतो ते ऐकले पाहिजे, या भाषेत कधीही बोलावे लागत नाही. शहाजी जाधव यांनी विवेकमध्ये आपले असे स्थान निर्माण केले होते. जाहिरात, वितरण, संपादकीय विभाग, विवेकचे वेगवेगळे उपक्रम या सर्वात काम करणारे कार्यकर्ते सल्लामसलतीसाठी आणि खूप वेळेला निर्णय घेण्यासाठी जाधवांकडेच जात. आणि त्यांचा निर्णय अंतिम निर्णम मानून त्यावर सर्व काम करीत. गेल्या 23-24 वर्षांत जाधवांचा हा निर्णय मला मान्य नाही, अशी तक्रार घेऊन कोणी माझ्याकडे आल्याचे मला आठवत नाही. अशी मान्यता एखाद्या संस्थेत मिळविणे हे वाटते तितके सोपे काम नाही. अद्वितीय या एकाच शब्दात त्याचे वर्णन करता येईल.

संस्थेची वाढ संस्थेत काम करणारे सर्व कार्यकर्ते करीत असतात. तांत्रिक भाषेत विवेकमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आहेत. कर्मचारी दोन गोष्टींवर लक्ष ठेवून काम करतो. पहिले लक्ष त्याचे घडयाळाकडे असते आणि दुसरे लक्ष मला काय मिळणार आहे? याकडे असते. विवेकमधील कर्मचारी असे कर्मचारी नाहीत. त्यांचे योग्य शब्दांत वर्णन करायचे तर, ते विवेकचे कार्यकर्ते आहेत. घडयाळाकडे कधी बघत नाहीत, आणि मला काय मिळणार याचा फारसा विचार करीत नाहीत. ही कार्यसंस्कृती हे विवेकचे अनन्यसाधारण वैशिष्टय आहे. त्याची वाढ करण्यामध्ये शहाजी जाधव यांचे योगदान हे देखील न पुसता येणारे योगदान  आहे.

संस्था मोठी झाली की कार्यकर्तेदेखील आपोआप मोठे होतात. मी मोठा झालो, हे त्यांना सांगावे लागत नाही. झाड जेव्हा रुजते तेव्हा लहानच असते, पण जेव्हा त्याचा वृक्ष होतो, तेव्हा मी वृक्ष झालो आहे, हे त्याला सांगावे लागत नाही, ते सर्वांना दिसते. संस्थेबरोबर जाधवही मोठे होत गेले. त्यांचे मोठेपण हे लहान रोपापासून ते वृक्षापर्यंत वाढणाऱ्या जैविक धारणेचे होते. अशा तऱ्हेने जेव्हा एखाद्याची वाढ होते तेव्हा मोठेपण त्याच्या डोक्यात शिरत नाही, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, असा भाव त्याच्या मनात निर्माण होत नाही. मी सर्वांच्याच बरोबरीचा आहे, हीच त्याची भावना राहते. विवेकच्या मोठेपणाची प्रतीके विवेकचे संपादक होतात. परंतु त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा विचार जाधवांच्या मनात कधी निर्माणच झाला नाही. माझे स्थान मंचावर बसण्याचे नसून सर्वांबरोबर बसण्याचे आहे, हा भाव ते निरंतर जगत राहिले. मला वाटते हे त्यांचे सर्वांत श्रेष्ठ असे मोठेपण आहे.

यामुळे जाधवांच्या आकस्मिक जाण्याने विवेकचा एक मजबूत खांब निखळला. त्यांची उणीव दीर्घकाळ पदोपदी जाणवत राहील.