हा सोहळा भक्तीचा...

विवेक मराठी    24-Jul-2018
Total Views |

 


 

 

भक्ती आणि त्यातून निर्माण होणारी सांस्कृतिक परंपरा यातून व्यक्तिविकास होतोच, त्याचबरोबर समाजही घडतो. समाजाच्या विकासात अशा परंपरा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असतात. व्यक्तीची आणि समाजाची मानसिकता घडवणे, भल्या-बुऱ्याची सीमारेषा दाखवून देणे हे काम अशा परंपरा करत असतात. महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही त्यापैकी एक आहे. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. वारीने महाराष्ट्राची जडणघडण केली, पुरुषार्थ दिला. पंढरीची वारी म्हणजे एक सोहळा आहे, ज्यातून भक्त आणि परमेश्वर हा भेद लयास जातो आणि परमेश्वराचे अस्तित्व ठायीठायी असल्याची अनुभूती येत राहते. 

gmधक आणि साधना किंवा भक्त आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फरक असेल तर तो बाह्य अंगाचा. अंतरंग मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. आपल्या देशात साधना आणि भक्ती अशा दोन्ही मार्गांनी परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून सुरू आहे. साधना आणि भक्ती यांच्यातील भेदरेषा खूपच पुसट असून बऱ्याच वेळा दोन्ही गोष्टी एकच असल्याचे मानले जाते. साधनामार्गाला जशी परंपरा आहे, तशीच भक्तिमार्गालाही आहे. आपल्या देशाचे वैशिष्टय असे आहे की ज्याला जो मार्ग भावला, त्या मार्गाचे अवलंबन करण्यात कोणतीही आडकाठी नाही, आणि त्यामुळेच आपल्या देशात विविध शास्त्रे, दर्शने निर्माण झाली आहेत. आजही ती परंपरा चालू आहे.

नवविधा भक्ती

आपल्या देशाला विविध परंपरांचे वरदान लाभले आहे. या परंपरांत विविधता असली, तरी त्यात एक समान सूत्र सामावलेले असते. वरवर वेगळया दिसणाऱ्या या परंपरा जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा त्या सर्वच परंपरा एकाच दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे आपल्या लक्षात येते. फक्त त्याचे बाह्य स्वरूप वेगवेगळे असते. आपल्या देशातील भक्ती परंपरेबाबतही असेच म्हणता येईल. भारतात विविध प्रकारच्या भक्ती परंपरा अनादिकाळापासून अस्तित्वात आहेत. कुणी वैष्णव आहे, तर कोणी शैव आहे, कुणी सगुण उपासना करते, तर कुणी निर्गुण निराकाराची आराधना करत असते. असे असले, तरी सर्वांचे अंतिम गंतव्यस्थान एकच आहे. सर्वांना एकाच विधात्याला प्रसन्न करून घ्यायचे असते. अशी ही भक्ती परंपरा कधीपासून सुरू झाली? याचे उत्तर महाभारतात पुढीलप्रमाणे सांगितले आहे - 'सृष्टीच्या प्रारंभी विधात्याने दक्ष प्रजापतीला भक्ती धर्माचा उपदेश केला. दक्षाने आदित्याला, आदित्याने विवस्वानला, विवस्वानाने मनूला, मनूने ईक्ष्वाकूला हा धर्मोपदेश केला. ईक्ष्वाकूने विश्वभर त्याचा प्रचार केला. हा धर्म महान, सनातन आणि सर्वश्रेष्ठ आहे. यद्यपि या धर्माचे तत्त्व समजणे आणि ते आचरणात आणणे कठीण असले, तरी भगवंताचे भक्त हे भक्तीलाच सदैव चिकटून राहतात.' तर अशी ही आपल्या देशातील भक्ती परंपरा आहे. भागवतात सांगितलेले भक्तीचे नऊ प्रकार आपल्या देशात प्रचलित आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारांतून भक्त आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेत असतो आणि या प्रत्येक भक्ती प्रकाराचे उच्चकोटीचे आदर्शही आपल्या देशात निर्माण झाले आहेत. सुदामा हे दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण आहे, तर स्मरणभक्तीसाठी प्रल्हाद आणि ध्रुवबाळ यांचा उल्लेख करावा लागतो. भागवताप्रमाणे नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात भक्तीचे एकूण अकरा प्रकार सांगितले आहेत. ज्या ज्या आचार्यांनी भक्तीची व्याख्या केली, त्यांनी त्यांनी भक्तीची अंगे, साधने आणि विघ्ने या गोष्टींचेही विवेचन केले आहे. निर्भेळ आनंद किंवा श्रेष्ठ प्रकारचे सुख मिळवून देण्यासाठी भक्तीचा उगम झाला आहे आणि हे सुख उपभोगण्यासाठी अनेकांनी आपआपल्या क्षमतेनुसार मार्ग शोधला पाहिजे. भक्ती ही मुक्तीहूनही वरचढ आहे. कित्येक लोक मुक्तीलाच जीवनाचे अंतिम फल मानतात. पण भक्तांना तसे कधीच वाटत नाही. भगवद्भक्तांच्या घरी मुक्ती दासीसारखी राबत असते. पण भक्त तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. भक्ताला फक्त भगवंताची पादसेवा हवी असते. भक्तांच्या दृष्टीने भक्ती म्हणजे देवाचा प्रसाद आहे. या भक्तीचा गौरव करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,

न करी तपसाधन रे, मुक्तीचे सायास

जन्मो जन्मी हाचि गोड भक्ती रस

वारी - महाराष्ट्राचा जीवनमार्ग

महाराष्ट्राचा विचार करता, वारकरी संप्रदाय हा प्रमुख भक्तिमार्ग आहे. सावळा विठ्ठल हे या मार्गाचे आराध्य दैवत असून त्याचे केवळ दर्शन झाले, तरी चारही मुक्ती साध्य होतात अशी ग्वाही संत ज्ञानेश्वरांनी दिली आहे. वारकरी आणि पंढरीची वारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत सांगतात, 'होय होय वारकरी, डोळा पाहे रे पंढरी।' पांडुरंग परमात्मा ज्या पंढरीत वास करून आहे, त्या पंढरीला संतांनी 'भूवैकुंठ' म्हटले असून त्यांची रचना वैकुंठाच्या आधी झाली असल्याचा दावा संत मंडळी करतात. वारकऱ्याच्या जिवीचा आनंद हा विठ्ठल पांडुरंग असून तो चराचरात भरलेला आहे. पांडुरंग आपल्या प्रिय भक्ताच्या काजासाठी सदैव धावून जायला तयार असतो. त्यानेच चोखोबाची गुरे राखली आहेत, जनाईबरोबर दळण दळले आहे, नामदेवाची खीर चाखली आहे, तर गोरोबा कुंभाराबरोबर माती तुडवली आहे. असा हा कैवल्यनिधान पांडुरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दापीठ, भक्तिपीठ. या भक्तिपीठाने गेली आठशे वर्षे महाराष्ट्राला वळण लावले आणि भक्ती आणि कर्म यांची सांगड घालत एक आदर्श निर्माण केला. आणि म्हणूनच या भक्ती परंपरेने सांगितले, ''नलगेची सायास। न जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण॥'' पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या, गृहत्याग यांची आवश्यकता नसून केवळ विठ्ठलनामाचा टकळा आवश्यक असल्याचे प्रमाण संत देतात. नामसंकीर्तनाचे सोपे साधन ज्याला सापडले, त्याच्या जन्माचे कल्याण झाले अशी सर्वसाधारण धारणा आहे. या धारणेला प्रमाण मानून जगणारा मोठा समाजघटकही आहे. 'पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत॥' ही भावना मनात ठेवून गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रात पंढरीची वारी चालू आहे. या वारीत सहभागी होण्याचा सर्वाना अधिकार आहे. संत सांगतात, 'या रे या रे लहान थोर। याती भले नारी नर। सकळासी येथे आहे अधिकार। कलीयुगी उध्दार हरीच्या नामे।' पंढरीची वारी आणि विठ्ठलाचा नामघोष कुणीही करू शकतो. पंढरीचे सुख अनुभवू शकतो.

पंढरीचा वारी सोहळा हा केवळ अनुभवण्याचा विषय आहे. अनेकांनी या सोहळयाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, तरीही वर्णनात न सामावणारे काही तरी शिल्लक राहतेच. हे शिल्लक राहणे असते भाव-भक्ती. पांडुरंगावरची प्रगाढ श्रध्दा मनात जोजवत वारकरी पंढरीची वारी करतात. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाणे म्हणजेच भक्तिमार्गाचा अंगीकार करणे होय, अशी सर्वसामान्य माणसांची धारणा असल्यामुळे वारी हा त्याच्या जगण्याचा भाग झाली आहे. कोणतेही संकट असू दे, त्यातून पांडुरंग आपल्याला पार करेल हा विश्वास असतो. या विश्वासाच्या बळावरच पंढरीची वारी गेली कित्येक शतके वर्धिष्णू होत आहे.

संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही वारकरी भक्ती परंपरा आजही अव्याहतपणे चालू आहे. अठरापगड जातीजमातीचे संत वारकरी परंपरेचे पाईक झाले. आपले विहित कर्म करता करता त्यांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार केला आहे. अनेक घरांतून आजही ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा या ग्रंथांचे वाचन भक्तिभावाने होत असते. ज्ञानेश्वरी, गाथा वाचन हा महाराष्ट्रातील समाजाचा संस्काराचा भाग झाला आहे आणि याच संस्काराच्या बळावर पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अज्ञानी व्यक्तीपासून ते उच्चशिक्षित व्यक्तीपर्यंत सर्वांना भुरळ घालण्याची शक्ती वारी आणि वारकरी भक्ती परंपरेत आहे. अनेक गावांत वंशपरंपरेने वारीची जपणूक याच कारणामुळे होताना दिसते. रूढार्थाने कोणतेही कर्मकांड न सांगणाऱ्या आणि केवळ हरिनामाचा उद्घोष ही अपेक्षा ठेवणाऱ्या या भक्तिमार्गाची पर्वणी म्हणजे आषाढी एकादशीची यात्रा. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडया पंढरीत येतात. पंढरीत भक्तांचा आणि भक्तीचा महापूर येतो. ज्ञानेश्वरांच्या पूर्वीपासून सुरू असणाऱ्या या वारीला हैबतीबाबांनी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला, वारीची शिस्त लावली आणि ऐश्वर्य प्राप्त करून दिले. हैबतीबाबांनी घालून दिली वारीची शिस्त हा पुढील काळात वारकऱ्यांचा स्थायिभाव झाला आहे. वैयक्तिक भक्तीला समूहाशी जोडून वारीची निर्मिती झाली आहे. समूहात शक्ती असते हे वारीकडे पाहिले की लक्षात येते.

मार्ग अनेक, दिशा एक

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय आहे, तसाच रामदासी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, शैव संप्रदाय, देवी, गणपती असे विविध आराधना मार्ग आहेत. प्रत्येक पंथाचे आराध्य दैवत वेगळे आहे, उपासना पध्दती वेगवेगळया आहेत. काही अपवाद वगळता बहुतेक सर्व संप्रदाय हे वैयक्तिक उपासनेचे आहेत. व्यक्तिगत उपासनेतून आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे या पंथाच्या आराध्य देवतेचे, संत-महंतांचे उत्सव साजरे केले जातात. मुळात आपल्या सर्वांचा स्वभाव श्रध्दावान असल्यामुळे सर्वच उपासना पंथांबाबत आपण शरणतेची भूमिका घेत असतो. महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जिल्हानिहाय अनेक छोटे-मोठे पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले आहेत. त्यातील काही उपासना पंथांचे आराध्य दैवत वेगळे असले, तरी त्या पंथाचीही पंढरीची वारी असते. उदाहरण द्यायचे, तर रामदासी संप्रदायाचे देता येईल. आषाढी वारीसाठी दर वर्षी सज्जनगडहून रामदासांची पालखी घेऊन दिंडी निघते आणि आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. अशाच प्रकारे शेगावहून गजानन महाराजांची पालखी पंढरीत येते. अशी अनेक उदाहरणे देता येतात. जरी या पंथांचा भक्तिमार्ग वेगळा असला, तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे आपणही भागीदार व्हावे, असे त्यांना वाटत असते. एकूणच काय, तर महाराष्ट्रातील भक्तिमार्ग विपुल प्रमाणात असले तरी बहुतेक सर्वाचा अंतिम विसावा हा पंढरीत आहे.

आधुनिकतेचा स्पर्श

महाराष्ट्रातील वारी परंपरा खूपच जुनी असली, तरी ती नित्यनूतन आहे. काळानुरूप बदल स्वीकारत वारी वाटचाल करत असते. वारीकाळात येणाऱ्या समस्यांचा सामना करत वारकरी हरिनामाचा उच्चार करत चालत राहतात, वारकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची भावना कुणाच्यातरी मनात उत्पन्न होते आणि तो त्याच्या पातळीवर त्या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृष्टीने वारकऱ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगांची सेवा असते. वारकऱ्यांची सर्व प्रकारची सेवा करून ते पांडुरंगाला प्रसन्न करतात. नाहीतरी पांडुरंग आणि समाज वेगळा असतोच कुठे? पांडुरंग तर महाराष्ट्राच्या कणाकणात आहे, इथल्या श्वासात आहे, इथल्या ध्यासात आहे. अशा या समाज पांडुरंगाची वारीच्या काळात सेवा करण्याचा प्रयत्न अनेक मार्गाने चालू आहे आणि त्यात युवा पिढीचा सक्रिय सहभाग आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असणारी निर्मळ वारी समाज पांडुरंगाच्या भक्तीचा आदर्श नमुना म्हणायला हवा. वारी मार्गावर, विसाव्याच्या तळावर मानवी शौचाचा विषय हा पर्यावरण आणि मानवी सन्मान यांच्या दृष्टीने खूपच गंभीर होता. पण या प्रश्नालाही सेवा भक्तीतून उत्तर शोधले गेले आणि ते आता वारकऱ्यांच्या व निर्मळ वारीच्या सेवेकऱ्यांच्या अंगवळणी पडले आहे. निर्मळ वारीसारखीच आरोग्यवारी, पर्यावरण वारी, हरितवारी, शिक्षणवारी अशा वेगवेगळया प्रकारच्या वाऱ्या आळंदी, देहू ते पंढरपूर प्रवास करतात आणि समाजभक्तीतून ईश्वरभक्तीकडे प्रवास करतात, या लेखात सुरुवातीलाच भक्तीचे विविध प्रकार विशद केले आहेत, तेच प्रकार नव्या रूपात आजची युवा पिढी जगते आहे. उच्चशिक्षित तरुण-तरुणी जेव्हा पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली का होईना, पंढरीच्या वारीत सहभागी होतात, तेव्हा ते भक्तिमार्गीच झालेले असतात. संतांनी जसा पांडुरंगाचा ध्यास घेतला होता, तसाच ध्यास आजच्या युवा पिढीला लागला आहे आणि ते आधुनिकतेचा ध्वज खांद्यावर घेऊन पंढरीच्या भक्तिसोहळयात सहभागी होत आहेत.

तर असा हा पंढरीच्या भक्तिसोहळा, जो महाराष्ट्रात चैतन्य निर्माण करतो, जगण्याची उमेद देतो. शतकानुशतके चाललेली वारी आपली मूल्ये जपत आहे, त्याचबरोबर काळानुरूप बदलही स्वीकारत वारी पुढे पुढे चालली आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाइतकीच समाज पांडुरंगाची भक्तीही प्रस्थापित करत आहे.

9594961860