मध्यमाहेश्वर

विवेक मराठी    03-Jul-2018
Total Views |


 

 पंचकेदारांमधला मध्यमाहेश्वर / मधमाहेश्वर / मदमाहेश्वर हा दुसरा केदार. ११४८३ फूट उंचीवर वसलेलं मध्यमाहेश्वर अत्यंत सुंदर असं स्थान. सभोवती हिरवी कुरणं व छोटी झुडपं. एखाद्या गालिच्यासारखी अंथरलेली. अत्यंत शांतता अन जादू करणारं निसर्गचित्र असलेलं मध्यमाहेश्वर!

 

केदारं मध्यमं तुंगं तथा रुद्रालयं प्रियम्

कल्पं च महादेवि सर्वपाप प्रणाशनम्

कथितं ते महाभागे केदारेश्वर मंडलम्

अन्यान्यपि श्रुणु प्राज्ञे धन्या ते मतिरीदृशी

कथितं ते मया यतु केदारभवनं प्रिये

तस्मादिक्षणदिग्भागे योजनत्रयसम्मिते

मध्यमाहेश्वर क्षेत्रं हि गोपितं भुवनत्रये..

(स्कंद पुराण ४७, केदार खंड अ. ४७ / १०)

 

 

स्कंद पुराणातल्या ४७व्या अध्यायानुसार केदारनाथच्या दक्षिणेला तीन योजने अंतरावर मध्यमाहेश्वर आहे, असं सांगितलं गेलंय. हे अतिशय पुण्यदायक असं तीर्थक्षेत्र.

या स्थानी केदारेश्वर भगवान शिवांचा नाभिप्रदेश प्रकट झाला. हा मध्यभाग असल्यामुळे 'मध्यमाहेश्वर' म्हटलं जातं. इथलं शिवलिंगही नाभीच्या आकाराचं. जनसाधारण भाषेत याला मद माहेश्वर म्हणलं जातं.

पुराणांमध्ये मध्यमाहेश्वर तीर्थाला परमगोपनीय क्षेत्र म्हटलं गेलंय. याचं दर्शन झाल्यावर या स्थानी देहत्याग केला तर वैकुंठाचा लाभ होतो. भगवान शिव पार्वतीला म्हणताहेत, ''पूर्व काळातली कथा आहे. मध्यमाहेश्वर क्षेत्राचा महिमा ऐकून शंबुक नावाचा एक पारधी मध्यमाहेश्वराला गेला. असं म्हणतात की इथे आल्यावर त्याची हिंसक वृत्ती बदलली. त्याने धनुष्यबाणाचा त्याग केला व शिवपूजन करू लागला. त्याने समस्त तीर्थांचं दर्शन करून सरस्वती नदीमध्ये स्नान केलं व तीन दिवस उपवास धारण केला व चौथ्या दिवशी आपले प्राण त्यागले अन शिवसायुज्य -महादेवांशी एकरूप झाला. महादेव पार्वतीला सांगताहेत, ''मध्यमाहेश्वर तीर्थाचं परम आख्यान जो कोणी श्रध्दापूर्वक ऐकेल वा त्याचा पाठ करेल, त्याला शिवलोक प्राप्त होईल. या इथे पितृतर्पण, पिंडदान करण्यामुळं सर्व पितरांचा उध्दार होतो.''

या एतत्परमाख्यानं श्रुणोति श्रध्दयान्वित:

पठेच्चापि सतां मध्ये शिवलोके महीयते..

पिंडदानस्य माहात्म्यं पितृणामत्र पार्वति

श्रुणु पापहरं पुण्यं तथा वै जलदानत:

शतवंश्या: परा: पूर्वे शतवंश्या महेश्वरि:

तारिता: पितरस्तेन घोरात्संसारसागरात्

यैस्त्र पिंडदानाद्या: क्रिया देवि कृता: प्रिये

मध्यमेश्वर माहात्म्यं सोपाख्यानं मया तव

सर्वपापहरं पुण्यं कथितं शिवभक्तिदम्

(स्कंद पुराण ४९, केदार खंड अ. ४८ / ४९, ५२-५३)

तुंगनाथ उतरून आल्यावर आपण येतो पुन्हा चोपता इथे. चोपताहून आपल्याला जायचंय उखीमठ या गावी. चोपता ते उखीमठ हे अंतर साधारण ३० कि.मी. इतकं आहे.

उखीमठ

उत्तराखंडातल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित उखीमठ याचं जुनं नाव उषामाथ असं होतं, नंतर ते उषामठ व त्यानंतर त्याचा अपभ्रंश होत उखीमठ असं पडलं. ही केदारनाथ महादेवांची शीतकालीन गादी. शीतकालात केदारनाथचं कपाट बंद झालं की केदारनाथची पूजा उखीमठला होते.

या ठिकाणी राजा मांधाताच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला ॐकार स्वरूपात दर्शन दिलं होतं, तेव्हापासून उखीमठ येथील महादेव मंदिर हे ॐकारेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं.

उखीमठ हे समुद्रसपाटीपासून ४५०० मीटर्स उंचीवर वसलेलं अतिप्राचीन मंदिर, जे एका विशाल चबुतर्यावर ताशीव पाषाणखंडांपासून बनवलं गेलंय. चबुतर्याची आकृती ही कमळाच्या पाकळयांप्रमाणे. इतिहासतज्ज्ञांच्या मते, हे मंदिर कत्यूरी शैलीत निर्माण केलं गेलंय.

या ठिकाणी भगवान पंचानन शिवांची स्वर्णमयी मूर्ती विराजमान आहे. वामांगी पार्वतीची मूर्ती वस्त्राभूषणांनी सुसज्जित. शेजारच्या मोठया दालनात द्रौपदीसह पाच पांडवांच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या गर्भगृहात बद्रिनाथ, तुंगनाथ, ॐकारेश्वर, महाराजा मांधाता, उषा अनिरुध्द, काली, अर्ध्दनारीश्वर, भगवान विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत. तसंच भगवान मध्यमेश्वरांची उत्सवमूर्तीही मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहे. मुख्य मंदिराच्या मंडपात पितळी नंदीश्वर आहेत.

तसंच बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतीही एका दालनात आहेत. उखीमठ ही केदारनाथ व मध्यमाहेश्वर या दोन्हींचीही शीतकालीन गादी आहे. स्कंद पुराणातल्या केदार खंडानुसार सूर्यवंशी सम्राट मांधाताने या ठिकाणी तपश्चर्या केली व परमसिध्दी प्राप्त केली.

युवनाश्वसुतो धीमान् सूर्य वंशविवर्ध्दन:

मांधाता नाम विख्यातास्तत्रैव तप्तवांस्तप:

प्रापवै परमां सिध्दिं स च राजा महावल:

(स्कंद पुराण २४४, केदार खंड २००/ २५)

उखीमठ क्षेत्रात बाणासुराने महादेवांकडून अजेय होण्याचं वरदान प्राप्त केलं होतं. हा वर प्राप्त केल्यावर बाणासुर जगज्जेता झाला. त्याने शिवांसाठी बाणेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना केली, जे सर्व पापांच्या भयापसून मुक्ती देणारं आहे. त्याच बाणेश्वर महादेवांच्या प्रसादाने तो अजेय झाला.

तत: पश्चिमादिग्भागे नाम्ना बाणासुरो मुने

अजेयत्ववरप्राप्त्यै ध्यायन्वै मनसा शिवम्

बाणेश्वरो महादेवस्तत्र पापभयापह:

तत्प्रसादेन बाणोऽपि अजयत्सकलं जगत्

(स्कंद पुराण २४४, केदार खंड २००/ २६-२७)

उखीमठ हे स्थान उषा व श्रीकृष्णांचा नातू अनिरुध्द यांच्या पाणिग्रहणाचं स्थान. स्वप्नात बघितलेल्या अनिरुध्दचं वर्णन उषाने आपल्या सखीजवळ - चित्रलेखेजवळ केलं. तिने योगबलाने हुबेहूब त्याचं चित्र काढून उषाला दाखवलं अन अनिरुध्दला त्याच्या मंचकासकट द्वारकेहून शोणितपुरला घेऊन आली. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्यावर उषा व अनिरुध्द यांचा विवाह उखीमठ येथे झाला. या ठिकाणी त्यांची लग्नवेदी दाखवतात.

अशा या उखीमठपासून आपण मध्यमाहेश्वरला जाणार आहोत.

त्याआधी बघू या देवरिया सरोवर, जे उखीमठजवळ आहे.

उखीमठहून सारी गावापर्यंत वाहनाने जाता येतं. सारीपासून अडीच ते तीन कि.मी. पहाडी चढण चढून जावी लागते. देवरियाच्या चारी बाजूंना जंगल आहे, घनदाट असं. समुद्रसपाटीपासून २४३८ मी. उंचीवर.

देवरिया तालला पोहोचल्यावर दिसतो तो निसर्गाचा अभूतपूर्व असा नजारा. निसर्गाचं अपूर्व सौंदर्य. जे लोक पाली गावाहून देवरियापर्यंत जातात, त्यांना वाटेत अनेक वृक्षांनी व्यापलेलं घनदाट जंगल बघायला मिळतं. जंगलाचा नजारा काही औरच.

बशीच्या आकाराचं देवरिया तळं हे ४० मी. लांब व ७०० मी. रुंद असं. कस्तुरीमृग (उत्तराखंडाचा राज्यपशू), अस्वलं, क्वचित तरस हे पशू बघण्याचं सौभाग्य लाभतं.

देवरिया तळयाच्या बाबतीत असं मानलं जातं की, या तळयात स्नान व पूजापाठ विधी केल्यामुळे मनोकामन पूर्ण होतात. इथे राहण्यासाठी मंदिर समितीचं विश्रामगृह उपलब्ध होतं.

इथला सूर्योदय बघण्यासारखा. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकशात समोर असणारं चौखंबा शिखर बघताना असीम आनंद प्राप्त होतो. इथून एक रस्ता तुंगनाथ व चंद्रशीलेपर्यंत जातो.

देवरिया सरोवर बघून आपण पुन्हा उखीमठला येऊन मुक्काम करू या.

उखीमठहून आपण मध्यमाहेश्वरला जाणार आहोत.

उनियानाहून गौंडारपर्यंत जाऊन पुढं जायचंय. गौंडार पार करून नानू चट्टी येथे मुक्काम करायचा. नानू चट्टी ते मध्यमाहेश्वर व बुढा मध्यमाहेश्वर हा मार्ग.

उखीमठ ते उनियाना हे अंतर १६कि.मी. आहे. उनियानाहून गौंडार दहा व गौंडारपासून मध्यमाहेश्वर दहा कि.मी. अंतरावर आहे. उनियानापासून तीन किलोमीटर पुढे रांसी गाव आहे. रांसीपर्यंत रस्ता तयार केला गेलेला आहे. एका ठिकाणी कच्चा. सांस्कृतिक रूपाच्या दृष्टीने रांसी उनियानापेक्षा जास्त समृध्द आहे. इथे राकेश्वरी देवीचं एक मंदिर आहे. मध्यमाहेश्वरांची पालखी शीतकालीन निवासासाठी जेव्हा उखीमठला येते, तेव्हा तिचा रात्रीचा मुक्काम रांसीला होतो.

रांसी हे मध्यमाहेश्वर ट्रेक सुरुवात करायचं स्थान. हा रस्ता बांधीव, चालायला सोपा. या मार्गावर नैसर्गिक वन्यसंपदा अतिशय समृध्द. विविध फूलपाखरं, भरल्स, अनेक पक्षी, कधीकधी अस्वलं यांचं, क्वचित कस्तुरीमृगांचं दर्शन होतं.

रांसीहून साधारण तीन किलोमीटर चालल्यानंतर गौंडार गाव समोर येतं. गौंडारपर्यंत पोहोचायला खाली उतरून जावं लागतं. गौंडारनंतर समोरच्या पहाडावर थोडंसं चढून गेल्यावर नानू चट्टी दिसते.

गौंडार ते मध्यमाहेश्वर -

रांसीपासून आपल्या प्रवासाला सुरुवात होते. रांसीपासूनचा मार्ग सुरुवातीला काही चढत जाणारा. अर्ध्या तासाचा हा चढणीचा रस्ता अन नंतर काहीसा निमुळता होत, सपाटीवर येतो. पुढची ३०-३५ मिनिटं गेल्यावर आपण उतरायला लागतो. या बांधीव मार्गिकेवरून काही वेळ चालल्यावर ही घनदाट जंगलात प्रवेश करते. दोन्ही बाजूंना उंच हिरवेगार वृक्ष. हा मार्ग आता खाली उतरून फरशांनी बांधलेल्या रस्त्याला मिळतो.

असंच या बांधीव रस्त्यावरून साधारण तासभर चालल्यावर एक पूल लागतो. समोरचं दृश्य अतिविहंगम. उंचावरून पडणारा फेसाळता धबधबा. पडणार्या पाण्यातून उमटणारी सानुली इंद्रधनुष्यं बघताना अन पाण्याच्या थेंबांचा वर्षाव अंगावर घेताना होणारा आनंद... डावीकडून येणारी नदी पार करून पुढच्या मार्गावरून पुढे जायचं, जो आता हळूहळू चढत जातो. या मार्गावर २०-२५ मिनिटं चालल्यावर एक अजस्र शिला आपल्याला दिसते.

एखाद्या मोठया छपरासारखी ही शिला आपल्याला विश्रांतीसाठी उत्तम. काही काळ विश्रांती घेतल्यावर असंच चढण चढून गेल्यावर साधारण एक कि.मी. अंतरावर आहे गौंडार. अतिशय देखणं गाव. वाटेत आणखी दोन पूल लागतात, प्रत्येकी ५-१० मिनिटांच्या अंतरावर. तसंच उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिरही दिसतं. रांसीपासून गौंडारला पोहोचायला २ ते ३ तास लागतात.

जेवणासाठी इथे थांबता येतं. जेवणानंतर याच उतरत्या मार्गावरून चालायचंय. १५-२० मिनिटांनी एक पक्का पूल दृष्टीस पडतो. हा पूल पार केल्यावर लागतं बंतोली गाव. हे गौंडारपासून एक कि.मी. अलीकडे.

या पुलाजवळच दोन नद्यांचा संगम होतो. एक नदी मध्यमाहेश्वरहून येणारी मधुगंगा व दुसरी चौखंबा शिखराच्या पायथ्यापासून येणारी मार्कंडेय (मरकंडा) गंगा नदी आहे. या नदीवर पूल बनवला आहे. पूल पार केल्यावर लागते बंतोली चट्टी (गाव). हे अतिशय सुंदर असं स्थान. या नद्यांच्या संगमाला सन्मुख असं. काही छोटी घरं (झोपडया) असणारी. यात काही ठिकाणी राहण्याची सोय असणारी.

यानंतर हा रस्ता नानू चट्टीपर्यंत आता चढत जातो. साधारण ३०-३५ मिनिटं चढत गेल्यावर जंगलांनी अच्छादलेलं दृश्य दिसतं. सगळीकडे वृक्षमाथी, दाट आच्छादन अन दोन्ही नद्या. मधुगंगा व मार्कंडेय (मरकंडा) गंगा व त्यांचा जिथे संगम होतो, तो पूल. आपण चालून आलो तो संपूर्ण रस्ता मागे वळून बघताना आपल्याला दिसतो. पुढचा पाऊण तास चालल्यावर पुन्हा एक मोठी पाषाण शिला दिसून येते. यापुढे येतं ते खटरा चट्टी. खटरा हे बंतोलीपासून २ कि.मी. अंतरावर आहे.

खटरा चट्टीला काही कच्ची घरं. पण पर्यटक-यात्रेकरूंसाठी राहण्याची उत्तम सोय. इथे वनविभागवाल्यांचं एक चेक-पोस्ट आहे. यात्राकालात या चेकपोस्टवर कोणीच राहत नाही. पण यात्रा संपली, मध्यमाहेश्वर कपाट बंद झालं की वनाधिकारी इथे तळ ठोकतात. कारण कपाट बंद झाल्यावर जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय कोणाला पुढे जाता येत नाही. कधीतरी मध्यमाहेश्वर मंदिरात ऑॅफ सीझनमध्ये चोरी झालेली होती. तेव्हापासून प्रशासनाने ऑॅफ सीझनमध्ये मध्यमाहेश्वर यात्रा करायला बंदी घातलीय. काही लोक खटरा चट्टी येथे मुक्काम करतात अन दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास करतात. आजचा मुक्काम खटरा चट्टीला.

याच बांधलेल्या मार्गावरून पुढचा अर्धा तास चालल्यावर याच्या दोन्ही बाजूंना मोठे वृक्ष सलामी द्यायला सुरुवात करतात. रस्त्यावर पडलेली पानं, काहीसं गवत, काही प्रमाणात पडलेल्या पावसाने (जर जून-जुलैत गेलं तर हमखास) चिंब भिजलेला रस्ता. चालायचा आनंदच काही और. पुढच्या दीड-दोन तासांनंतरच्या वाटचालीनंतर येतं ते नानू चट्टी.

जरासा सोपा असा आजचा काही रस्ता वर चढणारा. नागमोडी वळणाचा बांधलेला रस्ता चढत जाताना दिसतो. अर्ध्या-पाऊण तासानंतर चढून आल्यावर भूछत्राच्या आकाराचा एक भूखंड समोर येतो. या मार्गात अशी बरीच ठिकाणं यात्रेकरूंच्या सोयीसाठी विश्रांतीसाठी उपलब्ध आहेत. तासाभरानंतर काही झोपडया दिसतात. ही आहे मौखोम चट्टी. नानू चट्टीपासून ८,५९६ फूट उंचीवर अन दीड कि.मी. अंतरावर. रस्ता आणखी चढत जाणारा. हा आपल्याला घेऊन जातो देखण्या अशा नैसर्गिक सौंदर्याने वेढलेल्या भूभागाकडे. काही मिनिटांतच ओक वृक्षांची व्याप्ती वाढत जाताना दिसू लागते. दोन्ही बाजूंना घनदाट होत गेलेले. मौखोम चट्टीनंतर ओक वृक्ष घनदाट होत जातात. पुढचा तासभर चढत गेल्यावर लागते ती कून चट्टी. एक पाटी ९,१२१ फूट उंची दर्शवणारी. काही अंतरावर एक छोटंस हॉटेल (धाबा).

शेवटचे काही कि.मी. सततची चढण. थकवणारी अन काही क्षणांतच दोन्ही बाजूंनी सुरू होतं र्होडेडेंड्रॉनचं जंगल.

हलक्या गुलाबी रंगांच्या कळया, नुकतीच उमलू लागलेली फुलं. नजरेला सुखावणारं असं निसर्गचित्र. जंगलात वाटचाल करू लागल्यावर अनेक हिमालयीन पक्षी दिसायला सुरुवात होते.

दोन-अडीच तासांच्या वाटचालीनंतर उजव्या बाजूला काही हिरवीगार कुरणं दिसायला लागतात. त्यात काही गुरं चरणारी. याचाच अर्थ आपण डोंगरमाथ्यावर येऊन पोहोचलोय. सपाटीवरून पुढचा तासभर वाटचाल केल्यावर जंगलातून हा रस्ता बाहेर पडताना दिसतो. पुनश्च काही चढण अन मध्यमाहेश्वरच्या मंदिरासमोर हा चढ संपतो.

११,४८३ फूट उंचीवर वसलेलं मध्यमाहेश्वर अत्यंत सुंदर असं स्थान. सभोवती हिरवी कुरणं व छोटी झुडपं. एखाद्या गालिच्यासारखी अंथरलेली. अत्यंत शांतता अन जादू करणारं निसर्गचित्र असलेलं मध्यमाहेश्वर! या खोऱ्यात अत्यधिक पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे जंगलच जंगल.

मंदिर समितीची गेस्ट हाउसेस उपलब्ध आहेत. काही छोटे धाबे आहेत. इथे तंबूही ठोकून राहता येतं.

मध्यमाहेश्वर व बूढा मध्यमाहेश्वर

पांडवांपैकी भीमाने या मंदिराची निर्मिती केली असं मानलं जातं. मंदिराच्या गर्भगृहात काळया पाषाणाचं नाभीसदृश असं शिवलिंग स्थापित आहे. याच्या शेजारी दोन छोटी मंदिरं आहेत, त्यापैकी एक पार्वतीचं व दुसरं अर्धनारीनटेश्वराचं.

मध्यमहेश्वर मंदिराजवळच माता सरस्वतीला समर्पित एक तीर्थस्थळी आहे, ज्याच्या गर्भगृहात माता सरस्वतीची एक संगमरवरी प्रतिमा प्रतिष्ठापित केली गेली आहे.

एक कथा अशीही सांगतात की विवाहानंतर शिव-पार्वती काही काळ या ठिकाणी राहिले. इथल्या तळयातल्या पाण्याचं प्राशन केलं, तर मोक्षप्राप्ती होते असंही सांगितलं जातं.

मध्यमाहेश्वरपासून ३कि.मी. अंतरावर व १००० मी. उंचीवर आहे बूढा किंवा वृध्द मध्यमाहेश्वर. चढणीचा रस्ता, हे मध्यमाहेश्वराचं पुरातन मंदिर, चिमुकलं असं. एका छोटया तळयाच्या काठावर असलेलं. त्या तळयाच्या पाण्यात प्रतिबिंब पडतं चौखंबा व मांडणी शिखरांचं.

मध्यमाहेश्वर चौखंबा शिखराच्या पायथ्याशी. आजूबाजूला अनेक हिमशिखरं. खोल दऱ्या, घनदाट जंगल अन संपूर्णपणे आठ महिने बर्फ व उन्हाळयात हिरवाई असणारं असं. मध्यमाहेश्वरपासून सहा कि.मी.वर आहे कांचनी ताल. अतिशय अवघड असा ट्रेक अन पांडु सेरा. असं मानलं जातं की पांडु सेरा इथे पांडवांनी स्वर्गाला जाण्यापूर्वी आपली शस्त्रं ठेवली.

सर्वात सुंदर असा केदार!

बूढा मध्यमाहेश्वरला अत्यंत चढणीचा रस्ता. पण तिथे पोहोचल्यावर अत्यंत सुंदर असं दृश्य. चौखंबा व मांडणी शिखरांचं प्रतिबिंब पडलेलं तळं व त्याच्या काठावर असणारं वृध्द मध्यमाहेश्वराचं मंदिर.

हे बघून आपण पुन्हा मध्यमाहेश्वरला येऊन परतीच्या रस्त्याने चालायचंय अन रांसीला येऊन थांबायचंय. त्यानंतर आपण जाणार आहोत केदारनाथला!

आस्थेचा सर्वोच्च प्राण - केदारनाथ!

pourohitamita62@gmail.com