अफवांचा महापूर आणि माणुसकीला ओहोटी

विवेक मराठी    07-Jul-2018
Total Views |


 

 केवळ अफवांवर विश्वास ठेवून अमानुषपणे पाच व्यक्तींना जिवे मारण्याची घटना धुळे जिल्हातील राईनपाडा या गावात नुकतीच घडली. सोशल मीडियाचा चुकीचा वापर या घटनेच्या पाठीमागे आहे. सोशल मीडियाचे व्यसन लागलेला समाज आज गावखेडयात निर्माण झाला असून त्यांच्या दृष्टीने या माध्यमातून प्रकाशित होणारे संदेश हे अंतिम सत्य ठरत आहे. एका बाजूला सोशल मीडियाच्या आहारी गेलेला समाजाचा एक गट, तर दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा एक गट अशी सामाजिक परिस्थिती असणारे आपण. केवळ अफवांमुळे काही निष्पाप जिवांचा बळी घेऊनही आपल्या वर्तनात काहीही फरक पडत नाही, हे आपण पुन्हा पुन्हा दाखवून देतच आहोत.

सोशल मीडियामुळे समाज जोडला जाऊ शकतो, विचारांचे आदानप्रदान होऊन व्यक्तीत आणि समाजजीवनात त्याचे सकारात्मक प्रतिबिंब दिसू शकते अशी भूमिका घेऊन बहुतेक सर्वच जण सोशल मीडियाशी जोडले जातात. पण काही वेळातच त्यांचा सोशल मीडियावरचा ताबा सुटतो आणि सोशल मीडिया त्यांचा ताबा घेत असते. अव्याहतपणे वाहत राहणाऱ्या या सोशल मीडियाच्या प्रवाहात आपण कुठे थांबायचे हे न कळल्यामुळेच अनेक जण त्या महापुरात वाहून जातात. आलेला संदेश एका क्षणात पुढे पाठवणारे त्या संदेशाची सत्यताही तपासून पाहण्याची तसदी घेत नाहीत आणि मग अशातूनच अनेक अफवा सर्वत्र पसरवल्या जातात.

राईनपाडा गावात गावकऱ्यांनी पाच जणांची हत्या केली, त्यामागे मुले पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे ही अफवा होती. ज्योतिष सांगून, भिक्षा मागून चरितार्थ करणारे पाच भटके विमुक्त बंाधव मारले गेले. दादाराव भोसले, भारत भोसले, राजू भोसले, आगनू इंगोले, भारत माळवे अशी या पाच मृतांची नावे असून ते मंगळवेढा तालुक्यातून आलेले होते.

ाईनपाडयाजवळच्या पिंपळनेर शहरात ते आपल्या कुटुंबीयांबरोबर पालात राहत होते. ही घटना घडल्यानंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसावरही जमावाने हल्ला केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक पोलीसबळ मागवण्यात आले. या घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपये सानुग्रह मदत दिली गेलेली आहे. पण एवढयावर हा प्रश्न संपत नाही, तर अशा घटना सोशल मीडियावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अशाच प्रकारे महाराष्ट्रासह छत्तीसगड, आसाम इत्यादी राज्यांत अफवांमुळे हत्येच्या आणि मारहाणीच्या घटना घडल्या असून न्यायालयाने यांची गंभीर दखल घेतली आहे व सोशल मीडियावर नजर ठेवण्याची, कारवाई करण्याची सूचना केली आहे. एका अफवेमुळे आपण - म्हणजेच आपण ज्या समूहाचे घटक आहोत, तो समूह अमानुषपणे वागतो याची प्रचिती या निमित्ताने आपण घेतली आहे आणि सोशल मीडियाची धुंदी कशी बेभान करते, हेही पाहिले आहे. घटना घडली, आरोपी पकडले जातील, त्यांना शिक्षा होईल, मृतांच्या नातेवाइकांना भरघोस मदत दिली जाईल, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होतील. पण एवढे करून हा प्रश्न संपेल का? या साऱ्यातून आपण प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत की वरवरचे इलाज करणार आहोत?

जसजशी माध्यमे वापरण्यास सहजसोपी आणि सहज उपलब्ध होत गेली, तसतसा त्यांचा प्रवास विधायकतेपेक्षा विघातकतेकडे होताना दिसतो आहे. माध्यम उपलब्ध झाले, पण त्यांची साक्षरता आणि भान उत्पन्न करणारी व्यवस्था उभी राहू शकली नाही, हे आपले दुर्दैव आहे. अफवांमुळे झालेल्या हत्याकांडामुळे ही समस्या अधोरेखित झाली असली, तरी ती खूप जुनी आहे. सोशल मीडियामुळे अनेक तरुण मुलामुलींनी घर सोडून जाण्यापासून ते आत्महत्या करण्यापर्यंतच्या घटना आपण पाहिल्या आहेत. याचे कारण आलेल्या संदेशावर पटकन विश्वास ठेवावा आणि तशी कृती करावी अशी परिस्थिती सोशल मीडियातून निर्माण केली जाते. बऱ्याच वेळा कोणत्याही प्रकारचे तथ्य नसलेल्या गोष्टी खूप वेगाने प्रसारित होत असतात आणि आपणही त्या लाटेवर स्वार होऊन त्या लाटेचा घटक होऊ पाहतो. सध्या सोशल मीडिया कसा वापरावा, त्याचे फायदे आणि तोटे लक्षात आणून देणारे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियामुळे वैयक्तिक आयुष्य आपण हरवून बसलो आहोत का? याचा एकदा विचार करायला हवा. सारासार विवेकबुध्दीलासुध्दा गुंगी आणण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असेल, तर आपणच त्यांचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा. राईनपाडा येथील हत्याकांडाने ही बाब अधोरेखित केली आहे. आता त्यांची अंमलबजावणी आपण कशा प्रकारे करणार आहोत? की पुन्हा लाटेत वाहून जात अफवेवर विश्वास ठेवणार आहोत? हा प्रश्न आहे. राईनपाडा येथे अफवेवर विश्वास ठेवून पाच जणांना ठार मारले, अशा प्रकारच्या घटना अन्य ठिकाणीही घडत असतात, याचा अर्थ असा नाही की सरसकट सोशल मीडिया वाईट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आसपास काही सकारात्मकही घडत असते. कदाचित त्यांचे स्वरूप खूप छोटे असल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नसावे. पण छोटया छोटया  गोष्टींतूनच आपण सकारात्मकपणे काही बदल घडवून आणू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

राईनपाडा येथे जमावाच्या हल्ल्यात मृत पावलेले पाचही जण भटके विमुक्त समाजगटातील आहेत, हे लक्षात येताच या घटनेनंतर  अनेक माध्यमांनी भटके विमुक्तांचे जीवन आणि त्यांची स्थिती-गती यांची रसभरित वर्णने प्रकाशित केली. अनेक संघटनांनी विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्याचे कार्यक्रम आयोजित केले.  आणि या कार्यक्रमांतून सरकारने भटके विमुक्त समाजासाठी काय केले पाहिजे याचा पाढा वाचला. केवळ अन्याय-अत्याचार झाल्यावरच असे प्रश्न उपस्थित करून त्याची सोडवणूक होणार आहे का? या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी तेवीस जणांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा आरोप लावला आहे. दोन मुख्य आरोपीच फरार असून त्यांचा शोध चालू आहे. लवकरच त्यांना अटक होईल आणि सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाईल. पण तेवढयाने हे प्रकरण संपणार नाही. या घटनेत मृत झालेले पाच जण भटक्या समाजातील आहेत म्हणून जितक्या जोरकसपणे प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिक आज बोलत आहेत, तितक्याच आस्थेने धी या भटक्यांच्या जगण्याची चौकशी होते काय? आजही पोलीस तपास यंत्रणेच्या दृष्टीने भटके बांधव जन्मजात गुन्हेगार नसतात काय? आपणही त्यांना चोर, उचले, भामटे अशाच शेलक्या नावांनी ओळखत नाही काय? गौरवशाली परंपरा असणाऱ्या भटके विमुक्त समाजातील असंख्य जाती आजही केवळ समाजाच्या संकुचित दृष्टीकोनामुळे स्थिर जीवन जगू शकत नाहीत. आपण आपल्या परिसरात त्यांना स्थिर होऊ देत नाही. कधी दबाव निर्माण करून, तर कधी असहकार करून आपापल्या परिसरातून या भटक्यांना हुसकावून लावण्याचे पवित्र काम आपण करत असतो. राहायला घर नाही आणि सांगायला गाव नाही, अशा परिस्थितीत गेली कित्येक दशके भटके विमुक्त समाज जगत आहे. भटके विमुक्त समाजातील काही प्रगत लोक आणि जातिसमूह सोडले, तर बाकी बहुसंख्य भटक्या समाजाची आजही शासन दरबारी नोंदही नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करताना अन्यायाचा आणि अत्याचाराचा बळी ठरला नाही, तर नवलच!

भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी शासन आणि काही सामाजिक संस्था खरोखरच चंागल्या प्रकारचे काम करत आहेत. भटके विमुक्तांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्या काही ठिकाणी योग्य प्रकारे राबवल्याही जात असल्या, तरी आजही बहुसंख्य भटके विमुक्त समाज केवळ भटकंती करूनच आपली उपजीविका करतो आहे. आधुनिक ज्ञानकौशल्यांची गंगा भटक्यांच्या पालापर्यंत पोहोचलेली नाही. ज्यांना ज्ञानकौशल्य प्राप्त झाले, ते पालातून महालात गेले आणि त्यांचा आपल्या उर्वरित समाजाशी असणारा संपर्क तुटून गेला, असाही व्यथित करणारा अनुभव येतो. तो समाज दिशाहीनपणे फिरत राहतो.

राईनपाडा येथील घटनेत भटके विमुक्त समाजातील पाच जण मारले गेले, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. त्या घटनेचा आणि त्या घटनेमागच्या मानसिकतेचा निषेध करायलाच हवा. पण या घटनेच्या आधाराने समाजात दुफळी निर्माण करू पाहणारे, भटके विमुक्तांना धर्मांतराचे आवाहन करणारे यांचाही निषेध करायला हवा. अशा प्रकारची घटना झाली रे झाली की,  मढयाच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक पीडित समाजाला जाहीरपणे धर्मांतराचे आवाहन करतात आणि हे अन्याय अत्याचार हिंदू धर्मातील वरिष्ठ लोक करत आहेत अशी आवई उठवायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशांचा निषेध करायला हवा. कोणतीही अन्याय-अत्याचाराची घटना असो अगर राईनपाडा येथे घडलेला सामूहिक हत्येची घटना असो, या सर्वच गोष्टींचे समर्थन करता येणार नाही. त्याचप्रमाणे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत या दृष्टीने समाजप्रबोधन करण्याऐवजी त्या गोष्टीचे जे भांडवल करू पाहतात, ते खरे समाजद्रोही असतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.

राईनपाडा येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारच्या घटनांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून झापडबंद समाज निर्माण होतो आहे. त्याला सातत्याने त्या प्रवाहात राहायचे आहे. पण त्याच्या संवेदना हरवून बसल्या आहेत. सोशल मीडियाची यांत्रिकता आता माणसांच्या हाडीमांशी खिळू लागली आहे. परिणामी करुणा, सहवेदना आणि आपलेपणा क्षीण होऊ लागला आहे. माणसाचा माणसाशी कशा प्रकारचा व्यवहार व्हावा यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेतला जाऊ लागला असून माणसाच्या जीवनातून, समाजजीवनातून मानवतेला, माणुसकीला ओहोटी लागली आहे. माणसाने माणसाशी माणसासारखा व्यवहार ही बाब आता केवळ तात्त्वि चर्चांमधून ऐकण्यासाठी असून माणसाचा व्यवहार ठरवणारा दुसराच कोणी तरी असेल, तो माणसाला कळसूत्रीसारखा नाचवेल, त्याला हवा तसा विध्वंस तो घडवून आणेल याची चुणूक राईनपाडा येथील घटनेने दाखवून दिली आहे. अफवांच्या महापुरात माणुसकीला ओहोटी लागण्याचा आपण अनुभव घेत आहोत, आणि ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.

-9594961860