राजूभाई, तुम्हारा चुक्याच!

विवेक मराठी    07-Jul-2018
Total Views |

 

 व्हॉट्स ऍप, फेसबुकसारखी अति लोकप्रिय समाजमाध्यमं महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेची दिशा ठरवतात, उलटसुलट चर्चांमुळे सर्वसामान्यांचा वैचारिक गोंधळ उडवून देतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये अशी सध्याची स्थिती आहे. राजकारण असो वा समाजकारण वा कलाजगत... कोणताही विषय या माध्यमांना वर्ज्य नाही आणि या विषयांमधील जातिवंत तसंच भोंदू तज्ज्ञांची इथे थोडीही कमतरता नाही. त्यामुळे एखादा विषय या माध्यमांच्या पटलावर आला की, क्षणाचीही उसंत न घेता लाटेमागून लाट यावी, तशा मतांच्या लाटा येत जातात. या भडिमाराने काही जण भांबावतात. ज्यांना तटस्थ राहण्याची कला साध्य असते, ते आपली सारासार विचार करण्याची शक्ती वापरून मत बनवतात.

अशा मतमतांतराच्या लाटांमुळेच समाजाची प्रतिक्रियात्मक मानसिकता तयार होते. ती कधी हिंस्र होऊन निरपराधांचे जीव घेते, तर कधी एखाद्या चित्रपटाला प्रमाणाबाहेर व्यावसायिक यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरते. या दोन्हींची ठळक उदाहरणं गेल्या पंधरवडयातलीच आहेत. पहिलं उदाहरण राईनपाडयाचं - व्हॉट्स ऍपवर फिरलेल्या अफवेमुळे भटक्या विमुक्त समाजातील 5 निरपराधांचे बळी घेणारं आणि अमानुषतेचं भयकारी दर्शन घडवणारं. आणि दुसरं उदाहरण 'संजू' या चित्रपटाचं - समाजमाध्यमांमधून झालेल्या उलटसुलट चर्चेमुळे तो बघण्याची उत्सुकता निर्माण करून त्याला पहिल्याच आठवडयात तुफान व्यावसायिक यश मिळवून देणारं.

 मित्राची जीवनकथा राजू हिरानीला चित्रपटासाठी योग्य वाटावी यामागे फक्त मित्रप्रेमच नाही, तर चित्रपटधंद्यात मुरलेल्या हिरानीने त्याला मिळू शकणारा प्रतिसादही ओळखला आहे. 

ही जीवनकथा आहे की जीवनावरून प्रेरित कथा आहे, असाही एक वादाचा मुद्दा, या चित्रपटावरून जे दोन तट पडले आहेत त्यांच्यात आहे. यश-प्रसिध्दी-पैसा-प्रतिष्ठा यांचा ज्यांनी उपभोग घेतला, त्या नर्गिस आणि सुनील दत्त या कलावंत दांपत्याचं संजय दत्त हे शेंडेफळ. श्रीमंताघरचं वाया गेलेलं शेंडेफळ. व्यसनांच्या आहारी गेलेला आणि स्वत:च्या घोडचुकांमुळे पुन्हापुन्हा पायावर धोंडा पाडून घेणारा, जन्मदात्यांच्या जिवाला अखेरपर्यंत घोर ठरलेला संजूबाबा. आईवडिलांच्या पार्श्वभूमीमुळे, कलावंत म्हणून अन्य कोणतंही क्वालिफिकेशन वा चमक नसतानाही चित्रपटाच्या दुनियेत आला आणि पडत-धडपडत इथे स्थिरावलाही. 93च्या बाँबस्फोटादरम्यान त्याने घरात ठेवलेल्या एके 56 रायफल्स आणि हँडग्रेनेड्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यासाठीची सजा भोगून, दहशतवादी नसल्याच्या न्यायालयाने दिलेल्या तोंडी प्रमाणपत्रानंतर त्याची सुटका झाली. 

त्याची व्यसनाधीनता, त्याला भूषणावह (?!) वाटत असलेली त्याची शेकडो लफडी, दहशतवाद्यांशी असलेले त्याचे स्नेहसंबंध आणि त्याने अवैधरित्या घरात बाळगलेली शस्त्रास्त्रं. यातला व्यसनाधीनतेचा आणि अवैधरित्या शस्त्र बाळगण्याच्या मुद्दा हिरानीने विस्ताराने दाखवला आहे. पैकी त्याची व्यसनाधीनता ग्लोरिफाय केलीनसली आणि त्याच्या वडिलांबद्दल मनात अनुकंपा दाटून येत असली, तरी संजूलाही सहानुभूती कशी मिळेल याची पुरेशी काळजी घेतली आहे. 

उत्तरार्धात, शस्त्रास्त्रं बाळगल्याचं आणि त्यातून घडलेल्या तुरुंगवारीचं चित्रण करताना हिरानीने दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेत, त्याला योग्य वाटणाऱ्या मुद्दयांवर भर दिला आहे. त्या खटल्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्याचा शहाजोगपणा हिरानीने का केला असावा? अभिनयाच्या बाबतीत बेतास बात असतानाही प्रचंड यश मिळवणाऱ्या संजय दत्तला कारकिर्दीच्या या टप्प्यावर अशा हिटची गरज होती की ही हिरानीची-त्याची मिलीभगत आहे? मुन्नाभाईसारख्या ब्लॅक कॉमेडीच्या सिक्वेलमधून समाजातील दुष्प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या हिरानीकडून संजय दत्तचं चरित्र वेगळया प्रकारे पडद्यावर येण्याची अपेक्षा होती. आधीच्या चित्रपटांच्या वेळी दाखवलेली हिंमत हिरानीने या वेळी का दाखवली नाही? वास्तव जीवनावर आधारित असलेली कथा पडद्यावर साकारताना दिग्दर्शकावर काही जबाबदारी असते की नाही? की त्याला हव्या त्या पध्दतीने, सोयीचे बदल करून तो निर्मिती करू शकतो? सर्वसामान्यांची दिशाभूल करू शकतो?

सोयीचं असेल त्या भागापुरतं जीवनचरित्र म्हणायचं, गैरसोयीचं वाटेल तेव्हा जीवनावर आधारित, अशी पळवाट शोधायची... जर वास्तवातील संजयच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आपल्याला हव्या त्या पध्दतीने दाखवायच्या होत्या, तर व्यक्तिरेखेचं आणि चित्रपटाचं नावही 'संजू' का ठेवण्यात आलं? ही भूमिका साकारणारा अभिनेता हुबेहूब संजयसारखा दिसावा यासाठी वेषभूषा/केशभूषा का करण्यात आली?... म्हटलं तर अगदी साधे प्रश्न आहेत. त्याची खरी उत्तरं देण्याचं धाडस राजू हिरानी आणि त्याला भरभक्कम पाठिंबा देणारी मंडळी दाखवतील का?

सत्प्रवृत्त व्यक्तीवर चित्रपट काढावा की दुष्प्रवृत्त? तो जीवनपट असावा की त्या व्यक्तीच्या विशिष्ट कालखंडाशी संबंधित?...याचा निर्णय संबधित व्यक्तींनी आपापल्या विचारसरणीप्रमाणे, मगदुराप्रमाणे, आवडीप्रमाणे घ्यावा. मात्र एकदा विषयाच्या सीमारेषा नक्की केल्यानंतर वास्तवाशी प्रतारणा करू नये. त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या चुकांना ग्लोरिफाय करू नये वा त्या आपल्याला हव्या तशा सौम्य करून - मूळ मुद्दयाला बगल देत मांडू नयेत, या अपेक्षा अवाजवी आहेत? रसिक म्हणून प्रेक्षकांच्या समजशक्तीवर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या आहेत?

राजूभाई, तुम्हारा चुक्याच! चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक दुष्प्रवृत्तींवर निडरपणे कोरडे अोढणारे ते तुम्हीच का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बेगडी मित्रप्रेमाची झूल पांघरून तुम्ही मालामाल झालात त्याचं दु:ख नाही हो, पण विचारी प्रेक्षकांची 'शाळा' घेणारी दुकानं जागोजागी उभी राहिली आहेत, हे क्लेशकारक आहे. काळ असाही सोकावतो.