मतदारांचा भाजपावरचा विश्वास दृढ झाला

विवेक मराठी    11-Aug-2018
Total Views |

 

महानगरपालिकेच्या निकालामुळे मतदारांचा भाजपावरचा विश्वास दृढ झाला आहे. राज्यात सत्तेत भागीदार राहूनही विरोधात उभ्या ठाकणाऱ्या शिवसेनेचीही या निवडणुकीत वाताहत झाली, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव शून्यावर आला आहे. गिरीश महाजन यांच्या रूपाने नवे नेतृत्व जिल्ह्यात पुढे येत आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकींमध्ये भाजपाला जळगाव जिंकणे अशक्य नाही.

"जळगाव म्हणजे सुरेशदादा' अशी ओळख निर्माण व्हावी, एवढा 40 वर्षे सत्तेचा काळ सुरेश जैन यांना व त्यांच्या गटाला मिळाला. प्रदीर्घ काळ सत्तेवर राहून जैन यांनी आपले प्रस्थ तर मजबूत केले, पण शहर विकासापासून वंचित ठेवले. परिणामत: महापालिका निवडणुकीत जैन आणि त्यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत भाजपाने चारीमुंडया चित केल्यामुळे वयाच्या 80च्या घरात असलेल्या सुरेश जैनांचा पराभव त्यांच्या व शिवसेनेच्या जळगावातील अस्ताची नांदी ठरावी.

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपा नव्हे, तर सुरेश जैन युतीसाठी प्रचंड उत्सुक दिसत होते. खुद्द मुख्यमंत्री जळगावात भाजप-सेना युतीला तयार असल्याचे ते सांगत होते. राज्यभर सरकारात असूनही भाजपाच्या नावाने शिमगा करणारी सेना जळगावात युतीसाठी एवढी उतावीळ का? असा प्रश्न पडायचा. त्याचे उत्तर निकालानंतर मिळाले. सुरेश जैन यांना पराभव दिसत असल्याने भाजपाशी युती व्हावी म्हणून खटाटोप चालविला होता.

एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभर अशांतता माजली असल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते व खुद्द मुख्यमंत्री त्या संकटाला तोंड देत होते. अशातच महापालिका निवडणूक आल्याने निवडणुकीसाठी भाजपाने आपली पक्ष संघटन यंत्रणा कामाला लावली. युती झाली तर व युती न झाल्यास काय होऊ  शकेल, याचे चिंतन झाले. मात्र उमेदवारी अर्ज दाखल व्हायच्या शेवटच्या दिवसापर्यंत युतीबाबत ठोस निर्णय झाला नाही. एकीकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन युतीसाठी अनुकूल दिसत होते, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे युतीच्या ठाम विरोधात होते.

युतीबाबत चर्चा, पण स्वबळाची तयारी

एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू ठेवून भाजपाने स्वबळावर लढण्यासाठी आवश्यक कुमक तयार करून ठेवली. इतर पक्षांतील  सक्षम मंडळींचा भाजपाप्रवेश मोठया प्रमाणात सुरू राहिला. खुद्द विद्यमान महापौर ललित कोल्हे सुरेश जैनांचा गट सोडून भाजपात दाखल झाले. तरीही युती होणार असेच भाजप-सेनेकडून सांगितले जात होते. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांबाबत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसत असल्याने विजयानुकूल परिस्थिती असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने भाजपाने 75 जागांवर उमेदवार पक्के केले नि युतीला खो दिला. युती होणार... नाही होणार... या गोंधळात शिवसेना असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये नव्हती. परिणामी प्रारंभापासूनच भाजपाने आघाडी घेऊन आपले जिंकायचे मनसुबे जाहीर करून टाकले.

भाजपाचे जिल्ह्यातील दोन मातबर नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगर ग्रामपंचायतीची व जामनेर नगरपरिषदेची निवडणूक मोठया फरकाने जिंकली होती. जामनेर नगरपालिकेत तर 25पैकी 15 सदस्य भाजपाचेच निवडून आले. या दोघांच्या खांद्यावरच जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी असल्याने 'जिंकण्याची' रणनीती तयार होती.

मजबूत संघटन व शिस्तबध्द प्रचार

निवडणुकीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने गिरीश महाजन यांच्या खांद्यावर होती. अनुभवी एकनाथराव खडसे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यामुळे भाजपाच्या प्रचाराला चांगलीच धार आली. शेकडो पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची दमदार फळी असल्याने प्रचारात प्रारंभापासूनच आघाडी घेतली होती. केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ कारभाराकडेही मतदारांचे लक्ष वेधण्यात भाजपा यशस्वी ठरला. 'आतापर्यंत रखडलेला जळगावचा विकास करण्यासाठी एकदा संधी द्या' हे आवाहनही भाजपाच्या कामी आले. बूथनिहाय प्रचार यंत्रणा ही आणखी एक जमेची बाजू. तुलनेत विरोधातील शिवसेनेसह सर्वच पक्षांचा प्रचार कमजोर पडला.

सुरुवातील सेना-भाजपात अटीतटीच्या लढतीचे अंदाज व्यक्त होत होते. सुरेश जैन यांचा करिश्मा सेनेला बहुमत मिळवून देईल असेही तर्क लढविले गेले. तथापि परिवर्तनाचा चंग बांधलेल्या मतदारांनी भरभरून मते देऊन भाजपाचे 57 उमेदवार निवडून दिले. शिवसेनेने 15, तर अनपेक्षितरित्या एमआयएमने 3 जागा जिंकल्या. वाताहत झाली ती कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आघाडीची. या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. चार वर्षांपूर्वी जो कॉंग्रेस पक्ष देशात सत्तेवर होता, त्या पक्षाला येथे फक्त 1.9 टक्के इतकी अल्प मते मिळाली. भाजपाला 57 जागांवर विजय तर मिळालाच, तसेच तब्बल 47 टक्के मतेही मिळाली.

मनपा निकालाने शिवसेनेच्या गोटात खळबळ

सुरेश जैन यांच्यासारखे खंबीर नेतृत्व व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासारखा दमदार वक्ता असताना जळगावात डाळ शिजली नाही. हा निकाल येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मंत्रिपदावर नसूनही एकनाथराव खडसे यांचा प्रभाव टिकून असल्याचे दिसले, तर गिरीश महाजन यांच्या रूपाने नवे नेतृत्व जिल्ह्यात निर्माण होत असल्याचे जाणवले. भाजपासमोर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव शून्यावर आला, तर सत्तेत भागीदार राहूनही विरोधात उभ्या ठाकणाऱ्या शिवसेनेचीही वाताहत झाली. या निकालामुळे मतदारांचा भाजपावरचा विश्वास दृढ झाला.

8805221372