या नव्या अस्पृश्यतेचे काय करायचे?

विवेक मराठी    13-Aug-2018
Total Views |

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातिसमूहापुरते मर्यादित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?  डॉ. आंबेडकरांचे काम केवळ एका समूहापुरते होते का? तसे नसेल, तर मग केवळ संघ-भाजपाला विरोध म्हणून ही नवी अस्पृश्यता पाळली जात आहे का? असे करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे अवमूल्यन नाही काय? 

आपला देश लोकशाहीप्रधान मूल्यव्यवस्थेवर  चालतो. या देशाच्या संचलनासाठी आपल्या देशात संविधान आहे. संविधानाने सर्वाना समान पातळीवर आणत समाजात भेदभाव करणारी, घृणास्पद वागणुकीला जन्म देणारी अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली. मानवी स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार यांची पाठराखण संविधानाने केली आहे. मात्र अलीकडच्या काळात एक नवीच अस्पृश्यता आपल्या देशात उफाळून आली आहे. या नव्या अस्पृश्यतेचे परिणाम समाजात जाणवू लागले आहेत. ही अस्पृश्यता संविधान आणि संविधानाचे निर्माते यांच्या गौरवाला बट्टा लावण्याचा, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आणि परस्पराविषयी अविश्वास व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानकर्ते आणि संविधान यांच्या नावाची घोषणा करत ही नवी अस्पृश्यता समाजाच्या माथी मारली जात आहे, ही खरोखरच गंभीर बाब आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले राकेश सिन्हा यांनी मेरठमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले व पुष्पहार अर्पण केला. यात राकेश सिन्हा यांनी काय चूक केली? विचारवंत म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून आणि सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून त्यांनी केलेल्या कृतीमध्ये काहीही अनुचित नाही. पण नवी अस्पृश्यता जपणारे चवताळले. त्यांनी बाबासाहेबांच्या ज्या पुतळ्याला पुष्पहार घातला, त्या पुतळ्याला गंगाजलाने अभिषेक घालून त्याची शुद्धी केली. विशेष म्हणजे हे महान काम करणारे लोक एका वकील संघटनेचे सदस्य आहेत. ज्या संविधानाने आपल्याला समानतेचा कायदा दिला, सर्व पातळ्यांवरचा भेद संपवला, त्या संविधानाचे, कायद्याचे अभ्यासक अशा खालच्या पातळीवरची कृती करतात, तेव्हा त्याच्यासाठी ‘नवी अस्पृश्यता’ याशिवाय दुसरे कोणते नाव द्यायचे? या नव्या अस्पृश्यतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केवळ आणि केवळ आपलाच हक्क असल्याचा दावा याआधी केला होताच. मेरठमध्ये घडलेल्या घटनेने त्याचा पुन:प्रत्यय आला. डॉ. आंबेडकर आमचे आहेत, त्यांच्यासंबंधी बोलण्याचा, लिहिण्याचा आमच्याशिवाय अन्य कुणालाही अधिकार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तीला तर हा अधिकार अजिबात नाही. राकेश सिन्हा संघ विचारक आहेत, ते त्यांनी कधीही लपवून ठेवले नाही आणि म्हणूनच राकेश सिन्हांनी मेरठमध्ये अभिवादन केलेल्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले गेले. ही पहिलीच घटना नाही. अशा अनेक छोट्या-मोठ्या घटनांतून नवी अस्पृश्यता जपली जाते आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणीने भाजपाच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरांना अभिवादन करण्याला केलेला अटकाव व चैत्यभूमीला तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शनजींनी भेट दिल्यानंतर झालेले शुद्धीकरण या साऱ्या घटना नव्या अस्पृश्यतेच्या साक्ष देणाऱ्या आहेत. या तथाकथित मंडळींचा संघ-भाजपा विरोध आणि पराकोटीचा द्वेष एकवेळ समजून घेता येईल. राजकारणात टिकून राहण्यासाठी ती त्यांची गरज आहे. पण डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातिसमूहापुरते मर्यादित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?  डॉ. आंबेडकरांचे काम केवळ एका समूहापुरते होते का? तसे नसेल, तर मग केवळ संघ-भाजपाला विरोध म्हणून ही नवी अस्पृश्यता पाळली जात आहे का? असे करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे अवमूल्यन नाही काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर सर्व पातळ्यांवरच्या भेदभावाविरुद्ध लढले, अस्पृश्यतेविरोधात त्यांनी आंदोलन केले. त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याला केंद्र करून वकिली करणारी माणसे जेव्हा अस्पृश्यता पाळू लागतात, तेव्हा त्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरही समजलेले नसतात आणि संविधानही समजलेले नसते. मात्र आम्हालाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजलेत असे पाखंड उभे करण्यात ते यशस्वी झालेले असतात. संघ आणि संघ कार्यकर्त्यासाठी सर्वच महापुरुष वंदनीय राष्ट्रपुरुष असतात. त्यांच्या विचारप्रकाशात आपण आपल्या समाजाची, देशाची वाटचाल चालू ठेवून महापुरुषांना अपेक्षित असणारा समतायुक्त, भेदमुक्त देश निर्माण करायचा आहे, अशी संघाची धारणा आहे आणि त्या धारणेचे प्रकटीकरण संघस्वयंसेवक आपल्या कृतीतून सिद्ध करत असतो, याची नोंद नवी अस्पृश्यता निर्माण करणाऱ्यांनी घ्यायला हवी.