तूच भिला तर...

विवेक मराठी    13-Aug-2018
Total Views |

शृंगारिक भावगीतांना जन्म देणारे ना. घ. देशपांडे आपल्या काही कवितेतून मात्र समाजातील दुष्ट प्रवृत्तींची गांभीर्याने दखल घेत सज्जनाला धीट बनण्याचा संदेश देतात. त्यामुळेच आजच्या कठीण सामाजिक परिस्थितीत तिची दखल घ्यावीशी वाटते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अशा कवितांचे विश्लेषण करणारा लेख.

 ना.घ. देशपांडे म्हटलं की 'मराठीला पहिलं भावगीत देणारे कवी' हे त्यांचं योगदान आठवतं. 'रानावनात गेली बाई शीळ' या त्यांनी लिहिलेल्या कवितेला जी.के. जोशींनी चाल लावल्यानंतर मराठीतलं पहिलं भावगीत जन्माला आलं. ते त्या काळी चांगलंच गाजलं होतं. त्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली व ती गाजलीही. मात्र चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम करण्याच्या आग्रहापासून ते दूरच राहिले. त्यांच्या अन्य शृंगारिक, धीट कविता खूप प्रसिध्द आहेत. पण

वेगळीच जात तुझी,

वेगळाच ताल

तूं अफाट वाट तुझी

एकटाच चाल..

या ओळी लिहिणारे ना.घ. वेगळेच वाटतात.

त्यांच्या इतरही अनेक आशयपूर्ण कविता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या आहेत. ते वकील होते. अत्यंत सचोटीने व नैतिकता पाळून वकिली करणाऱ्यातले ते होते. एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करतानाही चोख व न्यायपूर्ण व्यवहार करणारे उत्तम प्रशासक म्हणून ते प्रसिध्द होते. आणखीही एक चांगले श्रेय त्यांच्या खात्यावर जमा आहे. ते नागपूर आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. तेव्हा पुरुषांना निवेदक म्हणून 'संधी' द्यावी, यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले व त्यांच्यामुळे पुरुष निवेदकांना आकाशवाणीची दारं खुली झाली!

ना.घ. देशपांडेंचा जन्म 22 ऑगस्टचा. तिथीने नागपंचमीचा. यंदा तारीख आलीय 15 ऑगस्ट. हा योग साधून ना.घ. देशपांडेंची ही एक वेगळी कविता.

ही कविता वाचताना ना.घं.ची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर त्यांच्यासारख्या न्यायप्रिय, सत्यासाठी आग्रही राहणाऱ्या सत्प्रवृत्त माणसाची तळमळ जाणवते. समाजात फुटीर, विखारी, विध्वंसक शक्ती नेहमी आक्रमक असताना दिसतात व सज्जन शक्ती नेहमीच सुप्त असते. चांगले लोक पुढे येत नाहीत, त्यामुळे स्वार्थी दुर्जनांचं चांगलंच फावतं.

अंधाराचा नाश करण्यासाठी उजेडाची बीजं पेरावी लागतात. स्वातंत्र्य मिळवून त्या अंधाऱ्या पर्वातून आपण बाहेर पडलो खरे, पण अजूनही अनेक पायवाटांवर अंधार असलेला दिसतो आहे. त्या वाटांवर उजेड पेरणारे अनेक मूकनायक त्यांच्या कामात मग्न आहेत. ते जगाला दिसतही नाहीत.

पण समाजाच्या पृष्ठभागावर जी खळबळ दिसते आहे, ती भयावह आहे. विकृती आता केवळ कुजबुजत नाही, तर दात विचकत खदखदा हसते आहे. महत्प्रयासाने मिळवलेल्या स्वातंत्र्याबरोबरच आपण स्वीकारलेल्या समतेच्या व बंधुतेच्या मूलभूत तत्त्वांनाच चूड लागते आहे. अशा वेळी सत्प्रवृत्त माणसाने मूक राहणं मृतवत आहे, असं ही कविता आपल्याला कळवळून सांगतेय.

ज्याच्या मनात सत्याची चाड आहे, नीतीची जाण आहे आणि प्रगतीची आस आहे, त्या प्रत्येक सामान्य सज्जनाला हे आवाहन आहे.

तूच भिला तर...

आता भिऊन मुका राहून पाहू नकोस. ऊठ नि खडया स्वरात दे आव्हान या दुराचाराला. एरवी शांततेने आपल्या चक्रात दंग असलेला तुझा मंदसा स्वर कुणी ऐकणार नाही. या विकृतीची कुजबुज शांत करायची असेल, तर तुझा सच्चा प्रामाणिक स्वर आता गगनाला भेदेल असा उच्च लाव.

तुझ्याही अंगात अनेक सुप्त सत् शक्ती आहेत. तू कधी त्या वापरत नाहीस, म्हणून तुझ्या छाताडावर नाचायची दुष्टांची हिंमत होतेय. आता सत्याच्या रक्षणासाठी या शक्तींचा वापर करून दुष्प्रवृत्तींवर घाव घालताना मुळीही कचरू नकोस!

ऊठ! ऊठ!! सज्जन माणसा, भिऊ नको रे!

तू प्राणपणाने चांगुलपणा सांभाळतो आहेस. तू कधीही स्वत:हून कुणाची खोड काढायला जात नाहीस. पण तू भिऊन मागे राहिलास, तर मात्र सगळं जग या दुर्जनांच्या ताब्यात जाईल. सगळे सज्जन मग अगतिक होऊन जातील. त्यांच्या चांगुलपणाला काही मोलच उरणार नाही! मग जगबुडी व्हायला काय वेळ!

जो बोलेल त्याचं जग. गाईल त्याची गाणी.

तू गप्प राहिलास तर सत्य समोर येणार कसं? चांगलं काय हे ज्यांना कळतं, त्यांनी ते गाणं मोठयांदा गायला नको का? अन्यथा जे गायलं जातंय तेच चांगलं असं होईल! सत्य धाडसाने बोलला नाहीस तर जे वारंवार बोललं जातं तेच असत्य 'सत्य' वाटू लागेल. कपटनीतीची गीतंच प्रीतिगीतं वाटू लागतील!

या माजलेल्या अधमांना रक्ताची तहान लागलीय. तुझ्या मूक राहण्याने ही पिपासा शमणार नाही, उलटी वाढतच जाईल. कुणी अवरोधच केला नाही, तर हा अधमतेचा पिपासू वारू विश्वभर असाच उधळत राहील. या दुष्टांची दुराशा कशानेही शमणार नाही. ती वाढतच राहील.

म्हणून हे सत्याचे गान तू गात राहा.

जागोजागी, रस्तोरस्ती हाका दे.

माणसातला चांगुलपणा जागव.

त्यासाठी धडपड करावी लागेल.

कुठे कुठे तुझ्यासारखाच दुर्जनांना भ्यालेला,

नीतीला उराशी कवटाळून बसलेला,

डोळयात सत्य-शिव-मंगलाची स्वप्नं जोपासणारा,

न्यायाचीच कास धरणारा,

माणसातलं माणूसपण जपू पाहणारा,

पण निद्रिस्त असलेला,

मनुष्यमूर्त चांगुलपणा जागव.

ही घोर निद्रा आता संपव.

भलेपणाचा उद्गार उमटू दे.

शांततेचा हुंकार घुमू दे.

माणसाची मती व माणसाची नीती

जागी कर!

ना.घ. देशपांडेंनी ही कविता लिहिताना त्यांच्या मनात कोणती पार्श्वभूमी असेल माहिती नाही. पण स्वातंत्र्याच्या सूर्योदयाची 71 वर्षं साजरी करत असताना दिसणारं समाजाचं चित्र फार हताश करणारं आहे. त्यामुळेच सत्शक्तीने आपलं विराट रूप दाखवण्याची वेळ आली आहे. हजारो हुतात्म्यांच्या रक्ताची लाली क्षितिजावर अजूनही ताजी आहे. त्यांच्या बलिदानाने मिळवलेलं हे स्वातंत्र्य असं लांछित करण्याचा अधिकार आम्हाला कुणी दिला? या भूमीवर पुन्हा एकदा शांतता, समृध्दी, प्रगती, मांगल्य, एकात्मता, बंधुता, समरसता नांदायला हवी आहे. या भूमीवर प्रेम करणाऱ्या सर्वाचं हे कर्तव्य आहे. विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या भूमीच्या पुत्रांनी आता उच्चरवाने सत्याची पाठराखण करण्याकरता निर्भयपणे समोर यायला हवं आहे!

 तूंच भिला तर. ..

 कुजबुजतो तो आहे विकृत

मुकाच बसला आहे तो मृत

 

कर हिरिरीने अन त्वेषाने

आवेशाने उंच तुझा स्वर

गगन धरेला कंपवून तू

प्रतिरोधाचे आवाहन कर

 

चिडून आता तुझ्या सकलही

शक्तीने अन या दुष्टांवर

न घाबरता न चळताना

घाल तुझा हा घाव अनावर

 

भिऊ नको रे! तूच भिला तर

बुडेल लवकर जग हे सारे

हे होतीलच विजयी दुर्जन

अगणित सज्जन अगतिक सारे

 

तूच भिला तर या जगतावर

दिसेल सत्यच खोटयावाणी

तूच भिला तर कपटी खोटे

खऱ्याप्रमाणे म्हणेल गाणी

 

तूच भिला तर बघ वाढेलच

मत्त खळांची रुधिरपिपासा

विश्वजयाची खळ अधमांची

न शमणारी दुष्ट दुराशा

 

सत्य पुकारत झगडत झगडत

हाका मारत जागोजागी

ही चिरनिद्रा जगदांतर्गत

नीतिमती कर सत्वर जागी