वाजपेयी पंथ - सहमतीचे एक नवीन पर्व

विवेक मराठी    17-Aug-2018
Total Views |

***प्रा. राकेश सिन्हा****

वाजपेयींच्या नेतृत्वामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहमतीचे जे एक नवीन पर्व सुरू झाले ते म्हणजे वाजपेयी पंथ...

भारतीय संसदीय इतिहासावर श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक कारणांनी आपला कायमचा ठसा उमटविला आहे. अनेक विषयांवर व मुद्दयांवर लीलया संवाद साधणारे आणि सामंजस्य व भावनात्मकतेचा सुरेख समन्वय करणाऱ्या वाजपेयींची पाच दशकांहून मोठी राजकीय कारकीर्द रचनात्मक राजकारणाला नवं परिमाण देऊन जाते. स्वत:च्या आचार, विचार आणि व्यवहारात ते मर्यादापुरुषोत्तमच ठरले आहेत. त्यांच्या शैली आणि प्रवृत्तीत कमालीचं सातत्य आढळून येतं. याच वैशिष्टयांमुळे जागतिक लोकशाहीच्या विशेषत: भारताच्या विस्तृत राजकीय पटलावर त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण झालं आहे. शिवाय त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विचारसरणीमुळे अनेक विवाद सुसंगतपणे सुटले आहेत. म्हणूनच गुंतागुंतीच्या आणि प्रासंगिक मुद्दयांवर त्यांच्या भाष्याने आणि विचारांच्या प्रतिप्रादनाने कधीही संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही, किंवा राजकीय प्रक्रियेत गतिरोध निर्माण होत नाही. उलट परिस्थिती शांतपणे निवळण्यास ते मदतच करत. उदाहरणार्थ मिशनऱ्यांनी शाळा, सामाजिक संस्था इत्यादींचा वापर करून धर्मांतरण केले. त्यामुळे गुजरातमध्ये असंतोष पसरला आणि डांग येथे हिंसाचार भडकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि गुजरात सरकार विरुध्द धर्मनिरपेक्षतावाल्यांनी टीकेची झोड उठवली होती. परंतु डांगला जाऊन आल्यानंतर अतिशय सौम्य व कुशल मुत्सद्दयाप्रमाणे उत्तर देत वाजपेयी म्हणाले, ''धर्मांतरणावर व्यापक चर्चा व्हायला हवी.'' तसं पाहिलं तर वाजपेयींवर लिहिलं गेलेलं लिखाण हे बरंचसं चरित्रात्मक शैलीचं आहे, त्यात त्यांची वैयक्तिक वैशिष्टये, त्यांचं समाजकारण, त्यांची संवेदनशीलता, सहनशक्ती, विनोदी व काव्यात्मक भाषा, आवेशपूर्ण व ओघवतं वक्तृत्व वगैरेचा उल्लेख प्रामुख्याने आहे. परंतु अशा लिखाणातून त्यांच्या नेतृत्वाची आणि विचारांची तात्त्वि रचना निसटून जाते. राजकीय विचारसरणीवरील त्यांच्या भाषणांचा भारतीय समाजावर, स्वभावजीवनावर काय परिणाम होतो हे विचारातच घेतले जात नाही.

सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ वाजपेयींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून केली. आधी प्रचारक, मग संघ वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे संपादक आणि शेवटी भारतीय जनसंघात त्यांनी प्रवेश केला. पक्षाशी त्यांचा विशुध्द संबंध राहिलेला आहे. खरं तर असंही म्हणता येईल की जनसंघ / भाजपा म्हणजे वाजपेयींच्या राजकीय कारकीर्दीचीच समीक्षा आहे. 1960 च्या मध्यापासून पक्षातील एक प्रबळ नेता म्हणून ते उदयास आले. राजकीय कार्यकर्त्याच्या रूपात त्यांनी अनेक अद्वितीय आणि दुर्मीळ गुणांचे दर्शन घडविले आहे. ते एका वैचारिक चळवळीचे प्रणेते आहेत. त्यांच्या समकालीन बुध्दिवंतांनी, प्रमुख राजकीय व सामाजिक संस्थांनी, वृत्तपत्रांनी संपूर्ण भारतात तीव्र टीका केलेली आहे. परंतु या हल्ल्यांना, आपला वैचारिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. ते त्यांच्या काव्यात्मक आणि विनोदी भाषणशैलीमुळे पक्षात आणि पक्षाबाहेर प्रसिध्द आहेत असं म्हणणं त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. खरं म्हणजे त्यांना सामान्य माणसाची नाडी अचूक सापडलेली आहे. त्यांचा दृष्टिकोन, विश्वास, मानसिकता आणि त्यांच्या बौध्दिक क्षमतेची योग्य जाण त्यांना आहे. म्हणूनच वैचारिक-तात्त्वि मुद्दयांचे आणि कार्यक्रमांचे सहज सोपं विवेचन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या गुणांमुळे त्यांचे टीकाकार त्यांना सौम्य म्हणतात.

पक्ष विचारसरणींबद्दल सातत्याने होणाऱ्या नकारात्मक अपप्रचारावर त्यांनी नेहमीच कडाडून टीका केली आहे. इस्लामिक राज्यकर्त्यांनी, ब्रिटिश वसाहतवाद्यांनी आणि नेहरूंच्या निष्ठावंतांनी मुस्लिम, ख्रिस्ती व माक्र्सवादी दृष्टीने भारतीय राष्ट्रीयतेला, धर्मनिरपेक्षतेला, इथल्या संस्कृतीला आणि लोकांना पाहिलं. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वाच्या मूळ संकल्पनेला नेहमी कमीच लेखले गेले. हिंदूंची राष्ट्रीय अस्मिता खोटी धर्मनिरपेक्षता, राजकीय राष्ट्रीयत्व आणि तथाकथित आधुनिकतेमुळे झाकोळून गेली होती.

भारत एक प्राचीन राष्ट्र आहे आणि इथल्या संस्कृतीचा सतत विकास होत आलेला आहे. परंतु हिंदूंच्या मनीमानसी राष्ट्रीयत्वाबाबत काहीशी संभ्रमावस्था राहिली. भारतीय जनसंघ / भाजपाने सदैव, लोकांना त्यांच्या सांस्कृतिक क्षमतेची, राष्ट्रीयत्वात त्यांच्या भूमिकेची आणि हजारो वर्षांच्या त्यांच्या इतिहासाची जाणीव करून दिली. सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाच्या अशा विचारधारेशी वाजपेयी निगडित आहेत. तेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात एक समर्थ असं राजकीय सांस्कृतिक तत्त्वज्ञान कृतिशील होतं जे हिंदू मानसाचे अराष्ट्रीयीकरण आणि असंस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच ते पुसून टाकणं सहज सोपं नव्हतं. राष्ट्रीयत्वाच्या विचारप्रणालीला पुन:प्रस्थापित करणं व हिंदूंच्या निष्क्रियतेला सक्रियतेत बदलण्याचा ध्यास रा. स्व. संघाने घेतला. या चळवळीचे संसदीय विभागाचे नेते म्हणून वाजपेयींनी आपल्या विशिष्ट शैलीच्या राजकीय भाषणांद्वारे लोकांच्या मानसिकतेवर व दृष्टिकोनावर निर्विवाद वर्चस्व गाजवत एकीकडे पर्यायी मतांचा आणि विचारसरणीच्या गुणांवर जोर दिला आणि दुसरीकडे हिंदुत्व-विरोधी प्रचाराची धार बोथट करून टाकली. वेगवेगळया विषयांना, विचारांना, प्रश्नांना ते नेहमी व्यापक संदर्भात मांडत आले आणि पर्यायाने चर्चांनाही सखोल आणि विस्तृत स्वरूप देत गेले. त्याच वेळी भारतीय जनसंघ / भाजपाच्या राजकीय मार्गावरून मार्गक्रमण करत पक्षाच्या एकत्र्ाित प्रयत्नांचं नेहमी समर्थनही केलं. त्यांच्या आचार-विचारांनी पक्षाला ध्येयधोरण ठरवताना आणि कार्यक्रम राबवताना नेहमीच प्रभावित केलं आहे. कॅडरवर आधारित कुठल्याही वैचारिक पक्षात त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये एक घट्ट नातं असतं, आपलं मोठेपण विसरून काम करणं आणि पक्षाचे सांघिक निर्णय, सदोष ठरले तर खुल्या दिलाने मान्य करावे लागतात. आणि वाजपेयींनी ही जबाबदारी कधीही नाकारली नाही. गांधीप्रणीत समाजवादाला आपलं उद्दिष्ट करावं यासाठी त्यांनी पक्षाला प्रवृत्त केलं होतं. कालांतरानं पक्षाला त्यातली संदिग्धता जाणवली आणि पुन्हा पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद स्वीकारण्याची मागणी केली. दोन्ही प्रसंगांत वाजपेयी किंवा पक्ष कुणालाही एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं जाणवलं नाही. अर्थात गांधीवादी समाजवादाची तत्त्वे पक्षाच्या आर्थिक धोरणांमध्ये प्रतिबिंबित झाली होती.

भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून आणि नेहरूंपेक्षाही लोकप्रिय आणि पुरोगामी नेत्याच्या रूपात वाजपेयी कसे उदयास आले? नेहरूंनी भारताचं प्रतिनिधित्व केवळ स्वातंत्र्य लढयातील एक नेते किंवा भारताचे पहिले पंतप्रधान एवढयाच नात्याने केलं नाही. नवनवीन विचारांचे प्रणेते, आत्मविश्वास जागवणारे आणि संपन्न भारताचे भव्य-दिव्य स्वप्न पाहणाऱ्या द्रष्टा नेत्याच्या रूपातही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आग्रही व्यक्तिमत्त्व आणि गोरगरिबांबद्दल असलेली प्रचंड तळमळ हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. परंतु राज्यकारभार चालवताना आपली मूल्ये, आपली तत्त्वे अमलात आणताना ते पाश्चात्त्य विचारसरणीचा अवलंब करायचे हा त्यांच्यातील सर्वात मोठा दोष होता. त्यांनी भारतीय संस्कृतीची मूल्ये नाकारली होती. आपल्यावर मागासलेलं नेतृत्व असा शिक्का लागण्याच्या भीतीने भारतीय संस्कृतीबद्दल स्वत:च्या मतांचाच त्यांनी त्याग केला असं त्यांच्या या Discovery of India साहित्यकृतीतून दिसून येतं. नेहरूंना नेहमी तत्कालिक समस्यांबाबत आणि त्यांच्या त्यावरील कृतीवर पाश्चिमात्यांच्या प्रतिक्रियेबाबत जास्त काळजी असायची. पाश्चिमात्यांच्या वर्चस्वामुळे त्यांचे विचार आणि कृती पूर्वग्रहदूषित झाले होते. त्यामुळे भारतीय धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीयता, अल्पसंख्याकांचे प्रश्न, भारतीय जनजीवन आणि संस्कृतीची व्याख्या करताना त्यांनी पाश्चिमात्य शिकवणीचाच अवलंब केला असे प्रतिबिंबित होते. भिन्न राष्ट्रीयता, संमिश्र संस्कृती व त्या अनुषंगाने येणारे अल्पसंख्याक-बहुसंख्याक वाद, अशा भारतीय राष्ट्रीयतेला नेहरूंनी मान्यता दिली आणि परिणामी अनेक लोकांना प्रभावित केलं. त्यांनी ही संकल्पना रुजवली आणि ती स्वत:चीच आहे असं भासवलं व तीच भारतासाठी एक आदर्श राज्यव्यवस्था आहे असं प्रतिपादित केलं. ज्यांनी कुणी त्यांची चूक दाखवण्याचा प्रयन केला, त्यांना नेहमीच नेहरूंनी आपलं लक्ष्य बनवलं. अर्थातच रा. स्व. संघ हा पहिला बळी ठरला. वसाहतवादी बौध्दिक वातावरणात पोसलेल्या ऍंग्लो-सॅक्सन बुध्दिवंतांचा नेहरूंना पाठिेंबा होता. नेहरूपंथी तत्त्वज्ञानाला समर्थन करणारे दुसरे नवे मित्र होते माक्र्सवादी. सांस्कृतिक ऐक्य बिघडवून राष्ट्रीयत्वावर घाला घालण्यासाठी भारताचे अराष्ट्रीयीकरण करण्याचा त्यांचाच कार्यक्रम राबवला जात आहे अशी त्यांची धारणा झाली होती. ज्या मुसलमानांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना सर्वात जास्त सवलती देण्यात आल्या. अतिविशिष्ट नागरिकांप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात होती. संविधानाची रचना झाली आणि ते अमलात आणताना सामाजिक मानसिकतेचा असा काही वापर केला गेला की धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाला मुरड घालून बंद दरवाजा संस्कृती रुजवता येईल. नेहरूशाहीने अशा प्रकारे बुध्दिवंतांची अशी फळी उभारली जी बहुसंख्य समाजाला, त्यांच्या ऐतिहासिक भूतकाळाला पुसू पाहत होती. लाल आणि हिरवा बुध्दिवंत क्लब (RGC - Red and Green Intellectual Club) अशी युती होती ती. अनेक अंतर्गत विसंगती आणि विरोधाभास असूनही या क्लबने विशिष्ट स्थितिस्थापक गुणांचं दर्शन घडविलं आहे. अंतर्गत वैचारिक मतभेद असले तरी डॉलर्स, पेट्रोडॉलर्स, रुबल आणि रुपयांवर आश्रित असलेली सर्व मंडळी, संघ विरोधात मात्र एक झाली. काँग्रेसमधील सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाच्या समर्थकांनाही या क्लबने बाजूला सारले. काँग्रेसबाहेर संघ ही एकमेव अशी संघटना होती, जिनं भारताच्या सांस्कृतिक स्वरूपाच्या रक्षणाचा ध्यास घेतला होता. 50 च्या दशकात संघ एक छोटी संघटना असली तरी RGC ला तिच्या प्रचंड वैचारिक क्षमतेची ओळख पटलेली होती. म्हणूनच या क्लबने संघाला बेकायदेशीर ठरवण्याचा, त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा, त्याला कमी लेखण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. महात्मा गांधींच्या हत्येत संघावर आरोप लावून RGC आणि नेहरूपंथीयांनी त्या परिस्थितीचे भांडवल केले.

एवढं सगळं होऊनही पुढील सर्व दशकांत संघाचे प्रभावक्षेत्र उत्तरोत्तर विस्तारत गेले. आणि आज संघ जनसामान्यांची आणि राज्यकर्त्यांची विचारसरणी होऊ पाहत आहे. भारताच्या मूळ सांस्कृतिक भावनिष्ठेविरुध्द जाऊन नेहरूंनी नसलेलं एकमत सर्वांवर लादलं. पण मग प्रश्न असा येतो की जनतेने ते कसं काय स्वीकारलं? उत्तर सरळ आहे. देशापुढे तेव्हा प्रचंड आर्थिक संकटे उभी होती, उपाशी पोटं आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदामुळे लोकांना आपलं अनुकरण करायला भाग पाडण्याची संधी त्यांना मिळाली. पाश्चात्त्य धर्मनिरपेक्षता आणि इस्लामी फुटीरतेमुळे हिंदू मनावर ज्या जखमा झाल्या त्या नेहरूंच्या उपदेशाने, प्रचाराने, तथाकथित राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मनिरपेक्षतेच्या वारंवार घेतलेल्या शपथांनी भरून आल्या नाहीत.

वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या विरुध्द देशात व देशाबाहेर सर्वात जास्त पूर्वग्रहदूषित वातावरण होते. त्यामुळे चांगले चांगले व सहानुभूती असणारेसुध्दा या अपप्रचाराला भुलले आणि जर-तर करतच संघाला स्वीकारू लागले. 1996 मध्ये पंतप्रधानपदाची वाजपेयींनी शपथ घेतली तेव्हा RGC ला वाटले की लोकशाहीतील ही एक विचित्र आणि अपघाती घटना आहे. या घटनेची तुलना 1920 मध्ये काँग्रेसवाले द्विदल राज्यव्यवस्थेत मंत्री झाले त्या घटनेशी करता येईल. काँग्रेस आंदोलकांचं वर्णन करताना इंग्रज बुध्दिवंत तेव्हा म्हणाले की कालचे 'गुंड' आज कायद्याने मालक झाले आहेत. इंग्रज बुध्दिवंतांनी आणि नोकरशहांनी काँग्रेसी मंत्र्यांना पूर्णपणे अपयशी ठरवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. कारण, त्यांच्याबरोबर काम करताना इंग्रजांना अस्वस्थता जाणवायची. 90 च्या दशकात धर्मनिरपेक्ष पत्रकार, बुध्दिवंत आणि पक्ष या सर्वांनी भाजपाने चालविलेल्या सरकारविरुध्द नेमके हेच केल्याचे दिसून येते.

 राजकारणात आणि प्रशासनात सर्वसमावेशक अशी राजकीय संस्कृती सुरू करून वाजपेयींनी आपल्या नेतृत्वातील एका सच्च्या मुत्सद्दयाचे दर्शन घडविले. वरवर पाहता वाटतं त्यांनी आपल्याच विचारांना तिलांजली दिली. परंतु याचं सखोल विश्लेषण केलं की जाणवतं की पाच वर्षांच्या अल्पावधीतच एक नवी समाधानकारक राज्यपध्दती अस्तित्वात आली. या नवीन शासन पध्दतीने नेहरूपंथी एकमताचा त्याग केलाय. कुठल्याही नागरी संस्कृतीत वैचारिक परिवर्तन जर धाकदपटशाहीने झाले तर 'जैसे थे'ची स्थिती जोपासणाऱ्या बहुसंख्य स्थितीवादी लोकांमध्ये असमाधान निर्माण होते.

जनसंघाच्या काळापासून वाजपेयींच्या विचारांमध्ये, मतांमध्ये सातत्य आहे. धर्मनिरपेक्षतेची नव्याने व्याख्या करून ती जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. ते म्हणाले होते, ''मुस्लिम किंवा ख्रिस्ती भारताबाहेरून आलेले नाहीत. त्यांचे पूर्वज हिंदूच होते. धर्म बदलला तरी कुणी आपलं नागरिकत्व किंवा संस्कृती बदलत नसतं.'' (National Integration Note Submitted by A.B. Vajpayee, Leader of Janasangh group in Parliament at the National Integration Conference held at New Delhi on September 28, 29, 30, 1961) आणि आज 37 वर्षांनी भारताचे पंतप्रधान या नात्याने आपली व्याख्या आणि तत्त्वज्ञान लोकांना आग्रहाने सांगताना ते म्हणतात, ''धर्मनिरपेक्षतेची कल्पना बाहेरून आलेली नाही. आणि स्वातंत्र्यानंतर आपण तिचा जबरदस्तीने स्वीकार केला असं नाही. खरं तर ती आपल्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक भावनिष्ठेचे एक वैशिष्टय आहे .......''

तसं पाहिलं तर कुठलाही पक्ष किंवा आघाडी जर धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक कार्यक्रम घेत नसेल तर भारतीय जनता त्याला निवडून देत नाही. त्यांना गृहीत धरून विचार करणं म्हणजे त्यांच्या लोकशाही ज्ञानाला तुच्छ लेखण्यासारखं आहे.'' (Musings of New-Year Part II Kumarakon 2nd January 2001)

राम मंदिराबाबत जगाला नि:संकोचपणे सांगताना ते म्हणाले, की हा वाद जुन्या धर्मनिरपेक्षतेत आणि खऱ्या धर्मनिरपेक्षतेतला संघर्ष आहे. भारतीय लोकाचारात प्रभू रामाचे स्थान अढळ आहे यात शंका नाही. त्यांनी असं लिहिलं होतं, ''फार थोडे लोक हे सत्य नाकारतील की भारतीय संस्कृतीत राम उच्चासनावर आहेत. ते भारतीय सांस्कृतिक भावनिष्ठेचे एक अतिशय श्रध्देय दैवत आहे ... अहिंदूसुध्दा रामात एक आदर्श राजा आणि सद्गुणांचे मूर्त स्वरूप पाहतात.'' (Musings of New Year Part I Kumarakon (Kerala) 1st January 2001)

24 पक्षांची संयुक्त आघाडी असूनही वाजपेयी खऱ्या अर्थाने एक आदरणीय व्यक्ती ठरले आणि भाजपा एक खरा सत्ताधारी पक्ष. लोकशाही राज्यव्यवस्थेत आघाडी राजकारण अपवादात्मक समजले जाते, या बाबत दोन गृहीतके आहेत :- पहिल्या गृहीतकानुसार आघाडी सरकारे खंबीर धोरणे स्वीकारू शकत नाही. म्हणजे आघाडीमध्ये एकमत बनवण्याचे शास्त्र बऱ्याचदा, आघाडीतील सहकाऱ्यांचे संपूर्ण एकमत दर्शविणारे मुद्दे आणि कार्यक्रम सोडून देते. कार्यक्रम ठरवत असताना अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनक्षम मुद्दयांवर किमान समान वैचारिक पाया असल्याशिवाय ते सुसंगतपणे सोडविणं शक्य नसतं. त्यांनाही चाळणी लागते. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की आघाडीमध्ये जितके मोठे वैचारिक, सामाजिक आणि राजकीय विरोधाभास असतील तितकाच हा समान पाया लहान असणार. वागगीदाखल - स्विडनमधील 1976-82 आणि बेल्जियममध्ये 1970 मधील सामाजिक लोकतांत्र्ािक आघाडी सरकारे घेता येतील. दुसरं गृहीतक असं आहे की आघाडी सरकारांमध्ये अनेकदा लोकरंजनात्मक कार्यक्रमांवर अधिक भर दिला जातो. परंतु वाजपेयी सरकारने स्थैर्य देऊन वरील दोन्ही गृहीतकं नाकारली आहेत. लोकरंजनात्मक मुद्दा मग तो आजारी मिलचा असो, सार्वजनिक क्षेत्राचा असो, सरकारी कर्मचाऱ्यांचा असो किंवा राज्य सरकारच्या जिवावर सवलती देण्याचा असो, सरकार कधीही त्यांना शरण  गेले नाही. उलट शिक्षण, संस्कृती, राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेऊन दाखवले आहेत. पाठयपुस्तकांत सुधारणा, देशद्रोही शक्तींवर बंदी, परदेशी अर्थसाहाय्यावर नियंत्रण आणि अणुचाचण्यांसारखे निर्णयही घेण्यात आले. यावरून ही सर्वात जास्त यशस्वी आघाडी आहे हे सिध्द होते.

वाजपेयींचा लोकशाहीवर गाढ विश्वास आहे. त्यांचं उद्दिष्ट शासनकर्ते आणि विरोधी पक्ष यांच्यात दुही निर्माण करणे नसून जनहिताच्या आणि कल्याणकारी योजना साकार करणे आहे. लोकशाही म्हणजे 51 विरुध्द 49 असा आकडयांचा खेळ नव्हे. ती लोकाचाराची एक पध्दत आहे. नीतीपूर्ण जीवन पध्दती आहे. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य. जिथे रचनात्मक विरोधाची कदर केली जाते. म्हणून आघाडी सरकार एक नैसर्गिकच प्रक्रिया आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळेच ते म्हणतात की आघाडी सरकारचे नाते अस्थिरतेशी जोडले जाऊ शकत नाही आणि जोडलेही जाऊ नये. जगाला आपल्याला दाखवून द्यावं लागेल की भारतात आघाडी रचनेतही स्थिर आणि चैतन्यशील सरकार काम करू शकतं. (Annual Shram Awards Ceremony New-Delhi 14 October 1998, Vol.1, Publication .... 55)>

वाजपेयींच्या नेतृत्वामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहमतीचे जे एक नवीन पर्व सुरू झाले तो वाजपेयी पंथ आहे आणि तो नेहरूप्रणीत संकल्पनेच्या विरुध्द आहे.

अनुवाद : सुनीता परांजपे