प्रखर देशभक्तीने ओथंबलेली अटलजींची तेजस्वी पत्रकारिता

विवेक मराठी    17-Aug-2018
Total Views |

***डॉ. वि. ल. धारुरकर***

वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे जणू मुक्त विद्यापीठ असते. नवभारताची उभारणी करणाऱ्या महामानवांनी आपल्या लेखणी व वाणीने अपूर्व चमत्कार घडविला आणि त्यामुळे राष्ट्रजीवनाचे प्रारब्ध बदलू शकले. वेद, उपनिषदे, गीता आणि भारतीय दर्शनातील श्रेष्ठ व अमर असे चिंतन हिंदी पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय जनमानसापुढे प्रस्तुत करण्याचे श्रेय तेज:पुंज आणि प्रतिभाशाली पत्रकार या नात्याने अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे जाते. पत्रकारिता हे त्यांनी लोकशिक्षण, देशभक्ती आणि समाजसेवेचे साधन मानले.

'राष्ट्रधर्म' मासिकाचा चमत्कार

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अखंड भारतापुढे अनेक प्रश्न होते. सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजींना देशापुढील ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ या नात्याने स्वतंत्र मासिक प्रकाशित करावे असे वाटत होते. त्यांनी या प्रकाशनाची जबाबदारी भाऊराव देवराम आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर सोपवली. उभयतांनी मासिक कसे असावे, त्यातील आशय व अभिव्यक्तीचे स्वरूप काय असेल, संपादक या नात्याने कोणाला निमंत्र्ाित करावे याबाबत सखोल विचारविनिमय करून अटलबिहारी वाजपेयी आणि राजीवलोचन अग्निहोत्री यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्याचे निश्चित केले.

मासिकाचे राष्ट्रधर्म हे नाव डेहराडूनचे स्वयंसेवक विद्यासागर यांनी सूचित केले होते. पत्र्ािकेच्या संपादकपदी एक प्रतिभाशाली कवी आणि पत्रकार या नात्याने अटलजींची, तर संस्कृत साहित्याचे गाढे व्यासंगी या नात्याने राजीवलोचन अग्निहोत्री यांची निवड दीनदयाळजींनी केली होती.

राष्ट्रधर्म मासिकाची उद्दिष्टे काय असावीत याबाबतचा प्रस्ताव प्राचार्य चंद्रपालसिंह यांनी तयार केला होता. अमिनाबाद येथील मारवाडी गल्लीत कृष्णगोपाल कलंत्री यांच्या घरी 'राष्ट्रधर्म'चे छोटेखानी कार्यालय सुरू झाले. आरंभीच्या काळात वर्गणीची रक्कम त्यांच्याकडे जमा होत असे. त्यानंतर सेंट्रल बँकेत मासिकाचे खाते उघडण्यात आले. अवध पिं्रटिंग वक्र्सचे मालक राजेश्वर भार्गव हे मुद्रक, तर राधेशाम कपूर हे प्रकाशक होते. राष्ट्रधर्मची वार्षिक वर्गणी 10 रु., अर्धवार्षिक 6 रु. तर प्रत्येक अंक 12 आणे म्हणजे 75 पैशांचा असे.

राष्ट्रधर्म मासिकाच्या संपादकीय मंडळाच्या पहिल्या बैठकीला दीनदयाळजी, राजीवलोचन आणि अटलजी उपस्थित होते. विभक्ती प्रत्ययांसह संपूर्ण शब्द छापण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. अग्रलेख प्रकाशित करताना 'बिंदू बिंदू विचार' हे शीर्षक ठरविण्यात आले. मासिकाची पृष्ठसंख्या 96 असावी, असा संकल्प करून ते सिध्दीस नेण्यात आले.

राष्ट्रधर्मच्या पहिल्या अंकासाठी देशातील मान्यवर लेखक, विद्वान तसेच संस्कृतीप्रेमींना अटलजींनी विशेष पत्रे लिहून विनंती केली. भाऊरावजी देवरस अचानक एके दिवशी कचेरीत आले. त्यांनी ''हिंदू तनमन हिंदू जीवन'' ही अटलजींची कविता पहिल्या पानावर छापण्याचा आग्रह धरला. अटलजींनी त्यांना सांगितले, ''ही कविता अंकात आतील पानावर छापू.'' परंतु भाऊरावांच्या आग्रहापुढे त्यांची मात्रा चालेना! शेवटी त्यांची ही तेजस्वी कविता पहिल्या पानावर सचित्र छापण्यात आली; मगच अंक प्रकाशित झाला.

'राष्ट्रधर्म'चा श्रीगणेशा

राष्ट्रधर्मच्या पहिल्या अंकाचे मुद्रितशोधन सुरू झाले. पहिले, दुसरे व तिसरे मुद्रित तपासण्यात आले. अटलजी स्वत: बारकाईने मुद्रिते तपासत असत आणि अर्धविराम, स्वल्पविराम इ. साऱ्या बाबींकडे लक्ष देत असत. कोणतीही चूक राहता कामा नये असे ते पाहत असत.

पहिल्या अंकाच्या 3000 प्रती छापण्यात आल्या. प्रत्येक फॉर्मवर संपादक स्वत: लक्ष ठेवत असत. दुसरा अंक अधिक प्रमाणात संख्या व गुणवत्तेचा विचार करता, अधिक दर्जेदार स्वरूपात प्रकाशित करण्यावर भर देण्यात आला. पहिल्या अंकात ग्वाल्हेरचे व्यंगचित्रकार हरी मोहन यांनी मार्मिक व्यंगचित्र काढले होते. एका शेगडीवरील कढईत खीर शिजविली जात होती. एक वृध्द महिला शेगडी  पेटविण्यासाठी इंधन म्हणून चरखा टाकत होती. कढईतील दुधावर एक कुत्रा ताव मारत आहे असे दाखविण्यात आले होते. ती वृध्दा काँग्रेसचे प्रतीक, कुत्रा मुस्लिम लीगचे, तर चरखा हे अखंडतेचे प्रतीक मानण्यात आले होते. व्यंगचित्राखाली अमीर खुसरो यांच्या कवितेच्या ओळी दिल्या होत्या -

''खीर पकाई जतन से,

चरखा दिया जलाए

आया कुत्ता खा गया,

तू बैठी ढोल बजाए''

हे व्यंगचित्र पाहून मुद्रणालयातील एक मुस्लिम मशीनमॅन भडकला. या व्यंगचित्रात इस्लामचा अपमान आहे असे त्याला वाटू लागले; पण चतुर संपादक राजीवलोचनजी यांनी साऱ्यांची समजूत काढली. राष्ट्रधर्मचा पहिला अंक बिनधोक प्रकाशित झाला. अंकातील दर्जेदार आशय सामग्रीमुळे पत्र्ािका सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकांप्रमाणे सामान्य नागरिकांतही लोकप्रिय झाली. मुद्रणालयाचे मालक भार्गव यांचा उत्साहही वाढत गेला. मुखपृष्ठावर भगवा ध्वज आर्ट पेपरवर नि:शुल्क प्रकाशित करण्याचे त्यांनी मान्य केले. मुद्रणालयातून अंकाचे गठ्ठे ए.पी. सेन मार्गावरील कार्यालयात आणण्यात आले. स्वत: दीनदयाळजी व अटलजी अंकाचे गठ्ठे बांधत असत आणि प्रत्येक अंकावर सुबक अक्षरामध्ये पत्तेही लिहीत असत.

राष्ट्रधर्मच्या गुणवत्ताप्रधान आशय सामग्रीमुळे देशभरातून वाचकांचा जोरदार प्रतिसाद लाभू लागला. वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे अंकाच्या 500 प्रती पुनश्च छापण्यात आल्याची नोंद आढळते. पहिल्या अंकामध्ये प्रारंभी आद्य जगद्गुरू शंकराचर्यांचे बहुरंगी आकर्षक छायाचित्र होते. त्यानंतर अटलजींची कविता देण्यात आली होती. प. पू. गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेल्या 'हमारा राष्ट्रवाद' हा लेख झळकत होता. 'मुस्लिम राज्य बीज विकास और फल' या मथळयाने युक्त असा अटलजींचा लेख त्या काळी बहुचर्चित ठरला होता. राजीवलोचन अग्निहोत्री यांनी लिहिलेली 'शकारी विकमादित्य' ही कादंबरी धारावाहिक स्वरूपात नियमित प्रकाशित होऊ लागली. पहिल्या अंकातील इतर गणमान्य लेखकांमध्ये सर्वश्री राजाराम द्रविड, नारायणराव तर्टे, आचार्य लक्ष्मीकांत शास्त्री, न. गं. वंझे इ. चा समावेश होता. अटलजींच्या आग्रहामुळे राष्ट्रधर्मचा पहिला अग्रलेख 'अन्ततो गत्त्वा' या शीर्षकाने पं. दीनदयाळजी उपाध्याय यांनी लिहिला होता. बिंदू बिंदू विचार असे या अग्रलेखाचे सदर असे. राष्ट्रधर्मच्या पहिल्या अंकाचे देशभर स्वागत झाले.

साम्यवाद्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला

राष्ट्रधर्मच्या अपूर्व यशामुळे तत्कालीन साम्यवादी नेत्यांचे धाबे दणाणले. संघस्वयंसेवक लाठीकाठी चालवितात; फार तर एखाददुसरे शिबीर घेतात, अंक मात्र आम्हीच काढू शकतो हा त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला नि पहिल्या अंकाचे यश पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. भाऊराव देवरसांनी संपादकद्वयांचे मन:पूर्वक कौतुक केले. पहिल्या अंकावर पत्रांचा वर्षाव झाला. रात्री उशिरापर्यंत अटलजी वाचकांच्या पत्रांना उत्तरे लिहीत असत. दुसऱ्या अंकाच्या 6,000 प्रती छापण्यात आल्या. भार्गव यांच्या मुद्रणालयास आता कामे पूर्ण करणे अवघड होत असे. त्यामुळे दीनदयाळ उपाध्यायजींनी राष्ट्रधर्मसाठी स्वत:चे मुद्रणालय स्थापन करण्याचा निश्चय केला. लखनौच्या बाबूगंज मोहल्ल्यातील भारत प्रेस 17,000 रुपयास विकत घेण्यात आला. निवृत्त अधिकारी जैनी यांच्या मालकीचा एक हॉल 60 रु. महिना भाडयाने घेण्यात आला. पावगी हे प्रेसचे मालक बनले व राष्ट्रधर्मचे प्रकाशन या ट्रेडल मशिनवरून सुरू झाले.

दुसरा अंक अवध प्रेसमध्ये छापण्यात आला होता. त्याच्या 8,000 प्रती काढण्यात आल्या. मुखपृष्ठावर सिंहगडाचे चित्र होते. त्याखाली 'न दैन्यं न पलायनम्' असे सुभाषित देण्यात आले होते. या अंकातील एका व्यंगचित्राची खूप चर्चा झाली. त्या खाली -

''विनायकं प्रकुर्वाणी

रचयामास वानरम्''

अशा ओळी होत्या. म. गांधी गणेशाचे चित्र रेखाटत होते पण ते चित्र वानराचे बनले! असा या व्यंगचित्राचा आशय होता.

राष्ट्रधर्मचा विजयादशमी विशेषांक 16 पानांचा होता. त्यातील दर्जेदार सामग्री ही वाचकांना विलक्षण वेड लावणारी होती. वाचकांच्या पत्रांना अटलजींनी दिलेली उत्तरे भावगर्भ व अर्थपूर्ण असत. मुद्रणालयाच्या उभारणीस बराच वेळ लागला. त्यामुळे 3 संयुक्त अंकांचा एकच विशेषांक काढण्यात आला. या अंकामध्ये चर्चिल व बॅ. जीना यांची जोडी रेखाटणारे व्यंगचित्र होते. ते वाचकांना दीर्घकाळ लक्षात राहणारे ठरले. राष्ट्रधर्मचा खप एव्हाना 12,000 पर्यंत पोहोचला होता.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वत: अक्षर जुळविण्याचे कौशल्य हस्तगत केले होते. त्यामुळे अटलजी व सर्व कर्मचारी वर्ग स्वत: छपाईची सर्व कामे करू लागले. दीनदयाळजी स्वत: योग्य हिंदी शब्दांचा समर्पक वापर करत असत. आपण पर्यायी शब्द विचारपूर्वक विकसित करावेत असा त्यांचा आग्रह होता.

या काळात पं. दीनदयाळजींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उभय संपादकांच्या मनावर उमटला. आपण जितका मजकूर तयार करू तितका यथायोग्य जागेत प्रकाशित होईल असा प्रगाढ आत्मविश्वास अटलजींनी संपादन केला होता.

पांचजन्यचा शंखनाद

राष्ट्रधर्मच्या संपादनाची जबाबदारी राजीवलोचन यांच्याकडे सोपविण्यात आली तर पौष शुक्ल 3 संवत 2004 रोजी पांचजन्यचा पहिला अंक अटलजींच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होऊ लागला. गांधीजींच्या हत्येनंतर संघावर पहिली बंदी आली तेव्हा दीनदयाळजी व नानाजींना अटक करण्यात आली. अटलजी भूमिगत झाले. भारत प्रेसला सरकारने कुलूप ठोकले.

अटलजी अलाहाबादला पोहोचले आणि ते रामरखसिंह सहगल यांच्या 'क्राईसिस' पत्रात काम करू लागले. सहगल हे 'कर्मयोगी' या नावाने आणखी एक अंक काढत. अटलजी काही काळ या पत्राचेही संपादक होते.

संघाच्या कार्यावरील बंदी उठताच अटलजी पुनश्च लखनौस पोहोचले. त्यांनी पांचजन्यच्या संपादनाचे धनुष्य हाती घेतले. संघाची भूमिका स्पष्ट करणारा विशेषांक त्यांनी अप्रतिम स्वरूपात प्रकाशित केला. अटलजींनी तनमनधन अर्पण करून हा अंक प्रकाशित केला. त्यांना कशाचीही उसंत नव्हती. रात्रीचा दिवस करून त्यांनी 'अंक' हेच सर्वस्व मानले. राष्ट्रधर्म व पांचजन्य ही प्रकाशने समर्पित भावनेने केली जात असत. जागा अपुरी, साधनसामुग्री नाही आणि विलक्षण ध्येयवादास कृतीची जोड लाभल्यामुळे अशक्य ते शक्य करून दाखविण्याची किमया संपादकांनी करून दाखवली. भुकेला कोंडा व निजेला धोंडा असा हा प्रकार होता.

बऱ्याच वेळा अटलजी व दीनदयाळजी हे चटई अंथरून व उशाला विटा घेऊन झोपत असत. अथक परिश्रम व कर्तव्यपूर्तीचा निरामय आनंद हेच राष्ट्रधर्म प्रकाशनाचे सर्वस्वी यशसूत्र होते. राष्ट्रधर्म प्रकाशनाला अडचणीत आणण्यासाठी अनेकांनी त्यावर खोटे मुकदमे केले. पण अटलजी व यादवरावजी यांनी कुशलतेने आखणी करून हे सर्व खटले परतवून लावले. देशासाठी सर्वस्वाचे समर्पण करणारी, देशभक्ती प्रखर ज्योत प्रज्वलित करणारी ही ध्येयवादी पत्रकारिता विलक्षण इतिहास घडविणारी ठरली.

अटलजी पांचजन्यचे पहिले संपादक होते. तत्त्व, व्यवहार आणि फलश्रुती या तीनही दृष्टीने त्यांनी या पत्राचा भक्कम पाया घातला. 1996 साली पांचजन्यचा सुवर्ण महोत्सवी अंक प्रकाशित झाला तेव्हा त्यात दिलेल्या संदेशात अटलजी म्हणतात, - ''पांचजन्यच्या प्रारंभीच्या प्रसव वेदनापासून ते उत्तरोत्तर प्रगतीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. विचार आणि प्रचार या दोन्ही कसोटयांवर पांचजन्य हे असली बावनकशी सोन्यासारखे चमकदार ठरले आहे. त्याचे प्रगल्भ वाचक व प्रेमी यांच्या विश्वासाला हे पत्र पात्र ठरले आहे, तर दुसरीकडे समाजाच्या प्रबुध्द वर्गातील विचारमंथनातही त्याने गती दिली आहे. राष्ट्रवादाची मशाल सदैव प्रज्वलित ठेवून पांचजन्यने अनेक वर्षांपासून भ्रम व पूर्वग्रहाशी संघर्ष करून विचारांच्या आधारे कुरुक्षेत्रावर ''राष्ट्रे जागरू यामवयम्'' शंखनाद करून राष्ट्राला अखंड अजय बनविण्यात प्रभावी वैचारिक भूमिका पार पाडली आहे.'

पांचजन्यचे सर्व विशेषांक हे हिंदी पत्रकारितेच्या जगतात मैलाचे दगड ठरले आहेत, तसेच भविष्यासाठी दिशा देऊन पांचजन्यने भारतीय पत्रकारिता समृध्द बनविली आहे.

अटलजींना एक कुशल संपादक या नात्याने कार्य करण्यासाठी पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले; तर भाऊराव देवरस यांनी त्यांना सदैव नवी प्रेरणा दिली.

पांचजन्य साप्ताहिकाचे बीज आज एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे सर्वदूर पसरले आहे. हिंदुत्व जागरणाच्या अखंड विचारसाधनेत पांचजन्यची भूमिका इतिहास घडविणारी ठरली आहे. अटलजींची पत्रकारिता या प्रकाशपर्वातील पहाटपक्षी या नात्याने नवा उत्साह जागृत करणारी ठरली आहे.

दैनिक स्वदेशचे संपादन

राष्ट्रधर्म व पांचजन्यच्या अपूर्व यशामुळे अटलजींना आता दैनिक पत्राच्या संपादनाचे काम सोपवावे असे पं. दीनदयाळ उपाध्याय यांना वाटत होते. मासिक, साप्ताहिक व दैनिक असा हा प्रवास होता. स्वदेश पत्राचे प्रकाशन हा लखनौ नगरीसाठी एक सुवर्णक्षण होता. या समारंभासाठी पं. अंबिकाप्रसाद वाजपेयी, डॉ. राधाकुमुद मुखर्जी व डॉ. दीनदयाळ गुप्त उपस्थित होते. एक कुशल संपादक या नात्याने अटलजींची कीर्ती सर्वदूर पोहोचली होती. पहिली दोन वर्षे तर अथक परिश्रम घेऊन उत्साहाची लाट आणून पत्र काढण्यात येत होते. सरकार पक्षाच्या वक्रदृष्टीमुळे जाहिराती मिळेनात. आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. या दैनिकाचे प्रकाशन कठीण परिस्थितीतूनही चालू होते. अटलजींचा ''अल्विदा'' हा अग्रलेख अनेकांच्या स्मरणात राहिला. अटलजींचे अग्रलेख हे चैतन्यदायी असत. प्रभावी राष्ट्रचिंतन, अमर विचारमंथन व समर्पक शब्दयोजन यामुळे अटलजींचे अग्रलेख खूप गाजत असत. त्यांपैकी ''टंडनजी से'' ''तिस्बतपर आक्रमण'' ''ठक्कर बापा'' ''गोवध बंद हो'' ''पाकिस्तान का भारतविरोधी प्रचार'' ''घुँसे को घुँसा'' हे अग्रलेख खूप गाजले. अटलजींनी 19 ऑक्टोबर 1951 रोजी विजयादशमी हा अग्रलेख लिहून नवी दृष्टी दिली होती.

अटलजी या काळात एक नवोन्मेषशाली नि प्रतिभावान पत्रकार, विचारवंत म्हणून पुढे अाले. कुशल संपादक आणि मंत्रमुग्ध करणारा वक्ता या नात्याने त्यांचा लौकिक सर्वदूर पसरत गेला. अटलजींकडे अनेक पत्रांचे संपादकपद चालून आले होते; पण अटलजी हे ध्येयावर अटळ होते. कंकर कंकर ते शंकर पाहणारे, बिंदू बिंदू जल को सिंधू मानणारे अटलजी हे समर्पणाचे पुजारी होते. ''आपण जगावे अथवा मरावे ते हिंदुत्वासाठी'' हा त्यांचा विलक्षण ध्येयवाद होता. पू. गुरुजींचा संदेश कोटयवधी लोकांपर्यंत त्यांना पोहोचवावयाचा होता. दीनदयाळ उपाध्याय यांची एकात्म मानवतावादाची तुतारी त्यांना प्राणपणाने फुंकायची होती. पं. शामाप्रसाद मुखर्जी यांचा राष्ट्रवाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा हा ध्यास घेऊन अटलजी पत्रकारिता साधना म्हणून करत राहिले.

चेतनाचे तेजस्वी संपादक

काशीहून कमलापती त्र्ािपाठी हे संसार पत्राचे संपादक होते. या पत्राने चेतनावर हल्ला केला तेव्हा अटलजींनी संपादक या नात्याने त्र्ािपाठी यांच्यावर टीकेचे कोरडे ओढले होते. संसार पत्राने लक्षात घ्यावे की, चेतना आपल्या मार्गावरून हटणार नाही, डगमगणार नाही. चेतना पत्राने बुध्दिवादी वाचकवर्गात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

अटलजी हे सजग पत्रकार आणि उत्कट कवी आहेत. त्यामुळे ''ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदयी हृदय एक जाहले'' अशी त्यांची पत्रकारिता असते. देशाची फाळणी झाली तेव्हा अटलजी व्यथित झाले होते.

'पंधरा अगस्त का दिन कहता

आज़ादी अभी अधुरी है ।

सपने सच होने बाकी हैं।

रावी की शपथ न पुरी है ।

जिनकी लाशों पर पगधरकर

आज़ादी भारत में आई

वे अबतक है खानाबदौश

गम की काली बदली छाई ॥'

वीर अर्जुनचा विक्रम

राजधानी दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक व दैनिक वीर अर्जुनचे संपादक या नात्याने अटलजींनी नवा इतिहास घडविला.

संपादन क्षेत्रातील अनुभवांची परिपक्वता, विचारांची पारदर्शकता, भाषेचे प्रवाहित्व व स्वच्छता, अभिव्यक्तीमधील निर्भयता व राष्ट्रवादी विचारांचा आवेग यामुळे या पत्राचे अग्रलेख वाचकांना विलक्षण आकृष्ट करत असत. हे पत्र हातात पडताच वाचकवर्ग प्रथम अटलजींचा अग्रलेख वाचत असत. नंतर इतर सामग्री चाळत असत. आपल्या प्रतिभाशाली विचारांमुळे एक कुशल पत्रकार या नात्याने अटलजी वाचकांना मंत्रमुग्ध करतात. अनुशासित आणि अनुबंधित अशी भावोत्कट पत्रकारिता अटलजींनी विविध पत्रांच्या माध्यमातून प्रकट केली.

अटलजींना अभिप्रेत असलेली पत्रकारिता ही भारतमातेच्या हृदयींचा तेजस्वी हुंकार प्रकट करणारी प्रखर राष्ट्रवादी पत्रकारिता होय. त्यांच्या हृदयातील कवी आणि पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ग्वाल्हेर, कानपूर व लखनौ असा प्रवास करून अटलजी तेजस्वी संपादक बनले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विलक्षण ध्येयवाद आपल्या लेखणीतून आणि वाणीतून तेजस्वीपणे प्रकट केला.

हिंदुत्व अथवा भारतीयत्व हे त्यांनी आपल्या पत्रकारितेचे प्राणतत्त्व मानले. ते कधी थांबले नाहीत, कधी थकले नाहीत, कधी झुकले नाहीत. 'मेणाहून मऊ वज्राहून कठोर' अशी तेजस्वी दृष्टी घेऊन त्यांनी पत्रकारितेचा परिपोष केला. हिंदी भाषा व संस्कृतीचा अंतर्वेध घेऊन भारतीय जनमनाचा ठाव घेतला आणि आपल्या शब्दकळांतून पत्रकारितेचा विकास घडविताना आधुनिक भारतामध्ये सर्वंकष क्रांती घडवून आणली. नवभारताच्या उभारणीसाठी एक नवा प्रगतीचा मंत्र त्यांनी दिला. आपल्या पत्रकारितेचा आविष्कार घडविताना हिंदुत्व हे प्राणतत्त्व मानले. ते म्हणतात - ''मैं एक बिंदू, परिपूर्ण सिंधू है यह मेरा हिंदू समाज, मेरा इसका सबंध अमर, मै व्यक्ती और यह है समाज'' भारतीय समाजाशी अतूट असे नाते प्रस्थापित करत अटलजींची पत्रकारिता ही एखाद्या विशाल वटवृक्षाचे रूप धारण करते. त्यांनी स्वीकारलेला राष्ट्रधर्म तेजस्वी आहे. त्यांची अभिव्यक्ती पांचजन्याचा शंखनाद करते.

स्वदेशाची तेज:पुंज राष्ट्रनिष्ठा प्रखर रूप घेऊन प्रकट होते. त्यांच्यातील पत्रकारितेची चेतना नित्यनूतन व अमर ठरते. त्यांच्यातील वीर अर्जुन नवा इतिहास घडविण्यासाठी कुरुक्षेत्रावर नित्यनवे विचार-जागरण घडविणारा आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावादाचा संस्कार त्यांनी आयुष्यभर जपला आहे आणि बलशाली तसेच अखंड भारताच्या उभारणीचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प पूजनीय आहे, अनुकरणीय आहे. वाटेत प्रचंड वादळ झाले तरी हृदयातील नंदादीप तेवत ठेवून ध्येयमंदिर गाठण्याचा त्यांचा संकल्प वंदनीय आहे.