सात्त्विक सखा

विवेक मराठी    20-Aug-2018
Total Views |

अमरावतीच्या प्रवासात 9 ऑगस्टला असताना रात्री नऊच्या सुमारास प्रमोद बापट यांचा फोन आला, ''रमेशजी, एक वाईट बातमी आहे... आपले रवींद्र पवार गेले.'' आपल्या अगदी जवळचे कोणी गेल्यानंतर जो धक्का बसतो, तो मला बसला. मनात पहिली प्रतिक्रिया उमटली - मला अधिकारवाणीने सांगणारा माझा जवळचा सखा गेला. रवींद्रचा माझ्याशी संवाद कसा असे? ''रमेश, तुला कीर्ती कॉलेजमध्ये विषय मांडायला यायचे आहे, प्राचार्य मगरे तुला फोन करतील.'' तुला वेळ आहे का? तू जाऊ शकशील का? असले प्रश्न रवींद्रच्या कोशात नव्हते. 'मी जाऊ शकणार नाही' असे म्हणण्याची माझी हिम्मतदेखील नसे.

तसे पाहिले तर वयाने मी रवींद्रपेक्षा मोठा. संघाच्या अधिकारश्रेणीचा विचार केला, तर माझे स्थानही रवींद्रपेक्षा मोठे. परंतु एखादा कार्यकर्ता जेव्हा आपला सखा होतो, तेव्हा या उतरंडीला काही अर्थ राहत नाही. ही मैत्री अशी होते की, मित्राने सांगायचे आणि आपण मुकाट ऐकायचे आणि करायचे. माझ्या आणि रवींद्रच्या जीवनात असे किती प्रसंग निर्माण झाले असतील, हे सांगता येणार नाही. तसे आम्ही एकमेकांना वारंवार भेटत होतो, तासन्तास गप्पा मारत होतो, आवडीच्या हॉटेलमध्ये जाऊन खात होतो, असे काही नव्हते. कारण आमची मैत्री या प्रकारात मोडणारी नव्हती. या मैत्रीला अद्भुत असा संघआयाम होता. विचारांची समानता होती. काय करायचे, याची स्पष्टता होती. संवाद न करताच एकमेकांचे मनोगत एकमेकांना समजत होते. अमुक ठिकाणी जाण्यासाठी रवीने माझी निवड का केली, हे मी रवीने न सांगताच समजू शकत होतो. एकमेकांचे हृदय आम्ही जाणत होतो.

प्रसंग 93-94चा असावा. दाऊदच्या मुंबई बाँबस्फोटाने सर्व देश हादरलेला होता. पवार मुख्यमंत्री होते. गोपीनाथराव मुंडे विधानसभेत पवार-दाऊद संबंधीचे वाभाडे काढीत होते. भाई लोकांशी लढणे म्हणजे जिवाशी खेळ. पक्षात सामसूम होती आणि ती मला खटकत होती. मी मुंडयांची भेट घ्यायची ठरविले होते. काय बोलायचे याची चर्चा प्रांताच्या अधिकाऱ्यांशी केली, रवींद्रला याविषयी सांगितले. आणि रवींद्रच्या घरी माझी आणि गोपीनाथरावांची भेट झाली, बोलणे झाले. ते मी वर कळविले. नंतर गोपीनाथराव मुंडयांची संघर्षयात्रा ठरली आणि महाराष्ट्राचे चित्र बदलले. हा किस्सा रवींद्रने कधी कुणाला सांगितला नाही आणि रवींद्र गेल्यानंतर मी आज तो उघड करीत आहे. कार्यकर्त्यांचे मनोमीलन असे असते.

रवींद्रचा आणि माझा संबंध आणीबाणीनंतर खऱ्या अर्थाने वाढत गेला. महानगराच्या विविध जबाबदाऱ्या माझ्यावर येऊ लागल्या. मी महाविद्यालयीन प्रमुख झालो. रवींद्र तेव्हा परळ भागाचा कार्यवाह होता. त्याने भागाचा महाविद्यालयीन प्रमुख म्हणून गजानन साळवी या कार्यकर्त्याची नियुक्ती केली. गजानन साळवी संघात त्या मानाने नवीन, पण रवींद्रला त्याच्याविषयी खूप मोठा आत्मविश्वास होता. गजानन साळवीने तो सार्थ करून दाखविला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे काम एका उंचीला नेऊन ठेवले.

1978नंतर जवळजवळ दहा वर्षे रवींद्रशी सतत संबंध राहिला. रवींद्रच्या वैशिष्टयांचा जवळून परिचय होत गेला. रवींद्र मूळचा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता. संघाच्या सहयोगी संस्थांतील कार्यकर्ते संघकामात योग्यतम ठरतात असे नाही. संघाची कार्यशैली वेगळी. कार्यकर्त्यांकडून संघाच्या मागण्या प्रचंड असतात. पहिली मागणी वेळ देण्याची असते, दुसरी मागणी जे आपण करू शकतो तेच सहकाऱ्यांना सांगायचे, कोरडा उपदेश करायचा नाही. रोज शाखेत गेले पाहिजे हे सांगताना स्वतःला रोज शाखेत जावे लागते. बैठकांना नियमित आणि वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे, हे सांगताना त्याचे आचरण स्वतः करायला पाहिजे. रवींद्र शंभर टक्के संघकार्यकर्ता कधी झाला हे कळलेदेखील नाही. असा कार्यकर्ता श्वास-उच्छ्वासातून संघ जगत असतो. त्याचे वागणे, चालणे, बोलणे, रागावणे, सलगी देणे, सर्व काही संघमयच असते. म्हणून तो रागावला तर त्याचे दुःख होत नाही आणि पाठीवर कौतुकाची थाप पडली तर भरून पावल्यासारखे वाटते. मुंबईच्या संघातील रवींद्रचे स्थान असे होते.

कालांतराने संघाच्या दैनंदिन कामाच्या जबाबदारीतून मी मोकळा झालो आणि माझ्याकडे समरसता विषयाची जबाबदारी आली. रवींद्रकडे मात्र संघाचीच जबाबदारी राहिली. समरसता मंचाच्या प्रारंभीच्या दिवसात भल्याभल्या संघकार्यकर्त्यांचा या कामाला सैध्दान्तिक विरोध होता, व्यावहारिक विरोध होता आणि अनेकांच्या दृष्टीने समरसता हा थट्टा-मस्करीचा विषय झालेला होता. रवींद्र त्याला पूर्ण अपवाद होता. या कामाचे महत्त्व काय? याची रवींद्रला पहिल्या दिवसापासून जी जाणीव होती, ती थक्क करणारी होती. आजवर संघापासून दुर्लक्षित राहिलेला दलित वर्ग संघाशी जोडला गेला पाहिजे, आपल्याविषयी त्यांच्या मनात जे भ्रम आहेत, ते दूर झाले पाहिजेत या बाबतीतल्या रवींद्रच्या धारणा बावन्नकशी सोन्यासारख्या स्वच्छ आणि शुध्द होत्या.

यामुळेच संघाच्या व्यासपीठावर यापूर्वी कधी न आलेले प्रा. केशव मेश्राम, नामदेव ढसाळ, शांताराम नांदगावकर अशांसारखी फार मोठी माणसे रवींद्रच्या प्रयत्नामुळे आली. त्यांच्याशी संपर्क ठेवणे, त्यांच्याशी सलगी निर्माण करणे हे काम रवींद्रने मन लावून केले. शांताराम नांदगावकर नंतर मुंबई समरसता मंचाचे अध्यक्ष झाले. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मुंबईत रवींद्रने अनेक कार्यक्रम घडवून आणले. समरसता परिषद, बौध्द प्रदर्शन, चैत्यभूमीवरील 6 डिसेंबरचे भोजन स्टॉल अशा सर्व कामांत रवींद्रने फार मेहनत घेतली. समरसता हा विषय फार वेगाने समाजात नेला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे.

संघकार्यकर्त्याला अनेक आघातांना सहन करीत काम करावे लागते. बरोबरचे सहकारी जेव्हा योग्य सहकार्य देत नाहीत, विपरीत विचार करतात, तेव्हा सगळयात मोठे आघात बसत असतात. अशा वेळी चित्ताची प्रसन्नता ठेवून कोणाविषयी कसली कटुता मनात निर्माण न करू देता, काम करीत राहावे लागते. आज याला काही समजत नाही, पण उद्या समजेल, या आशेवर आपल्याला जे समजले त्यावर काम करीत राहावे लागते. कधी कधी रवींद्र माझ्याशी बोलत असे, त्याची बोलण्याची एक शैली होती - ''रमेश, तुला सांगतो, आपण हे जे समरसतेचे काम करत आहोत ना, हे संघात रुजायला फार वेळ लागेल.'' काही नावे घेऊन तो सांगत असे, यांचे असे असे विचार आहेत. माझ्याकडून उत्तराची अपेक्षा नसे, कारण माझे अनुभव काय यापेक्षा वेगळे नसत. आपण जे काही काम करतो आहोत ते संघाला पुढे नेणारे आहे, समाजाच्या हिताचे आहे, या बाबतीत आमच्या मनात थोडीशीदेखील शंका नसे.

मी तृतीय वर्षाला असताना तेव्हाचे सरकार्यवाह माधवराव मुळे यांचा भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील 26व्या श्लोकावरील बौध्दिक वर्ग झाला होता. तो श्लोक असा -

मुक्तसड्ोनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः।

सिध्दयसिध्दयोर्निर्विकारःकर्ता सात्त्वि उच्यते॥26॥

अनासक्त, निरहंकारी, धैर्य व उत्साह यांनी युक्त, कर्मातील यशापयशाने मनाची समता ढळू न देणारा असा जो कर्ता, त्याला सात्त्वि कर्ता म्हणतात. रवींद्र या श्लोकात वर्णन केलेला सात्त्वि कार्यकर्ता होता. या श्लोकात दिलेल्या गुणांबरोबरच रवींद्रकडे आणखी काही गुण होते. गीतेच्या श्लोकांचा आधार घेऊन सांगायचे तर -

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः॥7॥

(अध्याय 13, श्लोक 7)

- अभिमानाचा अभाव, दंभ नसणे, अहिंसा, क्षमाशीलता, वागणुकीत सरळपणा, गुरुसेवा, शुचिर्भूतपणा, स्थैर्य, मनोनिग्रह.

एवढे मोठे यशवंत भवन रवींद्रने दिवस-रात्र मेहनत करून उभे केले. त्यासाठी रवींद्रला किती कष्ट उपसावे लागले असतील आणि कोणत्या मान-सन्मानातून जावे लागले असेल, हे तोच जाणो. परंतु त्याचा अभिमान शून्य होता. कीर्ती कॉलेजच्या व्यवस्थापनात आणि तेथे नवनवीन शैक्षणिक संकुले सुरू करण्यात रवींद्रने ढासळत्या प्रकृतीतदेखील प्रचंड मेहनत घेतली. परंतु त्याचे श्रेय त्याने कधी घेतले नाही, त्याचा कधी चुकूनही उच्चार केला नाही.

रवींद्रची एक प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात कायम राहणार आहे, ती म्हणजे चेहऱ्यावर कोणताही ताण नसलेली, कोणताही गंभीर भाव नसलेली, सदैव हसतमुख अशी प्रतिमा. एवढे सगळे व्याप करायचे आणि ते करत असताना स्वतः मात्र शेवटच्या श्वासापर्यंत वन रूम किचनच्या जागेतच राहायचे. कशाचे श्रेय नाही आणि कशाचे दुःख नाही. जे काम अंगावर घेतले आहे, ती कर्मपूजा समजून त्याचे फल संघाला अर्पण करून टाकायचे. आपण स्वतः यापासून पूर्णपणे अलिप्त राहायचे. हे लिहायला मला फार सोपे जाते, रवींद्रने या जीवनाचा आदर्श सर्वांपुढे उभा केला. अशा निष्काम भावनेने जो काम करतो, त्याचे चित्त आणि बुध्दी सदैव प्रसन्न राहते.

शेवटची काही वर्षे रवींद्रला डायलेसिस करावे लागत असे. परंतु त्याची पीडा त्याच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही. आजारपणाने शरीरात घर केले, नको असलेल्या पाहुण्याचे रवींद्रने आनंदाने स्वागत केले. ये बाबा! तू आला आहेस, तर आता सुखाने राहा आणि आपण दोघेही जण एकसाथ शेवटचा प्रवास करू. अर्जुनाला गीता सांगताना भगवान कृष्णाने म्हटले की, मनाची अशी अवस्था ही ब्राह्मी स्थिती आहे. रवींद्रने संघसाधना करून ही स्थिती प्राप्त केली आणि कृष्णाने आश्वासन दिले की, शेवटच्या क्षणांपर्यत जो या स्थितीत राहतो, त्याला अमृततत्त्व प्राप्त होते. रवींद्र आता त्या स्थितीला गेलेला आहे.

vivekedit@gmail.com