विकासपुरुष

विवेक मराठी    25-Aug-2018
Total Views |

राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि लोकशाही या चार बाबतीत अटलजींच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले व भरीव काम केले. म्हणूनच ते भारतीय जनतेच्या मनावर राज्य करू शकले.  त्यांच्या सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम यांचा या लेखात थोडक्यात आढावा घेतला आहे.

मा. अटलजींनी 1996 साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. खऱ्याखुऱ्या अर्थाने एका बिगर काँग्रेसी नेत्याने भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा तो देशाच्या 49 वर्षांच्या इतिहासातला पहिला क्षण होता. अटलजींपूर्वी झालेले सर्व पंतप्रधान हे आपल्या राजकीय आयुष्यात कधी ना कधी काँग्रेसबरोबर जोडलेलेच होते. पहिला सर्वस्वी बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा सन्मान ज्याप्रमाणे अटलजींना मिळाला, तसेच तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. 1996 ते 2004 या कालावधीत त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिले बिगर काँगेसी पंतप्रधान ठरण्याचा बहुमानही अटलजींनीच मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला 19 मार्च 2003 रोजी पाच वर्षे पूर्ण झाली व पाच वर्षे सत्तेवर राहणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. पंतप्रधान म्हणून त्यांनी 24 पक्षांच्या 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे नेतृत्व केले. हाही एक राजकीय विक्रमच होता.

अटलजींनी वेगवेगळया विचारसरणींच्या विविध राजकीय पक्षांना एकत्र आणून स्थापन केलेल्या 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीएचे) यशस्वी नेतृत्व केले. त्यापूर्वीचा देशातील अशा आघाडयांचा अनुभव चांगला नव्हता. 1967मध्ये सर्वप्रथम 'संयुक्त विधायक दल - संविद'च्या नावाखाली काही राज्यांमध्ये बिगर काँग्रेसी पक्षांच्या आघाडया सत्तेवर आल्या. नंतर 1977 साली आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जनता पार्टी केंद्रात व अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आली. पण हे सर्व प्रयोग अल्पजीवी ठरले. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्याची कर्तबगारी एकाही बिगर काँग्रेसी आघाडीला दाखवता आली नाही. 1980चे चरणसिंग सरकार, 1989चे विश्वनाथ प्रताप सिंह सरकार, 1990चे चंद्रशेखर सरकार, 1996मधील देवेगौडा व पाठोपाठ गुजराल सरकार ही सर्व सरकारे केंद्रात टिकली नव्हती. काही राज्यांमध्ये आलेली बिगर काँग्रेसी सरकारेही अल्पजीवीच ठरली होती. त्यामुळे केंद्रामध्ये किंवा राज्यांमध्ये बिगर काँग्रेसी आघाडी सरकार सत्तेवर आले, तर केवळ अस्थिरता निर्माण होते व केवळ आपणच स्थिर सरकार देऊ  शकतो असा प्रचार काँग्रेस सहजगत्या करू शकत असे व जनतेलासुध्दा तसेच वाटायला लागले होते. त्या पार्श्वभूमीवर अटलजींनी 'आघाडीचे कडबोळे सरकार' पाच वर्षे चालवून दाखवले आणि काँग्रेसचा अपप्रचाराचा मुद्दा आपल्या कर्तृत्वाने खोडून काढला. 1998पासून 2004पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांनी एनडीएचे आघाडी सरकार यशस्वीपणे चालवले व आघाडी सरकार टिकू शकते व काम करू शकते हे दाखवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात आघाडयांचे राजकारण यशस्वी झाले.

अटलजींची सहा-साडेसहा वर्षांची राजवट काहीशी अल्पजीवी वाटली, तरी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरली. आपल्या या कार्यकाळात अटलजींनी अणुचाचण्या करून देशाला अण्वस्त्रधारी देशांच्या रांगेत नेऊन बसवले. त्यांच्या कारकिर्दीत देशाने अनेक चढ-उतार पाहिले, अनेक संकटांना तोंड दिले, पण देश याच काळात झपाटयाने पुढे जात असल्याचा अनुभवही घेतला. 1998च्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेसह अनेक प्रगत देशांनी आपल्या देशावर लादलेले आर्थिक निर्बंध, ओरिसातील चक्रीवादळ, कारगिल युध्द, गुजरातमधील भूकंप आणि दुष्काळ अशा विविध आणि वेगवेगळया प्रकारच्या संकटांवर अटलजींच्या सरकारने यशस्वी मात केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समर्थ नेतृत्वामुळे देशात स्थैर्य निर्माण झाले व विकास झाला. परिणामी एक आर्थिक व आण्विक शक्ती म्हणून जागतिक भारताचा पातळीवर उदय झाला.

राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि लोकशाही या चार बाबतीत अटलजींच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले व भरीव काम केले. त्यांच्या सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम यांचा इथे थोडक्यात आढावा घेतला आहे.

1998 साली अटलजींच्या सरकारने अणुचाचण्यांचा निर्णय घेतला. पोखरण येथे या चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमुळे देश अण्वस्त्रधारी बनला व आण्विक शक्ती म्हणून उदयाला आला. ह्या चाचण्यांनंतर अमेरिकेने व अन्य प्रगत देशांनी आपल्यावर आर्थिक निर्बंध लादले. पण अटलजींनी त्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांनाही समर्थपणे तोंड दिले व आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर अमेरिकेसकट सर्व प्रगत देशांशी उत्तम मैत्रीचे संबंध स्थापन केले. रशिया आणि फ्रान्स यांच्याशी संरक्षण करार करून त्यांनी देशाच्या सुरक्षेची भक्कम व्यवस्था केली.

पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी अटलजींनी लाहोर बसयात्रा काढली. त्या यात्रेला अपेक्षित यश मिळाले नाही हे खरे असले, तरी भारत शांततेसाठी सतत प्रयत्न करत आहे पण पाकिस्तानच युध्दखोर आहे हे जगाच्या व्यासपीठावर प्रभावीरित्या नोंदवले गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानला एकाकी पाडण्याची प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली. त्याच्या पाठोपाठ कारगिल युध्दात पाकिस्तानचा पराभव करून आपण त्या देशाला धडा शिकवला.

जम्मू-काश्मीरमध्ये 2003मध्ये मुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक घेऊन अटलजींनी आश्वासन पूर्ण केले, तसेच भारत सरकारच्या या पुढाकारामुळे पाकिस्तानला धक्का बसला. या विधानसभा निवडणुकीत जनतेने दहशतवाद्यांची भीती झुगारून मतदान केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर मिळाले.

छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल ही तीन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याचे आश्वासन भाजपाने याच काळात पूर्ण केले. या तीन राज्यांची निर्मिती शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. आंध्र प्रदेशचे विभाजन करताना काँग्रेसने नंतरच्या काळात जे राजकारण केले व जो हिंसाचार त्या भागात उसळला, त्याच्या तुलनेत अटलजींचे हे यश फार मोठे होते. अटलजींनी सातत्याने महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्दयांवर मुख्यमंत्र्यांशी व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत केली. एनडीएच्या काळात केंद्र-राज्य संबंध सुधारले. म्हणूनच दक्षिण भारताच्या राजकारणात अनेक दशके कळीचा व हिंसक आंदोलनांचे कारण ठरलेला 'कावेरी लवाद'ही त्यांनी यशस्वी करून दाखवला. विशेष म्हणजे ह्या वादात गुंतलेल्या एकाही राज्यात त्या वेळी भाजपाची सत्ता नव्हती. 

ईशान्य भारताच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात प्रथमच स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली. बोडो लिबरेशन टायगर्सशी शांतता करार यशस्वीरित्या झाला. समाजकल्याण मंत्रालयाचे नामकरण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय केले गेले. आदिवासी विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. या दोन्ही निर्णयांमुळे सामाजिकदृष्टया मागासलेल्या समूहांच्या मनात आत्मविश्वास जागा करता आला.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच एनडीए सरकारने पायाभूत सुविधांच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक बदल करून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सुरुवात केली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकाता या चार महानगरांना जोडणारी सुवर्ण चतुष्कोन योजना, देशातली सर्व खेडी बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी हाती घेतलेली 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजना' हे त्यातले काही प्रमुख प्रकल्प!

ह्याच काळात दळणवळण व दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. टेलीफोन मोबाइल व लँडलाइन क्षेत्रात झपाटयाने प्रगती झाली. मोबाइलचे दरही झपाटयाने घसरले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात - आयटी क्षेत्रात - भारत महत्त्वाचा देश म्हणून उदयाला आला. सॉफ्टवेअर व हार्डवेअर निर्यातीतून देशाला प्रचंड उत्पन्न मिळाले. निर्गुंतवणुकीचा निर्णय अटलजींनी धाडसाने व पारदर्शकपणे राबवला.

सामाजिक विकासाच्या योजना - अंत्योदय अन्न योजना (गरिबांसाठी जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना), सर्व शिक्षा अभियान व त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याची घटना दुरुस्ती, वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरबांधणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतमालाच्या किमान हमीभावामध्ये सातत्याने वाढ, ग्रामविकासासाठी प्रथमच स्वतंत्र मंत्रालय, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखून किमती स्थिर ठेवणे अशा एक ना अनेक बाबतीत अटलजींच्या सरकारने अपूर्व कामगिरी करून दाखवली. याच काळात चौदा राज्यांमध्ये व्यापक दुष्काळ पडला, तरीही देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू दिला नाही आणि जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू दिले नाहीत.

अटलजींनी आपल्या अल्प कारकिर्दीत अशा प्रकारची सर्वांगीण भरीव कामगिरी करून दाखवली, म्हणूनच ते भारतीय जनतेच्या मनावर राज्य करू शकले. आपल्या जीवनाच्या अखेरच्या आठ-नऊ वर्षांमध्ये ते सार्वजनिक जीवनापासून पूर्ण दूर होते. तरीही भारतीय जनतेने त्यांच्याबद्दलच्या प्रेमाचा आविष्कार ज्या पध्दतीने केला, ते दृश्य केवळ अभूतपूर्व होते. आज अटलजी आपल्यातून गेले असले, तरी जोपर्यंत देशाचे चार कोपरे जोडणारे विशाल महामार्ग, सर्व खेडी जोडणारे चांगले ग्रामीण रस्ते आपण वापरत राहू, तोपर्यंत अटलजींचे नाव जनमानसावर कोरलेलेच राहणार आहे.

madhav.bhandari@yahoo.co.in