देवभूमी केरळ उभे राहावे...

विवेक मराठी    25-Aug-2018
Total Views |

केरळात गेल्या पंधरा दिवसांत पावसाने थैमान घातले होते. संपूर्ण केरळ या नैसर्गिक आपत्तीशी झुंजताना आपण पाहिले आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असून पुनर्वसन आणि पुनर्निर्माण कार्याला वेग येईल. केरळवर आलेली ही आपत्ती निसर्गनिर्मित किती आणि मानवनिर्मित किती? या विषयावर गेले काही दिवस विविध माध्यमांतून खूप चर्चा झाली आहे. पर्यटनाचे केंद्र असणाऱ्या केरळमध्ये अनेक गोष्टी निसर्गाविरुध्द झाल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल जपता आला नाही हे खरे असले, तरी केरळ पुन्हा नव्याने उभे करण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पर्यावरण, निसर्ग, जल व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण आज केरळच्या पूरपीडितांना आधार देऊन त्यांना स्थिर करणे याला प्राथमिकता देण्याची गरज आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीचा हात पुढे करणे हा आपला मानवी स्थायिभाव आहे, त्याची प्रचिती केरळ आपत्तीमध्येही आली आहे. व्यंकटेश मंदिराच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या 25 किलो तांदळापासून ते केंद्र शासनाने केलेल्या 4880 कोटी रुपयांपर्यंत वेगवेगळया पातळयांवरचा मदतीचा ओघ केरळच्या दिशेने सुरू झाला. अनेक राज्यांनी रोख मदतीबरोबरच अन्नधान्य, औषधे, पाणी, कपडे अशा वेगवेगळया स्वरूपात केरळला मदत पुरवली आहे. केरळच्या आपत्तीसंदर्भात परदेशातूनही मोठया प्रमाणात मदतीची घोषणा झाली. मात्र केंद्र सरकारने ही मदत स्वीकारण्यास नकार दिला आहे. या निर्णयाबाबतही प्रसारमाध्यमांतून खूप चर्चा झाली आहे. आपली समस्या आपण निवारण करू, आपण आपल्या पूरपीडित बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या आपत्तीतून केरळला बाहेर काढू, अशी या नकारामागची भूमिका असावी. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपत्तीच्या काळात केलेली मदत केवळ मदत नसते, तर त्याला अनेक विषय जोडलेले असतात, म्हणून आपण याआधीही अनेक वेळा अशा मदतीला नकार दिला आहे. केरळमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाने उच्चस्तरीय समितीही नेमली आहे.

केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर अनेक संस्थांनी मदतकार्य सुरू केले, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्तेही होते. केरळमध्ये गेली अनेक वर्षे कम्युनिस्टांकडून संघस्वयंसेवकाच्या हत्या होत आहेत. केरळमध्ये खूप मोठया पातळीवरचा वैचारिक संघर्ष हिंसात्मक मार्गाने चालला आहे. पण केरळवर आपत्ती आली आणि सारा संघर्ष बाजूला ठेवून  दोन्ही विचारधारांचे कार्यकर्ते आपत्तिग्रस्तांना मदत करण्यासाठी मैदानात उतरले. कारण ही आपत्ती उजव्यांवर आली नव्हती किंवा डाव्यांवर आली नव्हती. ती केरळच्या भूमीवर आली होती. केरळमध्ये आलेली आपत्ती उजवे-डावे भेद पुसण्यात यशस्वी ठरली आणि केवळ केरळचे नागरिक हीच ओळख शाबूत राहिली. केरळची पूरपरिस्थिती इतकी गंभीर होती की त्यातून पीडितांना बाहेर काढण्यासाठी सैन्यदलांची मदत घ्यावी लागली. सैन्यदलाचे काम जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामही महत्त्वाचे आहे. आपले कुटुंब, नातेवाईकही पूरपीडित असताना हे सर्व कार्यकर्ते आपत्तिनिवारणाचे कार्य करत होते. आपले दुःख, वेदना, अडचणी बाजूला ठेवून ते समाजाचे दुःख दूर करत होते. त्याचे कारण त्यांच्या मनात असणारा आत्मीयभाव. आपल्या समाजावर येणारी आपत्ती आपणच दूर केली पाहिजे, ही भावना त्यामागे होते आणि याच भावनेतून ईदचा नमाज पठण करण्यासाठी मंदिर खुले करून देण्यात आले.

केरळचे वर्णन 'देवभूमी' असे केले जाते. पण हे वर्णन खोटे ठरवणारे व्यवहार मागील काही दशकांपासून केरळच्या भूमीत चालू होते. वैचारिक संघर्ष हिंसेत परावर्तित झाला होता, भौतिक सुखासाठी निसर्गावर अत्याचार केले होते. देशात सर्वात जास्त साक्षरता असणाऱ्या राज्यांत केरळ राज्य अग्रेसर आहे. पण ही साक्षरता केरळच्या शाश्वत विकासासाठी वापरली असती, तर कदाचित केरळचे चित्र वेगळे दिसले असते. सर्व पातळयांवरच्या अतिरेकामुळे हा निसर्गाचा कोप झाला आहे का? याचा आपण विचार करायला हवा. निसर्गाच्या मार्गत आपण आडकाठी केली, तर निसर्ग ती आडकाठी मोडून काढतो आणि आपला मार्ग प्रशस्त करत असतो, हा धडा केरळच्या आपत्तीने आपल्याला शिकवला आहे. केरळमध्ये जी स्थिती निर्माण झाली, तशीच स्थिती अन्य राज्यांतही होऊ शकते, याचीही जाणीव या आपत्तीने करून दिली आहे. आपण आपले जगणे आणि पर्यावरण यांच्याकडे गंभीरपणे पाहणार आहोत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पूर आला, गेला. आता केरळ पुन्हा नव्याने उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. या देशाचे नागरिक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. शासकीय पातळीवरून पायाभूत सुविधा आणि पुनर्निर्माण या स्वरूपाचे काम होईल; पण मनामनात एकतेचा हुंकार निर्माण करण्यासाठी, अभेद समाजजीवन आणि सर्व पातळयांवरची अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपल्यालाच मैदानात उतरावे लागेल. याआधीचा केरळ, तेथील संघर्षाचा इतिहास पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. आता आपल्याला नवा केरळ उभा करायचा आहे जो देवभूमी असेल, संघर्षविरहित असेल. अशा प्रकारचा केरळ शासकीय योजनांतून निर्माण होणार नाही, तर सर्व समाजाच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून निर्माण होईल.