सरस्वती

विवेक मराठी    25-Aug-2018
Total Views |

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे भारत-पाकिस्तानमधील सरस्वती नदी आणि तिचे मंदिर.

सरस्वती नदी कधीतरी प्राचीन काळी लुप्त झाली, ही स्मृती कित्येक पिढयांनी वाहिली. ही नदी जरी लुप्त झाली, तरीही 'गंगा-यमुना-सरस्वती'च्या त्रिवेणी संगमात ती आहे. 'गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा' अशा स्तोत्रांमध्येही ती आहे. या नदीची सर्वात प्राचीन स्तुती मिळते ती ॠग्वेदात - 

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती ॥2.41.16॥

जी सर्वात महान आई आहे, सर्वोत्तम नदी आहे आणि सर्वात मोठी देवी आहे, अशा सरस्वतीला मी वंदन करतो. हिमालयापासून सागरापर्यंत वाहणाऱ्या, सरोवरांनी युक्त असलेल्या नदीला मी वारंवार वंदन करतो.

सरस्वती नदीच्या काठांवर वेदांची रचना झाली. वैदिक मंत्रांचे जयघोष तिच्याभोवती घुमले. तिच्या कुशीतील आश्रमात विद्यार्थ्यांनी गुरूंकडून वेदांचे पाठ ग्रहण केले. सरस्वतीच्या पाण्याप्रमाणेच - वाहणे आणि धारकाला शुध्द करणे हा ज्ञानाचा धर्म आहे. ज्ञानाचे वाहन आहे - भाषा आणि शब्द. भाषेतून, वाचेतून ज्ञान वक्त्याकडून श्रोत्याकडे वाहते. यामुळे सरस्वती ही वाचेची, वाणीची, सुरांची, भाषेची, शब्दाची, वेदांची आणि ज्ञानाची देवता झाली!

इ.स.पूर्व 3,000पासून इ.स.पूर्व 1,700पर्यंत जगातील एक महान संस्कृती सरस्वती नदीच्या काठावर वसली होती. सरस्वतीचे पात्र काही ठिकाणी 10 कि.मी. इतके रुंद होते. यमुना, सतलज आणि दृषद्वती या तिच्या उपवाहिन्या होत्या. अशी समृध्द सरस्वती या संस्कृतीचा प्राण होती. कालांतराने यमुना व सतलज यांचा मार्ग बदलला. त्यावर सरस्वती क्षीण होऊ लागली. इ.स.पूर्व 1,900मध्ये ही नदी लुप्त झाली. तिच्या काठावरची गावे ओस पडली आणि सरस्वती-सिंधू संस्कृती लयास गेली.

प्राचीन साहित्यात या घटनेचे पडसाद उमटलेले दिसतात. ॠग्वेदात ती सर्वोत्तम नदी होती, महाभारतात तिचे पात्र ठिकठिकाणी कोरडे पडले होते आणि शेवटी पुराणांमध्ये सरस्वतीची दैवी नदीची जागा गंगेने घेतली. आता आपण देवी गंगेची आरती करतो. गंगामैय्या या संबोधनातून तिला आईच्या रूपात पाहतो आणि परमपवनी पापक्षालिनी नदी म्हणून गंगास्नान करतो.   

सरस्वती अदृश्य झाली या घटनेच्या भौगोलिक खुणा 18876मध्ये ब्रिटिश इंजीनियर ओल्डहॅमला सापडल्या. राजस्थानमध्ये फिरताना त्याच्या लक्षात आले की पावसाळयाच्या दिवसात घग्गर नावाची एक लहानशी नदी हरयाणा, राजस्थानमधून वाहते. ही लहान नदी समुद्रापर्यंत पोहोचत नाही. तरीही तिचे पात्र मात्र अतिविशाल आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात या कोरडया पात्राला हकरा असे नाव आहे. ओल्डहॅमने निष्कर्ष काढला की घग्गर नदीने स्वत:चे पात्र तयार केले नसून, एका प्राचीन विशाल नदीच्या पात्रातून ती वाहते. ती प्राचीन नदी म्हणजेच सरस्वती.

सरस्वती लुप्त झाली, या घटनेच्या पुरातत्त्वीय खुणा 1950च्या दशकापासून मिळाल्या. त्या वेळी भारतीय पुरातत्त्व संस्थेला या कोरडया नदीच्या काठावर सरस्वती-सिंधू संस्कृतीची अधिकांश गावे सापडली.

सरस्वती जशी वाचेची देवी आहे, तशीच लिखाणावरही तिची छाप पडलेली दिसते. काश्मीरच्या परिसरात लिखाणासाठी जी लिपी तयार झाली, तिचे नाव होते - शारदा. ही लिपी सध्याच्या काश्मीर, पंजाब, उत्तर पाकिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तान या भागात वापरली जात होती. पेशावरजवळ सापडलेली दुसऱ्या शतकातील बख्शाली हस्तलिखिते शारदा लिपीत बध्द आहेत. तसेच पाकिस्तानातील अटक येथे शारदा लिपीमधून लिहिलेला, आठव्या शतकातला एक शिलालेख उपलब्ध आहे आणि अकराव्या शतकातील अफगाणिस्तानतील काबुलमध्ये हिंदूशाही राजांच्या नाण्यांवर शारदा लिपी वापरलेली दिसते.

शारदा लिपीमधून उत्कृष्ट संस्कृत साहित्य लिहिले गेले - कल्हाणची राजतरंगिणी, सोमदेवचे कथासरित्सागर, क्षेमेंद्राचे बृहतकथामंजिरी आणि कितीतरी. अकराव्या शतकात महमूद गझनवीबरोबर आलेला विद्वान अल-बरुनीने लिहिले आहे - भारतात शारदा लिपीमधून लिहिलेली हजारो पुस्तके आहेत! 

काश्मीरच्या खोऱ्यात, कृष्णगंगा व मधुमती नद्यांच्या संगमाजवळ शारदेचे प्राचीन मंदिर उभे आहे. हे शारदा पीठ विद्येचे माहेरघर होते. आठव्या शतकात आद्य शंकराचार्य गुजरात, सिंधुदेश, गांधार, काबुल, पेशावर आदी ठिकाणी जाऊन काश्मीरमध्ये आले. त्या वेळी मंदिराच्या चार द्वारांवर असलेल्या पंडित समूहाशी शास्त्रार्थ करून त्यांचा पराभव केल्यावरच शारदा पीठात प्रवेश मिळत असे. शंकराचार्यांनी त्या ठिकाणी चारही मंडळांचा पराभव केला. त्यावर पंडितांनी आचार्यांचा सन्मान करून त्यांच्यासाठी मंदिराची द्वारे उघडली. शारदेच्या सर्वज्ञपीठावर आसनस्थ होण्याचा मान आचार्यांना मिळाला. पुढे बाराव्या शतकात जयचंद राठोडच्या दरबारातील श्रेष्ठ कवी श्रीहर्षसुध्दा शारदापीठ येथे आपल्या काव्याचे वाचन करायला आला होता.  

शारदा पीठ आज पाकव्याप्त जम्मूमध्ये आहे. 1947मधील दसऱ्याच्या जवळपास पाकिस्तानी टोळयांनी केलेल्या हल्ल्यात या सरस्वतीच्या मंदिराची प्रचंड हानी झाली. भारताची फाळणी होईपर्यंत शारदा मंदिर भाविकांसाठी खुले होते. इथे भक्त नियमित    यात्रेला जात असत. या मंदिरातील यात्रा पुनश्च सुरू व्हावी व काश्मिरी हिंदूंना दर्शन घेता यावे, याकरिता वाजपेयी सरकारच्या काळात प्रयत्न सुरू झाले होते. त्या प्रयत्नांना जेव्हा यश येईल तेव्हा येवो, पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तेव्हा येवो.... तोपर्यंत आपण सरस्वती नदीप्रमाणे, शारदा पीठ हे सरस्वतीचे मंदिर आपल्या स्मरणातून जाऊ देऊ नये!