माणूसपण जपणारा माणूस

विवेक मराठी    29-Aug-2018
Total Views |


अटलजींना लोकांनी आपला माणूस मानले, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ उपाधी आहे. नेता जेव्हा आपले माणूसपण आपल्या जीवनातून जगायला लागतो, तेव्हा तो लोकांच्या हृदयात जाऊन बसतो. हे माणूसपण असते माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करण्याचे, त्याच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करण्याचे. या कष्टातून मला काय मिळणार आहे, याची क्षणभरदेखील चिंता न करण्याचे अटलजी असे जीवन जगत राहिले.

संस्कृत सुभाषितकार म्हणतो की, ज्याच्या जीवनाने संसारात जन्म-मृत्यू होत येत-जातात, परंतु त्याचाच जन्म सार्थ होतो, त्याचा समाज आणि वंश याची फार मोठी कीर्ती होते. अटलजींनी हे सुभाषित आपल्या जीवनाने सार्थ करून दाखविलेले आहे. अटलजी गेल्यानंतर बहुतेक सर्वांनी 'ते फार महान नेते होते, कवी होते, संवेदनशील होते, उत्तम वक्ता होते, अनेकांना ते पितृसमान होते' अशा अनेक शब्दांत त्यांचे वर्णन केलेले आहे. ते सर्व खरेही आहे. त्यांचे जीवन सार्थकी लागल्याची ही सर्व वाक्ये आहेत.

माणूस मोठा कशामुळे होतो? त्याची उंची खूप असेल, तर त्याला लंबूटांग म्हटले जाते. शारीरिकदृष्टया तो इतरांपेक्षा मोठा असतो. दुसरा एखादा बुध्दीने खूप मोठा असतो. इतर माणसे त्याच्या पुढे सामान्य बुध्दीची ठरतात. एखादा माणूस शीघ्रकवी, रसाळ कविता लिहिणारा असतो, तो ग.दि. माडगूळकर होतो. एखादा सभेला मंत्रमुग्ध करणारा वक्ता असतो. तो तासन्तास बोलला तरी श्रोत्यांना कंटाळा येत नाही. आपल्याकडे शिवाजीराव भोसले तसे होते. माणसाला मोठेपण देणारे हे सर्व विषय आहेत. परंतु हे सर्व विषय जरी माणसाला मोठेपण देऊन जाणारे असले, तरी त्याला फार मोठी उंची देणारे असतात असे नाही. ती उंची गाठण्यासाठी मोठया माणसाला फार लहान व्हावे लागते. इतके लहान व्हावे लागते की, तो आठवणींचा सूक्ष्म आलेख बनून सर्वसामान्य माणसाच्या मनात जावा लागतो. उंच अटलजी असे लहान झाले आणि सूक्ष्मरूपाने सर्वसामान्य माणसाच्या मनात आणि हृदयात जाऊन बसले.

अटलजी गेल्याचे दुःख न झालेला माणूस शोधून सापडणे कठीण आहे. 'हिन्दू तन मन, हिन्दू जीवन, रग रग हिन्दू मेरा परिचय' म्हणणारे अटलजी केवळ हिंदूंचे कधीच झाले नाहीत. धर्माच्या सीमा पार करून ते सर्वधर्मीयांच्या मनामध्ये जाऊन बसले. टॅक्सी चालविणारा अस्लमदेखील म्हणाला, ''एक नेक आदमी गया।'' अटलजींच्या कविता पाठ नसलेले - किंबहुना कधी त्यांनी कधी ऐकल्या असतील असेही नाही, असा सर्वसामान्य माणूसदेखील हळहळला. व्यावहारिक विचार केला तर वयाच्या 93व्या वर्षी जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्यात अतीव दुःख करण्याचे काही कारण नसते. यापेक्षा माणूस जास्त जगू शकत नाही. त्याने शंभरी गाठणे हा अपवाद असतो. त्यामुळे असा मृत्यू नैसर्गिक असतो, जो कुणालाही टाळता येत नाही. न टाळता येणारे विधिलिखित या शब्दात त्याचे वर्णन केले जाते. हे सर्व तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला माहीत असते, त्या बाबतीत तो अडाणी नसतो. तरीही तो शोक करतो, कारण अटलजींचा मृत्यू त्याच्या मनाला स्पर्श करून गेलेला असतो आणि हृदयाला हलवून गेलेला असतो.

लोक अटलजींची भाषणे कदाचित लक्षात ठेवणार नाहीत, ती विसरली जातील किंवा पुस्तकात शब्दरूपाने संग्रहित केली जातील. भविष्यातील अभ्यासकांना त्याचा उपयोग होईल. अटलजींच्या कविता अधूनमधून सादर केल्या जातील. लेखांतून, भाषणांतून उद्धृत केल्या जातील. अटलजींच्या स्मृतीचे तसे होणार नाही. 'जब तक चाँद सूरज रहेगा, अटलजी तुम्हारा नाम रहेगा' ही वाक्ये भावी काळात यथार्थ ठरतील. याचे कारण असे की, भाषणे, कविता, राजकारण या सर्वांपेक्षा अटलजींचे माणूसपण फार मोठे होते. माणसाने आपले माणूसपण कसे जपले पाहिजे आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर ते कसे जतन केले पाहिजे, हे अटलजींनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. हे त्यांचे सर्वात मोठेपण आहे आणि इतरांपेक्षा त्यांना यामुळे एक विशेष उंची प्राप्त झाली आहे.

आध्यात्मिक क्षेत्रात आपले माणूसपण कसे जतन करायचे हे ज्ञानदेवांनी अल्पजीवन जगून जगाला दाखविले. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर परमेश्वराकडे पसायदान मागताना त्यांनी 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील ते तो लाहो। प्राणिजात॥' अशी प्रार्थना केली. विश्वकल्याणाची इच्छा धरली. ही भारतीय आत्म्याची हाक आहे. हेच भारतीयत्व आहे आणि हेच हिंदूपण आहे. अटलजींनी ते आपल्या हिंदू तन मन, हिंदू जीवन या गीतात व्यक्त केलेले आहे. काय म्हणून गेले अटलजी -

 भूभाग नही शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय।

हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय॥

 

इस कोने से उस कोने तक कर सकता जगती सौरभ मै।

हिन्दु तन मन हिन्दु जीवनरग रग हिन्दु मेरा परिचय॥

 

हे आपले सर्वव्यापक, सर्वसमावेशक हिंदूपण अटलजींनी राजकीय क्षेत्रात जगून दाखविले. तो कालखंड फार वाईट कालखंड आहे. असहिष्णू विचारधारांच्या प्रभावाचा कालखंड आहे. सेमेटिक मानसिकता व्यक्त करण्याचा कालखंड आहे. आमचा विचार मान्य करा, नाही तर आम्ही तुम्हाला राजकीयदृष्टया अस्पृश्य करून टाकू, तुमचे जगणे मुश्कील करून टाकू अशा कालखंडात अटलजींनी हिंदू तन मन, हिंदू जीवन आपल्या जीवनात जगून दाखविले. संघात एक गीत गायले जाते, त्याच्या ओळी आहेत - 'खडा हिमालय बता रहा है, डरो ना ऑंधी पानी में। डटे रहो अपने पथपर कठिनाई तुफानोमें।' अटलजी असे 'तुफानोसे टकरानेवाले हिमालय थे।'

देशातील सामान्य माणूस अटलजींना पाहत होता. कधीकधी भाषणे ऐकत होता. त्याच्या मनात हळूहळू एक प्रतिमा बनत गेली - हा चांगला माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, राजकारणात असून भानगडी न करणारा माणूस आहे, सत्तेसाठी झुंजणारा माणूस आहे, पण सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करणारा नाही, हा कधी जातीचा उच्चार करीत नाही, कधी धार्मिक भावना पेटवीत नाही, विरोधी नेत्यांवर कधीही व्यक्तिगत आघात करीत नाही, त्याचे बोलणे मर्यादापुरुषोत्तमाचे बोलणे असते. कुणाविषयी याच्या मनात द्वेष नाही, कुणाविषयी आकस नाही, कुणाविषयी दुजाभाव नाही, विरोधात आहेत तेही आपले आणि आपले आहेत ते तर आपलेच आहेत, अशा भावनेने काम करणारा हा जगावेगळा नेता आहे.

सामान्य माणसाला हे कुणी सांगितले नाही, कुणी तसे पुस्तक लिहिले नाही, पक्षाने तसे अभियान केले नाही, त्याची काही गरज नसते. टिळकांना लोकमान्य पदवी मिळाली. ती कुठल्या विद्यापीठाने दिली नाही, धर्मपीठाने दिली नाही, राज्यसत्तेने देण्याचा तर प्रश्नच नव्हता, लोकांनी त्यांना ही पदवी दिली. गांधीजींना महात्मा ही पदवी अशीच कुणाकडून मिळाली नाही, ती लोकांनी त्यांना दिली. डॉ. भीमराव आंबेडकरांना बाबासाहेब ही उपाधी अशी कुणीही दिली नाही, ती जनतेने दिली आहे. जनता जेव्हा पदवी देते, तेव्हा त्या पदवीचे मोल जनार्दनीय असते. जनता ही जनार्दन आहे. परमेश्वरानेच दिलेली ती उपाधी असते. अटलजींना लोकांनी आपला माणूस मानले, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ उपाधी आहे. नेता जेव्हा आपले माणूसपण आपल्या जीवनातून जगायला लागतो, तेव्हा तो लोकांच्या हृदयात जाऊन बसतो. हे माणूसपण असते माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करण्याचे, त्याच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करण्याचे. या कष्टातून मला काय मिळणार आहे, याची क्षणभरदेखील चिंता न करण्याचे अटलजी असे जीवन जगत राहिले.

असे जीवन जगणारा माणूस केवळ स्वतःपुरता मोठा होत नाही. अटलजी मोठे झाले खरे, पण त्यांनी आपल्याबरोबर समाजालाही मोठे केले. स्वतः मोठे होण्यात काही विशेष नसते. बुध्दीने, धनाने किंवा अन्य कलागुणाने वैश्विक मोठेपण प्राप्त करता येते. अशा मोठेपणाने समाज मोठा होत नाही. अटलजींसारख्या थोर पुरुषांची उंची वाढत असताना समाजाची उंचीदेखील वाढत जाते. समाजाची उंची वाढणे याचा अर्थ समाजाच्या नैतिक पातळीत वाढ होणे, समाजात भ्रातृभाव निर्माण होणे, अंधश्रध्दा आणि कुरिती यांच्यापासून मुक्त होण्यासाठी समाज धडपड करीत राहणे असा करावा लागतो. थोर पुरुष आपल्या जीवनाने समाज ज्या ठिकाणी आहे, त्यापेक्षा त्याला चार पावले आणखीन पुढे घेऊन जाण्याचे काम करतात, म्हणून त्यांची स्मृती चिरकाल राहते.

एक राजकीय इच्छाशक्ती नसणे हे भारतीय समाजाचे वैशिष्टय आहे. आपली राज्यघटना सर्वांना समान राजकीय ओळख देते, समान राजकीय अधिकारही देते, पण सामाजिक स्तरावर आपण जाती, पंथ, भाषा यांत विभाजित असतो. अटलजींनी हे विभाजन सांधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पंतप्रधान बनणे, 'शर्यतीतील एक पंतप्रधान' असे नव्हते. ते समाजाच्या राजकीय इच्छाशक्तीचे प्रतिनिधी झाले. आपल्या जीवनाने, अटलजींनी समाजात एकसारखी राजकीय संवेदना निर्माण करून समाजाला चार पावले पुढे नेले. ते स्वतः उंच झालेच, तसाच समाजही त्यांच्याबरोबर उंच झाला.   

  vivekedit@gmail.com