जो दिखता है, वोही बिकता है

विवेक मराठी    30-Aug-2018
Total Views |

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी (सिंपल लिव्हिंग ऍंड हाय थिंकिंग) हे तत्त्व एरवी अनुसरण्यासाठी कितीही महान असले, तरी काही ठिकाणी मात्र ते बाजूला ठेवावे लागते. श्रीमंतांचे असेही एक विश्व आहे, जेथे भपकेबाज राहणी हेच प्रवेशासाठीचे ओळखपत्र असते. व्यवसायाच्या संधी साधण्यासाठी मला तेही मिळवावे लागले. ज्यांना केवळ पैशाची भाषा समजते, त्यांच्याशी मला त्याच भाषेत बोलावे लागले आणि काही ठिकाणी भपक्याचे सोंगही आणावे लागले.

 एका प्रसिध्द मराठी उद्योगपतींच्या आत्मचरित्रातील एक आठवण मी पूर्वी वाचली होती. त्यांचा महाराष्ट्रात कारखाना होता आणि कच्च्या मालाच्या आयातीसाठी त्यांना परवान्याची गरज होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात नवी दिल्लीत उद्योग मंत्रालयाकडून असे परवाने दिले जात. मराठी माणसे राहणीत फारच साधी. जवळ पैसे आहेत म्हणून रोज रेशमी कपडे अंगावर मिरवण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हे मराठी माणसाचे वैशिष्टय. हे उद्योगपतीही त्याला अपवाद नव्हते. ते दिल्लीला जात तेव्हा रेल्वेने जात आणि साध्याशा लॉजवर उतरत. काही महिने हेलपाटे घालूनही त्यांचे काम होत नसल्याने ते काळजीत पडले. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही दप्तर दिरंगाईचे कारण त्यांना समजत नव्हते.

एक दिवस त्यांनी त्या मंत्रालयातील ओळखीच्या अधिकाऱ्यापुढे आपली समस्या मांडली. त्यावर तो हसून म्हणाला, ''साहेब, तुम्ही मोठे उद्योगपती आहात हे फक्त मला ठाऊक असून किंवा कागदोपत्री सिध्द होऊन काय उपयोग? लोक साध्या साध्या प्रश्नांतून तुम्हाला अजमावत असतात. तुम्ही रेल्वेने येता आणि लॉजवर राहता हे समजल्यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा काय प्रभाव पडणार? येथील नोकरदारांना उद्योगपती म्हणजे नेहमी विमानाने प्रवास करणारे, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारे आणि शोफर असलेल्या गाडीतून मंत्रालयात येणारे बघण्याची सवय असते. आधी या नोकरदारांवर प्रभाव पाडा, तरच तुम्ही मंत्रीमहोदयांपर्यंत पोहोचू शकाल.'' त्या उद्योगपतींनी या सल्ल्यातून योग्य तो बोध घेतला आणि सर्वप्रथम आपला मुक्काम एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवला. थोडा भपका दाखवल्यावर त्यांना अपेक्षित तो परिणाम घडून आला आणि त्यांचे काम लवकर झाले. ही आठवण वाचताना आपल्यालाही पुढे स्वत:साठी असाच सल्ला अंमलात आणावा लागेल, याची मला कल्पनाही नव्हती. प्रत्यक्षात पुढे ते घडले.

आमची 'अल अदील' कंपनी स्थिरावली होती, दुबईच्या व्यापारी वर्तुळात तिचे नाव झाले होते आणि 'अल अदील'चा चालक म्हणून मलाही लोक ओळखू लागले होते. पण तरीही मोठी झेप घेण्याच्या संधी काही आम्हाला मिळत नव्हत्या. मी त्यासाठी खूप प्रयत्न करायचो. नामवंत कंपन्यांच्या बडया अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचो, त्यांच्यापुढे आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेचे प्रेझेंटेशन द्यायचो. मोठमोठया उद्योगपतींशी ओळख प्रस्थापित करण्यासाठी व्यावसायिक मेजवान्यांची आमंत्रणे चुकवायचो नाही. तरीही काही हाताशी लागत नव्हते. मी त्यांच्यासाठी अनोळखीच होतो.

एक गोष्ट हळूहळू माझ्या ध्यानात येऊ लागली, ती म्हणजे आपल्या धंद्याचा प्रभाव पडण्यासाठी पुष्कळ बोलून उपयोग नसतो. काही गोष्टी न बोलताही दुसऱ्यांना जाणवून द्याव्या लागतात. विशेषत: उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गात वावरायचे तर तुमच्याकडे संपत्तीचे ओळखपत्र लागते. किमान तसा आव आणता आला पाहिजे. इथे भपक्याला महत्त्व आहे. तुमची कार साधी आहे की आलिशान आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. एकदा हा विचार प्रबळ झाल्यानंतर मी फारच मोठे धाडस करून रोल्स रॉईस कंपनीची महागडी फँटम मॉडेलची कार खरेदी केली. तिचे वैशिष्टय असे होते की कंपनीने गेल्या 105 वर्षांमध्ये तशा केवळ 18 गाडया बनवल्या होत्या आणि मी खरेदी केलेले मॉडेल दुबईतील पहिलेच होते.

ही कार खरेदी करताना एका बँकेने मला मदत केली होती. नंतर गाडीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मला त्या बँकेच्या व्यवस्थापकाला भेटावे लागले. माझी कंपनी, व्यवसायाचे स्वरूप याबद्दल त्या माणसाला इत्थंभूत माहिती होती. माझ्या कंपनीच्या अकाउंटमधील उलाढालीचे आकडे त्याच्या लक्षात होते. त्याने मला एक साधासा प्रश्न विचारला, ''दातार साहेब! दुबईत कुणाहीकडे नसलेली इतकी सुंदर कार तुम्ही खरेदी केलीत, तर दाखवायला आणली आहेत का? कुठे पार्क केलीय?'' त्यावर मी उत्तरलो, ''कुठे म्हणजे? आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये. बँकेची शाखा घराजवळच असल्याने मी चालतच आलो. येताना कार आणलेली नाही. उगाच कारण नसताना कशाला दिखावा करायचा?'' त्या वेळी आमचे दुकान बँकेपासून जवळच्या इमारतीत खालच्या मजल्यावर होते आणि आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो. माझे उत्तर ऐकल्यावर तो व्यवस्थापक स्मित करत म्हणाला, ''सर, नाराज होणार नसलात तर एक सल्ला देऊ का? तुम्ही तुमची ही आलिशान कार रस्त्यावर सगळयांना दिसेल अशी पार्क करत जा. त्यावर कायमस्वरूपी एक शोफर तैनात करा आणि कुठेही जायचे तर ती दिमाखाने मिरवत जा. तुम्ही ती वापरताना लोकांना बघू द्या.''

 

त्याच्या त्या सल्ल्याने माझी करमणूक झाली, पण तो शांतपणे पुढे म्हणाला, ''साहेबऽ, मी असे सांगतोय त्यामागे कारण आहे. तुमची कंपनी छान प्रगती करत आहे, हे तुमची उलाढाल बघूनच लक्षात येतेय. पण ते केवळ बँकेला ठाऊक असून चालणार नाही. जे बडे उद्योजक तुमच्याशी व्यवहार करणार आहेत, त्यांना या आकडेवारीच्या भाषेत रस नसतो. ते केवळ पैशाची भाषा जाणतात. तुम्ही साधेपणाने राहिलात तर ते तुम्हाला बरोबरीचे समजणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वत: बोलण्यापेक्षा तुमच्या पैशाला बोलू द्या. एक काम करा. ही कार घेऊन तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जा आणि तेथे शांतपणे विचार करा.'' मला तत्क्षणी त्या मराठी उद्योगपतींना अधिकाऱ्याने दिलेला सल्ला आठवला. हा बँक मॅनेजरही तेच सांगत होता. त्याच्या सूचनेत तथ्य जाणवल्याने मी कार काढून शोफरला घेऊन जुमैरा बीचवर गेलो. जुमैरा बीच ही दुबईतील अशी जागा आहे, जेथे अतिश्रीमंत वर्गातील लोकांची कायम वर्दळ असते. मी मुद्दाम माझी गाडी सगळयांना दिसेल अशी पार्क केली. ती फँटम मॉडेलची रोल्स रॉईस त्या वेळी दुबईतील एकमेव असल्याने चमत्कारच घडला. माझी कार बघण्यासाठी लोकांची - विशेषत: तरुणाईची खूपच गर्दी झाली. जो तो गाडीजवळ येऊन निरखून बघू लागला. शोफरकडून त्यांना समजले की ही गाडी अल अदील ट्रेडिंग कंपनीचे मालक धनंजय दातार यांची आहे. मला न बोलता प्रसिध्दी मिळाली.

त्या बँक मॅनेजरचे शब्द पुढे खरे झाले. नंतर मी ज्या ज्या वेळेस कुणा उच्चाधिकाऱ्याला किंवा उद्योजकाला भेटायला गेलो, तेव्हा ते उच्चभ्रू लोक आधी माझ्या कारकडे बघूनच माझ्याशी अदबीने बोलू लागले. माझ्या प्रस्तावांमध्ये रस दाखवू लागले. अनेक जण आपणहोऊन माझी ओळख करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. एकेकाळी साधा दुकानदार असताना याच दुबईत आम्हाला कुणी मुलाच्या वाढदिवसासारख्या घरगुती कार्यक्रमालाही बोलावत नव्हते. पण तेच आता मला मोठमोठया शाही मेजवान्यांची आमंत्रणे न मागता येऊ लागली. बिझनेस डील्स सहज होऊ लागली. मला ठाऊक होते की हा सगळा पैशाचा चमत्कार होता. मी माझ्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी या सगळया प्रसिध्दीचा अचूक लाभ उठवला.

मित्रांनोऽ! मी पैशाला देव किंवा सर्वस्व मानत नाही. माणुसकी, मैत्री, नाती ही मूल्ये पैशाहूनही श्रेष्ठ मानतो. पण त्याच वेळी व्यावहारिक जगातील पैशाचे महत्त्वही दुर्लक्षून चालत नाही. हिरा अंधारात राहिला तर उपयोग काय? त्याची तेजस्वी चमक उजेडातच दिसल्याने लोक दिपतात आणि त्याचे मूल्य लक्षात येते. 'जो दिखता है वोही बिकता है' हा आजच्या जगातील यशाचा मंत्र आहे. नेहमीच 'झाकले माणिक' राहण्यात फायदा नसतो. त्यामुळे वेळप्रसंगी श्रीमंतीचा आव आणून प्रसिध्दीचा फायदा घेण्यात मागे राहू नका.

एक गमतीशीर संस्कृत सुभाषित आहे. अर्थात ते शब्दश: न घेता प्रसिध्दीसाठी कल्पक उपाय योजावेत, या अर्थाने घ्यावे.

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात गर्दभारोहणम।

येन केन प्रकारेण प्रसिध्द: पुरुषो भवेत् ॥

(मडके फोडावे, कपडे फाडावेत किंवा गाढवावर बसावे, पण या ना त्या प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेऊन माणसाने प्रसिध्द बनावे.)

 

(या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.)