पवारांची 'दिशा'

विवेक मराठी    31-Aug-2018
Total Views |

'राजा बोले आणि दल डोले' अशी आपल्या भाषेत म्हण आहे. या म्हणीची सध्याच्या काळात प्रचिती देणारा एकमेव माणूस म्हणजे शरद पवार. त्यांनी कोणत्याही घटनेवर केलेले सूचक भाष्य हे त्याच्या अनुयायांसाठी, पाठीराख्यांसाठी आणि शरद पवार यांच्या कृपाप्रसादात स्वतःला धन्य मानणाऱ्यांसाठी दिशादर्शन असते. पवार काय बोलतात याकडे या मंडळींचे लक्ष लागून राहिलेले असते. पवार म्हणजे या मंडळींसाठी एका अर्थाने वातकुक्कुट आहेत, जो त्याच्या सोईने दिशा बदलतो. पवार एखाद्या विषयावर काही बोलले की वेगवेगळया क्षेत्रांतील त्यांचे चेले त्यांना हवा तो अर्थ घेऊन कामाला लागतात, हा महाराष्ट्राचा आजवरचा अनुभव आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषद आणि नक्षलवादी कारवायांच्या तपासासाठी 28 ऑगस्ट रोजी अरुण परेरा, वारावारा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वरणन गोन्साल्विस या पाच लोकांना अटक केली. देशाच्या विविध भागांत छापे टाकून ही कारवाई झाली. याआधी 6 जून रोजी पुणे पोलिसांनी पाच लोकांना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे पाच माओवादी व्यक्तींना अटक करण्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर बाब असणार आणि पुणे पोलिसांच्या हाती तितकेच ठोस पुरावेही लागले असणार, म्हणून ही कारवाई झाली असणार अशी आमच्यासारख्या सर्वसामान्यांची समजूत होती. भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा व पंतप्रधानांचा घातपात करण्याचा प्रमुख आरोप या मंडळींवर असून पोलिसांनी त्याच तपासासाठी 28 ऑगस्ट रोजी या पाच लोकांना अटक केली आहे. मात्र शरद पवार यांनी दिल्लीतून वक्तव्य केले की, ''अटक झालेले डाव्या विचारांचे असले, तरी नक्षलवादी असतील आणि कुणाची हत्या करतील असे आपल्याला वाटत नाही. त्यांना झालेली अटक दुर्दैवी आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आपण भेटणार आहोत.'' शरद पवार बोलले आणि मग साथीच्या रोगाची लागण झाल्यासारखी वेगवेगळया व्यासपीठांवरून त्याची अभिव्यक्ती झाली. अनेक प्रसारमाध्यमांनी शरद पवारांसारखीच पुणे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात धन्यता मानली. अटक केलेले हे 'कथित' आरोपी आहेत अशा आशयाची बातमी करण्यापर्यंत मजल गेली. दूरचित्रवाहिन्यांतील या विषयावर चर्चा घडवणाऱ्या सूत्रसंचालकांचा रोखही अशाच प्रकारचा होता. एकूणच काय, तर आजही महाराष्ट्रात शरद पवार यांचा इशारा समजून घेऊन त्यांना हवा तशा प्रकारचा नाच करणारे अनेक जण आहेत. असे अनेक जण असणे हेच शरद पवार यांचे बलस्थान राहिले आहे. शरद पवारांनी दिल्लीत वक्तव्य केले आणि त्यांचे पट्टशिष्य जितेंद्र आव्हाड ठाण्यात अटक केलेल्या अरुण परेरा या संशयित आरोपीच्या कुटुंबीयांना तत्काळ भेटायला गेले. आव्हाडांनी प्रसारमाध्यमांसमोर अरुण परेरा निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे. कदाचित शरद पवार ठाण्यात येण्यास अवधी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी हे परेरा भेटीचे शुभ काम तातडीने उरकले असावे. अन्य चार जणांच्या घरांचे पत्ते मिळताच जितेंद्र आव्हाड तेथेही पोहोचतील. कारण पवारांनी या संशयितांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मग जितेंद्र आव्हाडांनी प्रत्यक्ष कृती केली, तर त्यात काय चूक असणार आहे?

पुणे पोलिसांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन अन्य राज्यांतून संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सबळ पुरावा नसेल, तर अन्य  राज्यांतील पोलीस यंत्रणांनी मदत करण्याची तयारी दर्शवली असती का? सहकार्य केले असते का? एवढा साधा विचार केला असता, तर शरद पवारांच्या मनातील संशयाचे मळभ दूर झाले असते. पण असा विचार करतील ते शरद पवार कसले? कायम सूचक भाष्य करून शरद पवार यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे आणि त्यातून आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजली आहे. पुणे पोलिसांनी अटकसत्र पूर्ण केल्यावर पुढील प्रक्रिया ही न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. या पाच संशयितांविरुध्द जास्तीत जास्त ठोस पुरावे सादर करण्याची जबाबदारी पुणे पोलिसांच्या खांद्यावर येते. आजतरी पुणे पोलीस कृतीवर ठाम असून आपल्याकडील पुरावे ते न्यायालयात सादर करतील. ही प्रक्रिया थोडी संथ आहे. पण तेवढी वाट पाहण्याचा धीर शरद पवार यांनी का धरला नाही? आणि ते नक्षलवादी नाहीत असे शरद पवार कशाच्या आधाराने म्हणत आहेत? शरद पवार तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. का? असे अनेक प्रश्न शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची कृती याकडे पाहिले की उपस्थित होतात. कधीतरी या प्रश्नाची उत्तरेही जनता शरद पवार यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. तपासयंत्रणा, न्यायपालिका या स्वतंत्र व्यवस्था असून त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नयेत, असा संकेत आहे. आणि शरद पवार यांना हा संकेत माहीत नाही असे म्हणणे म्हणजे त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा अपमान करण्यासारखे होईल. असे असेल, तर मग पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की शरद पवार असे का वागतात? पवारांचे हे केवळ आणि केवळ राजकारण आहे की, तपासयंत्रणा आणि न्यायपालिका यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा त्यांचा मानस असून संशयित आरोपींची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा मानस आहे? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांना आज नाही, तर उद्या द्यावी लागतील.