एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ...

विवेक मराठी    06-Aug-2018
Total Views |

 

 

आपण जगाला जे देतो ते दहापटीने आपल्याकडे परत येते, हे गौतम बुध्दांच्या उपदेशातील वाक्य मला खूप आवडते आणि पटतेही. आपण इतरांना प्रेम दिले तर आपल्यालाही प्रेम मिळते, इतरांना मदत केली तर आपल्यालाही मदत मिळते आणि इतरांचा राग-द्वेष केला तर आपल्याही वाटयाला तेच येते. 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या वचनानुसार वागले, तर मात्र आयुष्यात सुखाची फुले उमलतात.

दुबईमध्ये मी एक दिवस माझ्या कार्यालयात काम करत असताना माझे तेथील व्यवसाय सहयोगी एका तरुण महिलेला सोबत घेऊन आले. ती स्त्री गर्भवती होती आणि तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. त्यांचे माझ्याकडे काय काम असावे, या विचाराने मी बुचकळयात पडलो. गप्पांच्या ओघात माझ्या सहयोगींनी त्या महिलेची करुण कहाणी मला सांगितली. एका आखाती देशातून निर्वासित म्हणून दुबईत आलेली ती निराधार स्त्री चरितार्थासाठी हॉटेलांमध्ये बेली डान्स हा नृत्यप्रकार करत होती. तिचे नृत्यकौशल्य व सौंदर्य यावर भाळून एका श्रीमंताने संसार थाटण्याचे आश्वासन देत तिच्याशी विवाह केला. मात्र नंतर काही महिन्यांतच तिच्यावर मातृत्व लादून त्याने प्रतारणा करत तिला घटस्फोट दिला. त्या महिलेची अवस्था फार विचित्र झाली होती. एकतर ती निर्वासित असल्याने तिला कुणाचा आधार नव्हता, गर्भार अवस्थेमुळे तिचे उपजीविकेचे साधन असलेले नृत्य बंद झाले होते आणि तिच्याकडे काही पैसेही शिल्लक नव्हते. अपत्याला जन्म देणे भागच होते, पण त्यासाठी रुग्णालयाचा व प्रसूतिपश्चात देखभालीचा मोठा खर्च परवडणार नसल्याने ती अगतिक झाली होती. कुणाकडे मदत मागावी हे समजत नसल्याने ती भेटेल त्याला स्वत:ची व्यथा सांगून मदत मागत होती.

माझ्या सहयोगींनी कनवाळूपणाने तिला थोडीफार आर्थिक मदत केली होती आणि मीही माणुसकीपोटी काही साह्य द्यावे, अशी विनंती करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मी जरासा विचारमग्न झालो. काही हिंदी चित्रपटांच्या कथानकांत नायकाने प्रतारणा केल्यावर नायिकेची कशी परवड होते, हे आजवर पडद्यावर बघितले होते, पण आता तेच उदाहरण प्रत्यक्ष समोर बघत होतो. माझ्या सहयोगींनी शब्द टाकल्याने मीही त्या महिलेला सहानुभूतीने आर्थिक मदत दिली. त्या स्त्रीने कृतज्ञतेने माझे पुन्हा पुन्हा आभार मानले. जाताना ती इतकेच म्हणाली, ''साहेब! माझ्या खूप ओळखी आहेत. एरवी माझ्या नृत्यावर फिदा असलेला एकही चाहता अडचणीच्या वेळी मदतीला आला नाही. पण तुमचा आणि माझा काहीएक परिचय नसताना तुम्ही दयेपोटी पैसे देऊ केलेत. मी तुमचे उपकार विसरणार नाही.'' मी नंतर हा प्रसंग विसरूनही गेलो.

पुढे काही वर्षांनी मलाच व्यवसायात एका विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. माझे एक दुकान शहराच्या ज्या भागात होते, तेथे आसपासच्या आखाती देशांतून युध्द व यादवीमुळे दुबईत आसरा घेतलेले निर्वासित राहत होते. त्यांच्यापैकी काहींची किशोरवयीन मुले आमच्या दुकानासमोरच्या रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल असे खेळ कोणत्याही वेळी खेळत. आमच्या दुकानाला त्याचा त्रास होऊ लागला. दुकानाच्या काचा फुटण्याचे किंवा ग्राहकांच्या अंगावर चेंडू आदळण्याचे प्रकार रोजच घडू लागले. पोलिसांकडे तक्रार केली तर त्यांनी दुर्लक्ष केले आणि लहान मुलांविरुध्द काय कारवाई करणार, म्हणत हात झटकले. खरे पाहता ही मुले अगदीच लहान नसून चांगली 16-17 वर्षांची आणि मस्तवाल होती. आम्ही समजुतीने सांगितल्यावरही ती चेव आल्यासारखी रगेलपणे वागायला लागली. मग मी एका वकिलाचा कायदेशीर सल्ला घेतला. त्याने माझ्याकडून सल्ल्याची फी उकळली, पण काम केलेच नाही. नंतर मी अत्यंत प्रसिध्द अशा दुसऱ्या वकिलालाही भरमसाट फी मोजली, पण त्यानेही काम करतो असे सांगून मला बराच काळ लटकवून ठेवले आणि काहीही केले नाही. मला दुहेरी आर्थिक फटका बसला.

एक दिवस मी दुकानाजवळच्या हॉटेलमध्ये चहा घेत या समस्येवर मार्ग कसा काढावा, या काळजीत बसून होतो. तेवढयात माझ्यापुढे एक रूपवान महिला येऊन बसली आणि ''साहेब! तुम्ही मला ओळखलेत का?'' असे विचारू लागली. ही तीच बेली डान्सर होती, जिला मी पूर्वी मदत केली होती. विचारपूस झाल्यावर तिने विचारले, ''तुम्ही एकटेच येथे चिंतातुर बसलेले दिसलात. काही प्रॉब्लेम आहे का?'' प्रथम मला वाटले, की हिला कशाला सांगायची आपली समस्या? जेथे बडया वकिलांनी हात टेकले, तेथे ही बेली डान्सर काय करणार? पण दुसरीकडे ती परिसरातील लोकांना ओळखत असल्यास मला मदत करेल, अशी आशाही वाटली, म्हणून मी तिला सर्व हकीगत सांगितली. तिने ती लक्षपूर्वक ऐकून घेतली आणि ''माझ्या खूप ओळखी आहेत. तुम्ही निर्धास्त राहा. मी तुमचे काम नक्की करून देते'' असे सांगून ती निघून गेली.

आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी आमच्या दुकानापुढील रस्त्यावर पोलिसांची गाडी हजर झाली. पोलिसांनी त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना धरून चौकीत नेले आणि रस्त्यावर खेळून पुन्हा दुकानदारांना त्रास देणार नाही, असे हमीपत्र घेऊन मगच सोडले. पोलिसांनी त्यांना असा सज्जड दम भरला की त्या उनाड पोरांचे उपद्वयाप तत्काळ बंद झाले. जे काम मुरब्बी वकिलांना जमले नाही, ते एका बेली डान्सरने कसे करून दाखवले, याचे मला फार आश्चर्य वाटले. मी तसे तिला विचारलेसुध्दा. त्यावर ती म्हणाली, ''साहेब! तुम्हाला ती सिंह आणि उंदीर यांची गोष्ट ठाऊक असेलच. कधीकधी छोटासा उंदीरही सिंहाला मदत करू शकतो. तुम्ही माझ्या संकटात माणुसकीच्या भावनेतून मदत केली होती. तुमची अडचण समजताच मी ती सोडवण्याचा निश्चय केला. मी फार काही केले नाही. मदतीची परतफेड केली, इतकेच.'' नंतर मला समजले, की या महिलेने तिच्या ओळखी वापरून थेट शहर पोलीस प्रमुखांपर्यंत धाव घेतली होती आणि पोलिसांना कारवाई करायला भाग पाडले होते. आपण इतरांना मदत करण्याचा दृष्टीकोन ठेवला तर आपल्यालाही मदत मिळते, हे मी या प्रसंगातून शिकलो.

असाच आणखी एक प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा घडला. मी एकदा वाशी येथे क्लिनिकमध्ये नियमित आरोग्य तपासण्या करून घ्यायला गेलो होतो. तेथे सूर्यवंशी नावाचे एक गृहस्थ आपल्या मुलीची आरोग्य तपासणी करून घ्यायला आले होते. एक्स-रे काढण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी रक्कम नव्हती. तेकाउंटरवरच्या कर्मचाऱ्याला आपली अडचण सांगत असताना मी ते संभाषण ऐकले. पैशाच्या कमतरतेच्या कारणामुळे मुलीच्या उपचारांस विलंब लावू नका, असे सांगून मी त्यांना कमी पडणारी रक्कम दिली. त्यांनीही आभार मानून माझा फोन नंबर घेतला. नंतर पैसे परत करण्यासाठी ते माझ्या कार्यालयात आले, तेव्हा बोलण्याच्या ओघात त्यांना नोकरी नसल्याचे मला समजले. कमाईचे साधन नसताना ते कुटुंबाच्या चरितार्थाबरोबरच मुलीच्या उपचार खर्चाचा भार कसा सहन करत असतील, या विचाराने माझे काळीज हेलावले. मी तत्क्षणी विचारले, ''तुम्ही माझ्याकडे कामाला याल का?'' त्यावर त्यांनी एकच क्षण माझ्या डोळयात रोखून बघितले आणि ''येतो'' एवढेच बोलून ते निघून गेले. पुढे श्री. सूर्यवंशी यांनी अनेक वर्षे माझ्याकडे अत्यंत निष्ठापूर्वक व जबाबदारीने काम केले. आपल्या अंत:करणात माणुसकीचा गहिवर असेल, तर खरोखर चांगली माणसे भेटतातच.

मित्रांनो, आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण मैत्री, माणुसकी, नाती आणि जिव्हाळा ही मूल्ये त्याहून श्रेष्ठ आहेत. पैसा आला म्हणून आपण स्वार्थी होऊ नये. आपल्याला आसपासच्या समाजाने ही श्रीमंती मिळवून दिली आहे, याचे स्मरण ठेवून गरजूंना निरपेक्ष मदत करत जावी. जो इतरांना मदत करतो, त्याला देव मदत करतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.

संत कबीर म्हणतात,

धन रहै न जोबन रहे, रहै न गांव न ठांव।

कबीर जग में जस रहे, करिदे किसी का काम।

(धन, यौवन, मालमत्ता यापैकी काहीही शाश्वत राहत नाही. मनुष्याच्या मागे जगात उरते,ती त्याची कीर्ती आणि ती दुसऱ्याला मदत करून मिळत असते.)

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)