इस्रायलव्याप्त भाग - ऑॅक्युपाइड टेरिटरी

विवेक मराठी    06-Aug-2018
Total Views |

 इस्रायलची निर्मिती झाल्यावर 1967च्या जून महिन्यात इजिप्त, जॉर्डन आणि सीरिया या तीन शेजारील देशांनी इस्रायलवर आक़्रमण केले. त्यापुढे सहा दिवस जे युध्द झाले, ते 'सिक्स डेज वॉर' म्हणूनच प्रसिध्द आहे. या युध्दात इस्रायलच्या फौजांनी या तिन्ही देशांना त्यांच्याच भागात जाऊन हरवले आणि त्यांच्या देशातील काही भाग व्यापले. यालाच 'इस्रायलव्याप्त भाग' म्हणजेच 'इस्रायली ऑॅक्युपाइड टेरिटरी' असे म्हणतात.

इस्रायलच्या निर्मिती पूर्वी या भागाला पॅलेस्टाइन असेच म्हणत. पॅलेस्टाइनवर बॅबेलिऑॅन, रोमन, अरब, टर्किश आणि ब्रिटिश अशा वेगवेगळया राज्यकर्त्यांचे वर्र्चस्व होते. झायनिस्ट चळवळीतील नेत्यांना काहीही करून ज्यूंना पॅलेस्टाइनमध्ये पुनःस्थापित करावयाचे होते. त्यामुळे त्यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांचे साहाय्य घेण्यासही प्रसंगी मागे पुढे पाहिले नाही. पहिल्या महायुध्दाच्या काळात पॅलेस्टाइनवर टर्किश लोकांचे राज्य होते. तुर्कस्तानने ज्या वेळी पहिल्या महायुध्दात उतरण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी पॅलेस्टाइनमध्ये राहात असलेल्या ज्यूंनी, तसेच झायनिस्ट चळवळीतील बेन गुरिअनसारख्या तरुण नेत्यांनी तुर्कस्तानच्या बाजूने त्यांच्या आर्मीत ज्यू लोकांना सहभागी होण्यासाठी तयार केले. पण तुर्कस्तानने ते मान्य केले नाही आणि झायनिस्ट चळवळीतील तरुण नेत्यांना हद्दपार केले. झायनिस्ट चळवळीतील धुरीणांपैकी एक डॉ. वाईझमन हे लंडनमध्ये वास्तव्यास होते. डॉ. वाईझमन हे एक उत्तम रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनीच पहिल्या महायुध्दात ज्यूंना ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यास तयार केले. पण मुळात ज्यूंची आर्मी नसल्याने ते स्वीकारणे जरा अवघडच गेले. वाईझमन यांचा यामागे दुसरा हेतू असा होता की त्याद्वारे ज्यू लोकांना आर्मीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे. कारण आत्तापर्यंत ज्यू समाज हा धार्मिक पोथ्या, पुस्तके आणि व्यापार यातच गुंतलेला होता. ब्रिटिशांना पहिल्या महायुध्दाच्या काळात धूरविरहित गोळया आणि दारूगोळा निर्मितीत अतिशय उपयुक्त अशा 'ऍसिटोन' या रसायनाची खूप कमतरता भासू लागली. चर्चिल यांनी डॉ. वाईझमन यांना तसे सांगितल्यावर त्यांनी पंधराच दिवसात ऍसिटोनची निर्मिती करून दाखवली आणि ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांतील विविध रासायनिक प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञांना त्याच्या निर्मितीचे प्रशिक्षणही दिले. यामुळे युध्दकाळात ब्रिटिशांचा फायदाच झाला. या माध्यमातून डॉ. वाईझमन यांनी झायनिस्ट चळवळीसाठी ब्रिटिशांचा पाठिंबा मिळविला आणि ज्यूंना युध्दाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळाले आणि ज्युईश लष्कर तयार झाले. पुढे ब्रिटिश फौजांनी पॅलेस्टाइन जिंकले आणि तिथे ब्रिटिशांचे राज्य आले, जे झायनिस्ट चळवळीस पोषकच होते. यामुळेच नोव्हेंबर 1917मध्ये इंग्लंडच्या बाल्फोर या वसाहत मंत्र्याने ज्यूंच्या हिताची एक घोषणा केली. त्या घोषणेत ज्यू लोकांना पॅलेस्टाइनमध्ये पुनःस्थापित करण्याबरोबरच स्थानिक अरब पॅलेस्टिनी (नॉनज्युईश) लोकांच्या हक्कांवर गदा येईल असे काहीही ज्यूंकडून केले जाणार नाही, असे ठरवलेले होते. हीच घोषणा इतिहासात बाल्फोर घोषणा म्हणून सुप्रसिध्द आहे. पुढे 1948मध्ये इस्रायलच्या निर्मितीमध्ये याचाच फायदा झाला. सध्याच्या इस्रायलमध्ये डॉ. वाईझमन यांच्या नावाने 'वाईझमन इन्स्टिटयूट' नावाचे मोठे जागतिक दर्जाचे विज्ञानाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील बऱ्याच जणांना त्यांच्या जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिकही मिळालेले आहे.

इस्रायलची निर्मिती झाल्यावर 1967च्या जून महिन्यात इजिप्त, जॉर्डन आणि सीरिया या तीन शेजारील देशांनी इस्रायलवर आक़्रमण केले. त्यापुढे सहा दिवस जे युध्द झाले, ते 'सिक्स डेज वॉर' म्हणूनच प्रसिध्द आहे. या युध्दात इस्रायलच्या फौजांनी या तिन्ही देशांना त्यांच्याच भागात जाऊन हरवले आणि त्यांच्या देशातील काही भाग व्यापले. यालाच 'इस्रायलव्याप्त भाग' म्हणजेच 'इस्रायली ऑॅक्युपाइड टेरिटरी' असे म्हणतात. त्यात मुख्यत: उत्तरेकडील सीरियन गोलन हाइट्स, दक्षिणेकडील इजिप्तमधील गाझा पट्टी आणि पूर्वेकडील जॉर्डनला जोडलेला वेस्ट बॅंक असे तीन भाग येतात. या तिन्ही भागांत गाझा पट्टी हा दक्षिणेकडे इजिप्तला लागून असलेला अतिशय छोटा चिंचोळा भाग आहे. उत्तरेकडील सीरियाशी जोडलेला गोलन हाइट्स हा भाग गाझाच्या तुलनेत बराच मोठा आहे. ज्युईश बायबलमधील महत्त्वाचा पर्वत 'माउंट हारमोन' हा या गोलन हाइट्समध्येच आहे. त्या परिसरात संयुक्त राष्ट्र संघाच्या बऱ्याच तुकडया तैनात आहेत. यातच भारतीय सैन्याचीदेखील एक तुकडी आहे. पूर्वेकडील जॉर्डनला जोडून असलेला वेस्ट बॅंक हा भाग मात्र खूप मोठा आहे. वेस्ट बॅंकमध्येच जुने जेरुसलेम आणि पूर्वेकडील जेरुसलेमचा भाग येतो. वेस्ट बॅंकमध्येच ख्रिस्ती धर्मीयांसाठी महत्त्वाची धार्मिक स्थळे - उदाहरणार्थ, जेरिको, हेब्रॉन, बेथलेहेम (येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान), कसेर अल येहुदा (येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, ते जॉर्डन नदीच्या पूर्वेकडील तीरावर असलेले ठिकाण) आहेत. जुन्या जेरुसलेममध्येदेखील येशू ख्रिस्ताच्या आयुष्याशी निगडित माउंट ऑॅफ ऑॅलिव्ह्ज, व्हिया डलोरोसह्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.  गोलन हाइट्स आणि वेस्ट बॅंकमध्ये फिरताना, कुंपण घातलेले आणि पिवळया रंगाचे साइन बोर्ड्स असलेले भाग आपल्याला दिसतात. तिथे युध्दकाळात पेरलेले भूसुरुंग अजूनही आहेत. मधूनच कधी चुकून कोणी त्या भागात पाऊल ठेवलेच, तर भूसुरुंगांचा स्फोट होऊन अपघात घडलेले आहेत. ह्या भूसुरुंगांच्या जागा म्हणजे जणू काही इस्रायल आपल्या छातीवर अभिमानाने मिरवत असलेले युध्दातील पराक्रमाचे बिल्लेच. या तिन्ही भागात इस्रायलच्या लष्कराचे जवान भारीभक्कम मशीनगन्स घेऊन गस्त घालत असतात.

हे तिन्ही भाग पॅलेस्टाइनचे आहेत असे समजले जाते. पण पॅलेस्टाइन हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येऊ  शकत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त पॅलेस्टिनी लोकांचे पोलीस फोर्स आहेत. पॅलेस्टाइनकडे स्वत:चे लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रे नाहीत. त्यामुळे इस्रायलच्या लष्करापुढे त्यांचे काही चालत नाही. या इस्रायलव्याप्त भागातील गाझा आणि वेस्ट बॅंक येथे अरब लोकांचे वास्तव्य सर्वाधिक आहे. संपूर्ण पॅलेस्टाइन हे ज्यू लोकांचे आहे असेच मानून चालतात. असे वसाहतवादी ज्यू (ज्यू सेटलर्स) तिथे ओसाड जागा, शेतजमिनी हेरून आपल्या वसाहती बनवतात. यामुळे तेथील पॅलेस्टिनी अरबांच्या जमिनी ज्यू सेटलर्सच्या खिशात विनासायास जाताहेत. इस्रायलचे लष्कर यात त्यांना साहाय्य करते. त्यामुळे पॅलेस्टिनी अरब चिडून जाऊन इस्रायलव्याप्त भागातील ज्यू सेटलर्सवर हल्ले करतात. संयुक्त राष्ट्रसंघ या तिन्ही भागांमधील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. इस्रायलव्याप्त भागांत कायदा-सुव्यवस्था, कर प्रणाली, नागरी-सुव्यवस्था यांत प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे या प्रदेशातील अरब लोक ज्यू लोकांना तिथे येऊच देत नाहीत. समजा, चुकून कोणी गेलेच, तर त्यांना मारून टाकतात. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज इस्रायलचे लष्कर तिथे तैनात आहे आणि पॅलेस्टिनी लोकांवर त्याचे एक प्रकारचे दडपण आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार जर इस्रायलचे लष्कर तिथून काढून घेतले, तर तो सगळा भाग हमास, हिज्बोला यासारख्या दहशतवादी संघटना ताब्यात घेतील, कारण पॅलेस्टाइनकडे स्वत:चे लष्करी सामर्थ्य नाही. त्यामुळे इस्रायलवरील दहशतवादी हल्ले वाढून इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल. जुलै 2007मध्ये इस्रायलने गाझा पट्टी पॅलेस्टाइनच्या स्वाधीन केली. त्या वेळी गाझा पट्टीतील ज्यू सेटलर्सना इस्रायलच्या लष्कराने बळाच्या जोरावर गाझाबाहेर काढले होते. पण लगेचच हमास या पॅलेस्टाइनमधील अरब दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीचा पूर्ण ताबा घेतला. गाझा पट्टीतून, तिथल्या पॅलेस्टिनी अरब लोकांना (विशेषत: स्त्रिया, लहान मुले) वेठीस धरून हमास इस्रायलवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे लष्कर त्यांच्यावर उलटी क्षेपणास्त्रे डागते. यात गाझामधील अरब पॅलेस्टिनींचेच नुकसान अधिक होते. इस्रायल मानवतावादी दृष्टीकोनातून गाझा पट्टीतील लोकांना खाद्यपदार्थ, औषधे, पाणी, वीज या सर्व गोष्टींची रसद पुरवत असते. पण हमासचे दहशतवादी ही मदत प्रत्यक्ष पॅलेस्टिनी लोकांच्या हातात पडूच देत नाहीत. मदतीचे ट्रक्स अर्ध्या रस्त्यातच बॉंबने उडवले जातात. म्हणजे ह्या दहशतवादी संघटना इस्रायलच्या - म्हणजेच ज्यू द्वेषापायी पॅलेस्टिनी अरब लोकांनाच वेठीस धरून त्यांचा वापर करून घेत आहे. जगभरातील प्रसारमाध्यमेदेखील कायम एकच बाजू (पॅलेस्टाइनच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधात) मांडून जगभरात इस्रायलची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यामुळेच भारतीयांच्या मनातसुध्दा इस्रायल म्हणजे युध्दच असे समीकरण तयार झालेले आहे. गेले महिना-दोन महिने गाझा पट्टीत पुन्हा युध्द चालू आहे. ह्या वेळी इराणमधील हिज्बोला ही दहशतवादी संघटना हमासला येऊन मिळाली आहे. त्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलमधील दक्षिणेकडील सीमा भागातील शेतीमध्ये, रहिवासी भागांत पेटते पतंग सोडून, क्षेपणास्त्रे डागून भरपूर मोठया प्रमाणात आगी लावलेल्या आहेत. गाझामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन्स उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या लोकसभेत इस्रायलला संपूर्णपणे ज्यू राष्ट्र घोषित करणारा कायदा पास झाला. या कायद्याने पूर्वीच्या बाल्फोर घोषणेला हरताळ फासला आहे. याचा अर्थ संपूर्ण इस्रायलमध्ये ज्यू लोक, त्यांची संस्कृती, धार्मिकता, कट्टरपणा, हिब्रू भाषा यांना प्रथम दर्जाची वागणूक मिळणार. यामुळे अरब आणि ज्यू यांच्यात आधीपासून असलेली दरी आणखी वाढण्याचा धोका आहे. याचाच अर्थ वेस्ट बॅंकसारख्या इस्रायलव्याप्त भागात ज्यू सेटलर्सना मुक्त वावर. याचा परिणाम म्हणून अरब-ज्यू संघर्ष अधिक तीव्र होईल. याची परिणती इस्रायल जगाच्या नकाशावरून नष्ट होण्यातदेखील होऊ  शकते. त्यामुळे या भागातील तिढा आणखीनच वाढलेला आहे. ज्यूंचा पूर्वेतिहास पाहता त्यांना त्यांची अशी स्वतंत्र भूमी असणे अत्यावश्यक आहे. पण मग तिथे शतकानुशतके, पिढयानपिढया राहत असलेल्या अरब पॅलेस्टिनी लोकांनी कुठे जायचे? हादेखील एक मोठा प्रश्नच आहे. ज्यू लोकांनी स्वत:च्या अनुभवावरून या पॅलेस्टिनींचा विचार केला पाहिजे. जर ऑॅक्युपाइड टेरिटरीज इस्रायलमध्ये औपचारिकरित्या जोडल्या गेल्या आणि अरब व ज्यू दोघांचे एक सेक्युलर राष्ट्र बनवले, तर ज्यू तिथे अल्पसंख्य होतील. त्यातून पुढे ज्यूंच्या अस्तित्वास धोका निर्माण होऊ  शकतो. सामोपचाराने ठरवून इस्रायल ज्यूंचे आणि पॅलेस्टाइन अरबांचे अशी दोन राष्ट्रे केली, तरी अरबी दहशतवादी संघटना पॅलेस्टाइनचा ताबा घेणार नाहीत याची काहीही खात्री देता येत नाही. पूर्वी इस्रायलमध्ये राबिन नावाचे पंतप्रधान असताना त्यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाइन ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्यासंबंधी अतिशय महत्त्वाची पावले उचलली होती. पण ज्या दिवशी ते करारावर स्वाक्षरी करणार, त्याच्या एक-दोन दिवस आधीच एका कर्मठ ज्यू माणसाने गोळया घालून त्यांची हत्या केली. तो अजूनही इस्रायलच्या तुरुंगामध्ये बंदिस्त आहे. त्याच्यामुळे इस्रायलचा हा प्रश्न सुटला नाहीच, उलट या प्रश्नाने आणखीनच भयावह स्वरूप धारण केलेले दिसते. यासाठी इस्रायलमधील बऱ्याच सेक्युलर ज्यू लोकांनी एक 'शांततेची संघटना' निर्माण केली आहे, जी दोन्ही समूहांमध्ये सामोपचार घडवून आणण्यास कटिबध्द आहे. पण त्यांना त्यात फारसे यश मिळत नाही, कारण यात एकूण दोन्ही (अरब आणि ज्यू) लोकांचा हट्टीपणा आणि कर्मठपणा आहे. सामोपचाराने घेण्यास कोणीच तयार नाही. त्यांचा परमेश्वर या दोन्ही समूहांना सद्बुध्दी देवो, हीच आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना.