केरळने पाहिला संघाचा सेवाभाव

विवेक मराठी    01-Sep-2018
Total Views |

*** हरी कर्था'****

केरळमधील जलप्रलयामुळे जीव, निवारा आणि बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागल्या. या आपत्तीपासून केरळवासीयांनी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे यासाठी सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धन ओतून जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक आहे.

 काही दिवसांपूर्वी केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले. काही भागात मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन लोकांचे घर-संसार गाडले गेले. या महाप्रलयात येथील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. केरळी जनता या संकटातून अद्यापही पुरेशी सावरलेली नाही. या भीषण परिस्थितीत मदतीचे अनेक हात पुढे आले. मात्र या सगळया मदतकार्यात आणि लोकांची सुटका करण्यात संघपरिवार नेहमीप्रमाणेच आघाडीवर होता. या दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या लाखो लोकांनी जात, पंथ, वर्ण, धार्मिक श्रध्दा, राजकीय भूमिका आणि पक्षीय हितसंबंध बाजूला ठेवून एकमताने हे कबूल केले आहे की, संघपरिवाराने या सगळया आपत्तीत खूपच चांगली कामगिरी केली आहे. भयग्रस्त अवस्थेतील लोकांनी पाहिले की स्वयंसेवक आणि संघपरिवारातील कार्यकर्ते स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी खोल पाण्यात उडया घेत होते. संपूर्ण राज्यातील पूरग्रस्त भागात आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शर्थ करत होते.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून  
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे

 

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळने भूतकाळात कधीही मृत्यूचे असे थैमान, असा विध्वंस, असा प्रलय अनुभवला नव्हता. धुवांधार पावसामुळे निर्माण झालेल्या या प्रलयाची इतकी भीषणता होती. या आपत्तीत 300हून अधिक मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. आणखी शेकडो लोक गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. हजारो लोक मिळेल त्या मार्गाने सुरक्षित भागात स्थलांतर करत होते.

हे सर्व सुरू असताना संघस्वयंसेवकांबरोबरच संघपरिवारातील विविध संस्थांचे कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतकार्यात सहभागी झाले होते. भाजपा, भाजयुमो, भारतीय मजदूर संघ, अभाविप आणि विहिंप यांचा त्यात समावेश होता. सेवा भारतीच्या प्रतिनिधींनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संघटनेचे राज्यस्तरीय समन्वयक, मार्गदर्शक विविध संस्थांमार्फत तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवर सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याचे समन्वयन आणि व्यवस्थापन करत आहेत. संघपरिवारातील या कार्यकर्त्यांना समाजातील सर्व स्तरांतून बोलावले जात होते. आक्रमक, धाडसी मदतकार्य करून जर कोणी सर्वांचे लक्ष वेधले असेल, तर ते म्हणजे मासेमार स्वयंसेवक. न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबत पहिल्या पानावरच बातमी देऊन 'फिशरमेन टर्न हिरो' असे त्याचे शीर्षक केले होते. धीवर या मासेमार समाजातील बांधवांनी स्वत:च्या खिशातील लाखो रुपये खर्च करून कुट्टनादमध्ये आणि त्या सभोवतालच्या परिसरात मोठे मदतकार्य केले. ते सर्व संघपरिवारातील मत्स्यप्रवर्तक संघाचे सदस्य होते. अलाप्पट, पय्योली, कोयीलांडी, वेल्लाइल आणि मारद या पूरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी ते धावून गेले होते. देशी बोटी आणि वल्ही यांच्यासह ते लोकांची सुटका करत होते. सेवा कार्याचे मोजमाप करणे हे तसे अवघड काम असते. स्वयंसेवकांचे कार्य तत्पर आणि निरपेक्ष असते. पण संघपरिवाराने हाती घेतलेल्या या विशाल कार्यात प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा असा या परिवारातील संस्थांचा प्रयत्न होता. संघपरिवारातील सुमारे 25000 जण या सुटका आणि मदतकार्यात सहभागी झाले होते. त्यांपैकी किमान 10 हजार लोक तरी तहानभूक, झोप सर्व काही विसरून दिवसरात्र काम करत होते. परिवाराने केलेल्या मदतकार्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयाचे तपशील विचारले असता सेवा भारतीचे एक पदाधिकारी उत्तरले, ''संघाचे लोक सेवा कार्य करताना प्रसिध्दीपासून दूर राहतात. राजकीय नेत्यांप्रमाणे अशा संकटाच्या आणि शोकाच्या प्रसंगी डोंगर पोखरून उंदीर काढल्याप्रमाणे आपल्या कामाचे प्रदर्शन करणे संघाची प्रवृत्ती नाही.'' ते पुढे म्हणाले की, ''मानवसेवा हीच माधवसेवा आहे. या मोहिमेत सहभागी प्रत्येक स्वयंसेवकाची किंवा संघकार्यकर्त्याची हीच भावना आहे. त्यामुळे या विशाल मोहिमेचा आवाका समजून घेणे कठीण आहे.'' सेवा भारतीने हजारो टन तांदूळ जमा केला. पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या अन्नसाठयासाठी काही विशेष गोदामे तयार करण्यात आली. सुमारे 10 हजार क्विंटल भाजीपाला जमा करण्यात आला. मदतकार्य करण्यासाठी सेवा भारतीने जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात आपली केंद्रे उभारली आहेत. ही केंद्रे दिवसरात्र काम करत असतात.

भारतीय मजदूर संघही या मदतकार्यात खूपच सक्रिय होता. भारतीय मजदूर संघाचे राज्यातील प्रमुख के.के. विजया कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एके सकाळी कोट्टायम येथून 10 हजार चपात्या तयार करून त्या पूरग्रस्त भागात पाठवल्या. तसेच काही दिवसांपासून बीएमएस कार्यकर्त्यांतर्फे प्रत्येक पूरग्रस्त गावात 2 हजार ते 3 हजार खाद्य पाकिटे वितरित केली जात आहेत. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, या सेवा कार्यात बीएमएसशी जोडलेले सुमारे दहा हजार कर्मचारी सहभागी आहेत. प्रत्येक दिवशी पिण्याच्या पाण्याच्या हजारो बाटल्या या पूरग्रस्त भागात पाठवल्या जातात. या आपत्तीत बीएमएसने केलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक व दैनंदिन वस्तूंचे पुढच्या महिनाभरासाठी पुरेल असे किट वितरित करणे. सेवा भारतीच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळे कार्य करत असल्याचे विजया कुमार यांनी स्पष्ट केले. बीएमएसशी संलग् व्यापारी संघांनीही आपापल्या सदस्यांना पूरग्रस्तांसाठी निधी किंवा वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले आहे. बीएमएसशी संलग् असलेल्या धनलक्ष्मी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1000 रुपये पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी निधी म्हणून गोळा केला आहे.

केरळमध्ये भाजपाने राज्यातील आपल्या मुख्य कार्यालयाद्वारे एक हेल्पलाइन सुरू केली आहे. याद्वारे पूरग्रस्तांना या मदतकार्यात सहभागी संबंधित संस्थांशी जोडण्यात मदत होत आहे. या हेल्पलाइनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच पक्षाचे केरळ राज्यातील अध्यक्ष पी.एस. श्रीधरन यांनी पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपला दोन दिवसांचा पगार पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी देण्याचे आवाहन केले. भाजपाचे आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते या सेवा कार्यात सहभागी आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना पूरग्रस्त भागात कपडयांचे वाटप करण्यात यश मिळत असल्याचे युवा मोर्चाचे राज्यातील सचिव आर.एस. राजीव यांनी सांगितले. केवळ थिरुअनंतपुरम शहरातूनच 35 हजार, त्याचबरोबर टी-शर्ट्स, ब्लँकेट्स, उश्या, चटया आदी गोळा करून ते सेवा भारतीकडे सोपवण्यात आले. युवा मोर्चाने सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषधे यांचाही मोठया प्रमाणात साठा करून त्यांचे वितरण केले. युवा मोर्चाद्वारे वेगवेगळया भागांत छोटी छोटी पथके पाठवून तेथील पुराच्या तडाख्यात सापडलेली घरे विनामूल्य स्वच्छ केली जात आहेत, हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय. जलशुध्दीकरणाच्या औषधांचाही मोठा साठा या भागात पाठवण्यात आला. अन्नधान्य, औषधे आणि कपडे यांनी भरलेले ट्रक्स नुकतेच थिरुअनंतपुरम किल्ल्यामधून निघाले. सेवा भारतीतर्फे राज्यातील वेगवेगळया पूरग्रस्त भागांतील केंद्रांच्या दिशेने हे ट्रक्स रवाना झाले आणि भाजपा खासदार आणि प्रसिध्द सिने अभिनेता सुरेश गोपी यांनी या ट्रक्सना झेंडा दाखवला.

अभाविपने राज्यातील आपल्या मुख्य कार्यालयात एक हेल्प डेस्क सुरू केले, जिथे पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे नाहीशी झाली, त्यांना सहकार्य करण्यात येत होते. विद्यापीठाशी आणि अन्य शैक्षणिक संस्थांशी हेल्पलाइनचा संपर्क जोडला जाईल आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना नवीन प्रमाणपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. परिषदेचे कित्येक विद्यार्थी कपडे अाणि औषधे यांच्या वितरणात सहभागी झाले. अन्य राज्यांतील अभाविप पथकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. मेडिव्हिजन आणि जिज्ञासा या दोन संस्था पूरग्रस्त भागात अपुक्रमे आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद याद्वारे वैद्यकीय उपचार देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांचे पन्नास-एक वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पथक या कामात गुंतले होते. या कार्यासाठी अभाविपनेच निधीची तरतूद केली.

बालगोकुलम ही संघाचीच शाखा लहान मुलांसाठी काम करणारी जगातील सर्वात मोठी संस्था मानली जाते. या संस्थेतर्फे दर वर्षी दहीहंडीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मात्र या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करून संस्थेचे सर्व कार्यकर्ते या मदतकार्यात सहभागी झाले. 'कन्निरोप्पान, कन्नानोडोप्पम' (देवासमवेत दु:खितांचे अश्रू पुसू या) हेच ब्रीद 'बालगोकुलम'ने आपल्या यंदाच्या वार्षिकमोहिमेसाठी ठेवले आहे.

देशाच्या कोणत्याही भागात जेव्हा अशा प्रकारची आपत्ती येते, तेव्हा मदतकार्यासाठी संघाचे हजारो स्वयंसेवक सहभागी होतात. या वेळीही सेवा भारतीने आणि संघपरिवारातील सर्वच संस्थांनी नि:स्वार्थीभावनेने केरळी जनतेच्या पुनर्वसनात आपले योगदान दिले. त्यामुळे येथील जनतेला संघाची पुन्हा नव्याने ओळख पटली आहे.

 

सेवा भारतीच्या माध्यमातून केरळमध्ये झालेले मदतकार्य


* केरळमधील आपत्तीत सहभागी स्वयंसेवकांची एकूण संख्या 85,000. (पुरुष - 65,000, स्त्रिया - 20,000)

*सरकारकडून चालवली गेलेली एकूण मदत शिबिरे 3965. त्यांपैकी 150 शिबिरे सेवा भारतीच्या माध्यमातून चालवली जात आहेत.

* सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांनी 70 हजार लोकांना वाचवले. 25,000 स्वयंसेवक पूरग्रस्त भागातील स्वच्छतेच्या कार्यात सहभागी.

*150 बोटी, 70 रुग्णवाहिका, 300 गाडया सेवा भारतीने या मदतकार्यासाठी वापरल्या.

*  1.20 कोटी रुपये या मदतकार्यात वापरण्यात आले.

 

 

 harikartha@gmail.com

 

अनुवाद : सपना कदम-आचरेकर