हॉलोकॉस्ट ज्यूंचे शिरकाण

विवेक मराठी    01-Sep-2018
Total Views |

निसान या महिन्यातील 27वा दिवस हॉलोकॉस्टमध्ये मारलेल्या गेलेल्या ज्यू बांधवांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. त्यालाच हिब्रूमध्ये 'योम हाशोहा' असे म्हणतात. जेरुसलेममध्ये 'याद वाशेम' हे हॉलोकॉस्ट पीडितांच्या स्मृतींचे मोठे संग्रहालय आहे. इस्रायलमध्ये अजूनही हॉलोकॉस्टमधून वाचलेल्या आणि ज्यांना कोणीच नाही अशा ज्यू लोकांसाठी 'हॉलोकॉस्ट सर्व्हायव्हर्स' सेंटर्स आहेत. या सेंटर्समध्ये हे लोक एकत्रितपणे हसत खेळत आपला वृध्दापकाळ व्यतीत करत आहेत.   

इस्रायलमध्ये जाईपर्यंत ज्यू धर्मीय आणि ज्यू समाज यांविषयी मला फारच थोडी माहिती होती. हॉलोकॉस्टवर आधारित बरेच चित्रपट पाहण्यात आल्यामुळे त्याविषयी थोडी कल्पना होती. पण एखाद्या धर्माच्या लोकांचा इतका टोकाचा द्वेष कसा काय केला जाऊ शकतो, हे मला न उलगडलेले कोडे होते. इस्रायलचा, ज्यूंचा इतिहास समजल्यावर माझ्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. ज्यू धर्मीय लोक हे स्वत:ला एक वेगळा वंश समजतात. परमेश्वराने निवडलेल्या इब्राहिम या व्यक्तीपासून हा वंश निर्माण झाला, अशी त्यांची धारणा आहे. ते स्वत:ला 'परमेश्वराने निवडलेले लोक' आणि पूर्वीचे पॅलेस्टाइन म्हणजेच सध्याचे इस्रायल ही त्यांना परमेश्वराकडून मिळालेली जमीन आहे, ही त्यांची धारणाच आहे. त्यामुळे रोमन साम्राज्याने ज्यू लोकांना पॅलेस्टाइनमधून पळता भुई थोडी केल्यावर जगात इतरत्र पांगलेले ज्यू आपल्याबरोबर आपले हिब्रू भाषेतील धर्मग्रंथ घेऊन गेले. परदेशात भूमिपुत्राचा दर्जा नसताना टिकून राहण्यासाठी शिक्षण आणि उद्यमशीलता या दोन गोष्टींमुळे ज्यू मुले कष्टाळू आणि हुशार निपजू लागली. ज्या देशात राहावयाचे, तिथे उदरनिर्वाहासाठी काही ना काही उद्योग करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळेच जो शक्य असेल तो व्यवसाय ज्यू लोक तिथे चालू करत असत. स्वत:ची संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या घरातच सर्व ज्युईश परंपरा पाळत असत. स्थानिक युरोपियन ख्रिस्ती तरुण वाडवडिलांकडे असलेल्या पैशाच्या नादात ऐतखाऊ बनत चालले असल्याने ज्यू तरुणांनी ती कमतरता भरून काढण्यास सुरुवात केली. एकूणच त्यांच्या कष्टाळू प्रवृत्तीमुळे आणि अंगभूत गुणांमुळे कमी कालावधीतच ज्यू लोकांकडे पैसा आला. युरोपात त्यांनी स्वत:चे उद्योगधंदे चालू केले. त्यातच झायनीस्ट चळवळीमुळे पॅलेस्टाइनमध्ये आपला ज्यू देश पुन्हा निर्माण करण्याच्या ध्यासाने जोर धरलेला होता. त्यामुळे युरोपीय देशांत कमावलेले धन विविध मार्गांनी पॅलेस्टाइनमध्ये तेथील ज्यूंपर्यंत पोहोचवले जात असे.

दुसऱ्या देशातील संस्कृतीशी समरस न होता, आपलाच धर्म जपणारे व आपल्या निष्ठा पॅलेस्टाइनशी वाहिलेले ज्यू लोक हे अनेक स्थानिकांना डोईजड वाटू लागले. तोपर्यंत संपूर्ण युरोपात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झालेला होता. ख्रिस्ती धर्मप्रसारक ज्यूंना ख्रिस्ती होण्याविषयी जबरदस्ती करत असत. दबावाला बळी पडून काही कुटुंबे ख्रिस्ती धर्म स्वीकारत, पण ते फक्त बाहेरून दाखवण्यासाठी. घरात ते आपल्या ज्यू धर्माचेच पालन करत असत. ज्यू लोकांमध्ये ज्यू स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेले प्रत्येक मूल (वडील ज्यू असोत किंवा नसोत) हे ज्यू समजले जाते. ज्यूंचा स्त्रियांवरचा अविश्वास हे एक याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे बऱ्याच ज्यू तरुणी स्थानिक ख्रिस्ती तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांच्याशी लग्न करीत आणि ज्यू धर्मीयांची संख्या वाढवत असत. जर्मनीमध्ये नाझी लोकांच्या डोक्यात आपणच आर्य असल्याचे पक्के झालेले होते. त्यामुळे ज्यू मुलींशी किंवा मुलांशी संबंधांतून जन्माला येणारी प्रजा ही अशुध्द रक्ताची आहे, इत्यादी संकल्पना मूळ धरू लागल्या. त्यातच काही ज्यू धर्मगुरूंनी येशू ख्रिस्ताला रोमन सरदारांकरवी मारवले, याचा राग ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या मनात होताच. या सगळयाबरोबरच ज्यूंच्या आक्रमक स्वभाववैशिष्टयांनी, तसेच स्वार्थीपणाने आगीत भर टाकली. युरोपातून, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांतून ज्यू लोकांनी कमावलेले धन व्यापाराच्या माध्यमातून पॅलेस्टाइनकडे येत असे. यातूनच एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीचा धंदाच चालू झाला. यामुळे ज्यूंवर मुळात नाराज असलेल्या युरोपातील लोकांना ज्यू म्हणजे रक्तशोषक जळूसारखे वाटायले लागली. त्यामुळे जोपर्यंत सर्व ज्यूंना समूळ नष्ट केले जात नाही तोपर्यंत ज्यूंचे वर्र्चस्व संपणार नाही, असा विचार जोर धरू लागला. या सगळयातूनच ज्यूंवर सामाजिक आणि आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात झाली. त्यांनी पॅलेस्टाइनमध्ये पैसा पाठवण्याच्या व्यवहारावर पूर्णपणे बंदी आणली गेली. युरोपातील अनेक ज्यूंनी विविध मार्गांनी अमेरिका, कॅनडा आणि पॅलेस्टाइनकडे पलायनास सुरुवात केली. पुढची पिढी सुरक्षित राहावी, म्हणून पॅलेस्टाइनमध्ये 10-12 वर्षाच्या ज्यू मुला-मुलींच्या आलीयास सुरुवात झाली. 

तोपर्यंत जर्मनीतील नाझी पक्षाने सर्व सत्ता ताब्यात घेतल्याने त्यांनी ज्यूंचे नियोजनबध्दपणे शिरकाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना उद्योगधंदे करण्यास मनाई करण्यात आली, जिथे ज्यू नोकरीवर होते तिथून त्यांना हाकलून लावले गेले. त्यांची बँक खाती गोठवली गेली, त्यांना ठरावीक पैसेच जवळ बाळगण्याची मुभा दिली गेली. इतर लोकांमध्ये ज्यू वेगळे दिसावेत यासाठी त्यांच्या दंडावर पिवळी किंवा पांढरी पट्टी लावण्याची सक्ती करण्यात आली. अशा पट्टया लावून गेलेल्या ज्यूंना अतिशय अपमानकारक वागणूक दिली जाऊ लागली. त्यांना फक्त विशिष्ट गोष्टीच - उदा., बटाटे विकत दिल्या जात. याचा परिणाम ज्यूंच्या उपासमारीत लगेचच दिसू लागला. सगळया ज्यूंना आपापली घरे जैसे थे स्थितीत सोडून ज्यूंसाठी बनवलेल्या घेटोंमध्ये पाठवले गेले. घेटोतील ज्यूंना नाझी आर्मीचे लोक राबवून घेत असत आणि दिवसाच्या शेवटी ब्रेडची एक लादी दिली जात असे. तरीही सर्व कुटुंब एकत्र राहू शकत आहोत या समाधानात आणि त्या त्या देशातून पॅलेस्टाइनच्या दिशेने कसे बाहेर पडता येईल या प्रयत्नात ज्यू कुटुंबे असत. पण नाझी लोकांनी सर्व नाकाबंदी केल्याने तेदेखील अवघड होऊन बसलेले होते. त्याच वेळी नाझींनी ज्यूंना एकत्रितपणे मारण्यासाठी गॅस चेंबर्स तयार केली. सगळी सिध्दता झाल्यावर घेटोमधील ज्यूंना रेल्वेच्या मालगाडीतील डब्यांमध्ये अक्षरश: गुरांसारखे कोंबून त्या मालगाडया थेट गॅस चेंबर्समध्ये नेल्या जात असत. गॅस चेंबर्समध्ये शिरण्याआधी सगळयांना त्यांचे कपडे आणि बूट काढावयास सांगितले जाई. नंतर गॅस चेंबर्समध्ये त्यांची रवानगी होत असे. आतमध्ये गेल्यानंतर पाइप्सद्वारे विषारी वायू आत सोडला जात असे आणि एकाच वेळी अनेक ज्यूंची जीवनयात्रा किडयामुंग्यांसारखी संपवली जात असे. जर्मनीमध्ये अजूनही अनेक ठिकाणी असे लपवलेले गॅसचेंबर्स सापडतात. त्या ठिकाणी ज्यांना मरण आले, अशांचे बूट, कपडे, चीजवस्तूदेखील आढळतात. ज्यूंच्या पुढील पिढयांमध्ये ज्यूंवरील ह्या अन्यायाची स्मृती जागृत असावी यासाठी इस्रायलमधील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली जर्मनीतील, ऑॅस्ट्रियातील घेटो आणि गॅस चेंबर्स दाखवण्यासाठी नेल्या जातात.्र

त्याच सुमारास काही ज्यू धार्जिण्या जर्मन लोकांनी ज्यूंना यातून वाचवून पलायनास मदत करण्यास सुरुवात केली. ऑॅस्कर शिंडलर हे त्यातीलच एक मोठे नाव आहे. त्यांनी 1200 ज्यूंना आपल्या कारखान्यात नोकरीवर ठेवून हॉलोकॉस्टमधून वाचवले होते. एकूण 60 लाख ज्यू लोक यात मारले गेले. त्यांच्या निसान या महिन्यातील 27वा दिवस हॉलोकॉस्टमध्ये मारले गेलेल्या ज्यू बाधवांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. त्यालाच हिब्रूमध्ये 'योम हाशोहा' असे म्हणतात. जेरुसलेममध्ये 'याद वाशेम' हे हॉलोकॉस्ट पीडितांच्या स्मृतींचे मोठे संग्रहालय आहे. इस्रायलमध्ये अजूनही हॉलोकॉस्टमधून वाचलेल्या आणि ज्यांना कोणीच नाही अशा ज्यू लोकांसाठी 'हॉलोकॉस्ट सर्व्हायव्हर्स' सेंटर्स आहेत. या सेंटर्समध्ये हे लोक एकत्रितपणे हसत खेळत आपला वृध्दापकाळ व्यतीत करत आहेत.   

इस्रायलमध्ये गेल्यावर माझ्या परिचयात जे आले, त्यातील काहींच्या आई-वडिलांच्या हॉलोकॉस्टमधील कहाण्या ऐकावयास मिळाल्या. मी सिनेमात जे पाहिले होते, त्याहूनही काही भयंकर अनुभव होते. माझी तिथली एक मैत्रीण आहे. तिने तिच्या आईची ('क्ष'ची) कहाणी सांगितली. 'क्ष' 9-10 वर्षांची असताना ऑस्ट्रियातील एका गावात तिच्या आई-वडील आणि भावांसोबत राहत होती. एक दिवस अचानक नाझी सैनिक त्यांच्या गावात आले. गावातील सगळया ज्यूंना ट्रक्समध्ये कोंबायला सुरुवात केली. 'क्ष'ला आणि तिच्या भावांना वेगवेगळया ट्रक्समध्ये कोंबले. ट्रकच्या एका फटीतून 'क्ष'ला बाहेरचे दिसत होते. त्या वेळी पाहिलेले दृश्य मनाचा थरकाप उडवणारे होते. 'क्ष'ची आई आपल्या मुलांना हाका मारत घराच्या बाहेर आली, तर नाझी सैनिकांनी तिच्या अंगावर शिकारी कुत्री सोडली. आपले मरण डोळयासमोर दिसत होते, त्यामुळे तिने जिवाच्या आकांताने तिच्या मुलांना ओरडून सांगितले की तुमचे नातेवाईक पॅलेस्टाइनमध्ये आहेत. कसेही करून तिथे जाण्याचा प्रयत्न करा. 'क्ष'च्या डोळयासमोर तिच्या आईला शिकारी कुत्र्यांनी फाडून खाल्ले. त्यानंतर 'क्ष'ला आणखी काही जणांबरोबर दुसऱ्या एका गावात नेण्यात आले. पुढे गॅस चेंबर्समध्ये नेण्याआधी त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. तिथल्या दवाखान्यातील एका नर्सने 'क्ष'ला आणि काही जणांना सावध केले आणि तिथून पळून जाण्यास मदत केली.

तिथून निसटून 'क्ष' लपत छपत नेमकी नाझी आर्मीच्या कॅम्पपाशीच आली. तिथे सैनिकांपासून लपण्यासाठी ती त्यांच्या शौचालयात लपली. तिथेच घाणीत तीन दिवस राहिली आणि पकडली गेल्यावर पुढे तिला एका नाझी आर्मी कॅम्पमध्ये नेण्यात आले. तिथे तिच्यासारख्या अनेक मुली होत्या. त्यांच्याकडून विषारी पावडर वापरून दारूगोळा बनवून घेतला जात असे. त्याचा परिणाम त्या मुलींच्या आरोग्यावर होत असे. त्याचबरोबर जर्मन ऑॅफिसर्स त्या मुलींना वरच्या खोलीत नेऊन हंटरने गुरासारखे मारत. या सगळयाचा 'क्ष'च्या शरीरावर आणि मनावर खूप परिणाम झाला. वयाच्या 14व्या वर्षी नशिबाने तिची त्यातून सुटका झाली आणि जर्मनीतील एका रिकव्हरी सेंटरमध्ये तिला पाठवण्यात आले. तिथे 'क्ष' तब्बल 3-4 वर्षे होती. त्याच सेंटरमध्ये तिला तिचा चुलत भाऊ भेटला आणि दोघेही पॅलेस्टाइनमध्ये आले. आत्मविश्वास, स्वत्वाची भावना, जगण्याची उमेद हे सगळे हरवलेल्या स्थितीत वयाच्या 19व्या वर्षी 'क्ष' पॅलेस्टाइनमधील नातेवाइकांकडे पोहोचली. तिला पुढे जगण्याचीदेखील शाश्वती वाटत नव्हती.... लग्न, मुले-बाळे फार दूरची गोष्ट. पण नशिबाने 'क्ष'चे लग्न झाले आणि दोन मुलीही झाल्या. त्यातील एक माझी मैत्रीण. पण शेवटपर्यंत 'क्ष'च्या मनावरचे त्या अनुभवांचे परिणाम गेले नाहीत. माझ्या मैत्रिणीने सांगितले की तिची आई बुरशी आलेला ब्रेडचा तुकडादेखील फेकायला तयार नसे. त्यांना सायकल चालवणे, बाहेर खेळायला पाठवणे यासाठीसुध्दा तिची आई घाबरत असे.

वरील मजकूर वाचताना किळस, भीती, घृणा असे बरेच काही वाटू शकते. फुकटचे स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेल्या आपल्या देशातील अनेकांना या भयानकतेची कल्पना यावी! आपल्याकडे काश्मिरी हिंदूंनी, बंगालमधील हिंदूंनी, फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतांतील हिंदूंनी काय भोगलेय याची कल्पना यातून येईल. गेल्या 3-4 वर्षांत इराक, सीरियामधील याझिदी, कुर्दीश लोकांनी हेच थोडयाफार प्रमाणात भोगलेले आहे. एकेश्वरवादी धर्मांची धार्मिक कट्टरता कोणत्या थराला जाऊ शकते आणि ज्या लोकांना ते भोगायला लागते, त्यांच्या जीवनात याचे परिणाम किती खोलवर असू शकतात याची लोकांना कल्पना यावी, यासाठी इतके सगळे तपशिलात लिहिलेले आहे. सध्याचा इस्रायल असा का आहे, हे समजण्यास यातून मदत होईल. बाल्फोर घोषणा धाब्यावर बसवून संपूर्ण ज्युईश नेशन स्टेटचा कायदा पास का करून घेतला जातो, याचे उत्तर यातून मिळण्यास मदत होईल असे मला वाटते.   aparnalalingkar@gmail.com