वेदवाङ्मयमूर्ती श्रीगणेश!

विवेक मराठी    10-Sep-2018
Total Views |

माउलींनी वाग्देवीच्या मूर्तीसाठी केलेले स्तवन म्हणजे गणेशाच्या रूपाचे खरे वर्णन आहे. ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही. माउलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयाची मूर्ती आहे अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.

विघ्नहर्त्या गणरायाच्या मंगल आगमनाचे हे दिवस. या वेळी मनात रुणझुणते आहे ते ॐकारस्वरूप गणेशावरचे आदिकाव्य!

मराठीचे आद्यकवी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्याने केला, ते गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे.

'ॐ नमोजि आद्या' हे रेकॉर्डमध्ये ऐकून आपल्याला माहीत आहे, तो या संपूर्ण रचनेचा काही अंश आहे.

माउलींनी वाग्देवीच्या मूर्तीसाठी केलेले स्तवन म्हणजे गणेशाच्या रूपाचे खरे वर्णन आहे. ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही. माउलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयाची मूर्ती आहे अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.

ॐकार हे परब्रह्मस्वरूपाचे प्रथम नादरूप प्रतीक. त्याच्या उच्चाराने स्वरूपाची जाणीव निर्माण होते. या जाणिवेबरोबर एकरूपतेचे भान येते व त्यातून घडते ते खरे 'न मन'. तो खरा नमस्कार! विश्वनिर्मिती केल्यानंतर परमेश्वराने त्यावर उठवलेली आपली नाममुद्रा म्हणजे ॐ. 

अशा आदिबीज ॐकारापासून विस्तार पावत गेलेली शास्त्रे, दर्शने, त्यातून साकारलेले विस्तार पावत असलेले तत्त्वज्ञान, हा शब्दब्रह्मरूपी आविष्कार हेच गणेशाचे खरे रूप. म्हणून तो आदिदेव.  आपल्या कोणत्याही कृतीला याचे म्हणजेच तत्त्वाचे, विचारांचे अधिष्ठान असेल तर ते निर्विघ्न पार पडतेच.

ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ 1 ॥

देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु ॥

म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी ॥ 2 ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।

तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ 3 ॥

स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव ।

तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ 4 ॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।

पदपध्दती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥ 5 ॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ।

जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ 6 ॥

देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका ।

त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ 7 ॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पहातां कुसरी।

दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥ 8 ॥

तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती ।

चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ 9 ॥

देखा षडर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ।

म्हणउनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ 10 ॥

तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु ।

वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ 11 ॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।

तो बौध्दमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ 12 ॥

मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।

धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ॥ 13 ॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।

जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ 14 ॥

तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।

देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु विघ्नराजु ॥ 15 ॥

मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं ।

बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ 16 ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।

सरिसे एकवटत । इभमस्तकावरी ॥ 17 ॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।

तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ 18 ॥

अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।

मकार महामंडल ।  मस्तकाकारें ॥ 19 ॥

हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥

तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ 20 ॥

या मंगलाचरणाच्या आरंभी गणेशाला नमन करताना त्याला सर्वांचे मूळ 'आद्य', ज्याचे स्वरूप समजून घ्यायचे तर वेदांचा आधार घ्यावा लागेल असा  'वेदप्रतिपाद्य' आणि जो केवळ आपल्या आतल्या संवेदनेने, जाणिवेनेच जाणता येऊ  शकेल असा सर्वव्यापी, आत्मरूप असे म्हटले आहे.

त्या सर्व व्यापक गणेशाचा जयजयकार !!

हे गणेशा, तूंच सर्वांच्या बुध्दीमध्ये अर्थाचा प्रकाश पाडतोस!

हे नम्रपणे श्री निवृत्तींचा दास तुम्हांस सांगत आहे, तिकडे लक्ष द्यावे!

असा हा श्रीगणेश म्हणजे संपूर्ण वेदवाङ्मयाची जणू उत्तम वेषधारी मूर्ती.

त्याचे सुडौल शरीर 'वर्णवपु' म्हणजे स्वर-व्यंजनरूपी आहे, जे निर्दोषपणे झळाळत आहे!

पुढे माउलींनी त्याचा प्रत्येक अवयव, दागिने, फुले  यांसाठीदेखील जी प्रतीके वापरली आहेत, त्यातून आपल्या समस्त प्राचीन वाङ्मयाचा ठेवा किती प्रचंड आहे, हे लक्षात येते. श्रीगणेशाची पूजा म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाची पूजा असे का म्हणतात, ते पटते.

स्मृती हे त्याचे अवयव आहेत आणि त्यांच्यातील अर्थसौंदर्यामुळे या अवयवांना डौल प्राप्त झाला आहे.

अठरा पुराणे म्हणजे त्याची आभूषणे व त्या अलंकारातील जी रत्ने आहेत, ते या पुराणांतील तत्त्वज्ञान व त्यातील छंदमय पद्यरचना म्हणजे त्या रत्नांची कोंदणे!

आमच्याकडील लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हे त्याचे विविधरंगी वस्त्र! त्या वस्त्राचा पोत इतका दर्जेदार, तलम, चमकदार दिसतो आहे तो या काव्यातील शब्द- आणि अर्थालंकारामुळे!

त्याच्या पायातील लहान लहान घंटा/घुंगरू म्हणजे जणू काव्यनाटिका! त्या नूपुरांचा झंकार म्हणजे त्यातील अर्थ!

त्यातल्या तत्त्वसिध्दान्ताची पाहणी कराल, तर उचित अशा पदांची लहान लहान रत्ने त्यातही दिसून येतील!

व्यासादी कवींची प्रतिभा म्हणजे त्याचे कटिवस्त्र! त्यांच्या शुध्दतेचे प्रतीक म्हणजे त्याच्या पदराला असलेल्या मौक्तिकमाला!

जे निरनिराळे तत्त्वसंप्रदाय (वेगवेगळे विचारप्रवाह) सांगितले जातात, ते याचे सहा हात आहेत. यांची मतभिन्नता दर्शविण्यासाठी त्याच्या प्रत्येक हातात निराळे आयुध आहे!

तर्कशास्त्र हा हातातील परशू. न्यायदर्शन (नीतिभेदरूप अर्थशास्त्र) हा अंकुश. हातातील मोदक म्हणजे ब्रह्मरसाने भरलेला वेदान्त!

आपल्या परंपरेत बुध्दमताला (तत्त्वज्ञानाला) शून्यमत (अपुरे -परिपूर्ण नाही असे) मानले जाते. त्याची त्रुटी दर्शविण्यासाठी तुटका दात हातात आहे!

सांख्यमताचा सत्कार म्हणजे त्याचा वरदहस्त, (हाती कमल असलेला पद्मकर), तर आशीर्वाद देणारा अभयहस्त म्हणजे धर्माची प्रतिष्ठा!

आणि गणेशाची सरळ सोंड म्हणजे तर ब्रह्मसुख. केवल परमानंद! ती प्रतीक आहे अतिशय निर्मल, विवेकपूर्ण अशा योग्य-अयोग्यतेच्या सरळ विचारांचे!

या संदर्भातला परस्परातला संवाद म्हणजे त्याचे दात आणि त्या संवादातली नि:पक्ष वृत्ती म्हणजे त्या दातांची शुभ्रता!

आपल्या आत स्फुरण पावणारे ज्ञान म्हणजे त्याचे बारीक डोळे. असा हा विघ्नराज!

त्याचे दोन्ही कान म्हणजे धर्ममीमांसा व ब्रह्ममीमांसा. सर्व ॠषिमुनी भुंग्याप्रमाणे सतत श्रवण-चिंतनाचा मधुर गुंजारव करत त्याच्या गंडस्थलातून पाझरणाऱ्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करत आहेत, असे मला वाटते!

द्वैत-अद्वैत ही दोन प्रमेये गंडस्थळे आहेत, ती वादविवादात तितकीच तुल्यबळ असल्यामुळे एकमेकांना खेटून बसली आहेत. त्यावर दशोपनिषदांचा मुकुट व ती श्रुती-स्मृती-वेद-पुराणे यातील तत्त्वार्थरूप पोवळयांच्या आभूषणाने तेजस्वी दिसत आहेत!

उत्तम ज्ञानाचा मकरंद उदारपणे देणारी दहा उपनिषदरूपी फुले गणेशाच्या मुकुटाला शोभा देत आहेत.

असे सर्व वर्णन झाल्यावर मग 'अ'कार म्हणजे दोन्ही पाय, 'उ'कार म्हणजे विशाल पोट व 'म'कार म्हणजे मोठे गोल मस्तक हे तिन्ही एकत्र आल्यावर जो ॐकार तयार होतो, त्यात सारे साहित्यविश्व सामावते.

म्हणून त्या आदिबीजाला मी सद्गुरुकृपेने नमन करतो!

हे मंगलाचरण म्हणजे पुढे जे काही अतिशय विशुध्द असे ज्ञान मिळणार आहे, त्याची नांदीच आहे! संपूर्ण गीतेत वा ज्ञानेश्वरीत कुठेही कर्मकांडाचे अवडंबरच काय, समर्थनही नाही. या मंगलचरणातही जिथे जिथे तेज आहे ते ज्ञानाचे, तत्त्वार्थाचे व सौंदर्य आहे ते अर्थामुळे! आणि याचा आस्वादही घ्यायचा आहे, तो आपल्या जाणिवेने! केवळ रूक्ष, गंभीर, कोरडे तत्त्वज्ञानच श्रेष्ठ असे नाही, तर ते कला, लालित्य, प्रासादिकता यानी रसपूर्ण केलेले! असा रसमय, ज्ञानमय मोदकच माउली आपल्याला खाऊ  घालत आहेत असे वाटते! ज्ञानेश्वरी ही संपूर्ण तत्त्वज्ञान समजून घेण्याची आधुनिक काळातली पहिली पायरी मानता येईल. ज्ञानेश्वरीमुळे गीता समजते. गीतेमुळे महाभारत, भागवत वाचावे वाटते. त्यातून वेद-उपनिषदांचा अभ्यास करावासा वाटतो, अशी खालून वर - संसार ते मोक्ष नेणारी ही साखळी आहे, असे जाणकार सांगतात.

पहिल्याच यत्तेत याची गोडी निर्माण करण्याचे काम माउली अतिशय चातुर्याने करतात, हे नक्की!!

 

9890928411