नव्या पक्षाचे स्वागत करताना ...

विवेक मराठी    14-Sep-2018
Total Views |

भारतीय राजकारणात अनेक विचारधारा कार्यरत असून या विचारधारांना प्रकट करणारे विविध पक्ष स्थापन झाले आहेत. एकाच विचारधारेचे वेगवेगळे पैलू आणि नेतृत्व यामुळे एकच विचारधारा सांगणारे अनेक पक्षही स्थापन झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे. उदाहरणादाखल आपण 'समाजवाद' ही विचारधारा घेतली, तर अनेक गोष्टी आपोआपच स्पष्ट होतील. एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचा, तर निश्चित अशी ध्येयधोरणे, क ार्यक्रम पत्रिका आणि विपुल कार्यकर्ता बळ अपेक्षित असते, त्याचप्रमाणे भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व व काळाची आव्हाने समजून घेण्याची दृष्टी लागते. असे नेतृत्व व दृष्टी नसेल, तर स्थापन होणाऱ्या पक्षाचे दीर्घकालीन भविष्य नसते. ही सारी चर्चा करण्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक म्हणून काम करणाऱ्या सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात नुकतीच केलेली पक्षस्थापनेची घोषणा होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच रायरेश्वरासमोर दिवाळीनंतर मराठयांच्या पक्षाची स्थापना होईल. मराठा समाजाकडून होणारी आरक्षणाची मागणी तशी खूप जुनी असली, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रांत आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावरची आंदोलने होत आहेत. या आंदोलनांना सोशल मीडियावरून खूप मोठा पाठिंबा मिळत असून मराठा समाजाने स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करावा, राज्याची सत्ता हाती घ्यावी आणि मराठयांना आरक्षण द्यावे अशी सोशल मीडियावरून अनेक वेळा चर्चा होत होती. दोन महिन्यांपूर्वी मराठयांना आरक्षण मिळावे म्हणून झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यावर मराठा समाजाचा पक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता कोल्हापुरातून पक्षाच्या स्थापनेची घोषणा झाली आहे.

मराठा समाजाचा असा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आल्यावर मराठा समाजाचे प्रश्न संपतील, याबाबत आमच्या मनात शंका आहे. कारण मुळात मराठा समाजाचे प्रश्न हे आर्थिक व सामाजिक आहेत. केवळ राजकारण करून किंवा राजकीय पक्ष स्थापन करून त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? राजकारणातून या प्रश्नाची उकल होणार असेल, तर हा प्रश्न आजवर प्रलंबित का राहिला? कारण महाराष्ट्र राज्य विधानसभेत सर्वपक्षीय मराठा समाजाच्या आमदारांची संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे. तरीही या या प्रश्नाची तड लागत नाही, यामागचे कारण काय? हे समजून घेतले पाहिजे. आरक्षणाचा  प्रश्न केंद्र मानून मराठा समाजाचा पक्ष निर्माण होणार असेल, तर आरक्षण या विषयाशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, अन्य समाजाचा सहभाग याविषयीची भूमिका काय असणार आहे? हा पक्ष एका जातीचा असणार आहे की छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वरासमोर स्थापन होणारा पक्ष सर्वसमावेशक असणार आहे? आणि समजा, पक्ष स्थापन करून सत्ता हस्तगत केली, मराठा समाजाला आरक्षणही मिळवून दिले, तर त्यानंतर पक्षाची पुढची रणनीती काय असणार आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आज उपस्थित होताना दिसत आहेत. या प्रश्नाची कोंडी आगामी काळात कशी फोडली जाते, त्यावर पक्षाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.

मराठा समाजाला हवे असणाऱ्या आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा - म्हणजेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिला आहे. काही कारणामुळे रेंगाळलेला मागासवर्ग आयोगही आता गतीने काम करत असून 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला अहवाल देण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येतो की नाही याचा निवाडा मागासवर्ग आयोग करेल, न्यायालय त्याचा कायदेशीर आधार तपासेल आणि मागासवर्ग आयोगाचा निवाडा त्या कसोटीवर टिकला, तर न्यायालय शासनास आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आदेश देईल. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाबाबत याच पध्दतीने पुढे जावे लागते. या पध्दतीत राजकीय शक्ती किंवा पक्ष यांना नगण्य स्थान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षाची काय उपयोगिता आहे, याचा विचारही करायला हवा.

आपण लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्थेत जगतो आहोत. या व्यवस्थेत राजकीय पक्षांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या विचारधारेचे राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रकटीकरण करण्यासाठी हे पक्ष प्रयत्न करत असतात. मात्र त्यासाठी त्यांना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते, केवळ एका समूहाच्या उत्कर्षाचा विषय हाती घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही. उलट त्या पक्षावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. मराठा समाजाच्या उत्थानासाठी स्थापन होणारा नवा पक्ष कोणत्या मार्गाने जाईल आणि राजकीय इतिहासात त्याची कशा प्रकारे नोंद घेतली जाईल हे जरी आज ठामपणाने सांगता येत नसले, तरीही एक गोष्ट निश्चित आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न, म्हणजेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विषय हा आर्थिक व सामाजिक स्वरूपाचा आहे, याची नोंद मराठा समाजबांधवांनी घ्यायला हवी. मराठा समाजाचे सर्व प्रश्न केवळ राजकीय प्रयत्नातून निकाली निघणार नाहीत. समाजाचे प्रश्न सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये शासकीय प्रयत्नाबरोबरच सामाजिक प्रयत्नाचेही खूप महत्त्व आहे. मराठा समाज आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मनःस्थितीत आला आहे, पण सामाजिक पातळीवर प्रश्न सोडवण्याची काय व्यवस्था या समाजाने उभी केली, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ नव्या पक्षाचे स्वागत करताना आपल्यासमोर आली आहे. मराठा समाज जोपर्यंत आर्थिक, सामाजिक दृष्टीने या प्रश्नांना भिडत नाही, तोपर्यंत मागच्या पानावरून पुढे चालू असेच वर्तमान आपणास पाहावे लागणार आहे.