'सुमन्त्रिते सुविक्रान्ते' जागतिक हिंदू परिषदेचा मंत्र 

विवेक मराठी    14-Sep-2018
Total Views |

***विकास देशपांडे***

  शिकागो येथे दि. 7 ते 9 सप्टेंबर या दिवशी दुसरी जागतिक हिंदू काँग्रेस आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील हिंदूंना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने ही काँग्रेस भरवण्यात आली होती. त्यामुळे धार्मिक प्रवचने अथवा सांस्कृतिक कार्यक्रम हे या काँग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट नव्हते. त्याऐवजी, या काँग्रेसअंतर्गत अर्थशास्त्र अधिवेशन, महिला अधिवेशन, युवा अधिवेशन, विविध माध्यमांचे अधिवेशन, शिक्षण अधिवेशन , राजकारण अधिवेशन आणि हिंदू संस्थांचे अधिवेशन अशी सात समांतर अधिवेशने होती. या परिषदेचा सविस्तर वृत्तान्त.

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

60 देशांमधून आलेल्या 2500 हिंदूंच्या उपस्थितीत, दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या अनावरणाने, दुसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेसचा शुभारंभ झाला. चार वर्षांनी सर्व हिदूंना एकत्रित आणण्यासाठीचा हा सोहळा यंदा अमेरिकेत शिकागोजवळील लोम्बार्ड या गावी वेस्टीन हॉटेलच्या सभागृहात करण्याचे ठरवले होते. कारणदेखील तसेच होते. शिकागोला झालेल्या सर्वधर्म संसदेतील स्वामी विवेकानंदांच्या अजरामर व्याख्यानास या वर्षी, 11 सप्टेंबरला 125 वर्षे होणार असल्याने शक्यतो जवळची वेळ आणि तारीख निवडण्यात आली. आध्यात्मिक संत-महंत, शिक्षण, राजकारण, माध्यमे, उद्योग या आणि सद्यजीवनातील जे काही विविध मार्ग आहेत, त्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमेरिकास्थित उद्योजिका आणि कलाकार म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रिका टंडन यांनी एकात्मता मंत्र म्हणून कार्यक्रमातील हिंदू एकतेचे ध्येय परत अधोरेखित केले.

इलिनॉइस राज्याच्या उपगव्हर्नर एव्हिलीन सन्गुएनेटी, सुरीनामचे उपराष्ट्राध्यक्ष अश्विन अधीन यांच्या आणि इतर अनेक देशांतून आलेल्या पाहुण्याच्या उपस्थितीत कार्यक्रम चालू झाला. स्वामी विज्ञानानंद यांच्या शंखनादाने आणि काँग्रेसचे संयोजक डॉ. अभय अस्थाना यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रम सुरू झाला. विश्वविख्यात Massachusetts Institute of Technologyच्या (MITच्या) Sloan School of Managementचे प्राध्यापक डॉ. एस.पी. कोठारी हे या कार्यक्रमाचे संचालक होते. प्राध्यापक कोठारींनी आपल्या भाषणात हिंदू धर्माच्या आणि समाजाच्या सहिष्णुतेबद्दल बोलून प्रस्तुत कार्यक्रमाचा मोकळा दृष्टीकोन सांगितला. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या कार्यक्रमाचे घोषवाक्य, 'सुमन्त्रिते सुविक्रान्ते' म्हणजे काय हे सांगत हिंदू संघटनाची आवश्यकता का आहे, हे स्पष्ट केले. ''भारताची उतरती कळा संपली असून, आत्ताचा काळ हा आपली उन्नती कशी होईल यासंबंधी ऊहापोह करण्याचा आहे'' असे सांगत त्यांनी उपस्थितांना वैचारिक दिशा दिली. ते पुढे म्हणाले, ''हिंदूंना हिंदू धर्मात सांगितलेली वैश्विक मूल्ये माहीत आहेत हे खरे, पण ती आचरणात आणण्याचा त्यांना विसर पडल्याने, गेले सहस्रक हिंदू समाजाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे... हिंदू ऐक्य म्हणजे सगळयांनी सारखेच असावे असा अर्थ नसून, वैविध्य टिकवत असताना सर्वांचे समान सामाजिक ध्येय असणे महत्त्वाचे आहे.''

जागतिक बौध्द गुरू दलाई लामा, आर्ट ऑॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, चिन्मय मिशनचे जागतिक गुरू स्वामी स्वरूपानंद, धर्मसभेचे स्वामी परमात्मानंद, शीख सद्गुरू दलीप सिंगजी आदींनी उपस्थित राहून अथवा व्हिडिओवरून उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वामी स्वरूपानंद आपल्या भाषणात म्हणाले की, ''आज हिंदू कुटुंबे आणि कौटुंबिक मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी हिंदूंमधील हिंदू धर्म जागृत करण्याची गरज आहे.'' सद्गुरू दलीप सिंग म्हणाले, ''शीख हे हिंदूंपासून वेगळे होऊ  शकत नाहीत... पवित्र गुरुग्रंथसाहेबामध्ये म्हटले आहे की शिखांनी स्वत:मधील हिंदूपण जपणे गरजेचे आहे.''

अक्षय पात्र, इस्कॉन बंगळुरूचे मधू पंडित दासा म्हणाले, ''हिंदू धर्मातील विविध पंथ, हिंदू धर्माचे बलस्थान आहे.'' अमेरिकन काँग्रेसमध्ये इलिनॉइस प्रांतातून प्रतिनिधित्व करणारे राजा कृष्णमूर्ती म्हणाले, ''आज मी इथे उपस्थित असणे हे माझ्या काही मित्रांना आणि मतदारांना आवडलेले नाही. पण तरीदेखील मी येथे आलो आहे, कारण मला कायम माहीत असलेला आणि जो मी शिकून कायम आचरणात आणला, त्या सर्वसमावेशक हिंदू धर्माशी माझे दृढ नाते मला दाखवून द्यायचे होते.'' ते पुढे म्हणाले, ''थोडक्यात मी स्वामी विवेकानंदांनी दिलेली समानतेची शिकवण घेऊन आज येथे एक हिंदू, एक अमेरिकन आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहे!''

याआधी 2007 साली न्यूझीलंडला प्रायोगिक तत्त्वावर अशी काँग्रेस झाली होती आणि नंतर 2014ला दिल्लीमध्ये प्रथम काँग्रेस पार पडली होती. विविध क्षेत्रांतील हिंदूंना एकत्रित आणणे हे या काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे धार्मिक प्रवचने अथवा सांस्कृतिक कार्यक्रम हे या काँग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट ठरले नाही. त्याऐवजी, या काँग्रेसअंतर्गत अर्थशास्त्र अधिवेशन, महिला अधिवेशन, युवा अधिवेशन, विविध माध्यमांचे अधिवेशन, शिक्षण अधिवेशन, राजकारण अधिवेशन आणि हिंदू संस्थांचे अधिवेशन अशी सात समांतर अधिवेशने होती. 7 आणि 8 सप्टेंबरला दीड दिवस ही समांतर अधिवेशने चालली होती. प्रत्येक अधिवेशनात सहा विविध विषयांवरील सत्रे होती. त्यामध्ये विविध व्यावहारिक विषय आणि त्यातील हिंदूंचे स्थान यावर चर्चा झाली. त्या त्या विषयात तज्ज्ञ असलेले असे अनेक पाहुणे आले होते. त्यामध्ये दत्तात्रेयजी होसबाळे, अनुपम खेर, अश्विन अधीन (सुरीनामचे उपाध्यक्ष), उद्योजक राजू रेड्डी, मुकेश चाद्दार, मोहनदास पै, शिरीन कुलकर्णी, शेफाली वैद्य, विवेक अग्निहोत्री, मधुर भांडारकर, प्रा. मकरंद परांजपे, डेव्हिड फ्रोली (वामदेव शास्त्री), कॉन्राड एल्स्ट आदी अनेक वक्ते होते.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी - म्हणजे रविवार, 9 सप्टेंबरला सांगता समारंभ झाला. समांतर सत्रातून सुचवले गेलेले अनेक उपक्रम त्या दिवशी चर्चिले गेले. उदाहरणार्थ, तरुणांना राजकीय क्षेत्रात अनुभव येण्यासाठी शासकीय कचेऱ्यांत उमेदवारी हवी होती. महिलांना उद्यमशीलतेत रस होता, तर समाज माध्यमांतील तज्ज्ञांकडून शिकण्याची राजकीय व्यक्तींची इच्छा दिसली. थोडक्यात, सत्रे जरी समांतर असली, तरी त्यातून परस्परावलंबित्व दिसून आले आणि त्यासाठीचा उत्साह आणि झटण्याची तयारी सर्वांनी दाखवली. त्याचबरोबर भारताबाहेरील जगभरातील हिंदूंचे प्रमाण पाहता भारताबाहेर World Hindu Congressची कायमस्वरूपी कचेरी तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

कार्यक्रमाचा शेवट विशेष कार्यक्रमाने झाला. या वेळी भारताचे उपराष्ट्रपती मा. वेंकय्या नायडू उपस्थित होते. माननीय उपराष्ट्रपतींच्या भाषणातून त्यांचा स्वामी विवेकानंदांवरील गाढा अभ्यास आणि हिंदू धर्मावरील स्वाध्याय सहज लक्षात येत होता. त्यांनी आपल्या भाषणातून आसेतुहिमाचल असलेल्या भारतातील विविधता आणि त्याच वेळेस असलेले अखंडत्व याची उपस्थितांना जाण करून दिली. हिंदू विचारातील वसुधैव कुटुंबकम तत्त्व, तसेच सत्य एक असले तरी ते अनेक पध्दतीने दिसते, साधुसंत सांगतात हे दाखवून दिले. सरतेशेवटी त्यांनी मातृभाषेची आणि मातृभाषेच्या जपणुकीची सर्वांना आठवण करून दिली.

World Hindu Congressच्या संयोजकांनी कार्यक्रम संपल्याची घोषणा करत असतानाच पुढील काँग्रेस 2022 साली थायलंडला भरेल असे जाहीर केले. विविध श्रध्दांचा, संप्रदायांचा, आचारविचारांचा एकत्रित आलेला 2500 जणांचा हा समुदाय आपापल्या घरी परतत असताना, भरपूर काही सक्रिय विचार आणि उत्साह घेऊन जात होता, हे त्यांच्या चालू असलेल्या चर्चांतून आणि प्रतिक्रियांमधून जाणवत होते.

vvdeshpande@gmail.com