देणाऱ्याने देत जावे...

विवेक मराठी    19-Sep-2018
Total Views |

आई-वडिलांचे संस्कार आणि वाटचालीतील अनुभव यांनी माझ्यातील उद्योजक घडवला, पण माझ्यातील माणूस घडवण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरल्या त्या दोन स्त्रिया - माझी आई व माझी पत्नी. आईने माझ्यावर कष्ट, स्वाभिमान, स्वावलंबन, काटकसर आणि प्रामाणिकपणाचे संस्कार केले, तर पत्नीने मला व्यवसाय एके व्यवसाय या चाकोरीतून बाहेर काढून माझा दृष्टीकोन आनंदी व समाजाभिमुख बनवला. 'देणाऱ्याने देत जावे' ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली.

 माझी आई शशिकला म्हणजे शेगावच्या दामोदर आणि शांताबाई कुरळकर यांच्या तीन मुलींतील सगळयात धाकटी. जुन्या काळाला अनुसरून तिचे शालेय शिक्षण फारसे झाले नव्हते, परंतु ती उत्तम आणि व्यवहारकुशल गृहिणी होती. गरिबीतही तिने बाबांचा संसार उत्तम आणि स्वाभिमानाने करून दाखवला. माझ्या जन्माच्या अगोदर - म्हणजे गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात ती लाड कारंजाजवळचा देवीचा डोंगर पायी चढून गेली आणि तिने देवीला बोललेला नवस फेडला. माझ्यातील निश्चयी स्वभाव ही माझ्या आईचीच देणगी आहे.

कोणत्याही व्यावसायिकाला त्याच्या घरच्यांचा पाठिंबा असणे फार महत्त्वाचे असते. सुदैवाने मला आई-वडिलांकडून आणि पत्नीकडून तसा पाठिंबा सतत मिळाला आहे. पण व्यवसाय क्षेत्राकडे माझी पावले वळण्यास सर्वप्रथम कारणीभूत ठरली ती आई. मुंबईत कालिना येथे मिलिटरी कॅम्पसमध्ये राहायला असताना शाळकरी वयात मी परिसरातील झाडांवर चढून चिंचा-बोरांचे वाटे करून फावल्या वेळात विकत असे. माझे हे उद्योग वडिलांच्या कानावर कधी गेले नाहीत, पण आईनेही कधी त्या खटपटीला हरकत घेतली नाही. चिंचा-बोरे विकून साठवलेली पहिली कमाई मी आईला नेऊन दिली, तेव्हा ती इतकेच म्हणाली, ''दादाऽ, कष्टाने पैसे कमवणे कधीही चांगलेच, पण तू सदैव प्रामाणिकपणे काम कर. घामाचा पैसा मिळव, पण पापाचा पैसा कधीच घरी आणू नकोस.'' त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात मी मुंबईच्या उपनगरांत दारोदार फिरून फिनेल, इन्स्टंट मिक्सेस अशी उत्पादने विकत होतो, तेव्हाही आईने तोच इशारा दिला. परिणामी मी कधीही पैशासाठी हावरट बनलो नाही आणि चांगल्या मार्गावरून पाऊल ढळेल अशा नको त्या तडजोडीही केल्या नाहीत.

माझ्या आईचा स्वभाव इतरांना मदत करण्याचा होता. आम्हाला कधी कुणाकडे समारंभ व भोजनासाठी आमंत्रण आले, तर आई पाहुण्यासारखी पहिल्या पंगतीला कधीच जेवायला बसायची नाही. ती गेल्या-गेल्या प्रथम यजमानांच्या स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवायची, तेथे घरधनिणीला कामात मदत करू लागायची आणि तिच्यासोबतच शेवटच्या पंगतीला अन्नग्रहण करायची. मला ती नेहमी सांगायची, ''आपण सर्वांच्या उपयोगी पडलो, तर हा समाजच आपल्याला पुढे घेऊन जातो.'' मला पुढच्या आयुष्यात आईच्या त्या शब्दांचा खरोखर पडताळा आला. व्यवसाय कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्या माझ्यासारख्या नवशिक्याला असंख्य लोकांनी आपुलकीने मदत आणि मार्गदर्शन केले. दुकानात झाडू-पोछा करणाऱ्या तरुणाला त्याच्या ग्राहकांनीच एक दिवस 'मसाला किंग' बनवले.

लहानपणी गरिबीत दिवस घालवताना मी आईला म्हणायचो, ''आईऽ, मी इतके कष्ट करीन की एक दिवस आपली परिस्थिती बदलून टाकीन. खूप श्रीमंत होईन आणि तुम्हालाही सुखी करेन.'' त्यावर आई म्हणायची, ''अरे! कष्ट केल्यानंतर कुणालाही समृध्दी मिळतेच; पण खरा माणूस तो असतो, जो आपले पूर्वीचे गरिबीचे दिवस न विसरता आपल्या संपत्तीचा हिस्सा समाजऋण फेडण्यासाठी वापरतो. खरे वैभव पैशात आणि मालमत्तेत नसून माणुसकीत आहे. गौतम बुध्दाचा उपदेश आहे, की आपण समाजाला जे देतो तेच आपल्याकडे दसपटीने परत येते. म्हणून आपण माणुसकीचे बियाणे पेरावे, म्हणजे पीकही आपुलकीचेच येते.''

व्यवसायात उतरल्यावर मी आईचे शब्द आठवून नेहमी कष्टाच्या, प्रामाणिकपणाच्या आणि माणुसकीच्या मार्गावर चालत राहिलो. आमची परिस्थिती पालटल्यावर मी आईला खर्चासाठी भरपूर रक्कम देऊ लागलो. वास्तविक आईला त्याची गरज नव्हती, पण माझे मन मोडू नये म्हणून ती ते पैसे घ्यायची. ती अखेरपर्यंत साधी, अनासक्त व श्रध्दाळू राहिली. आईचे निधन झाल्यावर मला वडिलांकडून समजले, की मी आईला देत असलेले पैसे तिने कधीच खर्च केले नव्हते. त्या रकमेची तिने बँकेत मुदत ठेव करून ती माझ्या नावावर ठेवली होती. तिचा हात नेहमीच देणारा राहिला होता. कवी विंदा करंदीकरांची एक कविता आहे.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे

मला सांगायला अभिमान वाटतो की आईकडे बघून माझाही हात इतरांना मदत करणारा राहिला.

आईने तिच्या पश्चात माझ्यासाठी बक्षीस म्हणून ठेवलेली ठेव वैयक्तिक कारणासाठी खर्च करू नये, असे मला मनोमन वाटत होते. पण मग त्या रकमेचा सदुपयोग कसा करता येईल, याचा मी विचार करू लागलो. त्यातून मला एक कल्पना सुचली. आमच्या कुलदेवतेवर - म्हणजे तुळजाभवानीमातेवर आईची अत्यंत श्रध्दा होती. लाड कारंजा गावात बाबांनी जमीन घेऊन त्यात एक घर बांधले होते, तरीही आसपास बरीच जागा रिकामी राहिली होती. गावात जवळपास देवीचे देऊळ नसल्याचे आई नेहमी बोलून दाखवायची. ते लक्षात ठेवून मी आईने मागे ठेवलेल्या रकमेत काही भर घालून त्या जागेत तुळजाभवानीचे मंदिर बांधलेच, शिवाय एक मंगल कार्यालयही बांधले, ज्यामुळे भाविकांची आणि गोरगरिबांची सोय झाली. आईचा समाजसेवेचा वारसा जपल्याचे मला आत्यंतिक समाधान लाभले. 

मला समाजाभिमुख बनवण्यात माझ्या पत्नीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. तिला प्रथमपासून समाजसेवेची आवड होती. आमचा विवाह ठरला, तेव्हा ती एका रुग्णालयात रुग्णांची सेवा-शुश्रुषा करायची. दातारांच्या घरात प्रवेश केल्यानंतर तिने घर-संसार, व्यवसाय व नात्यांच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्याच, परंतु स्वत:मधील समाजसेवेचा पैलू कधीही हरवू दिला नाही. एकेकाळी मी माझ्या व्यवसायात इतका गुरफटून गेलो होतो की संसाराकडेही माझे लक्ष नव्हते. मुलांच्या संगोपनात वाटा उचलणे, कुटुंबासह विरंगुळयाचे क्षण घालवणे, वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणे या गोष्टींकडे माझे दुर्लक्ष झाले होते. त्याचा फटका मला बसला. मी आजारी पडलो, दुखण्यामुळे एकाकी व चिडचिडा झालो. या निराश मन:स्थितीतून आणि व्यवसाय एके व्यवसाय या चाकोरीतून मला माझ्या पत्नीने बाहेर काढले. ती मला आग्रहाने सार्वजनिक समारंभांना घेऊन जाऊ लागली. शारीरिक आव्हाने पेलणाऱ्यांच्या जगात ती मला घेऊन गेली, आपल्या सहवासाने त्यांच्या नजरेत उमटलेला आनंद तिने मला दाखवला. माझ्या हातून गरजूंना तिने मदत घडवली. परदेशामध्ये मराठी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उपक्रमाचे बीज तिने माझ्या मनात रुजवले.

व्यवसायामध्ये मला नफा-तोटयाचा विचार करावाच लागतो, पण समाजसेवेने मात्र मला त्यापलीकडे पाहायला शिकवले. प्रसिध्दीपराङ्मुख राहून आपण इतरांच्या अडचणींचे ओझे हलके करतो तेव्हा त्यात किती समाधान असते, याचा मला प्रत्यय आला. उद्या हे जग सोडून जाताना कदाचित परमेश्वराने मला विचारले की 'जीवनात तू अर्थपूर्ण काय केलेस?' तर माझ्याकडे सांगण्यासारख़्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे मी कायम प्रामाणिक राहिलो आणि कुणाचीही एका पैशाचीही फसवणूक केली नाही आणि दुसरी म्हणजे मी संत तुकाराम महाराजांच्या 'जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेच करी' या उपदेशानुसार वागलो आहे.

मित्रांनो, मला सुखाचा सदरा सापडला आहे असा माझा मुळीच दावा नाही. पण अनुभवाने जितके उमगले, त्यावरून सांगू इच्छितो की माणसाने कष्टाने भरपूर कमवावे, पैसा नुसता साचवून न ठेवता त्याचा आनंदासाठी विनियोग करावा. स्वत:ला, कुटुंबाला, आपल्या संपर्क-सहवासात येणाऱ्यांना आनंदी ठेवावे. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, त्याच्याप्रती कृतज्ञ राहून त्याच्या देण्याची परतफेड करावी. सभोवतालच्या जगातील गरजूंना, वंचितांना आणि आव्हाने पेलणाऱ्यांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करावी. मागे एक मराठी चित्रपट बघत असताना त्यातील संवादात लक्षात राहिलेले एक वाक्य मला खूप आवडले - 'हे जग सुंदर आहे आणि आपल्याला ते आणखी सुंदर बनवायचे आहे.'

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)