आमच्या वैश्विक वारशाचे स्मरण

विवेक मराठी    21-Sep-2018
Total Views |

'भविष्यातील भारत' हे या तीन दिवसीय विचार संमेलनाचे शीर्षक होते. संघाचा दृष्टीकोन काय आहे हे सरसंघचालकांनी सांगितले. भविष्यातील भारत आर्थिक, नैतिक आणि सामरिकदृष्टया समर्थ हवा. हे सामर्थ्य आपल्याला जगावर अधिराज्य गाजविण्यासाठी मिळवायचे नाही. मानवाला सुखी करण्यासाठी मिळवायचे आहे. त्यासाठी जी पूर्वअट आहे ती, 'समतायुक्त, शोषणमुक्त आणि विश्वासाठी मनात सद्भावना ठेवून चालणारा समाज उभा राहिला पाहिजे.' हे आमचे व्हिजन डॉक्युमेंट आहे.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दिल्लीतील विज्ञान भवनात 17 ते 19 सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे दोन दिवसीय व्याख्यान आणि एक दिवसीय प्रश्नोत्तरे असा तीन दिवसांचा कार्यक्रम 'भविष्यातील भारत' या शीर्षकाखाली ठेवण्यात आला. या व्याख्यान सत्रासाठी संघाबाहेरील बुध्दिजीवी आणि समाजातील अन्य मान्यवर व्यक्ती यांना आमंत्रित केले गेले होते. समाजाच्या विविध स्तरांतील मंडळी या भाषणमालेसाठी दिल्लीच्या विज्ञान भवनात एकत्र झाली. संघाच्या आजवरच्या वाटचालीत हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरावा, असा झालेला आहे. यापूर्वीही संघाने आपल्या वेगवेगळया कार्यक्रमांत समाजातील मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केलेले आहे. नागपूरच्या तृतीय वर्ष संघशिक्षा समारोपासाठी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना निमंत्रित केले होते. ते आले आणि त्यांचे भाषणही झाले. ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा उपस्थित होते. अशा प्रकारे समाजातील मोठया व्यक्तींना संघकार्यक्रमात बोलवण्याची परंपरा डॉ. हेडगेवारांपासून चालू आहे.

या परंपरेतील पुढचा टप्पा समाजातील सर्व क्षेत्रांतील प्रमुख मंडळींना बोलावून त्यांच्यापुढे संघ मांडण्याचा कार्यक्रम, म्हणजे दिल्लीतील उपक्रम होय. असा उपक्रम यापूर्वी का केला गेला नाही? आताच का केला गेला? त्यामागे काही राजकीय हेतू आहे का? काही राज्यांच्या निवडणुका आहेत, 2019 साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम झाला का? अशा अनेक चर्चा या विषयावर चालू आहेत.

यापूर्वी असा कार्यक्रम का नाही केला गेला? या प्रश्नाचे उत्तर असे की, अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक प्रकारचे वातावरण लागते, ज्यांना बोलावायचे आहे ते सहजपणे कार्यक्रमाला येतील अशी परिस्थिती असावी लागते. अशी परिस्थिती या वेळी निर्माण झाली. त्यामुळे संघाच्या निमंत्रणावरून निमंत्रित कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विज्ञान भवनातील सर्व आसने पूर्ण भरलेली होती. ती जर रिकामी राहिली असती, तर मोहनजी काय बोलले याची बातमी न होता रिकाम्या आसनांची बातमी झाली असती. अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे असा कार्यक्रम घ्यावा असे संघाला वाटले?

संघाचा विचार करता परिस्थितीमध्ये जबरदस्त बदल झालेला आहे. संघ पूर्वी शक्तिस्थानावर होताच, परंतु त्यापेक्षा अधिक मोठया शक्तिस्थानावर संघ आलेला आहे. संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान आहे, राष्ट्रपती स्वयंसेवक आहेत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री स्वयंसेवक आहेत. देशाचे वातावरण असे आहे की जो सत्तास्थानी जातो, त्याला सर्वच लोक अतिशय शक्तिमान समजतात. संघाचे स्वयंसेवक सत्तास्थानी गेल्यामुळे संघ खूप शक्तिमान झाला आहे, असे बहुतेकांना वाटते. संघच सत्ता चालवतो, हा आरोप तर रोजच होत असतो आणि ज्यांना संघाची काही माहिती नसते, त्यांनादेखील संघ सत्ता चालवतो, असेच वाटते.

याच्या जोडीला सततच्या अपप्रचारामुळे संघाविषयी समाजात प्रचंड भ्रम निर्माण केले गेले आहेत. संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ एकाधिकारशाहीवादी आहे, संघाचा लोकशाहीवर विश्वास नाही, संघ महिलाविरोधी आहे, संघाची राष्ट्राविषयीची भूमिका संकुचित आहे, संघाचे काम गुप्तपणे चालते, संघाला देशातील बहुविविधता संपवून टाकायची असून आपलेच प्रभुत्व निर्माण करायचे आहे, असे एकापेक्षा एक आरोप संघावर केले जातात. या जुन्या आरोपांबरोबर संघाला घटना बदलायची आहे आणि विषमता निर्माण करणारी घटना संघाला आणायची आहे, संघाला इतर राजकीय पक्ष संपवून टाकायचे असून भाजपाची एकपक्षीय राजवट आणायची आहे, असे आरोपही केले जातात.

समाजमानसावर या आरोपांचा परिणाम होतोच. संघाविषयी मते असणाऱ्यांची वर्गवारी अशी करता येते - 1. अज्ञानी - ज्यांना संघाविषयी शून्य माहिती असते. 2. चुकीची माहिती असणारे - काही जणांना संघाची ऐकीव आणि वाचीव माहिती असते, त्यांनी प्रत्यक्ष संघ पाहिलेला नसतो. 3. भ्रमित - या गटात ज्यांचा पध्दतशीरपणे बुध्दिभ्रम केलेला आहे, असे लोक येतात. 4. विपरीत विचार करणारे - यात प्रामुख्याने कम्युनिस्ट विचारधारा मानणारे, कम्युनिस्टांचा राष्ट्र आणि समाजविचार मानणारे लोक येतात. या चारपैकी ज्यांनी शिशुपाल व्रत स्वीकारलेले आहे - म्हणजे संघाला शिव्या घालण्याचेच ज्यांनी ठरवलेले आहे, त्यांचे मतपरिवर्तन करणे कुणालाही शक्य नाही. भागवतांनी तीनच काय, तीनशे भाषणे दिली तरी त्याचा परिणाम शून्य! परंतु जे अज्ञानी आहेत, भ्रमित आहेत, चुकीची माहिती ग्रहण करणारे आहेत, त्यांचे गैरसमज खूपशा प्रमाणात दूर केले जाऊ शकतात. दिल्लीच्या कार्यक्रमातून हेच साध्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी भाषण करताना भूमिका अशी घेतली की मला तुम्हाला कोणताही उपदेश करायचा नाही, की माझा विचार तुमच्यावर लादायचा नाही. संघ काय आहे, एवढेच तुम्हाला सांगायचे आहे. आपल्याला स्वयंसेवक नसलेल्या समुदायासमोर बोलायचे आहे आणि हे बोलणे दूरचित्रवाहिन्यांवरून देशातील सर्व लोक ऐकणार आहेत, याची जाणीव मोहनजींना नक्कीच होती. त्यामुळे दोन दिवसांच्या भाषणात ज्यावरून वादंग माजविला जाईल किंवा विपरीत अर्थ काढले जातील असे कोणतेही विधान त्यांच्या भाषणात आले नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी कोणत्या परिस्थितीत आणि का संघ सुरू केला, हे त्यांनी डॉक्टरांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सांगितले. 1925 साली एका बैठकीत 'संघ सुरू करीत आहोत' हे डॉक्टरांनी घोषित केले. प्रथम मासिक बैठका, मग साप्ताहिक बैठका आणि मग त्यानंतर रोजचे मिलन असा कार्यक्रम सुरू झाला. संघ सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी शाखा सुरू झाली. शाखेचे वेगवेगळे कार्यक्रम कसे सुरू झाले, हे मोहनजींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

संघ का सुरू करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी डॉक्टरांच्या जीवनाच्या आधारेच दिले. ''जोपर्यंत समाजातील सर्वसामान्य व्यक्ती चारित्र्यसंपन्न, समाजाचा विचार करणारी, देशाचा विचार करणारी होत नाही, तोपर्यंत देश उभा राहणार नाही. देश पारतंत्र्यात गेला, कारण या गुणांचा अभाव होता. देश स्वतंत्र आणि बलशाली बनवायचा असेल, तर या गुणांची निर्मिती झाली पाहिजे. हे काम राजकीय किंवा अन्य कोणत्याही चळवळीकडून होणार नाही. हे काम मलाच करावे लागेल, असा डॉक्टरांनी विचार केला आणि संघ सुरू केला.'' मोहनजींनी जे सांगितले, त्याचा सारांश असा आहे. संघस्वयंसेवकांना ही गोष्ट पूर्ण माहीत असते, परंतु अज्ञानी, भ्रमित, चुकीची माहिती असणाऱ्यांना यातले काहीही माहीत नसते.

संघाला देशात प्रभुत्व निर्माण करायचे नाही. संघाला स्वत:चे नाव अजरामर करायचे नाही. ''संघामुळे देश मोठा झाला असे जर इतिहासात लिहिले गेले, तर तो संघाचा पराभव असेल'' या शब्दात मोहनजींनी संघाचे वेगळेपण मांडले. संघ सुरू करत असताना डॉ. हेडगेवारांनी हीच भूमिका मांडली की आपल्याला नवीन काही करायचे नाही आणि जे काही काम करायचे आहे, ते सर्वांना बरोबर घेऊन करायचे आहे. कोणाच्या विरोधात आपल्याला काम करायचे नाही. आम्ही कोणाला शत्रू मानीत नाही. सगळेच आमचे मित्र आहेत. मोहनजींनी हीच भूमिका अत्यंत स्षष्ट शब्दात मांडलेली आहे. एका राजकीय पक्षाला सत्तेवर बसविण्यासाठी संघाचे काम चालत नाही. संघाला सगळेच आपले आहेत.

पहिल्या दिवसाच्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीतील योगदानाविषयी गौरवाचे उद्गार काढले. डॉ. हेडगेवार काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले होते. 1929 साली काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याचा ठराव केला आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करावा असे ठरवले. डॉ. हेडगेवारांनी सर्व शाखांना पत्र लिहून या दिवशी स्वातंत्र्य विषयावर भाषण करावे आणि हा दिवस साजरा करावा असे सांगितले, अशी सर्व माहिती मोहनजींनी आपल्या भाषणात दिली. काँग्रेसविषयी ते म्हणाले, ''स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक लोकांनी देशासाठी बलिदान केलेले आहे. ते आजही आम्हाला जीवनात प्रेरणा देतात. सर्वसामान्य माणसाला स्वतंत्रतेच्या मार्गावर आणण्याचे काम या धारेने केलेले आहे. स्वातंत्र्यापूर्वी सर्व देशाची ती एक राजकीय धारा होती.''

काँग्रेस संघाचा किती द्वेष करते हे सांगण्याची गरज नाही. राहुल गांधींनी इसिस आणि इस्लामिक ब्रदरहुड यांच्याशी संघाची तुलना केलेली आहे. असे असताना मोहनजींनी काँग्रेसची स्तुती का करावी? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. राजकारणी त्याचे उत्तर वेगळया प्रकारे देतील. ते म्हणतील - मोहनजींनी भाजपाला संदेश दिला आहे, संघ काँग्रेसशी जवळीक साधू इच्छितो वगैरे. परंतु हे विश्लेषण खरे नाही. मोहनजींना हे सांगायचे आहे की आम्हाला सर्वच पक्ष समान आहेत. काँग्रेसशी आमचे कसलेही वैर नाही. ते आमच्या विचारधारेत बसत नाही. आमचे काम एका राजकीय पक्षाला निरंतर सत्तेत बसविण्याचे नाही. 'मुक्त भारत' हे आमचे धोरण नसून 'लोकयुक्त भारत' हे आमचे धोरण आहे. या लोकयुक्त भारतात राहणारे सर्व उपासना पंथाचे लोक येतात. 'मुसलमानमुक्त भारत' ही आमची संकल्पना नाही. आम्हाला कोणावरही प्रभुत्व निर्माण करायचे नाही. कारण संघाचा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. आमची चिंता राष्ट्राची असते. राष्ट्रीय विषयावर आम्ही बोलतो,'' हे मोहनजींनी विस्ताराने आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

आम्हाला कोणाचा विरोध करता येणे शक्य नाही. कारण जी हिंदू विचारधारा आम्ही मानतो, ती मानवधर्माची विचारधारा आहे. भारताचा स्वभाव म्हणजे हिंदुत्व आणि हा स्वभाव सर्वसमावेशकतेचा आहे. कोणावरही आपले मत लादण्याचा नाही. पॉल ब्रॅन्टन हे रमण महर्षींना म्हणाले होते, ''मला हिंदू व्हायचे आहे.'' रमण महर्षी त्यांना म्हणाले की ''त्याची काही गरज नाही. तू ख्रिस्ती धर्माचे पालन श्रध्दापूर्वक कर, तुला सत्य सापडेल.'' हे उदाहरण देऊन मोहनजी यांनी आपली परंपरा आपले मत दुसऱ्यावर लादण्याची नाही हे स्पष्ट केले. 'स्वदेशो भुवनत्रयम्' अशी आपली विश्वकुटुंबाची कल्पना आहे. व्यापकता हा आपला स्वभावधर्म आहे. 'सब्ब पापस्य अकरणम्। कुसलस्स उपसंपदा। सचित्तपरियोदपनम्। एतं बुध्दानु शासनम्॥' भगवान गौतम बुध्दांचे हे वचन मोहनजींनी आपल्या भाषणात सांगितले. भारतातील सर्व पंथ-संप्रदायांमध्ये मूल्यांविषयीची समानता असते. अहिंसा, सत्य, अक्रोध, स्वाध्याय, तप इ. मूल्ये सर्वत्र समान असतात. या मूल्यांच्या आधारे आपल्याला जगायला शिकले पाहिजे. आपण तसे जगत नाही. त्यामुळे हिंदू समाजाचा वैरी हिंदू समाजच असतो, ही गोष्ट मोहनजींनी सुरेखरित्या आणि सोप्या भाषेत आपल्या भाषणातून सांगितली.

महिला वर्गाला देवता बनविणे किंवा दासी बनविणे या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत, तर त्यांना राष्ट्रजीवनात समानतेचे आणि बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, हेदेखील मोहनजींनी सांगितले. राज्यघटनेचा त्यांनी अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला. ''आपले संविधान विद्वान लोकांनी प्रत्येक शब्दावर चर्चा करून परिश्रमपूर्वक तयार केलेले आहे. ते आमची सद्सदविवेकबुध्दी आहे.'' त्यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेची उद्देशिका वाचून दाखवली. राज्यघटनेची उद्देशिका, राज्यघटनेचे तत्त्वज्ञान असते. बंधुता हा त्यातील एक शब्द आहे. समाजात बंधुभाव निर्माण करण्यासाठीच संघाचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनीच घटना समितीसमोरच्या अखेरच्या भाषणात बंधुभावनेवर कोणते विचार व्यक्त केले, यांचेही त्यांनी स्मरण करून दिले.

'भविष्यातील भारत' हे या तीन दिवसीय विचार संमेलनाचे शीर्षक होते. संघाचा दृष्टीकोन काय आहे हे सरसंघचालकांनी सांगितले. भविष्यातील भारत आर्थिक, नैतिक आणि सामरिकदृष्टया समर्थ हवा. हे सामर्थ्य आपल्याला जगावर अधिराज्य गाजविण्यासाठी मिळवायचे नाही. मानवाला सुखी करण्यासाठी मिळवायचे आहे. त्यासाठी जी पूर्वअट आहे ती, 'समतायुक्त, शोषणमुक्त आणि विश्वासाठी मनात सद्भावना ठेवून चालणारा समाज उभा राहिला पाहिजे.' हे आमचे व्हिजन डॉक्युमेंट आहे. जर व्हिजन डॉक्युमेंट तयार झाले तर ते जगावर प्रभुत्व गाजवण्यासाठी निर्माण होणार नाही. आपल्या भाषणात रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी यांना मोहनजींनी उद्धृत केलेले आहे. या तिघांनीही मानवाला उंच करणारे विचार आपल्या भाषणात, लेखनात आणि काव्यात मांडलेले आहेत.

मोहनजींच्या भाषणाचे मर्म थोडक्यात सांगायचे तर त्यांनी आपल्या परीने भारतवासीयांना भारताच्या सर्वसमावेशक, समन्वयवादी, विश्वकल्याणकारी वैश्विक वारशाची आठवण करून दिली. म्हटले तर ती नवीन आहे, असे नाही. ज्ञानदेवांचे पसायदान त्यावरच आहे आणि शिकागो येथील विवेकानंदांच्या भाषणाचा आशयदेखील हाच आहे. एवढेच काय, उद्देशिका ठरावावर घटना समितीची जी भाषणे झाली, त्या भाषणातूनही हाच आशय प्रकट केला गेला आहे. परंतु, भव्य विचारामागे भव्य, सात्त्वि शक्ती लागते. संघाच्या रूपाने ती आज उभी आहे. मोहनजींच्या मुखातून आणि सात्त्वि शक्तीच्या अधिष्ठानावरून ही विश्वात्मकता भारताच्या राजधानीत ध्वनित झाली, हादेखील एक मोठा ऐतिहासिक क्षण आहे.

प्रश्नोत्तरांतून उलगडला संघाचा विचार

या कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या व शेवटच्या दिवशी पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत प्रश्नोत्तर व शंकानिरसनाचे सत्र पार पडले. प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये त्यांनी संघ व राजकारण, संघाची महिलाविषयक भूमिका, कलम 370, समान नागरी कायदा, आरक्षण व ऍट्रोसिटी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.

 

v रोटी-बेटी व्यवहार व आंतरजातीय विवाहाबाबत बोलताना डॉ. भागवतांनी खुल्या दिलाने रोटी-बेटी व आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले. परंतु रोटी व्यवहाराइतका बेटी व्यवहार सहजसोपा नाही, असेही ते म्हणाले. कारण त्यात दोन परिवारांचा व दोन जिवांच्या कायमस्वरूपी जीवनाचा प्रश्न असतो. सारासार विचार करून हा विषय हाताळला गेला पाहिजे. 1942 साली तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी महाराष्ट्रातील आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांचे अभिनंदन केले होते, असे सांगून मोहनजींनी आपले मत व्यक्त केले. तसेच आज आंतरजातीय विवाह केलेल्यांची आकडेवारी काढल्यास सर्वांत जास्त आंतरजातीय विवाह केलेल्यांच्या संख्येत स्वयंसेवकच अधिक आढळून येतील, असे सांगत लक्ष वेधून घेतले.

 

v जातिव्यवस्थेवर बोलताना ही मुळात व्यवस्था नसून 'अव्यवस्था' असल्याचे सांगून त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध दर्शविला. जातिव्यवस्थेला जबरदस्तीने घालविण्याचा प्रयत्न केल्यास ती अधिक घट्ट होते. अंधार घालविण्यासाठी काठीची नाही, तर दिव्याची गरज असते असे रूपक उदाहरण देऊन समाजमन बदलवून जातिव्यवस्था घालवावी लागेल असा संदेश त्यांनी या वेळी बोलताना दिला.

 

v संघातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे स्थान काय, यावर बोलताना डॉ. भागवतांनी संघात जातीपातीला थारा नाही व आम्ही कधी कोणाला जात विचारत नाही असे स्पष्ट सांगितले. परंतु, संघात पूर्वी उच्च स्तरावर विशिष्ट जातीतील स्वयंसेवकांचा भरणा अधिक होता. पण संघ जसजसा सर्व समाजात पोहोचत गेला, तसतसे संघात सर्वच जातींतील स्वयंसेवकांची संख्या वाढली. आज क्षेत्र स्तरावर व अखिल भारतीय स्तरावर विविध जातींतून आलेले पण स्वत:ला केवळ हिंदू मानणारे स्वयंसेवक आपल्याला दिसतील. भटक्या विमुक्त जातीसाठी तर संघाचे अहोरात्र सेवा कार्य चालू आहे. संघाच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांसाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील 'यमगरवाडी' या अभिनव प्रकल्पाला भेट देण्याचे त्यांनी त्या वेळी सर्व उपस्थितांना आवाहन केले.

 

v शिक्षण या विषयावर बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की आपल्या देशाच्या संस्कृतीचा व परंपरांचा विचार करून आपली शिक्षण पध्दती ठरली पाहिजे. चालू शिक्षण पध्दतीत बदल व्हावा ही तर संघाची इच्छा आहे. लोक म्हणतात की शिक्षणाचा स्तर घटतो. पण हे खोटे असून शिक्षण देणाऱ्याचा व शिक्षण घेणाऱ्याचा स्तर घटतो आहे, हेच सत्य आहे. शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला आपण देशाची भावी पिढी घडवत असल्याचे भान असले पाहिजे आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपणास देशाच्या व समाजाच्या कल्याणासाठी ज्ञान संपादन करायचे आहे हे माहीत असले पाहिजे. पण दुर्दैवाने आजकाल विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षणाकडे केवळ डिग्री व कमाईचे साधन म्हणून पाहतात. हा विचार बदलणे गरजे आहे. काही खाजगी शिक्षणसंस्था शैक्षणिक बाबतीत चांगले कार्य करीत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

 

  1. भाषा या विषयावर बोलताना मोहनजींनी आपला कोणत्याही भाषेला विरोध नसल्याचे सांगितले. पण भाषा ही संस्कृतीची वाहक असते. इंग्लिशविषयी शत्रुत्व नको. पण, दोन भारतीय एकमेकांशी बोलताना इंग्लिशमध्ये बोलतात, हे आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. देशाच्या उन्नतीसाठी आपल्या मातृभाषेचे महत्त्व फार मोठे आहे. ते आपण जोपासले पाहिजे. ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी राज्य केले, त्या त्या ठिकाणी इंग्लिश भाषेला जास्त महत्त्व प्राप्त झालं. आपल्या देशातून इंग्लिश बोलणारे विद्वान निर्माण व्हावे, पण आपल्या संस्कृतीतील भाषाही आपल्याला चांगल्या पध्दतीने अवगत असायला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले.

v महिलांच्या सुरक्षेविषयी बोलताना महिलांना स्वसंरक्षणक्षम बनवता आले पाहिजे व महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीकडे मातेच्या नजरेने पाहणे शिकवले आहे. केवळ कायदे करून उपयोग नाही, तर समाजमन बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

v मॉब लिंचिंग व गोरक्षण विषयावर बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की कायदा हातात घेणे ही चुकीचीच बाब आहे. अशा अपराध्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. गोरक्षणासाठी हिंसा करण्याची आवश्यकता नाही. गायीचे महत्त्व जर समाजापर्यंत पोहोचवता आले, तर गायींच्या तस्करीवर व विक्रीवर आळा बसेल. जर गोधनाविषयी जागृती झाली, तर गायच गरीब शेतकऱ्याचा आधार बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक मुसलमानसुध्दा गोसेवा करतात. त्यामुळे धार्मिक नजरेने गोसेवेकडे पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

v आरक्षणावर बोलताना डॉ. भागवत म्हणाले की आरक्षण ज्यांना मिळाले आहे, त्यांनी स्वत:च ते किती दिवस ठेवायचे व कधी सोडायचे याचा विचार करावा. मुळात आरक्षण ही समस्या नाहीच. आरक्षणावर राजकारण होते ही समस्या आहे. त्याचप्रमाणे अस्पृश्यताही कोणत्या कायद्यामुळे आली नाही, की जी कायदा केला म्हणजे घालवता येईल. ऍट्रोसिटी कायद्याचा होणारा दुरुपयोग तेवढा टाळता आला पाहिजे. सामाजिक सदभाव रुजला म्हणजे अशा कायद्यांची गरजच पडणार नाही.

 

v अल्पसंख्याकांविषयी संघाचे मत व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले, मुळात आपल्याकडे अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या स्पष्ट नाही. श्रीगुरुजींच्या 'बंच ऑफ थॉट्स'चे उदाहरण देऊन संघाला बऱ्याचदा मुस्लीमद्वेषी असल्याचा शिक्का मारला जातो. पण ते खरे नाही. संघ कुणाकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहत नाही. संघाचे विचार कालानुरूप बदलत आले आहेत व त्याची परवानगी आम्हाला खुद्द डॉ. हेडगेवारांनी दिली असल्याचे त्यांनी हसतमुखाने सांगितले. संघाला समजून घेण्यासाठी संघात येण्याचे त्यांनी त्या वेळी प्रश्नकर्त्यांना आवाहन केले.

 

v राममंदिराच्या मुद्दयावर बोलताना मोहनजींनी 'अयोध्येत श्रीराम मंदिर झालेच पाहिजे' असे स्पष्टपणे सांगितले. अयोध्या हे प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे तिथे मंदिर झालेच पाहिजे. देशात देवाला न मानणारेही श्रीरामाबद्दल आदरभाव ठेवतात. राममंदिर उभे राहिले म्हणजे देशातील एक संवेदनशील विषय संपुष्टात येईल, असेही ते या वेळी म्हणाले.

 

v संघाच्या कार्यपध्दतीवर विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, संघ 'बॉडी ऑफ इंडिविज्युअल्स' या तत्त्वावर स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला असल्यामुळे संघाची नोंदणी झालेली नाही. पण तरीही संघाचे वेळेवर ऑडिटही होते व संघाचे सर्व उच्चपदस्थ निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडले जातात. सरसंघचालकपद हे संघाचे श्रध्दास्थान असल्यामुळे त्याची निवडणूक होत नाही. पण संघात मुळात सरकार्यवाह हे सर्वोच्च अधिकारी पद आहे. सरकार्यवाह ठरवतात तशी संघाची ध्येयधोरणे ठरतात. आवश्यक ते बदल होतात. पण तत्पूर्वी संघातील स्थानिक स्तरापासूनच्या स्वयंसेवकांच्या मताचा विचार केला जातो व त्यानुसारच निर्णय घेतले जातात. संघात एकाधिकारशाही नसून सर्व काही सर्वानुमते ठरत असते. आज मी जे काही बोलत आहे, तेसुध्दा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच बोलत आहे, असे ते म्हणाले.