वेळेची किंमत जाणून घ्या

विवेक मराठी    26-Sep-2018
Total Views |

कोणताही निर्णय उतावीळपणे न घेता विचारपूर्वक आणि शांतपणे घ्यावा, हे तत्त्व कुणालाही पटण्याजोगे असते, परंतु यालाही अपवाद आहे. काही प्रसंगच असे असतात की तेथे निर्णय घेताना वेळ गमावून चालत नाही. कारण दिरंगाई झाली तर एकतर हातची संधी जाते किंवा मग न भरून काढण्यासारखे नुकसान होते. रुग्णाची स्थिती बघून त्याच्यावर नुसती औषध योजना करायची, शस्त्रक्रिया करायची की आपत्कालीन उपचार करायचे, हे जसे डॉक्टर तत्काळ ठरवतात, तसेच काहीसे व्यवसायाबाबत आहे. 'ए स्टिच इन टाइम, सेव्ह्ज नाइन' (वेळेवर घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो) ही म्हण अर्थपूर्ण आहे.

 माझा एक मित्र गंमतीने म्हणायचा, की निर्णय घेण्याचा प्रसंग कधी लव्ह मॅरेजसारखा, तर कधी अरेंज्ड मॅरेजसारखा असतो. प्रेमविवाहात झटपट कृती करावी लागते, मात्र तोच विवाह ठरवून होत असेल तर नियोजनाचा तपशील ठरवत बसायला बराच वेळ हातात असतो. मी पूर्वी पैसा किंवा व्यवसायाबाबतचा निर्णय घेताना सावकाश आणि पुन्हापुन्हा विचार करून घेत असे. त्यामागेही कारण होते. दुबईत दुकान सुरू केल्यावर पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाल्याने, भागीदारीत विश्वासघात झाल्याने किंवा बाजारपेठेत फसवणुकीचे अनुभव आल्याने आम्ही प्रत्येक पाऊल सावधपणे उचलत होतो. एक प्रकारे दुधाने तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो, या म्हणीसारखी ती अवस्था होती.

पुढे मात्र संयुक्त अरब अमिरातीत (यूएईमध्ये) आमच्या दुकानांची साखळी वाढू लागली, तसतशा आमच्याकडे व्यवसायाच्या नव्या संधी चालून येऊ लागल्या. वैयक्तिक ग्राहकांप्रमाणेच प्रामुख्याने हॉटेल्स, हॉस्पिटल्स, केटरिंग कंपन्या आदींकडून त्यांना घाऊक मालपुरवठा करण्याबाबत विचारणा होऊ लागली. रोजच्या रोज वस्तू वापरून संपतात, अशा ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा त्वरित आणि सातत्यपूर्ण होण्याची गरज असते. त्यामुळे अशा संस्था तात्पुरत्या खरेदीपेक्षा लाँग टर्म काँट्रॅक्ट करण्याला प्राधान्य देतात. हे लोक माझ्याकडे तत्काळ करारावर सह्या करण्याबाबत आग्रह धरत. मी मात्र सवयीप्रमाणे त्यांना 'विचार करून सांगतो' असे म्हणायचो. नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली, की ज्या वेळेस मी हे शब्द उच्चारायचो, त्या वेळेस नेमके ते डील हातातून जायचे.

एकदा असेच एक काँट्रॅक्ट हातचे गेल्यानंतर मी त्या कंपनीच्या प्रमुखांकडे माझे काय चुकले, अशी विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, ''दातार साहेबऽ, काही व्यवसाय असे असतात ज्यांची अवस्था 'ऍलिस इन वंडरलँड' कादंबरीत रेखाटलेल्या एका पात्रासारखी असते. हातात भाकरी घेऊन खात-खात पळणाऱ्या माणसाला छोटी ऍलिस विचारते, 'अरे तू एका जागी उभा राहून शांतपणे भाकरी का खात नाहीस?' त्यावर तो उत्तर देतो, 'मला भाकरी मिळवण्यासाठी पळावे लागतेच, पण ती थांबून खाण्याइतकाही वेळ माझ्याकडे नाही.' आमचेही तसेच आहे. तुम्ही पुरवठा करण्याचा विचार करण्यासाठी हवा तितका वेळ घेऊ शकता, पण आम्हाला मात्र 'जस्ट इन टाइम इन्व्हेन्टरी' हे तंत्र पाळावेच लागते. वेळेत कच्च्या मालाचा पुरवठा झाला नाही, तर आमच्या उत्पादनाची पुढची साखळी कोलमडते.''

मला तेव्हा समजले, की प्रत्येक परिस्थितीत 'थंडा करके खानेका' हा मंत्र वापरता येत नाही. एकदिवसीय किंवा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू तटवत बसून चालत नाही. संधी मिळताच ताकदवान फटके मारून चौकार अथवा षटकार जमवावे लागतात. म्हणजेच 'मोका देखके चौका मारनेका' हे व्यूहतंत्र वापरावे लागते. उत्पादनाची खरेदी (प्रॉडक्ट बाइंग) अथवा माल पुरवठयाचा करार (सप्लाय काँट्रॅक्ट) असे व्यवहार फार काळ लोंबकळत ठेवून चालत नाहीत. पण तेच एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल, तर उतावीळपणा करून चालत नाही. आपण विचार करून खात्री पटल्यावरही तो निर्णय घेऊ शकतो. व्यवसायात वेगवान निर्णय कधी आणि कसा घ्यावा, याचा एक आडाखा आहे. तुमच्यासमोर पुरवठयाची संधी येईल त्याच वेळी त्यातील फायद्याची आकडेमोड मनात करून ठेवा. विचार करून सांगतो असे म्हणण्यापेक्षा तुम्हाला इमिजिएट उद्याच कळवतो, असे चतुराईने सांगितलेत तर दोन फायदे होतात. एकतर तुम्हाला विचार करायला एक दिवस जादा मिळतो आणि तुम्ही प्रॉम्प्ट आहात, अशी प्रतिमाही समोरच्याच्या मनात निर्माण होते.

वेळेचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, की व्यावसायिकाला स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही वेळेची किंमत समजली पाहिजे. धंद्यात टाइमपास नसतो. काही वर्षांपूर्वी मी मुंबईत एका गृहस्थांच्या ऑॅफिसमध्ये गेलो होतो. आम्ही बोलत असताना तेथे एक सेल्समन आला. तो कोणत्यातरी मोबाइल कंपनीची सिमकार्ड विकत होता. ज्यांचे ऑॅफिस होते ते गृहस्थ त्या सेल्समनकडून कार्डची, प्लॅन्सची माहिती विचारून घेत होते व मध्येच त्याला अडवून त्याच्या कंपनीच्या योजनेतील चुकाही काढत होते. त्या सेल्समनचे पूर्ण ऐकून घेण्याआधीच ते ''तुम्हारी कंपनी का नेटवर्क अच्छा नही है, डिस्टर्बन्स बहुत है, सुनने में दिक्कत होती है'' असे शेरे मारत होते. त्या सेल्समनने काही पटवून देण्याचा प्रयत्न केला, की हे गृहस्थ त्यावर उलट टिप्पणी करायचे. यात जवळपास अर्धा-पाऊण तास गेला. शेवटी कंटाळून तो सेल्समन निघून गेला.

मला तो प्रकार विचित्र वाटला. जर या गृहस्थांना सिमकार्ड घ्यायचे नव्हते, तर त्यांनी त्या सेल्समनला प्रथमच तसे सांगायचे होते. विनाकारण स्वत:चा आणि त्याचाही वेळ कशाला वाया घालवायचा? मी त्यांना तसे विचारलेही. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ''अहो! या कंपन्या आपल्याला नको असतानाही त्यांचे कार्ड घेण्यासाठी गळयात पडतात. प्लॅन समजावून देण्यासाठी सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला कधी पाठवू, असे वारंवार फोन करून भंडावून सोडतात. मग मीही मुद्दाम त्यांच्या सेल्समनला बोलवून घेऊन मस्तपैकी अर्धा-पाऊण तास टाइमपास केला.''

त्यांच्या तोंडचा 'टाइमपास' हा शब्द ऐकताच मी अस्वस्थ झालो आणि भेट आटोपती घेतली. या प्रसंगात खरे तर कुणाचा वेळ वाया गेला असेल, तर तो माझा होता, कारण सेल्समन पगार घेऊन त्याचा जॉब करत होता आणि हे सद्गृहस्थ निव्वळ टाइमपास करत होते. मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले. मुंबईत दारोदार फिनेल, इन्स्टंट मिक्स अशी उत्पादने विकणारा मीही एक सेल्समन होतो. तेव्हा पुष्कळ ग्राहक असाच टाइमपास करून माझा वेळ वाया घालवायचे. काही जण उत्पादनाची माहिती सविस्तर ऐकायचे, वस्तू ठेऊन घ्यायचे, पण पैशासाठी वारंवार खेटे घालायला लावायचे. मी होतकरू होतो आणि मला पैशाची गरज असल्याने या कालापव्ययाचा राग आला तरी तो दाखवणार कुणाला? मग मी आपला शांत राहायचो.

नंतरच्या काळात हजारो ग्राहकांच्या स्वभावाचे नमुने पाहिल्यानंतर अनुभवाने मी विक्रीतील वेळेचे महत्त्व शिकलो. आमच्या दुकानात काम करताना मी अगदी थोडक्या वेळात ग्राहकांना उत्पादनांबाबत खात्री पटवून द्यायला लागलो. माझ्या बाबांच्या स्वभावातून मी बरेच शिकलो. ते ग्राहकांची आपुलकीने चौकशी करताना चतुराईने त्याच्या आवडीही जाणून घेत. ग्राहकांकडून त्यांना भारतातील निरनिराळया गावांत उत्तम उत्पादने कोण बनवतो किंवा कुठल्या प्रांतातील लोकांच्या आवडी काय आहेत, याची माहिती मिळत असे. हा तपशील ध्यानात ठेवून बाबा त्या वस्तू तत्परतेने मागवून घेत व ग्राहकांना आनंदी करत. ते मला एक म्हण सांगत, ती म्हणजे 'बोलण्याला चांदीची किंमत असते, ऐकण्याला सोन्याची किंमत असते आणि वेळेवर कृती करण्याला हिऱ्याची.'

ग्राहकाला उत्पादन विकत घेण्यात खरा रस आहे की निव्वळ टाइमपासमध्ये, हे विक्रेत्याने प्रथमच ओळखायचे असते. त्याचा साधासा ठोकताळा म्हणजे सकारात्मक विचारसरणीचे लोक दुसऱ्याचे बोलून होईपर्यंत लक्षपूर्वक ऐकून घेतात आणि नंतर शंका विचारतात. याउलट टाइमपास करणारे लोक संभाषणात मध्येच अडवून तक्रारी सांगू लागतात किंवा स्वत:ची मते प्रदर्शित करू लागतात. सेल्समनने अशा लोकांपासून सावध राहायचे असते. ते संभाव्य ग्राहक (पोटेन्शियल कस्टमर) नसल्याने त्यांच्यापुढे तोंडाची वाफ न दवडण्यातच शहाणपण असते.

मित्रांनो, 'टाइम इज मनी' ही म्हण मुळीच खोटी नाही. वेळ पैशाइतकाच मूल्यवान असतो. आपण आपला वेळ वाया घालवू नये आणि दुसऱ्याचाही. प्रत्येक क्षणाला महत्त्व असते, हे समर्थ रामदासांनीही सांगून ठेवले आहे. ते म्हणतात...

ऐक सदैवपणाचे लक्षण। रिकामा जाऊ नेदी एक क्षण।

प्रपंच व्यवसायाचे ज्ञान। बरे पाहे॥

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)