गोष्ट बहात्तर हजार माधव गुरुजींची

विवेक मराठी    04-Sep-2018
Total Views |

'बे एके बे' नावाचा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीप्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधव गुरुजी नावाचे पात्र भौतिक सुखसुविधांना तिलांजली देऊन गावाचा विकास करण्यासाठी निरंतर झटताना दाखवले आहे. एकल विद्यालय या संकल्पनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. देशाच्या सुदूर भागात अद्यापही शिक्षणाचा, सर्वांगीण विकासाचा प्रकाश पसरलेला नाही, या विधानाला छेद देणारी संकल्पना म्हणजे एकल विद्यालय हा उपक्रम. या विद्यालयांच्या माध्यमातून सुमारे बहात्तर हजार गुरुजी समाजकल्याणार्थ झटत आहेत.

''चहाच्या मळयात काम करणारी, कधी साध्या ट्रेननेही प्रवास न केलेली, पूर्ण आसामही जिने पाहिलेले नाही अशी मी एक खेडवळ मुलगी. अशा मुलीने लंडनमध्ये एक आठवडा राहणे, ऑॅलिम्पिकची मशाल हातात घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करणे हे स्वप्नांच्याही पलीकडचे आहे. पण हे स्वप्न पूर्ण झाले, याला कारण आहे एकल विद्यालयाने माझ्या हाती सोपवलेली ज्ञानाची, आत्मविश्वासाची मशाल. ही मशाल हाती घेऊन, माझ्यासारख्या अनेक पिंकी कर्माकर मला घडवायच्या आहेत.'' - पिंकी कर्माकर. (आसाममधील दिब्रुगढ येथील शाळांमध्ये चालवत असलेल्या दैनंदिन क्रीडा उपक्रमांची, तसेच बालविवाह, व्यसनमुक्ती व साक्षरता यासाठी चालवत असलेल्या चळवळीची दखल घेऊन युनिसेफने 2012 साली झालेल्या लंडन ऑॅलिम्पिकची मशाल हाती घेण्याचा मान पिंकी कर्माकरला दिला होता.)

''सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी एका देशद्रोही संघटनेबरोबर काम करत होतो. त्या संघटनेबरोबर काम करण्यात आम्हाला धन्यता वाटत होती, कारण अन्य कोणतीही संघटना विधायक काम करत नव्हती. परिसरातील अनेक युवक या संघटनेत होते. आपण करतोय ते देशविघातक कृत्य आहे याचेही आम्हाला भान नव्हते. पण हळूहळू या सगळयाचे भान येऊ लागले आणि ही संघटना सोडून मी दिशाहीन बनलो. त्या सुमारास एकल विद्यालयाचा कार्यकर्ता एकल अभ्यासवर्गाचे निमंत्रण घेऊन आला. या निमित्ताने मी एकल विद्यालयाशी जोडला गेलो. तिथे चालणाऱ्या कामाची माहिती मिळाली, मी एकल विद्यालयाकडे आकर्षित झालो आणि पुढे एका शाळेचा आचार्य (शिक्षक) झालो. वाट चुकलेला माझ्यासारखा एक युवक एकलमुळेच आज राष्ट्राच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेला.'' - आचार्य कर्ण गौड, तिनसुकिया, आसाम.

हे मनोगत आहे भारताच्या छोटयाशा खेडयामधील थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या एका क्रीडापटूचे आणि तिनसुकियातील एका शिक्षकाचे. केवळ हेच नव्हेत, तर अशा अनेक पिंकी कर्माकरना आणि कर्ण गौडांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एकल विद्यालयांनी केले आहे. नेमके आहे तरी काय हे एकल विद्यालय?

सर्वांगीण विकासासाठी एकल विद्यालय

देशाच्या विकासासाठी येथील कोनाकोपऱ्यातील खेडयातील, वाडया-वस्त्यांमधील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत पसरलेल्या भारत नावाच्या मोठया राष्ट्रात कित्येक वर्षे समाजातील अनेक घटकांपर्यंत शिक्षणाच्या मूलभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नव्हत्या. शारीरिक कुपोषणासह शैक्षणिक कुपोषण, आर्थिक शोषण यालादेखील जनता बळी पडत होती. यासाठी तातडीने उपाय योजणे आवश्यक होते. झारखंड येथील धनबाद येथे संघाचे दायित्व असणारे मदनलाल अगरवाल यांनी या जाणिवेतून 1989 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या उपस्थितीत 'एकल विद्यालय' या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. एकल या शब्दातच या संकल्पनेचा अर्थ दडलेला आहे. सोप्या भाषेत याला 'एकशिक्षकी शाळा' असेही म्हणता येईल. भारताच्या अतिदुर्गम परिसरांसाठी एकल विद्यालये वरदान ठरली आहेत. 3 ते 8 या वयोगटातील मुलांच्या मनात शिक्षणाची ऊर्मी जागवण्याचे आणि ज्येष्ठांच्या मनात शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम एकल विद्यालयांनी केले आहे.

वनबंधू परिषद, विश्व हिंदू परिषद, भारत लोकशिक्षा परिषद, एकल विद्यालय फाउंडेशन ऑॅफ इंडिया, सेवाभारती या संघपरिवारातील संस्थांच्या माध्यमातून भारतातील व नेपाळमधील 71 हजार 669 ठिकाणी एकल विद्यालय हा उपक्रम राबवला जातो. देशाचा व राज्यांचा सीमावर्ती भाग, सामाजिक व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसर, अविकसित ग्रामीण भाग व जनजाती क्षेत्र आदी ठिकाणी विशेषकरून एकल विद्यालयाचा उपक्रम राबवला जातो. दि. 30 जून 2018च्या आकडेवारीनुसार आज भारतातील झारखंड, छत्तीसगड, आसाम, अरुणाचल अशा 23 राज्यांत एकल विद्यालयाचा संसार विस्तारला आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नक्षलवादी पट्टयात एकल विद्यालयाचे काम मोठया प्रमाणावर चालते. अंदमान निकोबार बेटांवरही हा उपक्रम राबवला जातो. नेपाळमध्येही 2072 शाळा आहेत. 19 लाख 25 हजार विद्यार्थी या एकल विद्यालयात शिकत आहेत. शिकवण्याची इच्छा व आवड असणाऱ्या व किमान दहावी झालेल्या एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला तीन महिने शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन एकल विद्यालयाचे शिक्षक होता येते. स्थानिक नागरिक असेल तर संवाद साधण्याच्या आणि विद्यार्थ्याच्या आकलनाच्या दृष्टीने सोयीचे ठरते. आयआयटी, एनआयटीमधून शिकलेले, पीएचडीधारक अनेक तरुण नोकरी/व्यवसाय करण्याआधी अनुभव म्हणून एकल विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. अतिशय अल्प मोबदल्यात हे शिक्षक काम करतात. सकाळी तीन तास किंवा संध्याकाळी तीन तास हे वर्ग भरवले जातात. सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थी असलेले अनेक युवक आज एकल विद्यालयांचे आचार्य/आचार्या म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

चाकोरी ओलांडणारी पंचमुखी शिक्षण पध्दती

सर्वांगीण विकास म्हणजे केवळ वह्यांच्या आणि क्रमिक पुस्तकांच्या आधारे घेतलेले शिक्षण नव्हे. विविध सांख्यिक तसेच शाब्दिक खेळांच्या आणि उपक्रमांच्या आधारे एकल विद्यालयात शिकवले जाते. आचार्य/आचार्या म्हणून ओळखले जाणारे शिक्षक पंचमुखी शिक्षण पध्दतीच्या आधारे एकल विद्यालये चालवतात. प्राथमिक शिक्षण, आरोग्य शिक्षण, जागृती, विकासात्मक प्रशिक्षण आणि संस्कारक्षम शिक्षण अशा मुद्दयांच्या आधारे एकल विद्यालयाचे काम चालते.

'खेले-कूदे-नाचे-गाएँ' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या एकल विद्यालयातील शिक्षकांची पहिली जबाबदारी असते ती मुलांना एका जागी बसवण्याची. गाण्यांचा, गोष्टींचा, खेळांचा, चित्रकला-हस्तकलेचा आधार घेत मुलांना एका जागी बसवणे आणि त्याची सवय झाली की त्यांना मूलभूत शिक्षण देणे याची जबाबदारी आचार्यांवर असते. अनेकदा अर्धा ताससुध्दा बसण्याची मुलांची तयारी नसते. उपक्रमशील पध्दतीच्या आधारे एकल विद्यालयात तिसरीपर्यंतचे शिक्षण दिले जाते, त्यांची परीक्षा घेतली जाते व विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्याला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जाते. यासह मुलांना संस्कारक्षम शिक्षणही दिले जाते. उदाहरणार्थ, शाळेत येताना व्यवस्थित आवरून येणे, स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून नखे-केस वेळोवेळी कापणे, शाळेत येताना आईवडिलांना, घरातील ज्येष्ठांना वाकून नमस्कार करणे, आपल्यापेक्षा खालच्या इयत्तेतील विद्यार्थ्याला अभ्यासात मदत करणे, शाळेत आल्यावर गायत्री मंत्र, सरस्वती वंदना म्हणून अभ्यासाला सुरुवात करणे, जेवणापूर्वी प्रार्थना म्हणणे इत्यादी. अनेक शाळांमध्ये भारतीय संस्काररहित शिक्षण असते. एकलमध्ये मात्र संस्कारासहित शिक्षण दिले जाते.

अधिक रकमेच्या मजुरीच्या पावतीवर सही घेऊन कमी मजुरी दिली जात असल्याचे प्रकार ग्रामीण भागात अनेकदा घडतात. निरक्षरतेमुळे मजुरांना या गैरप्रकाराची जाणीव होत नाही. अशा वेळी आकडेमोड कळू लागलेली मुले आपल्या पालकांना याची जाणीव करून देतात.

पंचमुखी शिक्षणातील दुसरा मुद्दा सर्व समाजासाठी तयार करण्यात आला आहे. एकल विद्यालयाच्या स्थापनेपूर्वी जे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात भारतातील बराचसा भाग कुपोषित असल्याचे लक्षात आले. त्यावर तोडगा म्हणून प्रत्येक गावकऱ्याला, जनजातीयाला आपल्या घराच्या मागे पोषणवाटिका तयार करण्यासाठी एकल विद्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. रोपवाटिकांसाठी त्या नागरिकांना पोषक भाज्यांची रोपे, बिया देण्यात येतात. त्यांच्या भाज्या त्यांनीच पिकवायच्या व खायच्या. याचा परिणाम गेल्या तीस वर्षांत बऱ्याच मोठया प्रमाणावर दिसून आला असून एकल विद्यालय असणाऱ्या गावातील महिलांच्या व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण सुमारे 80 टक्क्यांनी खाली आले आहे. या परिसरामध्ये विविध आरोग्य शिबिरे भरवली जातात. त्याचाही फायदा या गावकऱ्यांना झाला आहे.

तिसरा मुद्दा येतो तो जागृतीचा. एकल विद्यालय हे केवळ बालकांसाठी न राहता प्रौढांसाठीही काम करते. सरकार जनतेसाठी राबवत असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांना मदत करणारे एकूण 8 हजार 582 पूर्णवेळ सेवाव्रती कार्यकर्ते काम करत आहेत. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराअंतर्गत सुमारे 9 हजार अर्ज करण्यात आले असून त्यांपैकी 70 टक्के अर्जांना केवळ उत्तरे न मिळता त्यावर कार्यवाहीही झाली.

एकल विद्यालय असणाऱ्या गावांतून ग्रामोत्थान रिसोर्स सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून विकासात्मक शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतात. एकल विद्यालयाअंतर्गत विकासात्मक प्रशिक्षण दिले जाते. त्यात स्त्रियांकरिता शिलाई प्रशिक्षण, दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रशिक्षण दिले जाते. 'एकल ऑॅन व्हील्स' नावाने 12 लॅपटॉपने सुसज्ज अशी बस तीन महिन्यांसाठी तीन गावांत सुमारे चार तासांसाठी फिरत असते. आज अनेक महिला शिवणकाम करून महिन्याला सुमारे दहा हजार रुपये कमावत आहेत. हस्तकला, सेंद्रिय शेती, हायब्रीड शेती व बायोगॅस प्लांट यासारखे उपक्रमही ग्रामोत्थान रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून राबवले जात आहेत.

प्रौढांसाठी वेगळा विभाग

पंचमुखी शिक्षण पध्दतीतील पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो संस्कारक्षम शिक्षणाचा. भारतीय संस्कारांच्या आधारे प्रौढ शिक्षण वर्ग चालवले जातात. पंधरा वर्षांवरील सर्वांसाठी संस्कारक्षम शिक्षण दिले जाते. यात सत्संग, कीर्तने, प्रवचने, भागवत सप्ताह, धार्मिक विधी यांचा समावेश होतो. यासाठी गावातील एखाद्या इच्छुकाला नऊ महिने अयोध्या, काशी, नागपूर इत्यादी ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. जनजाती वस्ती असणाऱ्या परिसरात अनेकदा व्यसनांचे प्रमाण अधिक असते. चोऱ्या, मारामाऱ्याही होत असतात. अशा वेळी या संस्कारक्षम शिक्षणाचा उपयोग झाला असून अनेक गावे 75 टक्के व्यसनमुक्त झाली आहेत. काही ठिकाणी व्यसनातून मुक्त झालेले लोकच स्वत: सत्संग चालवत आहेत. साप्ताहिक पाठशाळेच्या माध्यमातून हे वर्ग भरवले जातात. भारतात आणि नेपाळमध्ये एकूण 55 हजार 883 ठिकाणी हे साप्ताहिक पाठशाळा वर्ग भरवले जातात. साप्ताहिक पाठशाळेत येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या आहे 14 लाख 96 हजार 502. या पाठशाळेत शिकलेल्या जनजाती समाजाच्या पुरोहितांना धार्मिक कार्यात पौरोहित्य करण्यासही बोलावले जाते. सामाजिक समरसतेची जी कल्पना मांडली जाते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

आजवर 25 लाख 34 हजार लोकांना एकल विद्यालय या उपक्रमाचा लाभ झाला असून नजीकच्या काळात एक कोटीचा आकडा पार करण्याचे आव्हान उपक्रम राबवणाऱ्यांनी घेतले आहे. परदेशातही या उपक्रमाचे कौतुक होत असून भविष्यात अफगाणिस्तानात हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. 

जनाधारावर चालणारे एकल विद्यालय

एक एकल विद्यालय चालवण्यासाठी आज सुमारे 20 हजार रुपये वार्षिक खर्च येतो. एकल विद्यालय हा उपक्रम आजही संपूर्णत: जनाधारावरच चालवला जात आहे. सरकारकडून यासाठी कोणतीही आर्थिक मदत घेतली जात नाही. ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या वनबंधू परिषद, एकल विद्यालय फाउंडेशन अशा संघविचाराच्या संस्था-संघटनांना मिळणाऱ्या देणग्यांच्या माध्यमातून भारतासह नेपाळमधील एकल विद्यालयांचा खर्च उचलला जातो. कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनेक तरुण एकल विद्यालयासाठी मदतकार्य करण्यास इच्छुक असतात. शहरी-निमशहरी जगाला या दुर्गम आणि अविकसित भागाशी जोडण्याचे काम वनबंधू, एकल विद्यालय यासारख्या संस्था करीत आहेत.

ईशान्य भारत आणि नेपाळसह संपूर्ण भारतात चालणाऱ्या या एकल विद्यालयांचे आणि ग्रामोत्थान रिसोर्स सेंटर्सचे कार्य निःसंशय मोलाचे आहे. मात्र देशाच्या संपूर्ण विकासासाठी अशा संस्थांची, संघटनांची संख्या वाढणे आणि समाजातील सर्व स्तर त्यात सक्रिय होणे आवश्यक आहे. एकमेकांच्या साथीने एकमेकांना समृध्द करणे हे देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल.

(विश्व संवाद केंद्र लेख विभाग)