उत्सवाचा स्वाद वाढवणारे आंबा मोदक

विवेक मराठी    07-Sep-2018
Total Views |

 आज आंबा मोदक म्हटलं की मामा देवस्थळी असं समीकरण घट्ट जुळलंय. लुसलुशीत, केशरी रंगाचं कळीदार आवरण आणि तोंडात चटकन विरघळून जाणारं आंबा स्वादाचं सारण... असे हे मामांचे उकडीचे आंबा मोदक गणेशोत्सवाचा आनंद कित्येक पटींनी वाढवतात.  उत्सवाच्या दहाही दिवस मामांकडे आंबा मोदकासाठी मोठी ऑर्डर असते.

विघ्नहर्ता गणपती आणि मोदक यांचं नातं अतूट आहे. मोद म्हणजे आनंद, त्यावरून मनाला आनंद देणाऱ्या या पदार्थाला मोदक नाव पडलं, असं मानलं जातं. म्हणूनच आनंददायी गणेशाला तो प्रिय असतो. कारण काहीही असो, बाप्पाच्या नैवेद्याची कल्पना या मोदकांशिवाय करणं शक्यच नाही. कारण बाप्पाइतकाच तो त्याच्या भक्तांनाही प्रिय असतो. त्यातही जर उकडीचा मोदक असेल, तर त्याची मौजच न्यारी! आणि जर तो डोंबिवलीच्या मामा देवस्थळींचा आंबा मोदक असेल, तर आहाहा!! ते लुसलुशीत, केशरी रंगाचं कळीदार आवरण आणि तोंडात चटकन विरघळून जाणारं आंबा स्वादाचं सारण... असे हे मामांचे उकडीचे आंबा मोदक गणेशोत्सवाचा आनंद कित्येक पटींनी वाढवतात. या मोदकाची चव आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी चाखली, त्यांना ती विसरता येणं शक्यच नाही. आज आंबा मोदक म्हटलं की मामा देवस्थळी असं समीकरण घट्ट जुळलंय, इतके उत्कृष्ट प्रतीचे हे मोदक असतात. उकडीचे आंबा मोदक बनवणारे मामा देवस्थळी हे पहिलेच आणि एकमेवच असावेत.

मामा देवस्थळी हे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते होते. त्यांचे धाकटे बंधू श्रीराम देवस्थळी हे या सर्व व्यवसायाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनाही सगळे मामा म्हणूनच संबोधतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्या व्यवसायामागे 'मामा देवस्थळी' हे बिरूद रूढ झाले. डोंबिवलीतील शास्त्री हॉल आणि त्यातील मामा देवस्थळींचं केटरिंग हा डोंबिवलीकरांच्या अभिमानाचा विषय. गेली 30 वर्षं श्रीराम मामा या हॉलमध्ये केटरिंगचा व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे शास्त्री हॉलमध्ये ज्या मुलींची लग्न झाली, त्या मुलींच्या मुला-मुलींची लग्नही याच शास्त्री हॉलमध्ये झाली. त्यांच्या नातवंडांची बारशी, मुंजीदेखील याच हॉलमध्ये झाल्या. त्यामुळे नवऱ्या मुलीच्या माहेरच्या माणसांबरोबरच सासरची माणसंही मामांशी जोडली गेली. मामा हे सर्व कौतुकाने सांगतात.

 

32 वर्षांपूर्वी या व्यवसायात येण्यापूर्वी मामांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या काळात गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि ग्राहकांच्या वाढत्या उधारीमुळे किराणा मालाचं दुकान बंद पडलं. पण उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला. केटरिंगच्या व्यवसायात असणाऱ्या एका मित्राने त्या वेळी मामांना केटरिंगची एक ऑर्डर मिळवून दिली. एका जनरल बोर्डाच्या मीटिंगसाठी 300 लोकांसाठी चहा आणि उपम्याची ऑर्डर होती. ते काम फत्ते झालं आणि तिथपासून या व्यवसायात ते उतरले. हळूहळू सर्व शिकत गेले. आज शास्त्री हॉल म्हटलं की प्रत्येक ग्राहकाला खात्री असते की, इकडे फक्त चांगलंच जेवण मिळतं. दर्जेदार म्हणजे फक्त शास्त्री हॉल. या कीर्तीमुळे त्यांना डोंबिवलीच्या बाहेरसुध्दा अनेक मोठमोठी कामं मिळाली. या सगळयासाठी त्यांनी कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं नव्हतं, हे विशेष. काम करत, इतरांचं बघत, वेगवेगळे प्रयोग करत ते शिकत गेले.

श्रीराम मामांचे सगळेच पदार्थ दर्जेदार असतात, तर आंबा मोदक हा विशेष जिव्हाळयाचा! जवळजवळ 15 वर्षं ते आंबा मोदक करत आहेत. या आंबा मोदकाच्या निर्मितीचीही एक गंमतच होती. मामा कोकणातले. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या त्यांच्या गावी आंब्यांची मोठी बागायती. मे महिन्याचा सीझन होता. घरच्या बागेत भरपूर आंबे लागले होते. त्या दरम्यान मोदकाची एक ऑर्डर त्यांना मिळाली. प्रज्ञा जोशी या त्यांच्या सहकारी. त्या म्हणाल्या, ''आपण एक प्रयोग करू या का? आंब्याचे मोदक करू या का?'' मग त्यांनी तो प्रयोग केला आणि अगदी बेमालूमपणे तो यशस्वीही झाला. त्या पार्टीलासुध्दा मोदकांचा हा 'टि्वस्ट' आवडला. मग काय! हळूहळू त्यात अधिकाधिक सुधारणा करत मामांचे आज सर्वदूर प्रसिध्द असलेले आंबा मोदक तयार झाले. केवळ डोंबिवलीतच नव्हे, तर मुंबईपासून ते थेट विरार-वसईपर्यंत आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात 'मामाज मोदक' प्रसिध्द आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून स्वरयंत्राच्या बिघाडामुळे श्रीराम मामांना बोलायला त्रास होतो. पण त्याचा त्यांनी आपल्या व्यवसायावर काहीही परिणाम होऊ दिला नाही. आजही ते तितक्याच उत्साहाने ग्राहकांशी संवाद साधतात. 

श्रीराम मामांकडे जवळजवळ रोजच आंबा मोदकांची ऑर्डर असते. वर्षाला साधारणपणे लाख ते दीड लाख आंबा मोदक विकले जातात. गणेशोत्सव हा तर मोदकांसाठीचा खरा सीझन. त्यामुळे उत्सवाच्या दहाही दिवस मामांकडे आंबा मोदकासाठी मोठी ऑर्डर असते. त्यांनाच अनेकांना नकार द्यायला लागतो. प्रत्येकाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेळेत मोदक हवे असतात. ते करणं साध्य होत नाही. क्वालिटी राखायची तर क्वान्टिटीकडे दुर्लक्ष करावं लागतं. पहिल्या दिवशी तर अधिकच अडचण होते. कारण सर्वांनाच मोठया संख्येने मोदक हवे असतात. सुरुवातीला 10-15 लोकच 100-200 मोदक घेऊन जायचे. त्यामुळे इतर लोकांना मोदक मिळत नसत. त्यावरून वादावादी होऊ लागली. मग गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी फक्त 21च मोदक प्रत्येकाला द्यायचे असा निर्णय मामांनी घेतला, जेणेकरून कोणालाही नाराज न करता प्रत्येकाला नैवेद्यासाठी मोदक देणं शक्य होईल. दुसऱ्या दिवसापासून मात्र जितके मोदक हवे तितके मिळू शकतात. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये साधारणत: 10 ते 11 हजार जास्तीचे मोदक करावे लागतात. ऑर्डर जास्त असली की मामा आणि प्रज्ञाताई रात्री 2 वाजता कामाला सुरुवात करतात.

मोदक नुसता बघूनच लोक मामांचा मोदक ओळखतात. गुणवत्तेच्या बाबतीत मामा आणि प्रज्ञाताई दोघंही जागरूक असतात. पहिला नंबर आला की जास्त काळजी घ्यावी लागते, गुणवत्ता जपावी लागते, हे मामांचं तत्त्व. या आंबा मोदकासाठी मिळालेला पहिला नंबर हातून जाऊ नये यासाठी त्यांची सगळी धडपड असते. मोदकांचा दर्जा राखण्यासाठी कुशल कारागीर लागतात. त्यांच्याकडच्या कारागीर महिला कोकणातीलच आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष मोदक केले असले-नसले तरी त्यांना उकडीच्या मोदकाविषयी बेसिक ज्ञान असतं. पण शास्त्री हॉलमध्ये त्या, पारी म्हणजे काय? ती कशी वळायची? त्याला किती करमळं काढायची? सारण कसे भरायचे? मोदक कशा पध्दतीने हाताळायचे? हे शिकत शिकत तरबेज होतात.

मात्र गणेशोत्सवाच्या वेळी किंवा मोठी ऑर्डर असल्यास कोणी नवखी महिला आली, तर लक्ष द्यावं लागतं. जर मामांना मोदक मनासारखा वाटला नाही, तर ते सरळ तो मोदक बाजूला ठेवतात.

 

मामा सांगतात, ''सारण कसं बनवायचं, उकड कधी कोणी काढावी, पारी कशी बनवावी या सगळयाकडे आमचं लक्ष असतं. आंबा मोदकाच्या ऑर्डरसाठी साधारण 8-10 महिला कर्मचारी असतात. प्रज्ञा व मी स्वत: अत्यंत उत्कृष्ट मोदक वळतो. समजा, एखादेवेळेस बायका आल्या नाहीत किंवा कमी असतील, तर सात-आठशे मोदक तर आम्ही दोघंच वळतो. नवव्या मिनिटाला एक या गतीने आम्ही मोदक तयार करतो. एखादा मोदक बिघडला तर का बिघडला याचा शोध आम्ही घेतो. सुरुवातीच्या काळात सतत काय सुधारणा कराव्या लागतील याकडे आम्ही लक्ष द्यायचो. आता मात्र त्याची गरज राहिली नाही, इतकी मोदक करण्याची सवय झाली आहे.''

या आंबा मोदकांच्या यशात प्रज्ञाताईंचाही मोलाचा वाटा आहे. प्रज्ञा जोशी 20 वर्षांपासून मामांसह काम करत आहेत. त्यांच्या गावी राजापूरलाही आंब्याच्या बागायती आहेत. त्यामुळे तिथूनही चांगला आंबा त्यांना मिळतो. मोदक वळण्यात प्रज्ञाताईंची हातोटी आहे. मामाही त्यांच्याकडूनच हे कौशल्य शिकले.

प्रज्ञाताई सांगतात, ''साध्या मोदकांपेक्षा आम्ही आंबा मोदकच अधिक बनवतो. आंबा मोदकाच्या बरोबरीने आमच्याकडची आंबा पुरणपोळी, आंबा पोळीदेखील प्रसिध्द आहे. आंबा पुरणपोळी हा प्रकारदेखील फारसा कोणाला माहीत नाही. आणि आमच्याकडच्या या पुरणपोळया अगदी खुसखुशीत असतात.''

या आंबा मोदकांसाठी ग्राहकांकडून मिळणारे प्रतिसादही भन्नाट असतात. डोंबिवलीतील एक मुलगी कोकण भवनमध्ये नोकरीला होती. तिचं लग् शास्त्री हॉलमध्ये झालं होतं. लग्ाला 600-700 मंडळी होती. जेवणात आंबा मोदक होते. तिच्या ऑफिसमधील काही लोकांना काही कारणामुळे लग्ाला येता आलं नव्हतं. मात्र त्यांनी इतरांकडून आंबा मोदकांचं कौतुक ऐकलं. त्यामुळे लग्ानंतर जेव्हा ती मुलगी ऑफिसला गेली, तेव्हा तिला 500 आंबा मोदक घेऊन जावे लागले. तेव्हापासून दर वर्षी कोकण भवनमध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते, तेव्हा ते लोक मामांकडून 1000 आंबा मोदक घेऊन जातात.

एकाने सांगितलं, ''मामा, मला सकाळी 10च्या सुमारास 1200 मोदक हवेत. माझ्या नातवाच्या मुंजीसाठी बारामतीला न्यायचे आहेत.'' सकाळी साडेनऊपर्यंत मामांनी त्याला 1200 मोदकांचं पॅकिंग करून दिलं. तो माणूस विमानाने बारामतीला मोदक घेऊन गेला. तिथून त्याने फोन करून सांगितलं, ''मामा, इथे फक्त तुमच्या मोदकाचंच कौतुक चाललंय.''

अगदी सेलिब्रिटींमध्येही मामांच्या या मोदकांची ख्याती आहे. जयंतराव साळगावकरांच्या घरी गणेशोत्सवात हेच मोदक असणार हे पूर्वीपासून ठरलेलं. आताही त्यांच्या गणेशोत्सवात प्रसादासाठी मामांचे मोदक असतात. अभिनेता अविनाश नारकर हेदेखील त्यांच्या नियमित ग्राहकांपैकी एक. त्यांच्याकडूनही अनेकदा मामांना आंबा मोदकांची ऑर्डर असते.

मामा एक किस्सा सांगतात, ''पंकजा मुंडेने कुठेतरी आमचे मोदक आणि पुरणपोळी खाल्ली होती. तिने त्याबद्दल चौकशी केली आणि तिला आमचं नाव कळलं. अमित शहा मुंबईत आले होते, त्यांच्यासाठी तिने 500 मोदकांची आणि 200 पुरणपोळयांची ऑर्डर दिली.''

असे कौतुकाचे, समाधानाचे अनेक क्षण या आंबा मोदकांनी मामांना दिले. या मोदकांनी अगदी परदेशापर्यंत मजल मारली आहे. कित्येक उत्सवाच्या, आनंदाच्या क्षणांना स्वादिष्ट करण्याचं भाग्य मामांच्या मोदकांना मिळालं. यामागे मामांचे कष्ट, सातत्य यांच्या जोडीला गणरायाचा आशीर्वादही आहेच.