मनस्विनी 'उर्वशी'

विवेक मराठी    01-Jan-2019
Total Views |

 

यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या 'उर्वशी' या कादंबरीचा परिचय.

   आपल्या कथा-कादंबऱ्यांतून आधुनिक विचारांच्या आजच्या काळातील स्त्री व्यक्तिरेखा रेखाटणाऱ्या नव्या प्रवाहातील अनेक साहित्यिकांचा आपल्याला परिचय असेल. अरुणा ढेरे या मात्र त्यापेक्षा एक पाऊल पुढेच राहिल्या. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील स्त्री पात्रे विशेषत: नायिका या पुराणकाळातील किंवा महाभारत-रामायण या महाकाव्यातील असल्या तरी त्याही तितक्याच आधुनिक, स्वतंत्र विचारांच्या आहेत. त्यांच्या स्व-भानाला सात्विकतेचे, संवेदनशीलतेचे कोंदण आहे. 'उर्वशी' हे त्याचे एक उदाहरण.

उर्वशी-पुरुरवा यांची प्रेमकथा ही वेद आणि पुराणांमध्ये अर्धवट, अस्पष्टरित्या सांगितलेली. त्यामुळे या कथेच्या वेगवेगळया आवृत्त्या वाचायला मिळतात. एक लावण्यवती अप्सरा आणि मर्त्य लोकातील राजा यांचे उत्कट प्रेम आणि या प्रेमाचा दुर्दैवी शोकांत हा कथेचा गाभा समान असला तरी संदर्भात, उपकथानकात विविधता पहायला मिळते. अरुणा ढेरेंच्या 'उर्वशी'त मात्र या प्रेमकथेइतकेच उर्वशीचे व्यक्तिमत्त्व साकारण्यावरही भर दिलेला आहे. उर्वशीची सखी चित्रलेखा, इंद्रदेव, पुरुरवा आणि स्वत: उर्वशी यांच्या निवेदनातून ही कहाणी आणि उर्वशीचे व्यक्तिमत्त्व दोन्हीही उलगडत जाते. या कहाणीतील उर्वशी ही रूपगर्विता अप्सरा असली तरी अप्सरांच्या चौकटीत बसणारी नाही. तिची स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती, संवेदनशील मन, तिचा मानी स्वभाव, स्वत:च्या सौंदर्याविषयी असलेली जाण आणि त्याचवेळी स्त्री म्हणून असलेले आत्मभान ही सर्व वैशिष्ट्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवतात.

उर्वशी वगळता या कादंबरीतील अन्य सर्व निवेदक तिला जवळून अनुभवणारे आहेत. त्यांच्या आयुष्यात तिची वेगवेगळी भूमिका आहे. तिच्या सौंदर्याचा, स्वभावाचा, व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर विशिष्ट प्रभाव आहे. उर्वशीविषयी त्यांच्या मनात आकर्षण, आत्मियता, आदर आहे.

चित्रलेखा ही इंद्रलोकातील कमी प्रतिष्ठित अप्सरांपैकी. इंद्रावर मनापासून प्रेम करणारी आणि त्याच्या अनुकंपेसाठी झुरणारी. त्यामुळेच इंद्राला प्रिय असलेल्या तिच्या जीवलग सखीविषयी-उर्वशीविषयी तिच्या मनात नकळत डोकावणारी ईर्शा आहे. पण त्यात मत्सरी भाव नाही. कारण अन्य अप्सरांच्या तुलनेत उर्वशीची मनस्वी वृत्ती तिला जाणवते आणि प्रभावितही करते. तिला उर्वशी म्हणजे आनंदनायकी वाटते. उर्वशीच्या अंतर्बाह्य सौंदर्याचं चित्र तीच अधिक ठळकपणे उध्दृत करते. अनेकदा उर्वशीच्या वेगळया विचारांचं तिला आश्चर्य वाटतं. विचारभिन्नता असली तरी, त्यात तिरस्कार नसतो. उलट सख्यभावातून वाटणारी काळजी असते.

इंद्राची राजकारणी वृत्ती, सत्तालालसा आणि त्यातून वाटणारी भीती याचा उर्वशीला तिटकारा आहे. त्याच्या इच्छेपुढे आपले शरीर उधळून लावणे तिला अपमानकारक वाटते. तर इंद्रासाठी उर्वशी ही इतर अप्सरांपेक्षा जवळची वाटणारी प्रेयसी आहे. त्याला तिच्या सौंदर्याच, बुध्दिमत्तेचे आकर्षण आहे. उर्वशीची  बलस्थाने त्याची व्यावहारिक दृष्टी अचूक टिपते, पण तिच्या मनस्वी, मानी स्वभावापुढे त्याच्या अधिकाराचे अस्त्र निकामी ठरते.  देवराज म्हणून स्वत:च्या अधिकारांबाबत कठोर असणारा इंद्र अखेर उर्वशीच्या स्वभावापुढे मृदू होता. तिच्याकडे दासी म्हणून पाहण्याऐवजी सखी म्हणून तिचा स्वीकार करतो. राजकीय षडयंत्रातील सहभागाची तिची निरिच्छा लक्षात घेऊन तिला त्यापासून दूर ठेवतो, तिच्यावरील बंधने शिथिल करतो. उर्वशीला अभिप्रेत असलेलं प्रेम त्याला समजत नसलं तरी तिच्या मागण्यांचा तो आदर करतो, पुरुरवा आणि उर्वशी यांचं परस्परांकडे आकर्षित होणंही तो समजून घेतो. हे सर्व इंद्राच्याच शब्दात मांडताना अरुणाताई त्याच्या स्वभावातील वर्चस्ववादी परंतु व्यावहारिक वृत्ती सहज जाणवू देतात. उर्वशीला पुरुरवासोबत पृथ्वी लोकी पाठवण्याचा त्याचा निर्णय हा समंजसपणाचा असला तरी त्यातही त्याची स्वाभाविक राजकारणी वृत्ती डोकावत असते.

पुरुरवा हा पृथ्वीवरचा पराक्रमी राजा. इंद्राला युध्दात मदत केल्याने स्वर्गलोकीच्या आदरातिथ्याचा सन्मान त्याला मिळतो. उर्वशी आणि पुरुरवा पहिल्याच भेटीत एकमेकांवर अनुरुक्त होतात आणि हळूहळू एकमेकांमध्ये गुंतून जातात. उर्वशी ज्या प्रेमाच्या शोधात असते, ते तिला पुरुरवामध्ये सापडतं. त्या अद्भुत प्रेमाला शाश्वत कोंदण देण्यासाठी पुरुरवा उर्वशीला स्वत:सोबत पृथ्वी लोकी नेण्यासाठी इंद्राची अनुमती मागतो. तिच्याशी लग्नही करतो. मात्र पृथ्वीतलावर त्याला हळूहळू सांसारिक वास्तवतेचं भान येऊ लागतो. आपल्या नश्वर मानवी देहाची आणि उर्वशीच्या स्वर्गीय चिरकालीन सौंदर्याची तुलना करून तो अस्वस्थ होतो. त्याची आगतिकता, उर्वशीपासून दूर होण्याची भीती हे त्याच्या निवेदनातून जाणवतात.

उर्वशीचे निवेदन हे सर्वात लहान आणि शेवटचे. पुरुरवाच्या आयुष्यातून तिच्या अचानक नाहिसे होण्याच्या रहस्याचा भेद करणारे. नियतीच्या क्रूर खेळाने उध्दवस्त झालेली उर्वशी, देवेंद्रांच्या निर्दयी सत्ताकारणाने विध्द झालेली उर्वशी, आपल्या प्रियकराच्या आणि नवजात बाळाच्या विरहानं पोळलेली उर्वशी, वचनभंगाच्या अपराधी भावनेने दबलेली उर्वशी या शेवटच्या चारच पानांमध्ये भरून उरते.

या मुख्य निवेदकांइतकेच गंधर्व रसवर्धन, इंद्राज्ञी शची, मेनका, भरतमुनी, राणी औशिनरी ही उपपात्रेही या छोट्याच्या कथानकात महत्त्वाची भर टाकतात.

अवघ्या 76 पानांची ही कादंबरी म्हणजे शब्दशारदेचा उत्सवच आहे. वि.स. खांडेकरांच्या अलंकारिक शैलीचे स्मरण त्यात होतंच, त्याचबरोबर वडील रा. चिं. ढेरे यांच्या संशोधक वृत्तीचा अरुणाताईंनी जपलेला वारसाही त्यात जाणवत राहतो. पण त्यामुळे कादंबरीला कुठेही बोजडपणा येत नाही. उलट सहजता-सुगमता हे तिचं वैशिष्टय आहे.

देव, दानव, यक्ष, गंधर्व, अप्सरा आदी अमर्त्य व्यक्तिमत्त्वांना पृथ्वीवरील मर्त्य जीवनाचे असलेले आकर्षण किंवा त्यांना असलेला मानवी स्वभाव वैशिष्टयांचा स्पर्श यातून अनेक पुराणकथांचा जन्म झाला. उर्वशीच्या कथेचा जन्मही त्यातूनच झाला असावा. अरुणाताईंच्या 'उर्वशी'त अतार्किक शर्तींचा आणि त्यामुळे घडणाऱ्या तितक्याच अतार्किक घटनाक्रमांचा भाग जाणीवपूर्वक वगळून या कथेला तर्कसुसंगत रूप देण्यात आले आहे. त्यामुळेच ती अधिक भावते.

आकाश आणि पृथ्वी यांचे मिलन हे प्रेमाचे सृष्टीतील सर्वोच्च रूप मानले जाते. कारण ते जवळजवळ अशक्य, केवळ क्षितिजासारख्या काल्पनिक रूपातच ते शक्य होते. उर्वशी आणि पुरुरवा यांच्या प्रेमाला म्हणूनच अरुणाताई या स्वर्ग-धरेच्या मिलनाची उपमा देतात.  त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, ''उर्वशी आणि पुरुरवा यांचे अखंड मीलन म्हणजे स्वप्नच. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या एकत्र येण्याचे असे स्वप्न  मानवजातीने वारंवार पाहिले आहे; आणि त्या अद्भुत क्षणाची नुसती कल्पनाच इथे सर्जनाचे इतिहास घडवणारी ठरली आहे.

एखादी वेळ, जेव्हा कुणाच्या तरी मनात आभाळ खाली झुकून मातीच्या ओठांना भिडते.

एखादी वेळ, जेव्हा चिरंतनाचे हात अशाश्वताच्या गळयात पडतात.

एखादीच वेळ... पण ही अशी एखादीच वेळ या प्रेमिकांच्या नावावर असते. त्यांच्या विरहाला आणि मीलनाला कोणत्याही शपाची किंवा वराची जरुरीच नाही, असे मला वाटले.''

'उर्वशी'च्या प्रस्तावनेत अरुणाताईंनी अलौकिक प्रेमासाठी व्यक्त केलेला हा आशावाद या कथेच्या शोकांतालाही शाश्वत जीवनगाणे बनवतो.