संविधान हेच सर्वोच्च - रमेश पतंगे

विवेक मराठी    01-Jan-2019
Total Views |
 

पिंपरी-चिंचवड ः ''समाजात शेतकरी, कामगार, व्यापारी असे विविध प्रकारचे वर्ग असतात. एका वर्गाचे हितसंबंध दुसऱ्यासाठी बाधा आणत असतात. म्हणूनच या सर्वांशी समन्वय, संतुलन राखण्याचे काम राज्यघटनेला करावे लागते. अर्थात हे काम निवडून दिलेले प्रतिनिधी करत असतात. संविधान हेच सर्वोच्च असते.'' असे प्रतिपादन हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे गुरुवार, दि. 6 डिसेंबर 2018 रोजी 'आम्ही आणि आमचे संविधान' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात पतंगे यांनी संविधानाविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. या वेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे यांनी रमेश पतंगे, दलित इंडस्ट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडियाचे अध्यक्ष, पद्मश्री मिलिंद कांबळे, पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुनील कडुसकर या मान्यवरांचा सन्मान केला.

पतंगे म्हणाले की राज्य तयार होण्यासाठी भूमी, जन, सरकार व सार्वभौमत्व एकत्रित यावे लागते. म्हणूनच संसदीय लोकशाहीतील व अध्यक्षीय लोकशाहीतील चांगल्या गोष्टी घेऊनच भारतीय संविधान तयार झाले आहे आणि हे काम फ क्त भारतीय मनच करू शकते, अशी पावती विदेशी विचारवंतांनीही दिली आहे. घटनेत दर्जाची व संधीची समानता हे तत्त्व मान्य केल्याने जे अजूनही संधीच्या पातळीवर पोहोचलेले नाहीत, अशांसाठी वेगळी तरतूद व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

''डॉ. आंबेडकर हे जसे घटनातज्ज्ञ होते, तसे ते व्यावहारिक अर्थतज्ज्ञही होते. समाजात आर्थिक समता यावी यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या इच्छेचा आदर करत डिक्की ही संस्था हेच कार्य करत आहे'' असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

या प्रसंगी समितीतर्फे 'आम्ही आणि आमचे संविधान' या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सीमा चतुर आखाडे (प्रथम क्रमांक), सविता पाठक व वनिता जोरी (विभागून द्वितीय द्वितीय), प्रमोदिनी बकरे (तृतीय क्रमांक), स्मिता जोशी (उत्तेजनार्थ) यांनी स्पर्धेत क्रमांक मिळविला.

रमेश पतंगे लिखित 'आम्ही आणि आमचे संविधान' या पुस्तकाचे प्रा. दिगंबर ढोकले यांनी रसग्रहण केले. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून संविधान साक्षर करण्याची क्षमता या पुस्तकात असल्याचे ते म्हणाले. गिरीश प्रभुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समितीचे विश्वस्त मिलिंदराव देशपांडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विनायकराव थोरात, मधुसूदन जाधव, अशोक पारखी, रवींद्र नामदे, शरद जाधव, संजय कुलकर्णी, सुनीता शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सरला पाटील यांनी बुध्दवंदना सादर केली. शांतिरामजी भोईर यांनी आभारप्रदर्शन केले.